Login

सोनचाफा 9

एका खूनाचा शोध. रहस्यकथा
सोनचाफा 9

लग्नाची तारीख जवळ येऊन ठेपली होती. जवळपास दोन्ही कुटुंबाची सर्व तयारी झाली होती. मेहंदीचा कार्यक्रम खूप छान पद्धतीने रंगला होता. अखेर अनिकेतच्या नावाने ओवीच्या हातावर मेहंदी लागली होती. मेहंदीला खूप छान रंग चढला होता. चढणारच ना? अनिकेतचे ओवीवर जिवापाड प्रेम जडले होते त्याचाच तर हा पुरावा होता. अनिकेत अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हा त्याने ओवीला पाहिले होते तेव्हापासून ओवीच्या प्रेमात अखंड बुडाला होता. त्याला ओवी शिवाय दुसरे काहीच दिसत नव्हते. त्याने लग्नानंतरची बरीच स्वप्नं पाहिली होती. त्याने एका सहजीवनाच्या रूपाने ओवीला पूर्णपणे स्वीकारले होते. फक्त विधिपूर्वक त्या दोघांचे मिलन होणे बाकी होते. अनिकेत आता लग्नाची स्वप्ने पाहत होता.

ओवी मात्र तिच्याच विचारात मग्न होती. उद्यावर लग्न येऊन ठेपले तरीही तिच्या चेहऱ्यावर लग्नाचे वेगळेपण असे काहीच जाणवत नव्हते. तिच्या हातावर मेहंदी खूप सुंदर रंगली होती शिवाय तिला अनिकेतच्या नावाने हळदही लागली होती; पण त्या हळदीचा रंग तिच्या चेहऱ्यावर चढला नव्हता. ओवी नाराज होऊन तिच्या विचारांच्या गर्तेत होती. 'हे लग्न मी का करत आहे? खरं तर हे सगळे माझ्या मनाविरुद्ध सुरू आहे. मी इथे प्रतिकार करायला हवा; पण प्रतिकार करून तरी मी काय करणार? त्यापेक्षा आलिया भोगासी असावे सादर असे म्हणून आपण तयार व्हायला हवे.' अशी तिने मनाशी समजूत घातली.

अखेर लग्न दिवस उजाडला. सगळेजण आपापले आवरत होते. लग्न अगदी साध्या पद्धतीने करायचे ठरले होते. अनिकेतने गुलाबी रंगाची शेरवानी घातली होती. डोक्यावर फेटा होता. तो त्या कपड्यांमध्ये अगदीच रुबाबदार दिसत होता. चेहऱ्यावर तेवढीच छोटीशी दाढी आणि हातामध्ये मनगटी घड्याळ, पायामध्ये राजेशाही शूज त्याने परिधान केले होते. त्याने त्याचे सगळे आवरून त्यांच्या पाहुणे मंडळीसहित तो कार्यालयात आला. ओवीकडील मंडळी देखील आधीच येऊन राहिले होते; मात्र ओवी तिचे आवरत होती.

"ओवी ताई, तुझे अजून आवरले नाही! अगं, पाहुणे मंडळी हॉलमध्ये येऊन बसले आहेत. जिजू सुद्धा तिथे येऊन बसले आहेत आणि तू इतका का उशीर लावत आहेस? ओवीची छोटी चुलत बहीण म्हणजेच अनघाची सख्खी बहिण अपूर्वा ओवीला बोलावण्यासाठी तेथे आली होती. अपूर्वा त्यांच्या घरातील सर्वात शेंडेफळ म्हणून सर्वांची खूप लाडकी. ओवी आणि अनघा या मोठ्या असल्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी थोडी जास्त होती. त्या मुळातच समंजस होत्या, शांत आणि अभ्यासात हुशार अशा होत्या. अपूर्वा मात्र यांच्या उलट होती. ती थोडीशी अल्लड, दंगेखोर अशी होती. अजून लहान आहे असे म्हणून तिच्या बालिशपणाकडे सर्वांनी जणू दुर्लक्ष केले होते.

"हो. हे काय झालंच. शेवटची बिंदी एवढी लावते म्हणजे ओवीताई तयार झाली." असे म्हणून अनघाने तिच्या कपाळावर बिंदी लावली. अनघा ओवीला तयार होण्यास मदत करत होती. त्या दोघींचे बोलणे सुरू असताना ओवीने मात्र थोडीशी कसेनुसे चेहऱ्यावर हसू आणले आणि ती तयार झाली.

