Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 21

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 21

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

सोनल सासरी निघाली. आर्या तिच्या जवळ होती. तिला समजत होतं सोनल रडते आहे. अपसेट आहे तरी डॅडी का मम्मीला समजावत नाही? मी रडली तर माझे किती लाड करतो. ऋषी सोनलला समजून घेईल का? पुढे बघू...

ऋषीने आर्याकडे सोनल साठी पाण्याची बाटली दिली. रडून रडून तिचे डोळे लाल दिसत होते. नाकाचा शेंडा थोडा गुलाबी झाला होता.

सोनल खूप काळजीत होती. अस अचानक लग्न झालं. त्यात घरचे विचित्र वाटत आहेत. ती कोण मामी खूपच चिडली आहे. तिचा नेकलेस कोणी घेतला समजत नाही. पूनम तिच्या टेंशन मधे दिसते आहे. तिला काय झालं माहिती नाही. मधेच नीट बोलते तर मधेच तिच्या ताणात असते. ऋषी इनामदार तर बोलतच नाही. आजी फक्त चांगल्या आहेत.


माझं कस होईल? बाबांची ट्रीटमेंट लवकर व्हायला हवी. मग मी इथून चालली जाईल. पण आर्या मला सोडणार नाही. ती गोड मुलगी आहे.

रस्त्याने आर्या खूप बोलत होती. ऋषी आणि सोनल शांत होते. सोनलला तर काय करावं ते सुचत नव्हतं. ती आर्याला मांडीवर घेऊन बसलेली होती. ऋषी मोबाईल मध्ये काहीतरी करत होता.

" आर्या इकडे ये." ऋषीने तिला बोलवलं. त्याला असं वाटलं सोनल तिला सारखं सांभाळते आहे. ही माझी मुलगी आहे. मी तिच्याकडे बघणार.

"मी मम्मी जवळ बसणार." आर्या येत नव्हती.

"नाही, इकडे ये." ऋषी म्हणाला.

ती अजून सोनलकडे सरकली. तिला घ्यायचं म्हणजे उगीच सोनलला धक्का लागला तर? ऋषीला ते नको वाटलं.

" असू द्या ना." सोनल हळूच म्हणाली.

ऋषी काही म्हणाला नाही.

सोनल आर्याला छान सांभाळत होती. हीच तर एक आहे जिला मी हवी आहे. नाहीतर बाकीचे माझ्याकडे दुर्लक्ष करतात. मी असली काय नसली काय त्यांना फरक पडत नाही. मी पण आर्याला जीव लावेल. तिच्या सोबत राहीन.

आर्या स्कूल बद्दल सांगत होती. सध्या आत्तु माझा अभ्यास घेते. रोज एक टीचर येते. पदमा मॅम. मला ती टीचर आवडते. ती तिचा सिलॅबस सांगत होती.

ऋषी, सोनल, आर्या घरी पोहोचले. सोनल सगळीकडे बघत होती. खूपच सुंदर, मोठा बंगला होता. सगळीकडे स्वच्छता होती. खूपच छान वाटतं होतं. जस काही हॉटेल आहे. अस घर तर मी फोटोमधे बघितलं होतं. एवढ कोण आवरत असेल? मदतनीस असतिल.

तीच्या माहेरी, आई बाबांच्या घरी दोन खोल्या होत्या. आत राजेश, रसिका झोपत होते. बाहेर ती आणि आई, बाबा. मोठ्याने बोललं तरी एकमेकांना ऐकू जाईल इतकी लहान जागा होती. पहिल्या सासरी अशी परिस्थिती होती. पैशासाठी हपापलेले लोक.

अस घर ती खरच पहिल्यांदा बघत होती. आत किती रूम असतिल? प्रत्येकाला सेपरेट रूम? कोणी कोणाला भेटत असेल की नाही?

" मम्मी चल." तिने बघितलं ऋषी खाली उतरून उभा होता. पूनमने ओवाळून त्यांना घरात घेतलं.

"जा बेटा देवाला नमस्कार करा." आजी म्हणाल्या. दोघां सोबत आर्या होती. नंतर ते आशिर्वाद घ्यायला आशाताईंच्या रूम मधे आले. त्या उठून बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात कौतुक होतं.

रूम मधे एक नर्स खुर्चीवर बसलेली होती. एक मुलगी ही होती. ती डॉक्टर असेल बहुतेक. या सगळ्याची काय गरज आहे? उगीच सिरियस वातावरण करून ठेवलं आहे अस सोनलला वाटलं. दोघी मुली बाहेर गेल्या.

" सोनल अशी जवळ ये. आज तू खूपच सुंदर दिसते आहेस. " आशाताई म्हणाल्या.

सोनल ही त्यांना भेटून खुश होती. या चांगल्या आहेत. मेन म्हणजे शांत आहेत. ती बघत होती त्यांच वजन अगदीच कमी झालं होतं. डोळे खोल गेले होते. डोळ्याखाली काळे वर्तुळ होते. अंगावर नाइट गाऊन होता. त्या तरुण पणात फार सुंदर दिसत असतिल.

यांना नक्की काय झालंय? तिला विचारावसं वाटलं. पण कोणाला विचारणार? रूम मधे ऋषी, आर्या, ती आणि आशाताई होत्या.

दोघांनी त्यांच्या पाया पडल्या.

"खूप सुखी रहा. एकमेकांना समजून घ्या. आता तुम्ही दोघचं नाहीत आर्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. या कुटुंबाची ही जबाबदारी तुमच्यावर आहे. एवढी मोठी ईस्टेट आहे. नीट सांभाळा. त्याला वारस तर हवा. तसा विचार करा. तसे तुम्ही दोघे समजूतदार आहात." आशाताई हसत होत्या. सोनल लाजली होती. ऋषी लक्ष नसल्या सारखं दाखवत होता.

" हे लग्न घाईत झालं आहे. ऋषी तुझ्या बिझी दिनक्रमातुन सोनलला वेळ दे. फिरायला जावून या. "

" हो आई. तू जेवलीस का? " ऋषी त्यांच्या जवळ बसला.

" इच्छा नाही. "

" अस करायच नाही. " ऋषी प्रेमाने बोलत होता.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"


0

🎭 Series Post

View all