Login

सोनचाफा 7

एका खूनाचा शोध. रहस्यकथा
सोनचाफा 7
अनिकेत मात्र त्याचे सगळे आवरून रूममध्ये जाऊन बसला. त्याला बऱ्याच गोष्टी अस्वस्थ करत होत्या. 'एक तर ओवी या घरात नवीन आली होती तेव्हाच तिने सांगितले होते की, तिचे लग्नाआधी एका मुलावर प्रेम होते. मग तो मुलगा कोण असेल? त्याचा या खुनाशी काही संबंध असेल का? असा विचारही त्याच्या मनात येऊन गेला. छे छे! तो मुलगा कसा काय असेल? कदाचित दुसरे कोणी असू शकते. पण हे जर ओवीने केले असेल तर तिने असे का केले असेल? तिच्या मनामध्ये नक्कीच काहीतरी सुरू असेल.' असा विचार करत अनिकेत रूममध्ये बसला होता.

तो दिवस अजूनही लख्ख आठवतोय. आम्ही ओवीला बघायला तिच्या घरी गेलो होतो. अनिकेतने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट घातला होता. डोळ्यावर गॉगल, हातामध्ये मनगटी घड्याळ, शूज वगैरे घालून तो ओवीला पाहण्यासाठी तिच्या घरी गेला होता. अनिकेत, त्याची आई आणि त्याचे मामा असे तिघेजण ओवीला पाहण्यासाठी गेले होते. खरंतर अनिकेत या लग्नाला मुळीच तयार नव्हता. त्याला अजून एखादा वर्ष पुढे करिअर करायचे होते आणि त्यानंतरच लग्न करावे असे त्याने ठरवले होते.

"काय हे आई, माझ्या लग्नासाठी इतकी का घाई करत आहेस? अगं, माझ्या वयाची मुलं अजूनही लाईफ एन्जॉय करत आहेत. मी लाईफ एन्जॉय करावं असं तुला वाटत नाही का? अगं एकदा का होईना त्या लग्नाच्या बेडीत अडकलं की झालं; पुढे काहीच करता येत नाही. तू समजून घे ना मला." अनिकेत आईला विनवत होता.

"तुझं सगळं पटतंय मला; पण मलाही एकटीला घरात करमत नाही. सोबतीला सून असली की, आम्ही दोघी मिळून मजा करू. ती माझी लेक म्हणूनच या घरात येईल. एका मुलीला आई जसे ठेवते तसेच मी तिला ठेवेन. मला मुली नाहीत. तूच एकटा मुलगा आहेस. मुलगी व्हावी असे मला खूप वाटत होते; पण मुलगी झाली नाही म्हणून मी माझ्या सुनेचे खूप गोड कौतुक करणार आहे. तिचे सगळे लाड पुरवणार आहे; त्यामुळे तू कोणतेही कारण सांगायचे नाहीस. आता लगेच लग्नाला तयार व्हायचे आहेस." आई अनिकेतला समजावत होती.

"अगं आई, तुला करमत नाही तर तू गार्डनमध्ये जा, योगा कर, व्यायाम कर, फिरायला जा, कुठेतरी टूरला जा, भिशी कर. तुझ्या मैत्रिणी तर आहेतच ना. तुला करमत नाही म्हणून तू माझ्या हातात का बेड्या घालत आहेस?" अनिकेत आईला म्हणाला.

"मला असे वाटते की, ज्या त्या गोष्टी त्या त्या वयात व्हायला हव्यात आणि एखादा वर्ष म्हटलं तरी तुझे वय वाढते आणि मग तुला कोण पोरी देणार? एकदा का वय वाढले की कोणी पोरी द्यायला तयार होत नाहीत; त्यामुळे ज्या गोष्टी त्या वेळेलाच घ्यायला हव्यात असे माझे ठाम मत आहे." अनिकेतची आई ठामपणे म्हणाली.

