सोनचाफा ( भाग तिसरा )

सोनचाफ्याशी निगडीत एक हळवी प्रेम कथा
सोनचाफ्याचा सुगंधी दरवळ आसमंतात
तुझ्या आठवणींचा पसरा माझ्या हृदयात
कस सावरू मी स्वतःला तू नसताना
भास मला होतो तुझा फुले वेचताना


अनोळखी ती स्त्री तात्यांच्या हातातील फुलांकडे बघत होती. तात्यांच्या मनात सोनचाफा आणि माईंच्या बद्दल गोड आठवणी होत्या. ती स्त्री त्या फुलाकडे बघत असताना तिच्या डोळ्यांत आसवं जमा झाली आणि कटू आठवणींनी हृदय गलबलून गेलं. एका चांगल्या प्रसिद्ध कॉलेज मध्ये त्या इंग्रजी विषयाच्या प्रोफेसर होत्या. त्यांच नाव निशीगंधा आपटे.

नाव निशिगंधा असलं तरी त्यांनाही सोनचाफाच आवडत असे .आज सोनचाफा बघितला आणि सोनचाफ्यावरून झालेलं भांडण आठवलं. आपटे मॅडमच्या सासूबाई अंतिम घटका मोजत असताना त्यांनी आपल्या मुलाला सोनचाफ्याच्या फुलांची वेणी हवी आहे असं सांगितलं म्हणून ते आणण्यासाठी गेले. पण शेवटची इच्छा इच्छाच राहिली. आपटे मॅडमचे सर पुन्हा घरी येई पर्यंत त्यांच्या सासूबाईं अंनतात विलीन झाल्या. तेव्हा पासून सोनचाफ्याबद्दल आपटे सरांच्या मनात प्रचंड राग आणि चिड निर्माण झाली होती. त्यांना असं वाटायचं की मी जर सोनचाफ्याची वेणी आणायला गेलो नसतो तर मी माझ्या आईच्या जवळ असलो असतो आणि कदाचीत ती मला सोडून गेलीही नसती.

आपटे मॅडमला एक मुलगी आणि एक मुलगा. मुलीच नाव समिरा आणि मुलाच नाव पराग. समिरा पराग पेक्षा मोठी.  समिरा चौदा पंधरा वर्षांची होती तेव्हाची घटना. समिराला डान्स क्लास लावला असल्यामुळे ती छान डान्स करत असे . समिराने कथ्थक डान्स स्पर्धेत भाग घेतला होता. तिने खूपच छान डान्स केला होता. डान्स केल्यावर त्याच पोशाखात ती तशीच घरी आली बाबांना आईला ट्रॉफी दाखवली. बाबांनी खूप कौतुक ही केल. बाबांनी तिला आत जाताना पाहिलं आणि तिने डोक्यात माळलेली सोनचाफ्याची वेणी दिसली तसच तिच्या केसांना ओढत ते तिच्यावर ओरडले,

"असली थेरं मला चालणार नाहीत. काढ ती आधी केसातली सोनचाफ्याची वेणी आणि फेकून दे बाहेर. अगोदर मी विचार करत होतो कसला वास येतोय पण मला वाटल काही अत्तर वगैरे लावल असेल."

एवढं कौतुक करणारे बाबा आणि केसांना ओढत ओरडणारे बाबा यापैकी त्यांच खरं रूप कोणतं हे समिराला समजलंच नाही. समिराची आई सगळं पाहत होती पण काहीच बोलू शकली नाही. कारण त्यांना माहिती होत जेव्हा पासून त्यांची आई त्यांना सोडून देवाघरी गेली तेव्हा पासून ते सोनचाफाच काय बाकीच्या फुलांचा पण राग करतं असतं.

