सोनचाफा ( भाग दुसरा )

सोनचाफ्याशी निगडीत एक हळवी प्रेम कथा
पाणावलेल्या डोळ्यांत माझ्या
आठवणी तुझ्या गं सखी
ओघळू दिले नाहीत मी अश्रू
पाहत असशील तू मला म्हणोनी
हट्ट होता तुझा असावं मी आनंदी
तुझ्याविना गं सखे मी माझा ही नाही


तात्यांच्या हृदयात आठवणी, डोळ्यात आसू आणि हातात माईंनी लावलेल्या सोनचाफ्याची सुगंधी फुलं होती . लहान थोरांनी गजबजलेल्या बागेत आज मात्र ते एकटेच होते.

सोनचाफ्याला पहिली कळी आली होती तो प्रसंग तात्यांना आठवला. तात्या कारखान्यात होते.माईंनी त्यांना कंपनीत फोन केला होता त्या वेळी त्या. एवढंच बोलल्या ,

" असाल तसेच या. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. दाखवायचं आहे."

तात्या मिटिंग मध्ये होते. मिटिंग पटकन आटपून तात्या घरी गेले. माईंना त्यांनी विचारलं, " काय झालं, एवढं अर्जंट का बोलवून घेतलंस ? आज पर्यंत तर अस कधीच केल नाहीस. "

माईंनी तात्यांच्या हाताला धरत एक गोल फिरकी मारली आणि तात्यांना सोनचाफ्याजवळ घेऊन जात म्हणाल्या,

" आज पहिली कळी आली आहे आपल्या सोनचाफ्याला. म्हणून मी आज पुरण पोळी बनवली आहे. चला आपण स्वागत करू पहिल्या कळी फुलाच."

"लोकं बोलतात मुलं ही देवा घरची फुलं असतात पण मी म्हणते ही फुलं माझी मुलंच आहेत".

औक्षण करायला माईंनी ताट काय आणलं. तात्यांना नविन ड्रेस घालायला लावला. माईंनी छान भरजरी पैठणी नेसली . सगळी सोन्याची आभूषणे घातली आणि दोघांनीही सोनचाफ्याला ओवाळल. तात्यांनी माईंना एवढं खुश कधीच पाहिलं नव्हतं.
माईंचा आनंद म्हणजेच तात्यांचा आनंद. तात्यांनी माईंना स्वतःपेक्षा कधीच वेगळं समजलं नाही आणि माईंनी अंगणातल्या सोनचाफ्याला स्वतः पेक्षा वेगळं समजलं नाही.

तात्यांना कारखान्यात जायला उशीर झाला .माईंनी घाई घाईत तात्यांना नाश्ता दिला. तात्यांचा नियम होता कितीही काही झालं तरी दोघांनी सकाळचा नाश्ता आणि रात्रीच जेवण एकत्रच करायच. माईंनी स्वतःला वाढून घेतल आणि माई चटकन उठल्या. धावत गेल्या तांब्याच्या कळशीतून सोनचाफ्याच्या आळ्यात पाणी भरलं . पुन्हा डायनिंग टेबलवर आल्या.

तात्यांनी विचारलं, " काय झालं ग, एक घासही न खाता उठलीस आणि कुठे गेलीस एवढं धावतपळत."

माई म्हणाल्या," अहो आज कामाच्या धांदलीत सोनचाफ्याला पाणी घालायचं विसरले. पण खाता खाता आठवणं झाली आणि उठून पहिलं पाणी घातलं. नाहीतर मला घास ही उतरला नसता घश्याखाली."

माई दुपारचा आराम नेहमी सोनचाफ्याच्या सावलीत बसूनच करत. त्याच्याशी गप्पा मारत. तात्यांबद्दल काही तक्रार असेल तर चाफ्याला सांगत.

एकदा माई बोलत होत्या तेव्हा तात्यांनी ऐकलं "आता आपल्याला एक ताट घ्याव लागेल चांदीच , अस कस मी माझ्या फुलांना (मुलांना) एखाद्या साध्या भांड्यात गोळा करणार ? तुम्ही तर कारखान्याच्या मालकाच्या अंगणाची शोभा आहात ,माझ्या घराच घरपण आहात तुम्ही ".

तात्यांनी लगेच संध्याकाळी एक चांदीच ताट आणल आणि माई समोर ठेवल . चांदीच्या ताटामध्ये ती पहिली फुलं ठेवली . ते ताट माईंनी हातात पकडल . आणि तात्यांनी गाडी काढली. माई तात्या आणि सोनचाफ्याची पहिली फुलं पूर्ण शहरभर फेरी मारून आले. माईंच्या चेहऱ्यावर असा आनंद दिसत होता की त्यांनी त्यांच बाळ हातात घेऊन त्याच कौतुक करत आहेत.

माईंनी झाडा भोवती सुंदर रांगोळी काढलेली बघून तात्यांनी विचारलं काय सरकार आज काय अस विशेष आहे. माईंनी सांगितलं ,

"आज बरोबर एक वर्ष झालं आपण हे रोपटं लावल होत आणि आता त्याच झाड झालंय किती लवकर मोठा झाला ना सोनचाफा. त्याला पाणी घालणारी मी आणि आज तोच मला सावली देतोय उन्हातून दमून आले तर घरात जाण्या आधी. मी इथं थंड सावलीत बसते. मन शांत होत नंतर मी घरात जाते." माई अगदीच कौतुकाने झाडाकडे बघत बोलतं होत्या.

नागपंचमीचा सण होता माई हातावर मेहंदी काढत होत्या. तात्या माईंकडे बघत बोलले बघ तुझ्या मेहंदीला चढलेला रंग माझं तुझ्यावर असलेल प्रेम दाखवून देईल. माई बोलल्या मला पण बघायच आहे माझं तुमच्यावर किती प्रेम आहे थांबा काढते तुमच्या हातावर पण मेहंदी. तात्या नको नको म्हणत असतानाही माईंनी मेहंदी काढलीच. मेहंदी खूपच रंगली होती पण असे मेहंदीचे हात कोणी कारखान्यात गेल्यावर बघितले तर काय म्हणतील म्हणून तात्यांनी कारखान्यात जाण्याच टाळलं खरं, पण जेव्हा तिसऱ्या चौथ्या दिवशी कारखान्यात गेले तेव्हा पण खिश्यात हात घालूनच फिरत होते.

माई आणि तात्या झाडाखाली बसले होते. कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगार बाईच्या बाळाचा विषय निघाला आणि माईंचे डोळे पाणावताच माईंच्या ओटीत सोनचाफ्याच एक टपोर फुल टपकन पडल. माईंनी अलगद आपल्या ओंजळीत उचलून धरलं आणि डोळ्यांना लावत बोलल्या ,"तुम्हीच आहात रे माझ्या जीवनात आनंद आणि प्रेमाचा सुगंध दरवळवणारे."

तात्या खूप खोल आठवणीत गढून गेलेले असताना. माईंच्या जागेवर बसलेली स्त्री तिथून उठून समोरच्या बाकावर बसली आणि तात्यांनी ठेवलेल्या त्या सोनचाफ्याच्या फुलांकडे एकटक बघू लागली. तिच्या डोळ्यात अश्रू होते.

( क्रमशः)

🎭 Series Post

View all