सोनेरी नात्यांची वीण भाग 15
©️®️शिल्पा सुतार
दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26
सगळे जमले होते. ऋषीला सोनल बाहेर भेटली होती. तीच नवरी आहे हे बघून तो थोडा तरी समाधानी होता. आता पुढे...
राघव आला. ऋषी उठून पटकन त्याला भेटला. घरचा एकुलता एक जावई. हा मुलगा खरच फार चांगल आहे. याच्या सारखा जीवनसाथी मिळाला. पूनमने समजून घ्यायला हवं. ती अजूनही थोडी अल्लड आहे. ऋषीला तो आवडत होता.
"तुमच्या घरचे आले नाही का?" त्याने विचारलं.
" नाही, मी इथून ऑफिसला जाणार आहे." राघव म्हणाला. खर तर त्याला आज पूनमशी थोड बोलायचं होतं. परत आई, बाबा सोबत असते तर पूनम चिडली असती. सगळा गोंधळ झाला असता. आई ही तिला टोमणे मारत असते. त्याने ती कंटाळते. तो इकडे तिकडे बघत होता.
पूनम... ऋषीने आवाज दिला.
निळ्या साडीत ती खूप छान दिसत होती. श्रीमंतीच तेज चेहर्यावर होतं. छोटी निळी टिकली लावलेली. तिच्या केसांवर गजरे ही छान दिसत होते. ती पण पटकन त्याला भेटायला आली. ती छान लाजून हसली होती. दोघांमधे प्रेम खूप होतं. तरी कोणी माघार घेत नव्हतं.
"कशी आहेस?" त्याने विचारलं. त्याची नजर तिच्यावर होती. तिला ही ते समजत होतं.
" मी ठीक आहे." त्याच्याशी बोलतांना तिचा ही विरोध मावळला होता. हा माझा नवरा आहे. तिला एकदम त्याला मिठी मारावीशी वाटली. आपलं कोणीतरी आलं असं वाटलं. सगळे असूनही तिला एकट वाटत होतं.
मला तुझ्या शिवाय करमत नाही पूनम. घरी चल. तू म्हणशील ते मी ऐकेन. अशी दूर राहू नकोस... राघवच्या तोंडावर आलं होतं. त्याने सांगितलं नाही.
राघव ही थोडा स्ट्रेस फुल वाटत होता. आधी सारखा फ्रेश नव्हता. एकटा राहून बहुतेक तो कंटाळला असेल. पण तरी तो घरच्यांना समज देत नव्हता. पूनमची बाजू घेत नव्हता. घरचे काय म्हणतील. यात तो अडकला होता.
आता यापुढे दोघींना सोबत ठेवायचं नाही. त्याने ठरवलं होतं. आईच्या जवळ घर घेवू म्हणजे सगळीकडे लक्ष राहील. पण त्याने अजून ते पूनमला सांगितलं नव्हतं.
आर्या पळत आली. "आत्तु नवीन मम्मी कुठे आहे? दाखव ना. ओह सॉरी... फक्त मम्मी कुठे आहे?"
"येईल आर्या. हे बघ मामा आले तू त्यांना भेटली का?" पूनम म्हणाली.
" हे घे आर्या तुला चॉकलेट. " राघवने दिलं.
" मामा तुम्ही कुठे रहातात? माझ्या घरी आत्तु कडे का येत नाहीत? " तिने विचारलं.
दोघ काही म्हणाले नाही.
पूर्वी पूनम माहेरी आली की दुसर्या दिवशी राघव लगेच तिच्या मागे हजर असायचा. ते आर्याला आठवलं.
खरच किती गोड दिवस होते ते. एकमेकांची ओढ होती. अगदी दोन दिवस ही दूर रहावत नव्हतं आणि आता, किती दिवस झाले मी माहेरी आली आहे तरी राघव माझी समजूत काढायला येत नाही. आपली शांती सुख पेक्षा त्याला एकत्र रहाणं महत्वाचं वाटतं. अरे मग एकत्र आहोत तर तुझ्या घरच्यांनाही थोड नीट वागायला सांग. तर ते ही नाही. सुनेला नुसते सगळे नियम. तिला अस त्रासून सोडलं तर कस होईल? त्याने मी आणि आई बाबा मधे त्यांना निवडलं. ठीक आहे काही हरकत नाही. हेच नशिबात असेल. सत्य परिस्थितीची जाणीव झाल्याने पूनम मनातून नाराज झाली होती.
जावू दे. मी आता राघव वर चिडणार नाही. तो जितका भेटेल तितक नीट वागेल. माझं माझं ऑफिसच काम करेल. एक दिवस सगळं नीट होईल. तिला आशा होती.
" मामा काल आत्तु रडत होती. मी आणि आत्तू तुमचा फोटो रोज बघतो. " आर्याने सांगितलं.
राघव, पूनम कडे बघत होता. त्याला कसतरी वाटलं. मी पण असाच त्रासात आहे पूनम. कोणाला सांगणार. तो तरी शांत होता. काही म्हणाला नाही.
" जा आर्या खेळ." पूनम म्हणाली.
" मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे पूनम. यावेळी फक्त आपल्या बद्दल. आपण आरामात भेटू." राघव म्हणाला.
ती हो म्हणाली. तिला ही हे झालं तर नीट करायच होत. माहेरी दिवस तर पास होत होता संध्याकाळ नंतर राघवची खूप आठवण येत होती.
" मी काम सुरू करते आहे." तिने सांगितलं.
" कुठे? " त्याने विचारलं.
" माझ्या कंपनी मधे. सध्या ती दादा बघतो आहे. स्मॉल स्केल आहे. पण मी सगळं शिकून घेणार आहे."
राघवला आठवलं हीच ती कंपनी आहे ऋषी दादा मला देत होते. मी नाही म्हणालो. पूनमच्या नावावर बरीच प्रॉपर्टी आहे. दोन तीन कंपनी ही. ती काम शिकते आहे. छान... पण ती घरी परत येण्याबद्दल काहीच म्हणाली नाही. की तुझी आठवण येते अस ही सांगितल नाही. ती तिच्या दुनियेत खुश आहे. जावू दे तिला डिस्टर्ब करायला नको. त्याने तो सेपरेट घर घेणार आहे हे तिला सांगितल नाही. तो गप्प खुर्चीत बसून होता. आजींनी बोलवल्याने पूनम कामात होती.
******
"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
