Login

सोनचाफा 8

एका खूनाचा शोध. रहस्यकथा
सोनचाफा 8
ओवी आणि अनिकेतची नजरानजर झाली. इतका वेळ तिला पाहण्यासाठी आतुर असलेला अनिकेत आता मात्र थोडासा नर्व्हस झाला. तिला पाहण्यासाठी त्याचे मन प्रफुल्लीत झाले होते; पण आता मात्र तिच्या डोळ्यांमध्ये त्याला प्रचंड वेदना जाणवल्या. काय असतील तिला वेदना? ती खरंच या लग्नाला तयार असेल का की तिला आणखी काही बोलायचे होते? तिला माझ्याशी खूप काही बोलायचं होते असे त्याला वाटले; पण काय हे मात्र सांगू शकले नाही. आता मात्र त्याचे मन अस्वस्थ होऊ लागले होते. त्याला तिच्याशी बोलायचे होते पण कसे हा प्रश्न त्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता. आईला बोलून दाखवावे असे त्याला वाटले; पण इतक्या सर्वांसमोर ती इच्छा कशी प्रकट करायची असे म्हणून तो शांत झाला.

चहा पोह्याचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. अनिकेत देखील त्याच्या घरच्यांशी भरपूर बोलत होता. त्याला सर्वांशी बोलताना तसे काहीच जाणवले नाही; पण ओवीकडे पहिल्यांदा पाहिल्यानंतर मात्र तिच्या डोळ्यांमध्ये वेदना जाणवल्या होत्या. त्यानंतर जेव्हा तिने त्याच्याकडे पाहिले आणि ती त्याच्याशी बोलू लागली तेव्हा मात्र त्याला तसे काही जाणवले नाही. कदाचित तो माझा भ्रम असेल असे म्हणून त्याने मनाला समजावले आणि तो पुन्हा सर्वांची व्यवस्थित बोलू लागला.

पाहण्याचा कार्यक्रम अगदी व्यवस्थित पार पडला. दोन्ही कडील मंडळींना दोघेही पसंत पडले होते. अनिकेतला तर कधी एकदा ओवी त्याच्या घरी येते असे झाले होते. अनिकेतच्या आईला देखील ओवी खूप आवडली होती. ओवी तशी होतीच मुळात. अगदी गोड, सालस, समोरच्याला आपलंसं करण्याची कला तिच्यामध्ये उपजतच होती. ती अगदी गोड बोलून समोरच्या व्यक्तीला आपलंस करून घेत होती. आपसूकच समोरची व्यक्ती तिच्याकडे ओढली जायची. तिच्या त्या निखळ हसण्यात समोरच्या व्यक्तीला एक वेगळाच आनंद मिळायचा. तिच्या दिसण्यापेक्षा तिचे हसू खूप सालस होते. ती पाहून एकदा हसली की समोरची व्यक्ती तिच्याकडे आपसूकच ओढली जायची. तसेच काही क्षण अनिकेतचे झाले होते. जेव्हापासून तो ओवीला पाहून आला होता तेव्हापासून त्याच्या मनामध्ये तिचेच विचार सुरू होते. त्याने लगेचच त्याच्या आईला त्याची पसंती कळवली होती. "आतापर्यंत तर लग्न करणार नाही असे म्हणत होतास; पण पहिल्यांदाच मुलगी पाहून आल्यावर मात्र लगेच पसंती दर्शवली. काही विशेष?" असे म्हणून अनिकेतची आई त्याला चिडवत होती. तो मात्र गालातच हसून निघून जायचा. त्याला ओवी मनापासून खूप आवडली होती हे त्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते, म्हणूनच त्याच्या आईने लगेचच लग्नाचा घाट घातला.