सगळेजण हॉलमध्ये गेले. नवरी मुलगी सुद्धा हॉलमध्ये आली होती. ओवी लाल रंगाच्या शालूमध्ये खूप सुंदर दिसत होती. तिने केसांची हेअर स्टाईल करून त्यामध्ये सुगंधीत मोगऱ्याचा गजरा माळला होता. चेहऱ्यावर हलकेसे मेकअप आणि हात भरून बांगड्या, गळ्यामध्ये मोठा नेकलेस तिने घातला होता. नवरीच्या वेशामध्ये ओवीचे सौंदर्य खूपच खुलून दिसत होते. ते इतके की सर्वांचे चेहरे तिला पाहण्यासाठीच वळले होते. ओवी कार्यालयामध्ये जरी आली असली तरी तिची अजूनही द्विधा मनःस्थिती होती. 'हे लग्न करावे की नको? इथून निघून जावे का?' असा विचार तिच्या मनामध्ये येत होता.

फायनली तिच्या आई-बाबांचे चेहरे जेव्हा तिला दिसले तेव्हा तिने हे लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि ती बोहल्यावर चढली. दोघांचे लग्न अगदी व्यवस्थितरित्या पार पडले. अनिकेत ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण फायनली त्याच्या आयुष्यात आला होता. ओवी त्याची पत्नी म्हणून त्याच्या आयुष्यात आली होती. सगळ्या गोष्टी मनासारख्या घडत होत्या. लग्न अगदी व्यवस्थितरित्या पार पडले. ओवीचा गृहप्रवेशसुद्धा झाला. घरामध्ये मोजकेच पाहुणे मंडळी होते. अनिकेतचे काही जास्त पाहुणे नसल्याने फक्त थोडेच पाहुणे घरामध्ये होते; त्यामुळे त्या दोघांना मोकळीक मिळणार होती; पण ओवी मात्र तिच्याच विचारात गुंग होती. इथून पुढे खरं तर तिची परीक्षा होती. लग्न पार पडले. तिने गृहप्रवेश देखील केला; पण आता इथून पुढे या संसाराला कसे सुरुवात करायचे असा विचार त्याच्या मनामध्ये सुरू होता. अनिकेत मात्र ती लाजून शांत बसली असेल असे म्हणून तो देखील शांत बसला होता. त्याने तिला विचारण्याचा एक दोनदा प्रयत्न केला; पण ती काहीच बोलली नाही.

आता बरीच रात्र झाली होती. ओवी अनिकेतच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेली होती. त्याच्या रूममध्ये जाताना तिच्या मनाची धाकधूक सुरू होती. इथून पुढे एक क्षणही तिथे तिला थांबवत नव्हते. तिची चुळबूळ सुरू होती. ओवी अनिकेतच्या घरी आल्यापासून सर्वांशी छान बोलत होती; पण ती अनिकेतशी साधी नजरही मिळवू शकत नव्हती. कारण तिला कुठेतरी आपण याला फसवतोय ही भावना वाटत होती. अनिकेत मात्र तिच्याकडे एकटक पाहत होता. त्याला तिच्या डोळ्यामध्ये पहिल्या दिवशी ज्या वेदना दिसल्या त्या पुन्हा दिसतात का? हे पहायचे होते. पण वेडी ओवी मात्र त्याच्याकडे पहायलाच तयार नव्हती. आता मात्र त्याच्या रूममध्ये गेल्यावर त्याची नजर कशी चुकवायची असे तिला वाटत होते. ती आत जाण्यास तयार नव्हती; पण तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता त्यामुळे ती दबक्या पावलांनी हळूच आतमध्ये गेली. तिच्या मागे लगेच अनिकेत देखील आला होता. आत येऊन तिने पाहिले तर सुंदर फुलांनी सजवलेला तो बेड तिला दिसला; शिवाय खाली जमिनीवर फुलांनी हार्ट काढले होते. ते पाहून तिच्या मनाची घालमेल सुरू झाली. तिचे डोळे भरून आले. तिला खूप पश्चाताप होत होता. खूप वाईट वाटत होते. आई-वडिल आपल्याशी खूप वाईट वागले आहेत अशी भावना तिच्या मनामध्ये निर्माण झाली होती आणि हे कुठेतरी अनिकेतला जाणवले होते. तो हळूच आत गेला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. तेव्हा मात्र ओवीच्या डोळ्यातून पाणी ओघळू लागले. आता मात्र तिला सहन झाले नाही आणि मनातील सगळे बोलून टाकावे असा विचार तिने करून ती बोलू लागली.

