शीर्षक:- सूड
भाग:-३
ओवीकडे पाहून करूणाची मात्र बोबडी वळली.
ओवीचा चेहरा एखाद्या मुडद्यासारखा दिसत होता. चेहरा सफेद आणि डोळे काळे खोबणीत गडल्यासारखे ते पाहून करूणा जोरात किंचाळली.
"ए ऽ ऽ ए ओवी, काय झालं तुला? " ती घाबरून तिला म्हणाली.
"दिसत नाही का तुला, थेरडे?" ओवी गुरगुरत घोगऱ्या आवाजात म्हणाली आणि तिच्याकडे येत होती पण ती अचानक थांबली.
तिचा तो अवतार पाहून तिला कळून चुकले की ओवी कोणत्या तरी दुष्ट आत्म्याच्या घेऱ्यात अडकली. तिच्या हातातील रूद्राक्षच्या ब्रेसटल चमकल्याने ती हे लक्षात आल्यावर तिने तिच्या हातातला रूद्राक्षचे ब्रेसलेट काढून मोठ्या स्वरात मंत्रजाप करत हिंमत करून ओवीच्या दिशेने चालू लागली.
ओवीचे केस हवेने उडत होते. ती रागात तिला गूरकून रक्ताळलेल्या डोळ्यांने पाहत होती.
" ए थेरडे, हे मंत्र म्हणणे बंद कर. तू जर बंद नाही केलेस तर तुझा आवाज कायमचा बंद करेन. ओवी फक्त माझी आहे. माझ्यापासून हिला कोणीही दूर करू शकणार नाही." ओवीच्या अंगातील आत्मा पुरूषी घोगऱ्या आवाजात गुरगुरत म्हणाला.
करूणाचं अंग भीतीचे कापत होते. तरीही तिने मंत्रजाप चालूच ठेवले. तिने पुढे येत तिच्या हातातले रद्राक्षचे ब्रेसलेट जबरदस्ती ओवीच्या हातात घालण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात खिडकीतून अचानक एका काळ्या मांजरीने तिच्या हातावर झडप मारल्याने ते ब्रेसलेट लांब फेकले गेले. त्या सरशी करूणाही खाली जमिनीवर फेकली गेली आणि तिचा मंत्र जापही काही क्षणांसाठी थांबला.
हिच संधी साधून ओवी तिच्यावर धावून जाणार तोच करूणाने हिंमत एकवटून पुन्हा जोराने मंत्रजाप सुरू केला.
त्यामुळे ओवी त्रासाने कानावर हात रागात जोरात चिरकू लागली
तिच्या चिरक्याने मानव, क्रिश आणि शेखर यांची झोप उडाली. ते सर्व धावत किचनमध्ये आले आणि समोरचे दृश्य पाहून त्यांच्या अंगावर काटेच आले.
मानवला समजले काय झालं असेल. त्याने पटकन कोपऱ्यात पडलेले ब्रेसलेट उचलून करूणाच्या हातात घालण्याचा प्रयत्न केला पण ओवीने रागात झडप घालून ते दूर फेकले.
शेखर तर ते सर्व पाहून जागेवरच गोठून गेले होते.
क्रिशने वेळ न दवडता देवघरातील पवित्र गंगाजल आणले आणि ते ओवीच्या अंगावर शिंपडले. त्यामुळे ती जोर जोराने किंचाळत थरथरत जमीनीवर पडली आणि तिची शुद्ध हरपली. त्यांनी ओवीला उचलून रूममध्ये आणून झोपवले.
"हे सगळे काय होतं आहे? काय झाले वहिनीला?" क्रिश घाबरून निपचित पडलेल्या ओवीकडे पाहून काळजीने म्हणाला.
"मला तर पहिल्या दिवसापासून काही तरी गडबड असल्याची शंका होती. ओवीसोबत काही तरी वाईट होत आहे. एका मागून एक अपशकुन होत होते. तू तर तिला इतके वर्षापासून ओळखतोस, तुला कसं कळलं नाही, मानव? जर तुला हे सर्व माहिती होतं तर तू का हिच्याशी लग्न केलेस? " करूणाने मानवला दरडावत जाब विचारले.
"नाही आई, आधी नव्हतं असं काही. हे सर्व लग्नानंतर सुरू झालं. त्या दिवशीच नक्कीच काहीतरी तिच्यासोबत झाले असेल." असे म्हणत मानवने मधुचंद्राच्या रात्री काय झालं ते सर्व कथन केले.
"तुम्ही काळजी कराल म्हणून तुम्हाला सांगितले नाही. आजच मी गुरूजींना जाऊन भेटून आलो. उद्या अमावास्या आहे तर तिला त्यांनी घेऊन यायला सांगितलं आहे. त्या अगोदर काहीच करू शकत नाहीत असे ते म्हणाले. तिला उद्या तिथे घेऊन जाणार होतोच तोच हे सर्व घडले. आता बरे झाले आम्ही वेळेवर आलो नाही तर माहिती नाही तुझ्यासोबत तिने काय केले असते? " मानव सुस्कारा टाकत म्हणाला.