त्याच महिन्यात त्या दोघांचा साखरपुडा झाला आणि लगेचच लग्नाची तारीख ठरली. लग्न हे ओवीच्या घरच्यांनी करून देण्याचे ठरले. अनिकेतच्या इकडे मनुष्यबळ अजिबातच नव्हते; त्यामुळे लग्नाची सारी तयारी त्यांच्या दोघांच्याने होणे शक्य नव्हते म्हणून ओवीच्या घरच्यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. तसेही लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन असले तरीही ते दोन नात्यांचे संगम असते. दोन्हीकडच्यांनी थोडे थोडे पाऊल पुढे टाकत हा सोहळा पूर्ण करायचा असतो. ओवीच्या घरचेही खूप चांगले होते. सगळेजण अगदी हसतमुख आनंदाने सारे काही जबाबदारीने करत होते. त्यांनी लग्नाची जबाबदारी ही तितक्याच जबाबदारीने घेतली होती. ओवीच्या घरात एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे प्रत्येक जण एकेक जबाबदारी वाटून घेतली होती; पण ओवीच्या आणि अनिकेतच्या मतानुसार हे लग्न अगदी साध्या, घरगुती पद्धतीने करण्याचे ठरवले. या लग्नामध्ये कोणताही आहेर द्यायचा नाही असे त्यांनी ठरवले होते; त्यामुळे फक्त लग्नाच्या दोन साड्या ओवीसाठी आणि अनिकेतसाठी शेरवानी इतकेच कपडे काढण्यात आले होते. वायफळ खर्च करणे हे दोघांनाही आवडणारे नव्हते. खरे म्हणजे ओवी जरी शांत शांत असली तरी तिच्या लग्नाबाबतच्या ज्या काही अपेक्षा होत्या त्या अनघाला चांगल्याच माहीत होत्या; त्यामुळे तिने पुढाकार घेऊन सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. लग्नामध्ये ओवीला लाल रंगाचा शालू देण्यात आला होता. तो रंग तिच्या गोरापान देहावर खूपच खुलून दिसणार होता आणि अनिकेतने गुलाबी रंगाची शेरवानी घेतली होती.

ओवी आणि अनिकेत दोघेही लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर गेले होते; पण ओवी मात्र शांत शांतच होती. तिचा असा शांतच स्वभाव असेल असे म्हणून अनिकेत तिला हसवण्याचा, खुलवण्याचा खूप प्रयत्न करत होता; पण काही केल्या ओवी बोलायला तयार नव्हती. कशी बोलणार? तिचे मन तर दुसऱ्या कोणामध्ये तरी गुंतले होते आणि ते जर अनिकेतला बोलून दाखवले असते तर आज घरच्यांच्या रागाला तिला सामोरे जावे लागले असते. तो रागही तिने कसाबसा सहन केला असता; पण तिचे बाबा हे हार्टचे पेशंट होते, आजोबांची तब्येत बरी नसायची, सगळी जबाबदारी तिच्या काकांवर होती. या सगळ्यांचे चेहरे जेव्हा तिच्या नजरेसमोर येत होते तेव्हा मात्र ती काहीच करू शकत नव्हती; कारण सुरुवातीपासूनच स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या सुखामध्ये आनंद मानणारी ओवी आता याक्षणी स्वतःचा विचार कसा करू शकणार होती? तिने कितीही प्रयत्न केला तरी या सगळ्या गोष्टी ती अनिकेतला सांगू शकणार नव्हती; त्यामुळे काहीही न बोलता शांत राहणेच तिने पसंत केले होते.

साखरपुडा अगदी साध्या पद्धतीने फक्त दोन्ही घरातील मंडळी इतकेच असतील इतक्या साध्या पद्धतीने पार पडला. तो घरच्या घरी ओवीच्या घरामध्येच करण्यात आला. लग्न मात्र काही जवळच्या पाहुण्यांना सांगून करावे असे अनिकेतच्या आईची इच्छा असल्याने फक्त जवळच्या काही पाहुण्यांना लग्नासाठी सांगण्यात आले होते. ओवीकडील पाहुणे मंडळीचा राबता खूप मोठा होता. अगदी सर्वांना सांगणे शक्य नव्हते; त्यामुळेच त्यांनी अगदी थोडक्यात लग्न करायचे असा निर्णय घेतला होता. त्यात घरामध्ये अजून बरीच मुले लग्नाची होती. एकीसाठीच तर इतका खर्च केला तर बाकीच्यांचे लग्न करण्यासाठी खूप मोठी रक्कम जमा करावी लागेल असा विचारही त्यांनी केला होता; त्यामुळे अगदी थोड्याच लोकांत पण रीतसर त्या दोघांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला होता. अनिकेतला देखील अगदी धूमधडाक्यात लग्न करण्यापेक्षा साध्या पद्धतीने मोजकेच लोकं बोलावून लग्न करायचे होते. त्याला देखील त्यांची ही कल्पना आवडली होती. तसे अनिकेतकडे खूप काही पाहुणे मंडळी नव्हती. फक्त आईच्या माहेरचे आणि अनिकेतच्या ऑफिस मधील काही मंडळी इतकाच त्यांचा राबता होता; त्यामुळेच तर लग्नाचा घाट हा ओवीच्या कुटुंबाने करावा असे त्यांनी सांगितले होते.