"अगं आई, एका वर्षांनी मी काही म्हातारा होणार नाहीये. ऐक ना. एक वर्ष तरी थांब. पुढच्या वर्षी पाहूया आणि तू म्हणशील त्याच मुलीशी मी लग्न करणार आहे. तसेही मुलीबद्दल माझ्या काहीच अपेक्षा नाहीत. शेवटी तुझे आणि तिचे जमावे असे मला वाटते. तुम्ही दोघीच जास्त एकत्र राहणार आहात. त्यामुळे तूच ठरव; पण आता नको." अशाप्रकारे तू तू दोघांचे नेहमी सुरू होई; पण अनिकेत मात्र लग्नाला तयार होत नव्हता. अनिकेतच्या आईने स्थळ पाहण्यास सुरुवात केली होती; पण अनिकेत मुली पहायला जायला तयार होत नव्हता. अशातच एक घटना घडली.

एके दिवशी अनिकेत ऑफिसला गेला असताना त्याची आई घरात एकटीच होती. भांडीवाल्या मावशी भांडी धुण्यासाठी आल्या होत्या. अनिकेतची आई हाॅलमध्ये पेपर वाचत बसली होती. भांडीवाल्या मावशीची कामे झाल्यानंतर त्या जायला निघाल्या. त्या जाणार म्हणून पुन्हा दरवाजा लावून घ्यावा या उद्देशाने अनिकेतच्या आई खुर्चीतून उठल्या; तोच त्यांचा तोल जाऊन त्या धाड्कन खाली पडल्या. त्यांना थोडी चक्कर आली होती; तेव्हा भांडीवाल्या मावशी घरातच असल्याने त्यांनी लगेच अनिकेतला फोन लावला आणि त्या दवाखान्यात घेऊन गेल्या. अनिकेत तिकडूनच डायरेक्ट दवाखान्यात आला. अनिकेतच्या आईची चेकिंग केल्यावर समजले की, त्यांची शुगर खूप वाढली होती. त्यांनी कामवाल्या मावशीचे खूप आभार मानले; कारण त्यावेळी जर त्या नसत्या तर आईचे काय झाले असते? असा विचार अनिकेतच्या मनात आला आणि तेव्हाच त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला.

अनिकेत लग्नाला तयार झाला आहे म्हटल्यावर अनिकेतच्या आईने वधू परीक्षण सुरू केले. तिने वधू वर संस्थेमध्ये अनिकेचे नाव नोंदवले आणि तिच्याकडे बऱ्याच मुलींचे फोटो आले होते. त्यातून तिने ओवीचा फोटो पाहिला आणि तिला ओवी पसंत पडली. जेव्हापासून तिने ओवीचा फोटो पाहिला होता तेव्हापासून ती अनिकेतच्या पाठीमागे लागली होती. अनिकेत आईसाठी कसाबसा तयार झाला होता आणि फायनली त्यांचा बघण्याचा कार्यक्रम ठरला.

अनिकेतच्या आईने मुलीकडील सर्व माहिती मिळवली होती आणि मुलीला पाहण्यासाठी अनिकेत, त्याची आई आणि मामा असे तिघेजण गेले. त्या घरामध्ये भरपूर लोकं होती. ओवी ही एकत्र कुटुंबात राहत होती. त्यांचे खूप मोठे कुटुंब होते. काका, काकू, आजोबा, आजी, आई-बाबा असा मोठा परिवार होता. अनिकेतच्या घरामध्ये अनिकेची आई आणि अनिकेत असे दोघेच राहत होते; त्यामुळे त्या घरामधील गलबला पाहून त्यांना खूप बरे वाटले. एकत्र कुटुंबात किती मज्जा असते असेही अनिकेतला वाटून गेले. त्यांच्यासोबत ओवीचे आजी आजोबा, बाबा आणि काका हे बोलत बसले होते. ओवी तिचे आवरून येत होती. इकडे पाहुणे आले आहेत म्हंटल्यावर ओवीची खूपच धांदल उडाली होती. एकतर तिला हे लग्न करायचे नव्हते. त्यातच घरच्यांनी तिच्यावर प्रेशर टाकले होते. मनात एक व्यक्ती असणार आणि संसार दुसऱ्याबरोबर करायचा हे तिला पटत नव्हते. घरातून पळून जावे की काय असाही विचार तिच्या मनात येऊन गेला; पण शेवटी आई-वडिलांच्या इज्जतीचा प्रश्न होता त्यामुळे ती शांत झाली. पुढचे परिणाम बघण्याची तिच्यामध्ये शक्ती नव्हती; त्यामुळे तिने पण जाण्याचा विचार कॅन्सल केला. एकदा तिने तसा प्रयत्नही केला होता; पण जायच्या आधी तिच्या डोळ्यासमोर तिचे आई-बाबा आले आणि ती शांत झाली.

