Login

सोनेरी नात्यांची वीण भाग 39

ही सोनेरी नात्यांची वीण आहे हळूहळू उलगडणार
सोनेरी नात्यांची वीण भाग 39

©️®️शिल्पा सुतार

दीर्घ कथा लेखन स्पर्धा डिसेंबर जानेवारी 2025-26

ऋषी द्विधा मनस्थितीत अडकला होता. सोनलला स्विकारायला तो तयार नव्हता. उगीच काहीही कारण तो पुढे करत होता. आर्याला तिची ओढ होती. बघू आर्यासाठी तरी ते एकत्र येतील का? पुढे...

सोनल सकाळी तयार होती. ती पोळ्या करत होती. रसिका भाजी चिरत होती. तिने भाजी केली. राजेश पुढे बसला होता. मोहनराव पेपर वाचत होते. मीनलताई आत आल्या.

" तू का पोळ्या करते आहेस सोनल? कुठे जाते आहेस?"

" शाळेत आई. मला डबा हवा आहे. इतक्या सुट्ट्या घेवून चालणार नाही. परीक्षा जवळ आल्या आहेत." सोनल आवरत होती.

" अग पण तुझ्या घरच्यांना विचारल का?" मीनलताई सहज म्हणाल्या.

" त्यात काय विचारण्या सारखं आई. हे ऑफिसला जातांना मला विचारुन जातील का? मी माझा जॉब सोडणार नाही." ते तर माझ्याशी बोलत ही नाहीत. शेवटच वाक्य अर्थात ती मनातल्या मनात म्हणाली.

मीच सगळं विचारून करायच का? विचारलं तरी उत्तर देण्यात मुळात यांना इंट्रेस्ट आहे का? ते म्हणतील शाळेत जायचं तर जा, मला काय.

" काय बाई आजकालच्या मुली. नवर्याच वर्चस्व यांना मान्य नाही. थोड विचारल तर काय होणार आहे. लगेच चिडतात. आम्ही अजूनही यांना विचारल्या शिवाय घराबाहेर पाउल ही टाकत नाही." बडबड करत मीनलताई मोहनरावां जवळ बसल्या.

" काय झालं मीनल?" ते विचारत होते.

" सोनल ऐकत नाही. शाळेत जाते आहे."

" तिला काम असेल." मोहनराव म्हणाले.

यांना ही काही समजत नाही. माहेरी आली. इथूनच शाळेत जाते. निदान आजींना तरी सांगायचं.

सोनल बाहेर आली. ती वह्या घेत होती. हा गठ्ठा धरता येणार नाही. रिक्षा करावी लागेल.

" सोनल अग, तुझ्या घरी अजून काही प्रोग्राम नसतील ना. म्हणुन मी म्हणते आहे. " मीनलताई विचारत होत्या. आत्ता तर लग्न झालं. सोनल लगेच शाळा जॉईन करते आहे. त्यांना वाटलं ती फिरायला वगैरे जाईल. माझी लेक किती सदगुणी, सुंदर आहे. कोणी तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नव्हतं. ऋषी राव तिची वाट बघत असतिल अस त्यांना वाटलं.

" काही प्रोग्राम नाहीत आई." सोनल सहज म्हणाली. ती तीच तीच आवरत होती. चेहरा सिरियस होता.

मीनलताई तिच्याकडे बघत होत्या. ही नवी नवरी आहे, कालपासून बघते आहे तिच्या घरच्यांचा काही फोन नाही. नवीन आहे. जावू दे. दोघ अजुन जास्त बोलत नसतील. माझ्या लेकीच चांगलं होवू दे देवा. त्यांनी प्रार्थना केली.

" सोनल थोडे पैसे आहेत का? बाबांचे औषध आणायचे होते." राजेश विचारत होता.

"मी येतांना घेवून येईल दादा." ती म्हणाली.

दादाला कोणतीच जबाबदारी नको असते. हा अस वागतो ना. बाबांची ट्रीटमेंट करत नाही. आईकडे बघत नाही. आई वडील फक्त माझीच जबाबदारी आहे का? जावू दे. आई बाबांच केल तर मला कधीच काही कमी पडणार नाही.

चहा घेवून सोनल निघाली. रस्त्यांतून तिने पूनमला फोन केला " आर्या ठीक आहे ना? "

"हो वहिनी. तू आज येतेस ना? "

" हो आता शाळेत जाते आहे. संध्याकाळी येईल. " सोनल म्हणाली.

" तू जॉईन होते आहेस?"

" हो पूनम."

पूनम काही म्हणाली नाही. ही घरी राहून काय करेल? ऋषी दादा तिच्याशी बोलत नाही. नवरा आपल्या बाजूने नसतो तेव्हा कस वाटत तिला माहिती होतं. सोनल वहिनी दाखवत नाही पण ती टेंशन मधे आहे. तिला तीच बघाव लागेल. हे लग्न टिकेल की नाही माहिती नाही. आजीने उगीच दादाला लग्नासाठी बळजबरी केली.

आर्या उठली. तयार झाली. ती शाळेत गेली. पूनम ही तयार होती. ऋषी नाश्त्याला आला. नेहमी प्रमाणे तो कोणत्या मीटिंग आहे ते बघत होता.

"पूनम तू ऑफिसला येतेस का?" त्याने विचारलं.

" हो दादा."

" राघव कुठे आहे? काल ही आला नाही. त्याचं काय ठरत आहे?" ऋषीने विचारलं.

" काहीच माहिती नाही दादा. काल ही तो बिझी होता. मी काम सुरू करते." पूनम म्हणाली.

"तू परत त्याला काही म्हणाली का?"

" नाही, काल तर मी त्याला फोन ही केला नाही." पूनम म्हणाली.

पूनम फोन लावून बघत होती. राघव एअरपोर्टवर होता.

" अस अचानक कुठे जातो आहेस राघव? " तिला काही माहिती नव्हतं.

"दिल्लीला, ऑफिस कामासाठी. " राघव म्हणाला.

" तू मला एका शब्दाने सांगितल नाही. "

" अग रात्री उशिरा ठरलं. वाटल तू झोपली असशील. " राघव म्हणाला.

" इच्छा असेल तर मेसेज टाकता येतो. सकाळी काय झालं होतं? तेव्हा फोन केला असता. " पूनम नाराज होती.

" अग मी चेक इन करुन तुला फोन करणार होतो. "

"ठीक आहे. अस ही तू मला आता हल्ली स्वतः हून फोन करत नाही. तू तुझा तुझा खुश आहे वाटत."

"अस काही नाही पूनम. " राघव म्हणाला.

"कधी परत येणार आहेस? "

"एक आठवडा लागेल. "

" काळजी घे. हॅप्पी र्जनी. " तिने फोन ठेवला.

******

"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"