शीर्षक:- सूड
भाग:- १
"काय आणलेस गं, सुधा?" सुधाने आणलेले गिफ्ट उलटे पालटे करून पाहत ओवी उत्साहात म्हणाली.
"तूच उघडून बघ ना. म्हणजे तुला कळेल." काय गिफ्ट आहे हे न सांगता सुधा ओवीला उघडून बघण्यासाठी उल्हासून म्हणाली.
"वाॅव ! कसलं भारी आहे यार, हे पैंजण." गिफ्ट उघडून बघितल्यावर चांदीच्या सुंदर पैंजणांची जोड पाहून ओवीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
"तुला आवडले ना." सुधाने तिला विचारले.
मान वरखाली करत हसत भावुक होतं ओवी म्हणाली,"खूप खूप आवडले. थॅंक्यू सो मच, सुधा ; पण यार हे एवढे महागडे गिफ्ट आणण्याची गरज नव्हती. तू आलीस हे खूप आहे."
"असू दे गं, तुझ्या आयुष्यातला खास दिवस आहे तर गिफ्ट ही खास असे आयुष्यभर लक्षात राहिल अशीच हवी ना ? तेव्हा चुप बसं ! घालून दाखवं बरं हे." सुधा तिला पैंजण पायात घालून दाखवायला सांगत म्हणाली.
ओवीचे लग्न तिच्या काॅलेजमध्ये प्रेमात असणाऱ्या मानव सोबत होते. त्यांचा हा प्रेमविवाह असला तरी ते घरच्या सर्व लोकांच्या संमतीने विधीवत लग्न करणार होते.
ती लग्नासाठी तयार होऊन बसली होती. तेव्हा तिची जिवलग मैत्रीण सुधा आली होती. तिच्या म्हणण्यानुसार ओवीने तिने आणलेले सुरेख पैंजण पायात घालून दाखवले. तिला आवडले म्हणून सुधाला खूप समाधान वाटले.
त्या दोघी बोलत होत्या तोच ओवीची वहिनी रागिणी तिथे येत तिला म्हणाली,"ओवी, आवरले ना तुझे? चल अक्षदांची वेळ झाली आणि हे काय घातलेस तू पायात? किती काळे मणी आणि तो कसला धागा गुंफला आहे त्यात?"
रागिणी कपाळावर आठ्या पाडत तिच्या पायातील पैंजणाकडे पाहिले.
"पैंजण आहे, वहिनी. सुधाने आत्ताच गिफ्ट दिले. मला खूप आवडले, तिने खूप प्रेमाने आणलेत म्हणून मी पायात घातले. आजकाल काळ्या मण्यांची फॅशन आहे. धाग्याच म्हणत असशील तर ते पॅकिंग करताना गुंफले असेल, त्यात काय?" ओवी शांतपणे म्हणाली.
थोड्याच वेळात ओवी आणि मानव यांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. वधू वर सजवलेल्या गाडीने मानवच्या घरी आले.
मानवची आई करूणा त्यांचे औक्षण करण्यासाठी आनंदी मुद्रेने दारात सज्ज होती.
तिने हळदीकुंकू, निरंजन असलेले औक्षणाचे ताट त्यांचे औक्षण करायला जसे समोर घेतले तोच त्या ताटातील दिवा विझून गेला.
"अरे देवा ! हा संकेत म्हणायचा. असा कसा दिवा विझला? एवढी हवा पण नाही. हे तर अपशकुन झाले म्हणायचे." करूणाच्या मनात भीती दाटून आल्याने ती घाबरून म्हणाली.
"अगं आई, अपशकुन वगैरे काही नसतं गं. मी नाही मानत असल्या गोष्टी. होतं असं कधी कधी. त्यात काय एवढं? पुन्हा लाव ना दिवा." मानव करूणाला समजावत म्हणाला.
मानवचे वडील शेखर व छोटा भाऊ क्रिशनेही तिची तशीच समजूत काढली.
करूणाने पुन्हा दिवा लावला, ओवाळणार तोच पुन्हा दिवा विझला. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. नंतरही किती तरी वेळ तिने दिवा लावण्याचा प्रयत्न केला पण दिवा काही केल्या लागलाच नाही.