आज हे अनिकेतचे स्थळ आले होते. तिने तिची सारी काही तयारी केली होती; पण तिच्या चेहऱ्यावरील हसू मात्र कुठेतरी हरवले होते. जेव्हा तिचे प्रेम प्रकरण घरात समजले तेव्हा सर्वांच्याच रागाला तिला सामोरे जावे लागले होते आणि तेव्हापासूनच तिच्या चेहऱ्यावरील हसू मावळले होते. स्वतःही खुलून हसणारी आणि दुसऱ्याला खळखळून हसवणारी ओवी आता शांत शांत राहत होती. तिच्या अशा चेहऱ्याकडे घरच्यांना पहावेना म्हणूनच त्यांनी लग्नाचा घाट घातला. एकदा का ती संसारात रमली तर ते मोकळे झाले असे त्यांना वाटत होते.

बाहेर सगळेजण बोलत बसले होते. आता ओवीला पाहण्यासाठी सगळेजण आतुर झाले होते. ओवी देखील छान पिवळी साडी नेसून, गळ्यात छोटे नेकलेस, कानामध्ये छान असे झुमके, हातामध्ये एक एक बांगडी आणि केसांमध्ये माळलेला सुगंधित मोगऱ्याचा गजरा अशी नटून थटून आली होती. अर्थातच हे सगळे तिने परिधान केले होते; पण तिला नटवले तर तिच्या आईने आणि अनघानेच होते. ओवीच्या त्या पाहुण्यांसमोर आली तेव्हा अनिकेत तिला पाहतच बसला. त्याला ओवी पाहताक्षणी प्रचंड आवडली होती. आजपर्यंत इतक्या मुली त्याच्या अवतीभवती होत्या. शाळा, कॉलेज, ऑफिस सगळीकडे; पण अशा मुलीला त्याने कधीच पाहिले नव्हते. ओवी पाहताक्षणीच त्याला आवडली होती हे तिच्या आईने जाणले होते. अनिकेत तर तिच्या चेहऱ्यावरून इतरत्र पाहायला तयारच नव्हता. तो एकटक तिच्याकडे पाहत होता. ओवी मात्र अवघडून त्या सर्वांसमोर जाऊन बसली होती. अचानक स्थळ, पाहण्याच्या कार्यक्रमामुळे तिला खूप अवघडल्यासारखे वाटत होते. ती हाताची बोटे एकमेकात गुंफत मान खाली घालून बसली होती. कोणी काही प्रश्न विचारतील तिकडे मात्र तिने लक्ष ठेवले होते; पण कोणीच काहीच तिला विचारले नाही.

"ओवी बाळा, एकदा मुलाकडे पाहून घे. म्हणजे मुलगा तुला पसंत पडला की पुढच्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही." असे अनिकेतच्या आईचे बोलणे ऐकून तिने वर पाहिले. तिने अनिकेतकडे एक नजर फिरवली आणि अनिकेतही तिच्याकडे पाहून घायाळ झाला; पण एक गोष्ट मात्र त्याला खटकली.

यापुढे काय होईल ते वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा.
क्रमशः

© प्रियांका अभिनंदन पाटील.
फोटो क्रेडिट: पूजा चौगुले.

0

🎭 Series Post

View all