सोनचाफा ( भाग पहिला )

सोनचाफ्याशी निगडीत एक हळवी प्रेम कथा
संध्याकाळचे सहा वाजले. तात्यांचं लक्ष आपोआप घड्याळाकडे गेलं. मोलकरणीने चहाचा कप टीपॉय वर आणून ठेवला. सोबत काही बिस्कीट होती.तात्यांना सहा वाजता चहा लागतो म्हणजे लागतोच. इतक्या वर्षाची सवय सुटणार थोडीच होती . माईनी जवळ जवळ तीस वर्ष ही वेळ पाळली होती. चहा झाल्या नंतर दोघं फिरायला निघतं. चौकातल्या बागेत जावून बसत. आज माई जावून सहा महीने होवून गेले. माईंचा फोटो भिंतीवर आला आहे. कितीही टाळायचं म्हटलं तरी तात्यांची नजर फोटोतल्या हसऱ्या चेहऱ्याकडे जातेच. नकळत मागच्या वाड्यात लावलेल्या सोनचाफ्याची फुलं ते घेऊन येतात. काही फुलं फोटो सामोरं ठेवतात. काही स्वतःच्या खिशात ठेवतात.माई तर नाही आहे आता. पण तिने पाणी घालून मोठा केलेला सोनचाफा अजून तसाच फुलतो आहे. तिची आठवणं करून देतो.

तात्या आणि माई यांच अगदीच कधीतरी क्वचित भांडण होई ,पण भांडणात तात्या माईंबरोबर काव्यातून भांडत आणि भांडणाचा मुळ मुद्दा बाजूला ठेवून माई पुन्हा पुन्हा नव्याने तात्यांनी रचलेल्या कवितेच्या प्रेमात बुडून जात. तात्यांनी सवयीने चहा घेतला. सोनचाफ्याची फुलं फोटो सामोरं ठेवली. काही खिशात ठेवली. " येतो " असं ओठातल्या ओठात बोलत त्यांनी पायात चपला घातल्या. नेहमी प्रमाणेच बागेकडे निघाले. मनातल्या मनात माई बरोबर गप्पा मारत ते स्वतःशीच बोलू लागले.

तुझ्या आठवणींना सोनचाफ्याचा ग सुगंधी बहर
तुझ्या अनुपस्थिती येतो तुझ्या आठवणींचा कहर

डोळे नकळत पाणावले. तात्यांच मन भरून आलं आपला जोडीदार आपल्या बरोबर नाही हे तात्यांना क्षणा क्षणाला आठवायच. तात्यांनी डोळ्यातलं पाणी डोळ्यांत गोठवलं . माईंनी मस्करीत बोलेले शब्द त्यांना आठवले. "मी तुमच्या आधी जरी देवा घरी गेले तरी तुम्हाला एकटं पडू देणार नाही. मला फक्त तुम्ही ओळखा. मी कोणाच्याही रूपात येऊन तुम्हाला भेटेलच आणि तुमची काळजी घेईल. तुम्हाला भेटेल मी आपल्या अंगणातल्या सोनचाफयाच्या रूपात. रोजच बहरताना कधी तुमची विचारपूस करत तुमच्या "त्या" लाडक्या मैत्रिणीच्या रूपात."

एके दिवशी अश्याच गप्पा खूप रंगात आल्या असताना तात्यांनी त्यांच्या आयुष्यातील एक घटना माईंना सांगितली होती आणि त्यावरून माई धबधब्या सारख्या खळखळून हसल्या होत्या. तात्या कॉलेजला असताना त्यांच्या कॉलेज मध्ये एक उंच, गोरीपान
मुलगी होती आणि तात्यांना नेहमी वाटायचं ती मुलगी त्यांच्या कडे बघतेय. पण तात्यांचा तो गैरसमज होता हे कळायला पाच सहा महिने गेले होते कारण तिच्या डोळ्यांत तिरळेपणा होता आणि ती तात्यांकडे नाही तर त्यांच्या मित्राकडे बघत असायची. हे जेव्हा तात्यांनी सांगितलं तेव्हा माई खूप हसत तर होत्याच पण तात्यांना बोलल्या , "बर झालं ती तुमच्या मित्राकडे बघत होती नाहीतर मग आपलं लग्न कस झालं असत."

माई गेल्यापासून तात्यांचा दिवस माईंची आठवण काढत सुरू व्हायचा आणि माईंच्या आठवणीत संपून जायचा. का कोणासा ठाऊक पण आज आठवणींच आभाळ खूपच भरून आलं होत. त्यातच एक कटू आठवण तात्यांना आली आणि मन अधिकच उदास झालं.

