सोनचाफा ( भाग चवथा )

सोनचाफ्याशी निगडीत एक हळवी प्रेम कथा
तात्या माईंना स्वतःच मुलबाळ नव्हतं आणि निशीगंधा मॅडमला स्वतःची दोन मुलं असूनही त्या आज पोरक्या होत्या. समिरा तिच्या नवऱ्याबरोबर परदेशी सुखात होती. पराग शिक्षणासाठी म्हणून परदेशी गेला आणि तिथंच स्थायिक झाला होता. पराग, समिरा व्हिडीओ कॉल करायचे कधीतरी. आई वडील नसले की मुलं पोरकी होतात असं म्हणतात, पण इथं मुलांनी आईला पोरकं केलं होतं . पंख फुटलेली पाखरे उडून गेली. आईचा जिव मुलांच्या काळजीने तिळ तिळ तुटतं होता. याची जाणीवही मुलांना नव्हती.एक दिवस असा उगवला नाही की त्यांना मुलांची आठवण झाली नव्हती. एक दिवस असा मावळला नाही की परमेश्वरा जवळ मुलांच्या सुखासाठी प्रार्थना केली नाही.
डोळ्यातल्या पाण्यामुळे सगळ अंधुक दिसू लागल म्हणून हलकेच चष्मा काढलं आणि अलगद पदराने डोळ्यातलं पाणी पुसलं. अंधार पडत असल्याची जणीव झाली आणि निशिगंधा मॅडम त्या घराकडे निघाल्या ज्या घरात त्यांच्याशिवाय दुसरं कोणीच नाही.

रस्त्यात मध्येच एक मुलगी फुलं विकत असलेली दिसली आणि आपटे मॅडम पुन्हा एक कटू प्रसंग आठवला आपटे मॅडमच्या सरांचा वाढदिवस होता म्हणून सरांनी सगळ्यांना फिरायला घेऊन जायचं ठरवलं होतं. सगळे गाडीतून मस्त निघाले होते. सिग्नलला गाडी थांबली.  साधारण नऊ दहा वर्षांची मुलगी हातात फुलांची परडी घेऊन गजरे, गुलाबाची फुले, सोनचाफ्याची वेणी, छोटे छोटे पुष्पगुच्छ विकत असताना आपटे सरांच्या गाडी जवळ येत बोलली,

"साब मॅडमजी के लिए गजरा लेलो. गजरा नही तो गाडी में रखने के लिए सोनचाफेके फुलं भी हैं, बहुत अच्छी खुशबू आती हैं, लेलो ना साब!"

सिग्नल सुटला आणि त्या मुलीवर ओरडत आपटे सर ओरडले , "आज काल नुसता बाजार मांडलाय सुकून जाणाऱ्या फुलांसाठी पैसे द्यायचे का ह्यांना. छान सुगंध येतो . "असं म्हणत त्या निरागस मुलीच्या हातातील फुलांच्या परडीला," नको " असं म्हणत जोरदार धक्का दिला सगळी फुलं उधळली गेली आणि त्या फुलांवरून आपटे सरांनी आपली गाडी पुढे नेली. फुलं चेंगरली गेली. पण त्यांनी आपला गुणधर्म सोडला नाही.फुलं चेंगरली, कुस्करली गेल्याने आणखीनच सुगंध दरवळला.

आठवणी खूप होत्या पण सगळ्या कटूच होत्या.आपटे सरांना जाऊन पाच सहा वर्ष झाली पण अजूनही फुलं बघितलं की सरांचा फुलां बद्दल असलेला तिरस्कार आठवतो. एवढी दहशत मनात बसली आहे की आज ही आपटे मॅडम हातात फुलं घेतं नाहीत किंवा घरातल्या कुंडीत एखाद फुलाच रोपटं ही लावत नाही.हळू हळू चालत आपटे मॅडम घरी पोहचल्या शुगर कमी झाल्याने त्यांना चक्कर आली आणि त्या तश्याच बसून राहिल्या. आपटे मॅडमच्या घरी कामाला आलेल्या बाईने आपटे मॅडम ला उठवलं थोडी साखर खायला दिली आणि बेडरूम मध्ये घेऊन जात ती कामवाली बाई आपटे मॅडम ना बोलली,

"मॅडम काउन तुम्ही एकट्या राहताव, तुमची दोन्ही लेकरं परदेशात हायत. तुमी बी जावा की त्यांच्याकडं कोण हाय तुम्हाला हिथं, तुमच्याकडं लक्ष द्यायला मी जर आत्ता आले नसते, तर इचार करा बर काय झालं असत".

