सोनचाफा ( भाग पाचवा )

सोनचाफ्याशी निगडीत एक हळवी प्रेम कथा
श्वास कधी साथ सोडतील
आणि आयुष्य कधी पूर्णविराम घेईल सांगता येत नाही.

आपटे मॅडमने पराग आणि समिरा चा विचार डोक्यातून काढून टाकला. ज्या प्रकारे दोन्ही मुलांनी आपल्याला टाळलं त्यावरून आपण त्यांच्यासाठी किती परके आहोत याची जाणीव आपटे मॅडमला झाली. पण आपटे मॅडम आज रडल्या नाहीत त्यांनीही ठरवलं  आयुष्याच्या संध्याकाळी एक नवी सुरवात करु असं मनाशी ठरवून आपटे मॅडम झोपी गेल्या.

आजचा दिवस म्हणजे एक नवी सुरवात नागिणीने कात टाकावी आणि मागे वळून न बघत पुढे चालाव. आपणच आपले आहोत.

बागेत त्या अगोदरच येऊन बसल्या होत्या. न कळत तात्यांची वाट बघत बसल्या होत्या. त्यांना जास्त वाट बघावी लागली नाही. ठरलेल्या वेळी तात्या बरोबर आले. आज ते खूप थकलेले दिसत होते. त्यांनी आपटे मॅडम कडे बघून ओळखीचं स्मित हास्य केलं आणि ते बेंचच्या दुसऱ्या टोकाला बसले. या वयात आपण काही करणार आहोत का, मग कसला हा संकोच मॅडम स्वतःशीच बोलल्या. त्या हातांची चुळबूळ करत होत्या.

" तुमच्या घरी कोण असतं, सॉरी हां, मी उगाचच खाजगी प्रश्न विचारते. रोज एकटे बागेत येता ना. म्हणून प्रश्न पडला "

" मी एकटाच असतो, गेली कित्येक वर्ष "

" एकटे तर सगळेच असतात हो. मला दोन मोठ मोठी मुलं आहेत तरी मी देखील एकटीच आहे. " निराशेने सुस्कारा सोडत मॅडम म्हणाल्या. " कधी कधी खूप भीती वाटते हो. हा एकटेपणा अंगावर येतो. कधी वाटतं, या एकांतात कधी जीव जरी निघून गेला तरी कोणाला कळणार नाही. आणि कळलं तरी काय फरक पडणार आहे म्हणा कोणी येणार नाही की जाणार नाही. कोणी रडणार देखील नाही. " बोलता बोलता मॅडमचा आवाज रडवेला झाला. " दोन गोड शब्द सोडले तर आता कशाचीच भूक उरली नाही हो. पण आजकाल सगळं काही नाहीसं झालं आहे. "

तात्यांना एकदम भरून आलं. त्यांना अशा परिस्थितीत काय बोलावं तेच कळेना. अचानक त्यांना माई मागे उभ्या असल्याचा भास झाला. भास नव्हता तो, खरचं उभ्या होत्या . हसत हसत म्हणत होत्या. ," तात्या खरचं मॅडम सोबत राहा ना तूम्ही. तुम्हालाही सोबत होईल आणि त्यांनाही. मुख्य म्हणजे माझी पण काळजी कमी होईल. आम्हा बायकांची काळजी करण्याची सवय जीव गेलेला असला तरी सुटत नाही. "

" मला काय वाटतं, रागावणार नसाल तर सांगू का?"
तात्यांचा आवाज उगाचच घोगरा झाल्यासारखा वाटला.

" बोला ना, आता मला कसलाच राग येतं नाही. आता खरं तर राग लोभ करायला वेळच नाही. सगळीकडे एकटे पणा भरून राहिला आहे फक्त " कुठल्यातरी पोकळीत बघत असल्या सारख्या त्या स्वतःशीच बोलल्या.

" मला वाटतं, आपण सोबत राहू या. तुमची काही हरकत आहे का ?" एव्हढ सगळ बोलायला तात्यांना धाप लागली. ते मॅडमकडे आशाळभूत नजरेने पाहात राहीले.

" राहू  या. पण या नात्याला काहीचं नावं द्यायचं नाही. नाहीतरी आता आपल्याला काही द्यायचं आहे ना काही घ्यायचं आहे. "

" चालेल ना. चलाल का आता आपल्या घरी. जवळचं आहे. नाहीतर तूम्ही म्हणत असाल तर रिक्षाने जावू या."

" रिक्षा नको त्या पेक्षा बोलतं बोलत चालत जाऊ या "

तात्या आणि मॅडम दोघेही चालतच घरी आले. बाहेरून आल्याबरोबर आराम खुर्चीवर अंग टाकून डोळे मिटून पडून राहणाऱ्या तात्यांना आज काय करावे सुचत नव्हते. त्यांनी मॅडमला पाणी दिलं. आणि घर दाखवायला सुरुवात केली.

घरातल्या एकेक भिंतीवर, प्रत्येक वस्तूवर माईंची सावली होती. प्रत्येक गोष्टींशी त्यांच्या आठवणी निगडीत होत्या. आपटे मॅडमही स्वतः विषयी बोलतं होत्या.

" चला मी तुमच्यासाठी चहा बनवते. घरात चहा, साखर, दूध आहे ना ? "  आपटे मॅडम उत्साहाने म्हणाल्या. " मला फक्त डबे दाखवून द्या. मी बनवून आणते. "

तात्यांनी डबे दाखवले आणि ते मागच्या परसदारात आराम खुर्चीवर येऊन बसले. वर सोनचाफ्याचे उंच झाडं वाऱ्यावर झुलत होते. वाऱ्याच्या मंद झुळका सुरू होत्या. मध्येच विलायचीचा सुगंध आला. पाठोपाठ आपटे मॅडम हातात चहाचे कप घेऊन परसदारी आल्या. दोघे जण चहा घेऊ लागले. वर सोनचाफा सळसळत होता.

दोघांचा एकांत कोठे संपला होता. दोघानाही कळले नाही. चहा झाल्यावर तात्यांनी मॅडमला एका लांब काठीने सोनचाफ्याची फुलं काढून दिली. त्या फुलांच्या सुगंधाने सर्व वातावरण भारले गेले.

तूम्ही थोडावेळ आराम करा. मी आपल्या दोघांसाठी काहीतरी खायला घेऊन येतो असं बोलून तात्या बाहेर पडले. कोपऱ्यावर असलेल्या हातगाडीवरुन त्यांनी बटाटेवडे, समोसे घेतले. आजवर आपल्याला हे असं करणं का सूचत नव्हतं हे त्यांना समजत नव्हतं. लहान मुलासारखा त्यांना खूप आनंद झालेला होता.

थोडेसे थकूनच ते घरी आले. बैठकीत असलेल्या माईंच्या फोटो कडे त्यांची नजर गेली. फोटोला मॅडमने सोनचाफ्याच्या फुलांचा सुगंधी हार घातलेला होता. त्या मूळे आधीच सुंदर असलेल्या माईंचा चेहरा प्रसन्न दिसत होता.

क्षणभरामध्ये आपलं आयुष्य सोनचाफ्या सारखं सुगंधी झालेलं आहे असा भास तात्यांना झाला.

( समाप्त )

🎭 Series Post

View all