माईंना दिवस गेले होते. आठव्या महिन्यात डॉक्टर कडे नियमित तपासणीसाठी माई आणि तात्या आपल्या गाडीतून निघाले होते. साधारण चार पाच वर्षांच्या एका मुलीच्या हातातून फुगा निसटला आणि त्या फुग्याला पकडण्यासाठी ती धावत असताना अचानक तात्यांच्या गाडी समोर आली त्या चिमुकलीला वाचवण्यासाठी तात्यांनी भर्रकन गाडीच स्टेअरिंग फिरवलं आणि त्या मुलीला वाचवलं .पण तात्यांची गाडी एका खांबाला जाऊन धाडकन आदळली. ती छोटी चिमुकली वाचली पण माईंचा बीपी वाढला होता. तात्या घामाघूम झाले होते. आजूबाजूच्या लोकांनी तात्यांना आणि माईंना जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. माईंच्या डोक्याला मार लागला होता. रक्त येत होत तरी माईंचा एक हात पोटावरच होता . त्यांना आपल्या पोटातील बाळाची काळजी वाटत होती. तात्यांना मुका मार लागला होता. माईंची परिस्थिती फारच वाईट होती. माईंना दुसऱ्या दवाखान्यात हलवण्यात आलं. माईना प्रचंड वेदना होत होत्या. पोटात दुखतं होत. त्यातच माई बेशुद्ध झाल्या. त्यामुळं बाळाला धोका निर्माण झाला. डॉक्टरांनी बाळाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण बाळ वाचल नाही.

त्या दोघांच बाळ तर गमावलं गेलंच होत पण माईंच्या गर्भाशयाला इजा झाल्याने माईंना आपलं मातृत्व पण गमवावं लागलं . माई कधीच आई होऊ शकणार नव्हत्या. हे तात्यांना डॉक्टरांनी सांगितलं . तात्यांनी माईंना कळू नये म्हणून खूप खबरदारी घेतली.

तात्या माईंना खूप जपत असत. माईंनी आपलं बाळ गमवलं या घटनेला दोन वर्ष उलटून गेली होती. माईंना पुन्हा आई व्हावं असं वाटायचं म्हणून त्या तात्यांना म्हणायच्या , "आपण डॉक्टर कडे जाऊयात " तात्या हो म्हणायचे पण काही न काही कारण देऊन डॉक्टरकडे जाण टाळत असत. माईंना लक्षात आलं होतं की तात्या हे सगळं मुद्दाम करत आहेत. माई तात्यांवर चिडल्या आणि ," असं का करत आहात ? मला सांगा तुम्हाला माझी शप्पथ."  असं म्हणत त्यांनी तात्यांना वेठीस धरलं. नाईलाजाने तात्यांनी माईंना सगळं सांगितलं आणि दोघांनाही तो दिवस आठवला. एकमेकांच्या गळ्यात पडून तात्या आणि माई खूप रडले.

त्या दिवसा पासून माई सतत उदास राहू लागल्या. तात्या माईंना खुश ठेवण्यासाठी रोज काही न काही करत ,पण तो आनंद क्षणिक असायचा . माई पुन्हा उदास व्हायच्या. तात्यांना माहिती होत माईंना सोनचाफा फार आवडतो म्हणून एके दिवशी तात्यांनी सोनचाफ्याची फुलं न आणता सोनचाफ्याचं रोपच घेऊन आले आणि माईंना म्हणाले," हे बघ आज पासून तू या रोपट्याला आपल्या मुलासारखं सांभाळ आणि खूप मोठं कर. " सोनचाफ्याच रोप बघून माई खुलल्या आणि डोळ्यातलं पाणी पुसत लगबगीने उठल्या आणि वाड्याच्या मागील अंगणात ते रोप लावल.

अगदीच रोज सकाळी उठल्या की माई त्या रोपवरून मायेने प्रेमाने हात फिरवत त्या इलवल्याश्या रोपट्या बरोबर बोलत.

तात्यांना खूप चांगल वाटत होतं. आता माई पहिल्यासारखं आनंदी दिसत होत्या. रोपटं हळू हळू मोठं होत गेलं . चांगलं ताडमाड ऊंच झालं. फुलांनी बहरून जायला लागलं.  तात्या माई वयाने उतार होत होते.  सोनचाफ्याच्या सुगंधाने सगळा परिसर दरवळत असायचा .तात्या रोज माईंच्या केसात दोन् फुले माळत आणि स्वतःच्या खिशात दोन फुले ठेवत. सोनचाफ्याने देवघर सजवलं जात असे एवढा त्या सोनचाफ्याला फुलांचा बहर येत असे.
.
तात्यांच्या मनात अनेक आठवणी येत होत्या पण त्या आठवणींची तंद्री भंगली जेव्हा तात्यांनी बागेतल्या त्या बाकावर दुसऱ्या कोणत्या स्त्रीला बसलेलं बघितलं. तात्या आणि माईचं ठरलेलं रोज रुटीन होत ते. दोघेही बागेत जात तेव्हा ठरलेल्या बाकावर बसत. आजही तात्या तिथंच बसले होते पण माई बाजूला नव्हत्या. माई गेल्या तरी त्या जागेवर दुसरं कोणीच बसत नव्हतं पण आज तात्यांनी एका स्त्रीला माईच्या जागेवर बसलेलं बघितलं तात्या आपल्या जागेवर जाऊन बसले पण काहीच बोलले नाही पण तरी मनात विचार चालूच होता. माईच्या जागेवर ही परस्त्री कोण आहे?


क्रमशः……...

🎭 Series Post

View all