"एक मिनिटं मला तुमच्याशी काही बोलायचं आहे." ओवी

"हो बोल ना." अनिकेत

"लग्नागोदर माझे एका मुलाशी प्रेम होते. तो खूप चांगला होता. आम्ही दोघे लग्न करणार होतो; पण कुठून तरी ही गोष्ट माझ्या आई-बाबांना समजली आणि त्यांनी माझे घरातून बाहेर जाणेच बंद केले. आईबाबांना तो मुलगा पसंत नव्हता. आम्ही दोघे तरीही फोनवरून बोलायचो पण भेटणे मात्र शक्य नव्हते. माझे बाबा, काका आणि आजोबा असे तिघेही घरात होते. शिवाय माझे भाऊ हे देखील माझ्यावर पाळत ठेवून होते. मी पळून जाण्याचा खूप मोठा निर्णय घेतला होता; पण या सर्वांचे चेहरे माझ्या नजरेसमोर येऊ लागले त्यामुळे मी तो निर्णय रद्द केला. माझे धाडसंच झाले नाही. एक मुलगा मनात असताना दुसऱ्या मुलाशी संसार थाटायचा मला काही जमणार नाही. हे मी तुम्हाला लग्नागोदर सांगणार होते पण घरच्यांना वाईट वाटेल आणि ते मलाच दोषी ठरवतील असा विचार करून मी सांगणे बंद केले. पण आता या अशा क्षणी मला लगेच त्याचा विचार सोडून तुमच्या बाहुपाशात येणे खूप अवघड जाते आहे. म्हणून आता याक्षणी हे तुम्हाला सांगावे असे मला वाटले. तुम्ही लगेच तुमच्यासोबत मी संसार थाटावा असा विचार करत असाल तर तो चुकीचा आहे. मला माझा थोडा वेळ हवा आहे. थोड्या दिवसांनी मी तुम्हाला माझा निर्णय सांगेन त्याप्रमाणे आपण करू. पण आता याक्षणी तुम्ही आणि मी अनोळखीच आहोत. माझे मन तुमच्याकडे अजूनही ओढले गेले नाही. ते कधीपर्यंत ओढले जाईल हे सांगता येत नाही. माझे मन तुमच्यात एकरूप होईल की नाही हे देखील माहित नाही. पण आता तरी आपण अनोळखीच आहोत. प्लीज, तुम्ही माझ्यापासून दूर रहा." ओवीचे हे बोलणे ऐकून अनिकेतच्या सगळ्या स्वप्नांवर पाणी फिरले होते. त्याला त्या क्षणी तिच्या डोळ्यातील त्या भावना दिसून आल्या होत्या ज्या पहिल्या वेळी दिसल्या होत्या. आता तर लग्न झाले आहे. बाहेर जाऊन सर्वांना सांगावे तर आईची तब्येत आधीच बरी नाही. पाहुणे मंडळी काय म्हणतील? आईला काय वाटेल? असा सगळा विचार त्याच्या डोक्यात सुरू होता. लोकांचा तर त्याने कधीच विचार केला नाही; पण आईसाठी तो शांत झाला होता.

दाराचा खट् असा आवाज आला आणि अनिकेत भूतकाळातून सत्यात आला.

"अनिकेत अरे, माझ्या गोळ्या उद्या संपतील. तू उद्या ऑफिसमधून येताना घेऊन ये बर का." अनिकेतची आई येऊन त्याला सांगून गेली.

ओवी इतक्या खऱ्या मनाची असताना ती हा खून कसा करू शकेल? खोटी, लबाडी करता आली असती तर तिने तिचे प्रेम प्रकरण मला सांगितले नसते. मग हा खून ओवीच्या बॉयफ्रेंडने तर केला नसेल? पण तो का करेल? त्याचा आणि अनघाचा काय संबंध? अनघाचे कोणावर प्रेम होते हे पाहायला हवे आणि ओवीच्या बॉयफ्रेंडचे नाव काय असेल? याची पडताळणी करायला हवी. अनिकेत सगळ्या गोष्टीचा ताळमेळ लावत होता.
क्रमशः

0

🎭 Series Post

View all