कामवाली बोलत होती. आपटे मॅडमला पण वाटल आपण एकदा आपल्या मुलीला आणि मुलाला फोन करुन विचारावं आणि त्यांच्याच सोबत रहावं. रात्रीचं जेवण झाल्यावर आपटे मॅडमनी आधी मुलीला फोन केला इकडची तिकडची चौकशी झाल्यावर आपटे मॅडमने स्वतः आपल्या लेकीला विचारलं,

" काय ग मी येऊ का तुझ्याकडे तिकडेच कायमच रहायला. इकडे कोणीच नाही ग ,म्हणून विचारलं. " आपटे मॅडम असं बोलताच लगेच समिरा बोलली,

" अग आई तुला माहितेय ना, मी पण फिरतीवर असते. तूझ्या जावयाचा पण जॉबचं असा आहे. काय करणार मी? तू इकडे येऊन राहीली तरी तुझ्याकडे बघायला कोण आहे इथं ? तू तिकडेच रहा इंडियात. येणारे जाणारे तरी लक्ष ठेवतील. नाहीतर एक काम कर घरात चोवीस तास राहू शकेल अशी कामवाली ठेव. म्हणजे तीच तुझ्याकडे लक्ष राहिलं ."

समिरा बोलत होती. आपटे मॅडमचे डोळे पाण्याने भरून आले. हिच का ती समिरा जी लहानपणी बोलायची लग्न झाल्यावर मी माझ्या आईला माझ्याबरोबर घेऊन जाईल .नाहीतर मी माझ्या नवऱ्याला माझ्या घरी ठेवून घेईल, पण आईला सोडणार नाही.

" ठीक आहे आई सध्या मी कामात आहे ,नंतर फोन करते " असं म्हणत समिराने फोन ठेवून दिला.

नंतर त्यांनी परागला फोन केला आणि विचारलं ,

"मी येऊ का रे तिकडेच तुझ्याकडे कायमच."

"आई ,तुझा आवाज व्यवस्थित येत नाही ग,  काय बोललीस? पुन्हा बोल "असं म्हणत आपण जे काही ऐकलं तेच आई बोलली का हे बघितलं.
आपटे मॅडम पुन्हा बोलल्या "मी येऊ का रे तिकडेच तुझ्याकडे कायमच."

पराग जरा वरच्याच आवाजात बोलला,

"आई माझी आता पुढच्या महिन्यात एंगेजमेंट होईल. काही दिवसांनी लग्न पण होईल. मग कस सगळ ऍडजस्ट होणार सांग बर? तू तिकडेच रहा तुला इकडचं वातावरण पण सहन नाही होणार. नको येऊ तू इकडे माझं लग्न झाल्यावर मीच येऊन जाईल एकटा तुझ्याकडे, तू काळजी नको करू भारतातच रहा. एक मिनिट हं आई, मला ऑफिस मधून फोन येतोय. नंतर फोन करतो " असं म्हणत परागने ही फोन ठेवून दिला.

ज्या मुलांसाठी स्वतःच्या आवडी - निवडीला, स्वातंत्र्याला मुरड घातली त्यांना त्याची जराशीही जाणीव नाही. समिरा लहान असताना तिच्याकडे लक्ष देता यावं म्हणून चांगला जॉब सोडला. पराग
ची प्रत्येक हौस, हट्ट पुरवला आणि आज तीच माझी मुलं मला परकी झालीत. मुलांना जन्म देऊन मी आई झाले असली तरी असं वाटतं की, माझी कूस उजवलीच नाही.

आपटे मॅडम विचार करत असताना त्यांच्या मनात आलं आता आपण आपल्या मर्जीने जगायचं कोणाचाही विचार नाही करायचा, फुलाप्रमाणे जिवन जगायचं, काही काळचं अस्तित्व असलं तरी आठवणीच सुगंधी अत्तर होऊन मृत्यू नंतर ही अस्तित्व जपायच.


( क्रमशः )

🎭 Series Post

View all