Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 10

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 10

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

दोघांनी सुरुवातीला नकार दिला होता. ऋषी, सोनल दोघे ही एका कोंडीत अडकले होते. होकार देण्या वाचून त्यांच्या कडे पर्याय नव्हता. बघू पुढे काय होतय ते...

ऋषी घरी आला. आजी त्याची वाट बघत होत्या. त्यांच्या हातात फोटो होता. "हे बघ ऋषी सोनलचा फोटो."

त्याने लक्ष दिले नाही. फोटो बघितला नाही.

"अस काय करतोस ऋषी? तुझा सारखा आपला नकार असतो. जावू दे. चल जेवून घे."

" मला नको मी झोपतो. "

"तू काय ठरवलं आहेस?" आजींनी विचारलं.

" तूच सगळं ठरवते आहेस ना आजी. मला काही बोलायला जागा नाही ना. तू म्हणते ते करू." तो म्हणाला.

"तुझ खूप चांगल होणार आहे बघ. तू नंतर बोलशील. माझ्यावर विश्वास ठेव. " आजी खुश होत्या.

"आर्या कुठे आहे? "

" तिच्या रूम मधे झोपली आहे. "

तो रूम मधे गेला. आर्या झोपली होती. पूनम फोनवर बोलत होती. तिच्या आवाजावरून समजत होत ती राघव सोबत भांडत असेल. ऋषीकडे बघून तिने फोन ठेवला.

ऋषी आर्या जवळ बसला. तिच्या केसातून हात फिरवत होता.

" ही जेवली ना. मला ही घरी यायला उशीर होतो. हिच्याकडे दुर्लक्ष होतं. " ऋषीला वाईट वाटत होतं

" हो दादा, आर्या जेवली. होम वर्क केला. आम्ही छान खेळलो. दादा, एक विचारू? तू लग्नाला हो म्हणाला?" पूनम त्याच्याकडे बघत होती.

"हो. आजी काही सुचू देत नाही. ती मुलगी तिच्या ओळखीची आहे."

"अरे पण रिटा घरची होती. ही नवीन मुलगी कोण आहे? कुठली आहे? यात रिस्क आहे. तिच्याकडे कोण बघेल. तिच्यावर अस कस सगळं सोपवणार? आई अशी, आजी आंधळा विश्वास ठेवते. मी आणि आर्या उरलो. आर्याला तर मम्मी हवी. त्यामुळे ती खुश आहे. " पूनम काळजी करत होती.

" आजी पुढे काय बोलणार? मला ही कस होईल वाटत आहे. " ऋषी म्हणाला.

" पण मग तू तर काहीच एक्शन घेत नाही. ओह जे सुरू आहे ते तुला पसंत आहे ना. मग काही प्रश्न नाही. लग्नानंतर दोघं छान रहा. " पूनम म्हणाली. तिला हे अस अचानक लग्न होतय ते आवडतं नव्हतं. त्यात ऋषी ही स्टँड घेत नव्हता.

" तू अस का बोलतेस पूनम? मी लग्न केलं नाहीतर आजी वृंदावनात रहायला जाईल. ते ही कायमची. तिच्या कडून ही आता होत नाही. घरी कोण करेल? "

" तू बायको आणतो की केअर टेकर. तू तिच्या कडून घरकामाची अपेक्षा का करतोस?" पूनम त्याच्याकडे बघत म्हणाली.

" घर सांभाळणं म्हणजे घर काम नव्हे ना पूनम. आईकडे बघावं लागेल. आर्या आहे. आजी आहे. जरा समजून घे. सगळे मला बोलताय. मी तिला एक चान्स द्यायचा ठरवलं आहे. " ऋषी म्हणाला.

" ठीक आहे दादा. अस असेल तर मी काही म्हणणार नाही. तुझ नीट होईल बघ. काळजी करू नकोस. " पूनम म्हणालो. मनातून ती सोनलला स्वीकारू शकत नव्हती. मला काय. दादा बघून घेईल. तो ही एकटा राहून कंटाळला असेल.

" तुझ काय सुरू होत पूनम? तू घरी परत जातेस का? " ऋषीने विषय काढला.

" नाही दादा, राघव ऐकत नाही. मला म्हणतो की तुला सासरी यावं लागेल. "

" मग काय प्रॉब्लेम आहे?"

"मी त्या छोट्याश्या फ्लॅटमधे रहायला जाणार नाही. घराच काही नाही. पण त्या लोकांना वागायची बोलायची पद्धत नाही. इन मीन तीन बेडरूम. त्यात सासुबाई सारखं आमच्या रुम मधे येतात. कपाटाला हात लावतात. काहीही विचारतात. माझे ड्रेस, पर्स घेतात. आम्हाला काही प्रायव्हसी आहे की नाही? ते त्यांना समजत नाही. त्यात त्या आजी मला ओरडतात. सासुरवास करतात. सकाळी लवकर उठा. सगळे काम करा. मला स्वयंपाक जमत नाही. मला ना त्यांची ही मिडल क्लास मेंट्यालीटी समजत नाही. आवडत तर अजिबात नाही. दुसर्‍याला त्याचा पर्सनल स्पेस दिला पाहिजे. कामाला बाई लावता येत नाही का? सगळं जॉबलेस असल्या सारखं स्वतः करत बसा. कंटाळा आला आहे. " पूनम खूप बोलत होती.

" तू राघव कडे बघ ना. तो चांगला आहे ना. त्याच्या साठी सगळं कर. शांततेत घरी समजून सांग. घरचे मदतनीस घेतील. तुम्ही दोघ सुखी रहा ना. का उगीच भांडताय? आधीचे दिवस आठवं. अस करु नकोस. बाकीच्यांकडे दुर्लक्ष कर. " ऋषी तिला समजावत होता.

" अस कस दुर्लक्ष करू दादा? दर पाच मिनिटाला जर कोणी मला बोलत असेल, टोमणे मारत असतील तर हे अस अवघड आहे. अश्या वातावरणात रहाता येत नाही दादा. हे खूप टॉक्सीक आहे. सासरी जाणं अवघड असतं." पूनम बोलत होती.

तरी पूनमच लव मॅरेज आहे. सोनलच काय होईल? तिचा तर होणारा नवरा म्हणजे मी ही ओळखीचा नाही. ती इथे कशी राहील? तरी ती माझ्याशी लग्न का करते आहे? नक्की तिचा काय स्वार्थ असेल?...... ऋषी विचार करत होता.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all