Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 11

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 11

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी पूनमला समजावत होता. माझं तर जावू दे निदान तू तरी सुखी हो. सासरच्या लोकांमधे, इकडे जमीन आसमानचा फरक होता तोच पूनमला आवडत नव्हता. बघू ती ऐकते का ते...

"पूनम अस नसतं. जरा समजून घेत जा. त्रास करून घेतला की होतो. तू तुझ्या घरच्यां मधे मिक्स हो. लग्न केल आहे तर आता अस करु नकोस. नवीन लोक आहेत. सवय होईल. नाही पटलं तर सावकाश सांगत जा. हळू हळू नीट होइल." ऋषी तिला समजावत होता.

"मला नाही वाटत राघव माझ ऐकेलं. तू ही किती मदत करायला तयार होता. त्याला एक फॅक्टरी देत होता. बंगला देत होता. पण तो अति प्रामाणिक आणि स्वतः चा मान जपतो. त्याने नकार दिला. काय हरकत होती. कंपनी घेतली असती तर मी पण मदत केली असती. " पूनम म्हणाली.

" ते तर तू आत्ता ही करू शकते. "

" कस? "

" तू तुझ काम सुरू कर. ती तुझी कंपनी आहे. तिकडे लक्ष घाल. तेवढी तू हुशार आहेस. एमबीए केल आहेस. मी बाकीच्या कंपनी बघतो."

"हो दादा. आता पुरे झालं रडगाणं. मी जॉईन होते. राघवच जावू दे. त्याला त्याच्या मनाप्रमाणे करू दे. " पूनम म्हणाली.

" तो परत आला तर मागे हटू नकोस. त्याच्याशी नेहमी प्रेमाने, मानाने वाग. तू ही थोडा कमीपणा घे. त्याला सांभाळ." ऋषी म्हणाला.

" हो दादा. पण मला तिकडे रहाणं जमणार नाही." पूनमने सांगितलं.

" तू तुझ ठरवं. पण एक सांगतो एकट रहाणं कठिण असतं. खूप त्रास होतो. सगळे सोबत असून ही एक वेगळीच पोकळी असते. ती फक्त जोडीदार भरून काढू शकतो. देवाच्या कृपेने तुमच नीट आहे. राघवला जप. यावर विचार कर."

" हो मी विचार करेन दादा. "

" प्रॉमीस कर आज पासून फोन वर तू त्याला वाकडं तिकडं बोलणार नाही. "

" हो दादा मी नीट वागेन."

खरच ऋषी दादा चांगला आहे. होणारी वहिनी कशी असेल? त्याचं चांगल होवू दे देवा. त्याच्या आयुष्यात सुख येवू दे. पूनम प्रार्थना करत होती.

******

ऋषी रूम मधे आला. नुसत बसला होता. आयुष्य काय वळण घेणार आहे समजत नाही. माझं ही, पूनमच ही नीट नाही. आई आजारी असते. तिला जगायची उमेद नाही. बाबा गेल्या पासून ती अशीच करते. गोळ्या घेत नाही. ऐकत नाही. जेवत नाही. आजी आमचं किती करते. तिच्यासाठी मी लग्न करतो आहे. हा निर्णय चुकीचा आहे की बरोबर समजत नाही.

त्याला झोप येत नव्हती. तो उठून बाल्कनीत जावून बसला. तो आकाशाकडे बघत होता. माया तू का लवकर जायची घाई केलीस? माझ्याकडे कोणी बघायचं? तुझी लेक तुला मिस करते माया. तिला मम्मी हवी आहे. तू हे नीट वागली नाहीस. आम्हाला पोरक करून गेलीस. त्याच्या डोळ्यात पाणी होतं. किती तरी वेळ तो तसाच बसुन होता.

******

सकाळी ड्रायवर सोबत एक बाई आल्या. " मी नंदा, सोनल मॅडम साठी साडी, दागिने पाठवले आहेत."

रसिका ते घेत होती.

"तुमच्या कडे द्यायचे नाही. फक्त सोनल मॅडम." नंदा म्हणाली.

" द्या की इकडे." रसिका ओरडली.

" नाही सांगितल ना. उगीच मधे मधे करू नका. सोनल मॅडम चला तयार व्हा." नंदाने सगळे सूत्र हाती घेतले.

" मॅडम कोणती हेयर स्टाईल करायची? कश्या पद्धतीने साडी नेसायची?"

"साधी तयारी करून द्या. " सोनल हळूच म्हणाली.

"मॅडम तुम्ही लाजू नका मी तुमची असिस्टंट आहे. यापुढे काहीही लागलं तर मला सांगत जा. "नंदा म्हणाली.

" हो. " चला तिकडे कोणी तरी सोबत असेल बर झालं.

आजींनी बरोबर सूचना केल्या होत्या. सोबत मेकअप आर्टिस्ट होती. ती सोनलला तयार करत होती.

रसिका लांबून बघत होती. काय दागिने दिले ते समजलं नाही. ही बाई कोण आहे? ती मला सामानाला हात लावू देत नाही. डेंजर दिसते आहे. माझ्यासाठी काही नाही वाटतं. मला परत ती मरून कलरची साडी नेसावी लागेल. प्रत्येक लग्नात तीच. दागिने ही काही नाही. चिडचिड करत रसिका तयारीला गेली.

" चला तयार व्हा." मीनलताई बाकीच्यांना आवाज देत होत्या.

सोनल तयार झाली बाहेर आली. लाल सिल्क साडीत ती खूप सुंदर दिसत होती. त्यात भरपूर दागिने घातलेले. हातभार बांगड्या. नाकात नथ, आंबाडा घातलेला. चेहर्‍यावर छोटीशी टिकली होती. ती खूप गोड दिसत होती. अशी श्रीमंती तिला शोभत होती.

"डोळ्यात काजळ घाल. आज हिला माझीच दृष्ट व्हायची." मीनलताई नजर काढत म्हणाल्या.

"आई... अस का म्हणतेस? " तिने आई, बाबांच्या पाया पडल्या.

" मनात काही ठेवू नकोस सोनल. चांगला संसार कर. पैशासाठी नाही तुझ खरच चांगलं व्हावं म्हणून हा आग्रह आहे." मीनलताई म्हणाल्या.

" आनंदात रहा बेटा." मोहनरावांनी तील जवळ घेतलं. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं.

सोनल शांत होती. तिने देवाला नमस्कार केला.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"