Login

सोन्याची अंडी

सोन्याचं अंडं देणाऱ्या कोंबडीची आधुनिक गोष्ट

कुमुदताई त्यांच्या नोकरीतून सेवानिवृत्त झाल्या तशी त्यांच्या भाचेकंपनीने हट्ट धरला.. "आत्या, आता अजिबात एकटं राहायचं नाहीस. आमच्या घरी राहायला ये."

कुमुदताईंना एकटं राहण्याची सवय झालेली.. आणि त्यांचं त्यांचं बरं सुरू होतं. पण त्यांच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी दोघा भावांच्या चौघाही मुलांनी अगदी त्यांच्या घरी ठाणच मांडलं.. "आमच्या घरी राहायला चल." प्रत्येकाचा हट्ट होता.

कुमुदताईंना अगदी भरून आलं. शेवटी "रक्ताला रक्ताची ओढ!" त्यांच्या मनात आलं अन् भूतकाळात घडलेल्या घटनांच्या जखमेवरची खपली अलगद निघाली अन् जखम पुन्हा ठसठसू लागली.

कुमुद ताईंचे वडील त्यांच्या लहानपणीच गेले. आईने शिवणकाम करून त्यांना आणि त्यांच्या दोघा धाकट्या भावांना मोठं केलं. दोघे भाऊ अतिशय हुषार.. त्यांना शिक्षणाची आवड होती. त्यामुळे कुमुद ताईंनी वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच नोकरी धरली.. अन् भावांची शिक्षणं पूर्ण केली.

दोघा भावांनी आपल्या पसंतीने प्रेमविवाह केले आणि कुमुदच्या धाकट्या भावजया घरात सूना म्हणून आल्या. कुमुद ताई नोकरी करत.. त्यांचा गलेलठ्ठ पगार घरात येई म्हणून भावजया खुश होत्या. अगदी "कुमूदवन्सं.. कुमुदवन्सं.." करत तिच्या आगे मागे करत. ती ऑफिसातून घरी परत येताच तिच्या समोर आयता चहा ठेवत. कुमुदला घरात पाण्याचा तांब्या देखील उचलण्याचं काम नव्हतं.

तरीदेखील त्यांच्या मनात सल होतीच. \"धाकट्या भावांची लग्नं झालीत. आपल्या लग्नाचं काय?\" आई म्हातारी होती. तरीही तिने मुलांना कुमुदच्या लग्नाचं पाहण्याबद्दल सुचवलं. मुलासुनांनी नावापुरता होकार दिला.. पण कुणीच काही बघेना.

मुलं मोठी होत गेली तसतसा भावजयांचा नूर पालटू लागला.

एक दिवस कुमुदताई मैत्रिणींबरोबर साड्यांच्या सेलला‌ गेल्या अन् स्वतःसाठी महागड्या पाच साड्या घेऊन आल्या. साड्या बघताच मोठ्या भावजयीच्या कपाळावर चांगल्या दिसेलशा आठ्या पडल्या.

"वन्सं, गेल्या महिन्यात तीन साड्या घेतल्या होत्या तुम्ही.. आता पुन्हा पाच साड्या?" तिनं न राहवून विचारलंच.

"अगं, सेल लागला होता.. आणि तसंही ऑफिसला जायचं तर लागतातच साड्या.." कुमुदनं भाबडेपणानं उत्तर दिलं.. तर धाकट्या भावजयीच्या‌ पण जीवावर आलं.

"तरीही खर्च बेतानेच करत जा." धाकटीनं करडेपणानं सांगितलं. "मुलं मोठी होताहेत.. त्यांचा खर्च वाढलाय.. तुम्ही जर असा फालतू अवास्तव खर्च करत राहिलात तर पैसा कसा पुरेल?"

कुमुदताईंना धक्का बसला. त्यांनी त्यांच्या परीनं भावांना शिकवून स्वतःच्या पायांवर उभं केलं होतं. भावांच्या‌ संसाराची जबाबदारी त्यांची होती. कुमुदताई फक्त पगारातील थोडा भाग घरखर्चासाठी देत. पण आज भावजयांची वृत्ती बघून त्या निराश झाल्या.

कुमुदताईंना ना घर ना संसार ना मुलंबाळं. त्यांना फार शौक देखील नव्हते. भावांच्या शिक्षणाची जबाबदारी असताना त्यांच्याजवळ मोजक्या पाच सहा साड्या असत. हल्लीच त्यांचा हात जरा मोकळा झाला होता म्हणून आयुष्यात पहिल्यांदा त्यांनी मनमोकळी खरेदी केली तर भावजयांच्या डोळ्यात खुपलं.

त्यांनी मनाशीच काही तरी ठरवलं अन् त्या मोठ्या भावाच्या खोलीकडे वळल्या.

"हे, बघ.. तू लहानसहान कारणावरून ताईला काही बोलत जाऊ नकोस आजच्या सारखं!" भाऊ त्याच्या बायकोला सांगत होता.. "उलट तिची जमेल तेवढी सेवा कर.."

कुमुदला‌ भरून आलं.. "भावाला आपल्या कष्टांची जाण आहे!" तिच्या मनात आलं.. तेवढ्यात भावाचे शब्द कानावाटे तिचे काळीज चिरत गेले..

"आपल्या मुलांनाही आत्याचा लळा लागेल असं बघ. नाहीतर शेवटी ताईचा पैसाअडका धाकट्याकडे जाईल."

"छे! असं अजिबात होणार नाही. मी बरी त्यांच्या घशात जाऊ देईन वन्संचा पैसा! त्यासाठी तर धाकटीशी पटत नसूनही अजून एकत्र कुटुंबात राहतेय मी. घर मामंजीनी बांधलंय ना! मग वन्सं इथेच राहणार.. आणि त्यांच्या सोबत राहण्यात आपला फायदा आहे एवढं समजतं मला!" भावजय फणकाऱ्याने म्हणाली.

कुमुदताईंनी तातडीनं आपली बदली दूरच्या गावी करून घेतली अन् दोघे भाऊ हात चोळत बसले.

मध्यंतरीच्या काळात कुमुदताईंची आई गेली अन् कुमुदताईंचा भावांशी संपर्क देखील कमी झाला. दरम्यानच्या काळात त्यांची भाचे मंडळी देखील मोठी झालेली होती.. अन् त्यांच्या सेवानिवृत्तीची बातमी कळताच गुळाभोवती माशा घोंगाव्यात तशी त्यांच्या आत्याभोवती गोळा झाली.

खरंतर भाच्यांना पुढे करणं हे भाऊ आणि भावजयांचं कारस्थान आहे हे कुमुदताई पक्कं जाणून होत्या. पण आता उतारवयात त्यांनाही सोबतीची गरज होतीच. असं काय करावं की \"साप भी मरे और लाठी भी ना टूटे!\" विचारांनी त्यांना भंडावून सोडलं.

"तुम्ही म्हणताय तर मी तुमच्या एकेकाकडे एक एक वर्ष राहीन!" कुमुदताईंनी चतुराईनं उत्तर दिलं.. "पण माझ्याकडे पैसे नाहीत. मी मला मिळालेली सगळी रक्कम एलआयसीच्या जीवन शांती योजनेत आजीवन गुंतवणार आहे. मला फक्त दरमहा पेन्शन मिळेल.. मी जिथे राहीन तिथेच पेन्शन मधील काही रक्कम देईन.. जर काही कारणाने आपलं नाही जमलं तर \"टाटा बाय बाय!\" मी आणि माझी पेन्शन आम्ही दुसरा घरोबा करू!" कुमुद ताईंनी शेवटी गौप्यस्फोट केला.. "आणि मी असताना जी व्यक्ती मला उत्तमरीत्या सांभाळेल तिच्या नावाने मी नॉमिनेशन करून ठेवेन.. आणि लक्षात ठेवा.. मी नॉमिनेशन कितीही वेळा बदलू शकते!"

चौघं भाचे एकमेकांकडे टकमका बघू लागले. \"सोन्याची अंडी मिळवायची तर कोंबडी जपायलाच हवी\" हे समजण्याइतके ते नक्कीच हुषार होते..


कुमुद ताईंनी चतुराईने आपली म्हातारपणाची सोय मात्र उत्तम जमवली होती.