साखरपुडा झाल्यापासून पंधरा दिवसाच्या अंतराने लग्नाची तारीख ठरली होती; पण ओवीच्या चेहऱ्यावर मात्र लग्नाचा एक वेगळाच आनंद असा उठून दिसत नव्हता. तिचा चेहरा असा नर्वस झाला होता. लग्नाची हळद अंगाला लागली की तिचा चेहरा खुलून दिसेल असे सगळेजण म्हणत होते. अनिकेतने देखील या पंधरा दिवसात तिला भेटण्यासाठी बोलावले होते; पण ती घरच्यांची नावे सांगून त्याला भेटण्याचे टाळत होती कारण बोलण्याच्या ओघात त्याच्याशी सारे काही बोलून जाईल अशी भीती दिला होती. शिवाय अविश्वासाच्या बळावर सुरू होणारे हे नाते पुढे किती दिवस टिकेल याची तिला शाश्वती नव्हती. अर्थातच तिचे भूतकाळ तिच्यापासून दूर जात नव्हते आणि येणाऱ्या भविष्याची तिला ओढ लागत नव्हती. अशा द्विधा मनःस्थितीत ती मात्र लग्नाची तयारी नाराजीने का होईना; पण करत होती.

पंधरा दिवसात अनिकेतचा ओवीला रोज फोन यायचा; पण ती हाय हॅलो करून बोलून लगेच फोन ठेवायची. अनिकेतशी बोलण्यात तिला अजिबात इंटरेस्ट नव्हता. तसेही त्याच्याशी काय बोलायचे हा प्रश्न तिच्या मनामध्ये असायचा. खरंच आहे ना? मन एकामध्ये गुंतले असेल तर ते दुसऱ्यामध्ये लगेच गुंतेल असे सांगता येत नाही. ओवीचेही तसेच झाले होते. खरंतर अनिकेतसोबत तिला रमायला खूप वेळ लागणार होता. तिने सुरुवातीला तिच्या प्रियकराला बाजूला लोटले पाहिजे. त्याचा विचार बंद करायला हवा. त्याला मनातून काढून टाकून नव्या वाटचाली स्वीकारायला हव्यात. पण हे लगेच शक्य होईल का? तिच्या घरच्यांनी देखील तिच्या मनाचा विचार करून त्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा होता. या लग्नाचा घाट लगेचच घालायला नको होता. ओवीच्या मनातून अजूनही प्रियकरचा विचार गेला नाही तर ती इथे या लग्नात कशी रमेल? याचा विचार त्यांनी करायला हवा होता. पण घरच्यांनी तिला समजून न घेता लगेचच तिचा लग्नाचा घाट घातला होता. त्यांनी तर इथे फक्त स्वार्थ पाहिला होता. आता ओवी अनिकेतसोबत व्यवस्थित संसार करेल का? तिचे मन तिथे रमेल का? आता ओवीचे आणि अनिकेतचे लग्न जसे जवळ येईल तसतसे ओवीच्या मनामध्ये धाकधूक वाढत होती. तिचे मन अस्वस्थ होत होते. पुन्हा परक्या व्यक्तीच्या घरात जाऊन त्याच्यासोबत आपले सूर जुळेल का? तो आपले म्हणणे ऐकून घेईल का? त्याचेही कुणासोबत प्रेमसंबंध असतील का? या अविश्वासाच्या बळावर सुरू होणारे हे नाते किती दिवस टिकेल? अशा एक नाही अनेक प्रश्नांनी तिच्या मनामध्ये काहूर माजले होते.
यापुढे काय होईल हे वाचण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा..
क्रमशः

© प्रियांका अभिनंदन पाटील.
फोटो क्रेडिट: पूजा चौगुले.

0

🎭 Series Post

View all