समिरा रडत होती. तिची आई तिला समजुत घालायला तिच्या खोलीत गेली तेव्हा त्यांना एक प्रसंग आठवला आणि सहजच समिरा सांगितल,

" मला माहिती आहे तुझे बाबां आजी गेल्यापासून फुलांचा तिरस्कार करतात आणि सोनचाफ्याचा तर जास्तच तिरस्कार करतात. कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. माझ्या काही जुन्या विद्यार्थ्यांनी मला सोनचाफा आणि फ्रेम दिली होती सोनचाफा मी केसात माळला पण घरी येण्याआधी ती फुलं मी केसातून काढली पण केसात त्या फुलांचा सुगंध दरवळतच होता. रात्री बाबा जवळ आले त्यांना समजलं मी फुल माळल होत. त्यावरून त्यांनी माझ्याबरोबर खूप भांडण केल .त्यात माझं नाव निशिगंधा. तुझी आजी गेल्यापासून ते मला निशी म्हणूनच हाक मारत मला अगोदर वाटायचं ते प्रेमाने हाक मारतातं. पण खरं कारण हे होत की निशिगंधा हे फुलाच नाव आहे आणि त्यांना ते नाव सुध्दा उच्चारायचं नसायच .म्हणून ते मला निशी बोलायचे. त्यानंतर मी पुन्हा कधीच सोनचाफा हातातही घेतला नाही. मला हि खूप आवडतो गं सोनचाफा." असं म्हणत दोघीही एकमेकींच्या गळ्यात पडून खूप रडल्या.

दिवसेंदिवस आपटे सरांच्या स्वभावातला मृदूपणा नाहीसा होऊन कोरडा रुक्षपणा वाढत होता. परागला सतत अभ्यासावरून इतर गोष्टीवरून आपटेसर ओरडत असत. त्यामुळे समिरा आणि पराग दोघांच्या मनात हळू हळू आपल्या वडिलांविषयी प्रेम कमी कमी होऊन, त्यांच्याबद्दल भिती निर्माण झाली. आई बाबांना का काहीच बोलत नाही असं समिरा आणि परागला वाटायचं. काही बोलायला समजावून सांगायला गेलं की त्याचे परिणाम काय होत असत हे त्या दोघांनाही माहिती नव्हतं आणि त्या सांगूही शकत नव्हत्या. गप्प राहून जे होईल ते पाहणं आणि सहन करण या शिवाय पर्याय उरला नव्हता. घटस्फोट घेवून स्वतंत्र होऊ शकत नव्हत्या कारण जेव्हा समिराचे बाबा सोनचाफ्याची वेणी आणायला गेले होते तेव्हा त्यांच्या सासूबाईने वचन घेतलं होत की,

" काही झालं तरी माझ्या मुलाची साथ कधीही सोडू नको. त्याचा स्वभाव माहिती आहे मलाही आणि तुलाही म्हणूनच त्याची काळजी वाटते. मला नाही माहिती मी तुझं स्वतंत्र्यं हिरावून घेतेय की त्याची जबाबदारी तुझ्या अंगावर टाकतेय .पण तुझ्या जिवात जिव असे पर्यंत त्याला कधीच सोडून जाऊ नकोस. माझा जिव त्याच्यात गुंतला आहे तू मला हो म्हणून वचन दे म्हणजे मी प्राण सोडायला मोकळी होईल मला अंथरूण धरून नाही रहायच. मला मुक्त कर! "
निशिगंधाने आपल्या दोन्ही हातांनी सासूबाईंचा हात पकडला आणि भरल्या डोळ्यांतल पाणी लपवत मान हलवून हो म्हणून होकार दिला. चेहऱ्यावरची काळजीची रेषा पुसट झाली. समाधानाच एक स्मित हास्य करत "माझी निशिगंधा "असं एवढेच शेवटचे उच्चार कानात घुमले. मांडीवरच डोकं हलकेच बाजूला झालं आणि हातातला सासूबाईंचा हात थंड पडला.

अंधार पडला होता तात्या घरी जाण्यासाठी निघाले. तात्यांसाठी अनोळखी असलेली ती स्त्री अजूनही तिथंच तशीच शून्यात नजर लावून, भान विसरून कटू आठवणी हृदयात दडपून ठेवत शांत चित्ताने बसून राहिलेली होती.

( क्रमशः )

🎭 Series Post

View all