Login

सूड (भाग:-२)

सूडाच्या भावनेने केलेले कर्म त्याच्यावरच उलटते हे सांगणारी कथा

शीर्षक:- सूड

भाग:- २

"तिथे तर कोणीच नाही, मी तर आताच आले." एकदा बेडकडे आणि नंतर मानवकडे आश्चर्याने पाहत ओवी म्हणाली.

"अगं, खरंच सांगतोय मी. तिथे कोणी तरी होतं." तो भयभीत होऊन म्हणाला.

"तुम्हाला भास झाला असेल. या दोन-तीन दिवसांत तुमची खूपच दगदग झाली आहे ना. तुम्हाला आरामाची गरज आहे. हे दूध प्या आणि झोपा बरं शांतपणे." ती दुधाचा ग्लास त्याच्या हातात देत म्हणाली.

तिचं म्हणणं त्याला पटलं. दुधाचा ग्लास जसा त्याने हातात घेतला तसा तो त्या ग्लासात पाहून "रक्त, रक्त" असे भीतीने ओडरत खाली टाकून दिला.

"अहो, कुठे आहे रक्त? हे तर दूध आहे." खाली सांडलेल्या दुधाकडे बोट दाखवून ती गोंधळून त्याला म्हणाली.

त्याने आता पाहिले तर तिथे रक्त नसून दूध होते.

"हे भगवान !" म्हणत तो दोन्ही हाताने डोके गच्च धरून मटकन बेडवर बसला.

"अहो, तुम्हाला आरामाची खूप गरज आहे, तुम्ही झोपा. मी हे साफ करून झोपते." ती त्याच्या खांद्याला धरून बेडवर झोपवत म्हणाली.

त्याने मान डोलावली व तो झोपण्यासाठी बेडवर पहुडला. तीही सांडलेले दूध साफ करून त्याच्या बाजूला झोपली.

बराच वेळ मानवला झोप आली नाही तो डोळे बंद करून विचारात गढून गेला. त्याच विचारात त्याला कधी डोळा लागला ते त्याला कळलच नाही. मध्य रात्री नंतर त्याच्या कानावर कोणीतरी स्फुंदून स्फुंदून रडत असल्याचा आवाज ऐकू आला.

त्या आवाजाने त्याला जाग आली. त्याने त्याच्या बाजूला पाहिले तर ओवी तिथे नव्हती.

तो तिला शोधण्यासाठी उठला. तिला आवाज देत होता.

बाथरूममधून त्याला कुजबुजण्याचा आवाज आला. एवढ्या रात्री ओवी बाथरूममध्ये कोणाशी बोलते हे पाहण्यासाठी तो बाथरूमचे अर्धवट उघडे असलेल्या दारातून पाहिले तर बेसीनचे नळ वाहत होते आणि ओवी समोर बाथटबकडे पाहत हसत बडबडत बसली होती. ती त्याला पाठमोरी होती म्हणून त्याला तिचा चेहरा दिसला नाही. तो आवंढा गिळत हळूहळू तिच्या दिशेने जात तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला,"ओवी, तू इथे काय करतेस?"

तिने जशी गरकन तिची मान वळवली. तिचे ते भयानक रूप प्रचंड घाबरला. त्याचा जीव कंठाशी आला.

तिचा चेहरा पांढराफेक आणि डोळे बिना बुबुळाची पांढरे होते.

"ए, तू इथे कशाला आलास? आम्ही बोलत होतो ना. हि फक्त माझी आहे. हिला हात लावून तू खूप मोठी चूक केलीस. आता भोग तुझ्या कर्माची फळं." घोगऱ्या पुरूषी आवाजात क्रूर हसत ओवी म्हणाली आणि तिने मानवाचा गळा जोरात आवळत त्याला हवेत उचलले आणि उचलून भिंतीवर आपटले.

मानव जोरात ओरडला आणि त्याला काही कळायच्या आत त्याच्या डोक्याला जोरात मार बसल्याने बेशुद्ध होऊन तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडला.

त्याच्या पडल्याच्या आवाजाने ओवीला जाग आली. तिने उठून पाहिले तर मानव बेडवर नव्हता. त्याला आवाज देत शोधत ओवी बाथरूममध्ये आली.

रक्तबंबाळ अवस्थेतल्या मानवला पाहून ती जोरात किंचाळली. तिच्या किंचळण्याने घरातील सर्वजण जागे होऊन तिथे आले. त्याला तसे पाहून सगळेच घाबरले. पण क्रिशने प्रसंगावधान राखून वेळ न दवडता त्याला ताबडतोब चारचाकी गाडीत घेऊन हाॅस्पिटलमध्ये नेले.

गाडीमध्येच त्याने डाॅक्टरांशी संपर्क साधल्याने त्यांनी आणल्या आणल्या तातडीने त्याच्यावर उपचार सुरू केले.