"जोपर्यंत देव आपल्या पाठीशी आहे तेव्हा कोणीच आपलं काही वाकडं करू शकत नाही, मानव. तू म्हणतोस तसे जर हे लग्नाच्या वेळी झाले असेल तर सप्तपदी घेतानाच कोणीतरी काहीतरी केले आहे. त्यावेळी जर त्या मुलीसोबत कोणती आत्मा बांधली असेल तर ती तिला कधीच सोडत नाही. ती तिला आपल्या सोबतच घेऊन जाते." करुणा म्हणाली.
"ओह, असं पण असतं का? खरं तर आधी अशा गोष्टीवर माझा विश्वास नव्हता पण आता डोळ्यांने पाहिल्यावर विश्वास बसला. असो, उद्याच जाऊन गुरूजींना यावर निवारण विचारतो. ते नक्कीच याच निवारण सांगतील. तोपर्यंत ओवीच्या रूमबाहेर सुरक्षा करावी लागेल. ती या रूमबाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल." असे म्हणत त्याने बाहेरून दार बंद केले आणि दारावर देवघरातील गुरूजींनी दिलेल्या अभिमंत्रित कुंकवाने स्वातिक काढले व दाराबाहेर विभूतीचे रिंगण आखले जेणे करून ती आत्मा बाहेर पडणार नाही.
थोडा वेळ शांततेत गेला. परंतु काही वेळाने रूममधून जोर जोरात चित्रविचित्र आवाज येऊ लागले.
थकल्याने सगळ्यांचा डोळा लागला होता. ते सर्वजण हॉलमध्ये होते. आवाजाने ते धावत ओवीच्या रूमजवळ आले. आवाज आणखी मोठा झाला.
मानवने दाराच्या खाली पाहिले तर तेथून रक्ताचे ओघळ येत असल्याचे दिसल्याने त्याने क्रिशला दार उघडायला लावले. आतमध्ये ओवी भिंतीला स्वतःचे डोके आपटून घेत स्वतःला रक्तबंबाळ करून घेत असल्याचे त्यांना दिसले.
" ए ओवी काय करतेस? का स्वतःला इजा करून घेत आहेस?" असे काळजीने म्हणत मानव तिच्याकडे जात होता तेव्हा ती वेदनेने विव्हळत मागे वळून त्याला म्हणाली,"मला वाचवा, मानव. खूप त्रास होत आहे मला. आह ऽ ऽ.."
तिचा चेहरा रक्तरंजित झाला होता.
" तू घाबरू नकोस, ओवी. मी तुला काही होऊ देणार नाही." असे म्हणत मानव तिच्या जवळ गेला तेव्हा तिने तिच्या पंज्यात त्याचा गळा घट्ट पकडत त्वेषाने म्हणाली," मला हिच्यापासून कोणी दूर शकणार नाही. आजची रात्र हिची शेवटीची रात्र आहे. डोळे भरून पाहून घ्या हिला. नंतर हिला पाहू शकणार नाही कारण मी हिला सोबत नेणार. यात जो आडवा येईल त्याचीही शेवटची रात्र असेल."
तिने क्रूर विचित्र हसत त्याला हवेत उचलले.
"माझ्या मुलाचे आणि सुनेचे तू काहीही वाकडे करू शकणार नाहीस. तुझ्यासारख्या दुष्ट आत्म्याची अंतिम वेळ आली आहे. म्हणून बऱ्या बोलाने सांगतेय जेथून आला आहेस ते तेथे परत जा." करूणा त्याला चेतावणी देत म्हणाली.
तिच्या बोलण्याने ओवीच्या अंगातील आत्मा भडकला. त्याने मानवला सोडून दिले व रक्त उतरलेल्या डोळ्याने पाहत मोर्चा करूणाकडे वळवला. पण तिच्या हातातील रूद्राक्ष चमकल्याने ओवी जोरात किंचाळून खाली बेशुद्ध पडली.
तिला खाली पडलेल पाहून करूणाने लगबगीने देवघरातील अभिमंत्रित कुंकू आणून तिच्या कपाळावर लावलं. तिला बेडवर झोपवून तिची जखम साफ करून त्यावर मलमपट्टी केली. तिला बांधून ठेवले जेणेकरून ती स्वतःला इजा करून घेणार नाही. लगेच शालकी धूप जाळून सगळीकडे त्याचा धूर पसरवलं आणि तिच्या रूमबाहेरही दारात कापूर जाळले.
सकाळी सूर्याची किरणे धरतीवर पसरली.
मानव करूणाला अगतिक होऊन म्हणाला,"आई, मला खूप भीती वाटतेय. ओवीला गुरूजीं जवळ कसे घेऊन जाणार? आज जर घेऊन नाही गेलो तर सगळे संपून जाईल. मी नाही गमावू शकणार तिला? तिला काही झालं तर नाही जगू शकणार मी? "
मानव करूणाला अगतिक होऊन म्हणाला,"आई, मला खूप भीती वाटतेय. ओवीला गुरूजीं जवळ कसे घेऊन जाणार? आज जर घेऊन नाही गेलो तर सगळे संपून जाईल. मी नाही गमावू शकणार तिला? तिला काही झालं तर नाही जगू शकणार मी? "
क्रमशः
मानव गुरूजींकडे घेऊ शकेल का? ते यातून त्यांना बाहेर काढतील का?
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू नसून निव्वळ मनोरंजन म्हणून ही कथा वाचावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा