Login

सोन्याच्या साखळीत गुंतलेलं आयुष्य. भाग - ५

हुंडा एक विकृती
सोन्याच्या साखळीत गुंतलेलं आयुष्य. भाग - ५

सानिकाच्या मृत्यूमुळे गावात एकच खळबळ माजली होती. ती हुशार, शांत आणि सुसंस्कृत मुलगी होती. त्यामुळे ती अचानक असा काही टोकाचा निर्णय घेईल, हे कोणालाच वाटत नव्हतं… पण तिची डायरी तिच्या वेदनांची साक्ष देत होती.

दिपकच्या आजूबाजूच्या लोकांनाही त्यांच्या घरातले वाद माहिती होते पण जोपर्यंत सानिका सहन करत होती तोपर्यंत कोणीच मदतीला येत नव्हते पण आता बोलायला सगळे पुढे येत होते.

गणपत हा एक सज्जन माणूस होता ज्याने कधीच कोणाशी वाद घातला नाही की कधी न्यायालयाच्या पायरीवरही पाऊल ठेवलं नव्हतं, पण आता आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी रोज कोर्टात चकरा मारत होता.

"मला माझ्या लेकरासाठी लढायचंय. तिचं जगणं थांबलं, पण तिच्या मृत्यूला जबाबदार लोकांना शिक्षा झालीच पाहिजे." असं गणपतचं ठाम मत होतं.

पोलिसांनी तपासात सानिकाच्या डायरीचे पान, मोबाईलवरील मॅसेज, आणि सासरच्यांच्या दबावाच्या पुराव्यांवरून त्यांच्यावर हुंडाबळीचा गुन्हा दाखल केला.

दिपक आणि त्याच्या आईवडिलांना अटक झाली. कोर्टात केस सुरू झाली. त्यावेळी वकील तपासात म्हणाले की, "ही आत्महत्या नाही, ही एक नियोजित हत्या आहे समाजाच्या दडपणाने, लोभाने, आणि स्त्रीच्या आत्मसन्मानाच्या पायमल्लीने घडलेली हत्या." अशा नराधमांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, म्हणजे बाकीच्या लोकांना असं वागताना शंभर वेळा विचार करावा लागेल.

त्यानंतर प्रसार माध्यमांनीही या प्रकरणाची दखल घेतली. गावोगावच्या मुलींसाठी सानिका दिवा बनली पण तो दिवा जळून गेल्यावर प्रकाश देणारा ठरला.

दीड वर्षांच्या लढ्यानंतर न्यायालयीन निर्णय आला
दिपक आणि त्याच्या आईवडिलांना सात वर्षांची शिक्षा आणि दंड ठोठावण्यात आला. त्यावेळी दिपक आणि त्याच्या आई बाबांना आपल्या चुकीची जाणीव झाली. पण आता वेळ निघून गेली होती.

गणपतने सानिकाच्या आठवणीसाठी गावात एक पुस्तकालय सुरू केलं आणि त्याचं नाव "सानू वाचनालय" असं ठेवलं तिथे रोज शाळकरी मुली, महाविद्यालयीन तरुणी, शिक्षक वाचायला यायचे. सानूचं स्वप्न होतं , शिक्षण देणं आणि शिकणं. ते आता जणू आता शंभरपट वेगाने पूर्ण होऊ लागलं.

सानिका गेली, पण तिच्या मृत्यूने समाजात एक हलकासा बदल घडवला. गावातल्या अनेक घरांत आता "हुंडा" या शब्दाचा उच्चारही बंद झाला होता.

हुंडाबळी ही फक्त कायदेशीर बाब नाही, तर ती एका मुलीच्या अस्तित्वाचा घात असतो. पण हे अजूनही काही लोकांना समजत नाही. त्यामुळे आजही समाजात अशा घटना घडत आहेत. प्रत्येक सानिकासाठी एक आवाज उभा राहिला पाहिजे या आवाजच तिचा खरा न्याय आहे.

समाप्त.

(ही कथा जरी काल्पनिक असली तरी आताच घडून गेलेल्या घटनेवर आधारित आहे. या घटनेचा निषेध म्हणून मी ही कथा लिहिली आहे.)

🎭 Series Post

View all