Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 36

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 36

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी, सोनल मंदिरात जावून आले. ती माहेरी निघाली. ऋषीने आर्याला सोनल सोबत जावू दिलं नाही. दोघी नाराज होत्या. आता पुढे.

सोनल विचार करत होती. आईकडे गरिबीची परिस्थिती आहे. तिकडे काही नाही. घर ही साधं आहे. आर्याची गैरसोय होईल. जावू दे उगीच तिला काही लागलं तर हे ऋषी इनामदार माझा जीव घेतील. तिला तिच्या डॅडी कडे राहू दे.

पण हे कसे वागत आहेत? मी तिची आई आहे ना? की केअर टेकर? मी तिची काळजी घेईल. थोडा ही विश्वास नाही का? एवढं आहे तर इतर वेळी ही तिला का माझ्या जवळ सोडतात? काल तर आर्या पूर्ण वेळ माझ्या जवळ होती. ऋषी इनामदार तिला बघायला ही आले नाही. आज अस करत आहेत. मला काही हक्क नाही का?

विचार करण्यात काही अर्थ नाही. इथे बहुतेक अस होईल. हे मला काही महत्व देणार नाही. तुला रहायचं तर रहा. जायच तर जा. माझी मुलगी तुझ्या सोबत येणार नाही असं आहे.

"डॅडी मला मम्मीकडे जायचं आहे. प्लीज मला सोड." आर्या नाराज होती.

" नाही आर्या. डॅडी जवळ रहा." ऋषी ओरडला.

"मला जावू दे ना. मम्मी ही नाराज आहे. ती माझ्यासाठी थांबली आहे." आर्या रडत होती.

" नाही, तुझ्या मम्मीला तुझ्या बद्दल इतकं वाटत असतं तर ती माहेरी गेली नसती. तू माझ्या जवळ रहा. रडू नकोस आर्या. नाहीतर मी अजून ओरडेन." ऋषी म्हणाला.

" डॅडी, मम्मी परत येईल ना? " आर्या डोळे पुसत म्हणाली. तिला भीती वाटत होती. आर्या लहान वयात पोरकी झाली होती. तिने धसका घेतला होता.

ऋषी काही म्हणाला नाही.

आर्याला रडतांना बघून सोनलला कसतरी झालं. दोन मिनिट वरती जावून बघू का? आर्याला जवळ घेवू का? ऋषी इनामदार ओरडले तर? त्यांच्या रूम मधे न विचारता कस जाणार? तिला भीती वाटली.

" आजी, पूनम... " तिला वाटलं त्या मदत करतील.

" आम्ही आर्याकडे बघतो. तू जा सोनल ." आजी म्हणाल्या.

" नाही, नको.. मी आर्याकडे बघते." सोनल म्हणाली.

" अग ती असाच त्रास देते. आता ती विसरली असेल. वरती खेळत असेल. तू जा. उद्या परत ये." पूनम म्हणाली.

" नक्की ना? मला फोन करा. आजी, पूनम."

" हो."

सोनल, मीनलताई, मोहनराव निघाले. रस्त्याने ती विचार करत होती. ऋषी इनामदार माझ्यावर चिडलेले असतात. आता ही आर्याला दिलं नाही. सगळं कठिण झालं आहे. हे मला आपलं मानत नाही. इथे कस रहाणार? सगळे म्हणतात हक्काने वाग. कस पण?

तिच्या डोळ्यासमोरून आर्याचा चेहरा जात नव्हता. ती ऋषी इनामदारांची लाडकी मुलगी आहे. त्यांना काळजी वाटत असेल. तशी ही मी परकी आहे. अजून ओळख नाही. त्यांच ही बरोबर आहे. म्हणूनच त्यांनी तिला माझ्या सोबत येवू दिलं नाही. जावू दे. ते कसा विश्वास ठेवणार. आम्ही गरीब, त्यांच्या मुलीची गैरसोय होईल. मी पण आता यांच्यात अति मन लावणार नाही. मला ते घर माझं असं वाटत नाही. एका दिवसात नको नको झालं.

मोहनराव, मीनलताई खूप खुश होते. इनामदार किती चांगले आहेत तेच बोलत होते.

"आजींनी किती छान पाहुणचार केला. मला आणि रसिकाला ही साडी दिली." मीनलताई म्हणाल्या.

ते घरी आले. सोनल नुसती बसली होती. तिचे विचार थांबत नव्हते. ना सासरची ना माहेरची. मला माझं घर नाही. कुठे हक्क नाही. काही भविष्य नाही. काय करू समजत नाही. इकडे आईकडे दादा, वहिनीला मी नको आहे. तिकडे नवरा परकं मानतो. ते बोलत नाहीत. तरी मीच उगीच आशा लावून त्यांच्याकडे बघत असते.

एक मन म्हणतं होतं हे नीट होईल. काळजी करण्यासारखं काही नाही. दुसर्‍या मनाला सत्य परिस्थिती दिसत होती.

शाळेचा जॉब नीट करायचा. तो टिकला पाहिजे. पुढे काय होईल सांगता येत नाही.

रसिका चिडलेली होती. तिची आदळआपट सुरू होती. मीनलताई, सोनल एकमेकींकडे बघत होत्या.

"मी तिच्याशी बोलू का?" सोनलने विचारलं.

"नको जावू दे. मी तिच्यावर आरोप केला नव्हता. फक्त बोलत होती." मीनलताई म्हणाल्या.

"यापुढे तू काहीच बोलू नकोस आई."

"हो बाई आता कानाला खडा लावला. हे कठिण आहे." मीनलताई म्हणाल्या.

रसिका चहा घेवून आली. ती हॉल मधे उभी होती. "सोनलताई एक बोलू का? तुम्ही किती का श्रीमंत असे ना. आम्हाला काय. आम्हाला कमी समजू नका ना. असे आरोप करू नका."

" काय झालं वहिनी. माझं काही चुकलं का? मी तुला काही म्हटली का? अशी चिडु नकोस ग. " सोनलने विचारलं.

आधीच डोक्‍याला काही ताप कमी आहे का? त्यात ही वहिनी ही अस बोलते. सोनलला रसिकाशी भांडण्यात किंवा बोलण्यात अजिबात इंट्रेस्ट नव्हता. थोडी शांती हवी आहे. ती मिळेल का?

" आईंना विचारा. त्या माझ्यावर असा आळ आणू शकत नाही. मी तुमच्या मामे सासूचा नेकलेस घेतला नाही." रसिका म्हणाली.

" मला माहिती आहे वहिनी. अग आई असच म्हणत होती. रागवू नकोस. मी आईला सांगते. मी तुझी माफी मागते. हा विषय इथे संपव. " सोनल म्हणाली.

" ठीक आहे काही हरकत नाही. " ती आत गेली. नाहीतरी तिला ही पुढे जावून सोनलशी काम होतं. तिच्याशी जास्त भांडून उपयोग नाही. सोनलचा श्रीमंत नवरा आमचं जॉबच काम करू शकतो हे रसिकाला माहिती होतं. पण ते ऋषी इनामदार सोनल ताईंना भाव तरी देता का? त्यांच्यातला दुरावा स्पष्ट दिसत होता. इथे त्यांच नीट नाही. आमचा नंबर कधी लागेल?

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"