"बरं झाले तुम्ही मानवला वेळेत आणले. थोडा जरी उशीर झाला असता तर त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. पण आता धोका टळला आहे. घाबरायचे कारण नाही. दोन दिवसांनी तुम्ही त्याला घरी घेऊन जाऊ शकता." डॉक्टरांनी असे सांगितल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला.

करूणाने ओवीला काय झाले होते म्हणून विचारल्यावर तिने सांगितले," मला माहिती नाही कसे झाले? मी झोपले होते. काही तरी पडल्याचा आवाज आल्याने मला जाग आली आणि जाऊन पाहिले तर ते पाहून मलाच चक्करच आली आणि मी किंचाळले. पुढचे तर तुम्हाला माहितीच आहे."

ती करूणाला बिलगून रडू लागली.

"तो ठिक आहे, रडू नकोस." ती तिला सावरत म्हणाली.

पण तिच्या डोक्यात वेगळेच विचार घोळत होते. तिचे मन ओवीविषयी साशंक झाले होते.

दोन दिवसांनी मानवला घरी सोडण्यात आले. नंतर तो ओवीशी बोलायलाही घाबरू लागला.

ती त्याला म्हणाली,"अहो, खाऊन घ्या थोडं, किती बारीक झालात तुम्ही? मला एक कळतं नाही, तुम्हाला इतकं लागलं तरी मला कशी जाग आली नाही."

तिने जेवणाचं ताट त्याच्यासमोर ठेवले.

मानव आधीच घाबरला होता तिच्या प्रश्नाने तो अजूनच घाबरून गेला. त्याच्या घशातून आवाजच निघाला नाही.

तिने एक घास त्याच्या तोंडापर्यंत नेला. त्याने भीऊन तिचा हात पकडत नकारार्थी मान डोलावली.

"अहो, असं का करताय? असं अनोळखी सारखे का वागत आहात तुम्ही माझ्याशी ? " ती त्याला उदासीने म्हणाली.

तो काहीच न बोलता तिच्याकडे बघत होता.

तिने पुन्हा घास त्याच्या तोंडासमोर धरला. या वेळी त्याने घास खाल्ला. तेव्हाच ओवीच्या पाठीमागे एक काळी सावली लाल डोळ्यांनी त्याला रागात पाहत असलेली दिसली. तो खूप घाबरला. परंतु नंतर ती सावली अदृश्य झाली आणि ओवी विचित्रपणे‌ भयानक हसत होती. ते पाहून मानव अजून घाबरला. तो घाबरून रूममधून बाहेर पळून जाऊ लागला.

त्याला असे पळताना पाहून करूणा त्याला म्हणाली,"काय झाले रे तुला? इतकं घाबरून का पळत आहेस ? "

"हा ना, तुम्हाला असं पळताना असं वाटतं जसं की कोणतं तरी भूत बघितलंत." ओवी त्याच्या मागून येत थोडी मस्करीत म्हणाली.

"ए ओवी, कसे बोलतेस त्याला? एकतर तो आधीच घाबरलाय वरून असे बोलतेस? खरंच आजकालच्या पोरींना अक्कलच नाही, कसे बोलावे ते कळतच नाही." करूणा चिडून तिला म्हणाली.

तिचे बोलणे ऐकून ओवीचा चेहरा विचित्र झाला. ती रागात मूठ आवळत तेथून तिच्या रूममध्ये येत म्हणाली," या म्हतारीला धडा शिकवयला हवा. सारखे मध्ये मध्ये करते. आज रात्री हिचा खेळ संपवतेच."

रात्री सर्व झोपले होते. मानव घाबरून त्याच्या रूममध्ये न झोपता क्रिशच्या रूममध्ये झोपला होता.

रात्री दोन नंतर करूणाच्या कानावर काही तरी विचित्र खुडबुड केल्याचा आवाज आला.

"एवढ्या रात्री कोण खुडबुड करतोय? " असे म्हणत ती उठून आवाजाच्या दिशेने चालू लागली. आवाज किचनमधून येत होता.

किचनमध्ये गेल्यावर तिने पाहिले की ओवी खिडकीतून बाहेर पाहत हसून कोणाशी तरी बोलत होती.

"ही एवढ्या रात्री खिडकीतून कोणाशी बोलत आहे?" करूणा मनात म्हणाली.

तिची चाहूल लागताच ओवी शांत झाली आणि तिने वळून तिच्याकडे पाहिले.

ओवीकडे पाहून करूणाची मात्र बोबडी वळली.

क्रमशः

काय पाहिले करूणाने?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू नसून निव्वळ मनोरंजन म्हणून ही कथा वाचावी.


0

🎭 Series Post

View all