दारातच उभा असलेल्या मानव वैतागत शेवटी म्हणाला,"आई, राहू दे दिवा लागत नसेल तर. उभे राहून पाय दुखायला लागलेत. खूप दमलोय गं, पटकन आवर ना. आराम करायचा आहे आम्हाला."
"हो, ठीक आहे. ओवी उजव्या पायाने माप ओलांडून आत ये." करूणाचे मन खट्टू झाले होते, त्यामुळे ती नाराजीने ओवीला म्हणाली. त्यांना दारात ताटकळत उभा ठेवणे तिलाही योग्य वाटलं नाही.
उजव्या पायाऐवजी ओवीने डाव्या पायाने माप ओलांडले. त्यामुळे करूणा थोडी चिडत कपाळावर हात मारत तिला म्हणाली,"हे भगवान ! हे काय केलंस तू, ओवी? उजव्या पायाने सांगितले होते ना तुला मग तू डाव्या पायाने का माप ओलांडलेस? हा अजून एक अपशकुन झाला म्हणायचा."
"साॅरी आई, मी गोंधळून गेले होते." ओवी खाली मान घालून म्हणाली.
"अगं, असू दे ना, करूणा. आल्या आल्या लगेच सासूचा धाक दाखवू नकोस. जा आराम करा तुम्ही." शेखर करूणाला दटावले आणि मानव आणि ओवी यांना जायला सांगितले.
नंतर देवदर्शन व पुजा कशीबशी झाली. प्रत्येक वेळी काहीना काही तरी विघ्न येत होते. त्यामुळे करूणाच्या मनात शंका वाढू लागली. पण तिने कोणाला बोलून दाखवले नाही.
ओवी आणि मानव यांची मधुचंद्राची रात्र होती. मानव खुश होऊन मस्तपैकी तयार होऊन रूममध्ये आला. ओवी आधीच सजवलेल्या बेडवर तयार होऊन डोक्यावरून पदर घेऊन त्या पदराने पूर्ण चेहरा झाकून घेत दोन्ही हाताने गुडघे गुंफून मान खाली घालून बसली होती.
तो दार लाॅक करून तिच्या दिशेने येत हसत म्हणाला,"हे काय, ओवी आपण काय नवीन आहोत का ? पण आवडलं हं तुझे हे असं वागणं."
तो उत्साहात तिच्याजवळ गेला आणि तिच्या चेहऱ्यावरील पदर वर केला तेव्हा तिचा चेहरा पाहून त्याच्या पायाखालची जमीन तय सरकलीच शिवाय त्याची बोबडी वळून त्याचे डोळे बाहेर यायचे बाकी राहिले होते.
तिचा चेहरा खूपच विद्रुप दिसत होता. ती विचित्र हसत घोगऱ्या आवाजात म्हणाली,"दूर राहा हिच्यापासून ही फक्त माझी आहे, फक्त माझी. हा ऽ ऽ हा.."
तो दोन पावलं मागेच सरकला ; पण घाबरलेल्या असल्याने त्याच्या पायांना कंप सुटल्याने तो खाली पडला. त्याचे पूर्ण शरीर घामाने भिजून गेले होते.
तो छातीवर हात ठेवून विस्फारलेल्या नजरेने पाहत हिंमत करून अडखळत म्हणाला,"क ऽ ऽ को ऽ ऽ कोण कोण आहेस तू? माझी ओवी कुठे? "
तेवढ्यात दाराचे लाॅक उघडून ओवी दुधाचा ग्लास घेऊन आत आली. त्याला असे जमीनीवर खाली पडलेले पाहून तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. तिने हातातला ग्लास तिथेच खाली ठेवून त्याला उठवत म्हणाली,"अहो, काय झालं तुम्हाला? खाली का बसलात तुम्ही?"
तिला पाहून त्याने पुन्हा बेडकडे पाहिले. तर आता तिथे कोणीच नव्हते.
तो भयभीत नजरेने पाहत उठून बेडकडे बोटाने इशारा करत तिला म्हणाला,"तू इथे आहेस तर मग तिथे कोण होतं?"
क्रमशः
ती ओवी नव्हती तर कोण होती ती व्यक्ती?
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू नसून निव्वळ मनोरंजन म्हणून ही कथा वाचावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा