Login

सूड (भाग:-५ अंतिम)

सूडाच्या भावनेने केलेले कर्म त्याच्यावरच उलटते हे सांगणारी कथा

शीर्षक:- सूड

भाग:- ५ (अंतिम)

मग गुरुजींनी हातात एक लिंबू घेतला आणि त्यात पाच लवंगा घुसवल्या. जसं त्या लिंबूमध्ये लवंगा घुसवल्या तसं ओवीची तडफड होऊ लागली.

माथ्यावर लागलेल्या विभूती आणि गळ्यात असलेल्या रुद्राक्ष मणीमुळे ती आत्मा बाहेर येऊ शकत नव्हती. कारण एकदा जर ती का बाहेर पडली तर ती कोण हे सांगणार नाहीच‌ शिवाय ती ओवीलाही सोबत घेऊन जाईल हे माहिती होतं आणि बाहेर आल्यावर नंतर त्याला काबूत करणे खूप अवघडच काय असंभव असणार होतं. आज शेवटची रात्री होती जे की एक तर ओवीचा अंत, नाही तर त्या दुष्ट आत्म्याचा अंत .

गुरुजींनी तो लवंगवाला लिंबू हातात जोरात कुस्करले त्यासरशी ओवीच्या तोंडातून रक्ताची उटी बाहेर आली. ज्यातून मोहरी, लवंगा बाहेर पडल्या.

"नाही गुरूजी, तू हे करू नाही शकत." आत्मा तडफडत चिरकत म्हणाली.

गुरुजींनी लगेच पाणी असलेले कलश जवळ घेतले आणि यज्ञकुंडातील जळते लाकूड त्यावर ठेवले. त्याची राख त्या पाण्यात पडताच ते पाणी पवित्र झाले.

"हे पाणी आता पवित्र झालेले आहे. हे या दुष्ट आत्म्याला पाजलं पाहिजे. तो विरोध करून पिणार नाही पण काहीही करून हे पाणी तिला पाजायचे आहे." गुरुजींनी त्या सर्वांना सांगितले.

ओवी मोठी मोठमोठ्याने किंचाळत कलशलावर झडप घालण्याचा प्रयत्न केला पण गुरुजींनी ते घट्ट धरलेले होते त्यामुळे तिचे प्रयत्न सफल झाले नाही.

मानव आणि क्रिशने ओवीला धरलेले होते. तिचे शरीर कमजोर पडत असल्यामुळे तिला जास्त हालचाल करता येत नव्हते.

करुणाने हिम्मत करून तो कलश तिच्या तोंडाला लावला. ती इकडे तिकडे मान फिरवत पाणी पिण्यास नकार देत होती. त्यातूनही थोडे पाणी का होईना तिच्या तोंडात गेले.

त्याचवेळी गुरुजींनी अभिमंत्रित केलेले जल ही ओवीच्या अंगावर शिंपडले.

तेव्हा ओवी मागे फेकली गेली आणि तिच्या तोंडातून काळसर धुराच्या रूपाने ती आत्मा बाहेर निघून गेली.

बघता बघता ओवीचे शरीर हलके झाले आणि तिचे शरीर निश्चल होऊन खाली पडले.

"आता ओवी सुरक्षित आहे. ती आत्मा निघून गेली, पुन्हा ती हवी ही होणार नाही. तुम्ही निश्चिंत होऊन हिला घरी घेऊन जाऊ शकता." गुरुजी समाधानाने हसत त्यांना म्हणाले.

"आभार, गुरूजी. पण ती आत्मा कोण आणि माझ्या सुनेवर ती हवी कशी झाली? कोणी केलं हे सगळं? एखादी आत्मा असेच कुणालाही पकडत नाही." करूणाने मनातील प्रश्न विचारले.

"तू बरोबर बोललीस. ती आत्मा मनाने नाही आली. तिला ओवीसोबत तिच्या लग्नाच्या दिवशी सप्तपदी करताना बांधली होती. तेव्हापासून ती तिला घेऊन जायला बघत होती. तुम्ही जर वेळेवर इथे आणले नसते तर आज तिचे मरण निश्चितच होते." गुरुजी म्हणाले.

"कोणी आणि का ती व्यक्ती ओवीसोबत असे करेल?" मानवने गंभीर होत विचारले.

"मी नाव नाही सांगू शकत. ते नाव तुम्हाला उद्या सकाळी आपोआप कळेल. कारण ओवीचे शरीर सोडल्यानंतर ती आत्मा त्याच व्यक्ती जवळ जाईल ज्याने ओवीला त्या आत्म्याशी बांधल होते. आज रात्रीच ती त्या व्यक्तीला सोबत घेऊन जाईल." गुरुजी म्हणाले.

गुरुजींनी सगळ्यांच्या हातात रक्षा धागा बांधला. सगळेजण घरी निघून आले. 

सकाळ होईपर्यंत ओवीसोबत कोणी व का असे केले असेल याचा विचार सर्वजण करत होते. तोच ओवीचा मोबाईल खणखणला. तिच्या भावाचा काॅल होता.

"तुझी वहिनी रागिनी आता राहिली नाही.  काल रात्री अचानक काय झालं माहिती नाही. ती हे जग सोडून गेली." तिचा भाऊ पलीकडून बोलत रडत होता.

हे ऐकून ओवीच्या पायाखाली जमिनीच सरकली.

तिला विश्वासच बसला नाही की तिच्या वहिनीने तिच्यासोबत असं केलं असेल.  आधी तर तिला काहीच लक्षात आलं नाही. नंतर तिला रागिनीचा भाऊ मोहित आठवला.

एक वर्षापूर्वी:-

"मी तुला किती वेळा सांगितले मला त्रास देऊ नकोस म्हणून. मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये." वैतागून ओवी मोहितला म्हणाली.

"पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, ओवी. एवढं की तू कल्पना पण केली नसशील. मी तुला खूप खुश ठेवेन. जर तू माझ्याशी लग्न केलं नाहीस तर मी माझा जीव देईन."  मोहित आधी विनंती व धमकी देत म्हणाला.

"वेड लागलंय का तुला ? आपलं नातं आहे म्हणून मी शांत आहे. जर तू वहिनीचा भाऊ नसता तर मी आतापर्यंत दादाला सगळं काही सांगितलं असतं. मला तुमचं नातं खराब करायचे नाहीये. म्हणून गप्प आहे. माझं दुसऱ्यावर प्रेम आहे, मी त्याच्याशी लग्न करणार आहे. एवढे समजून सांगितले तरी तुला कळत नाही. इथून पुढे जर मला त्रास दिलास तर बघ मी नातं विसरून जाईन. दादाला सर्व सांगेन." तिने त्याला धमकीयुक्त स्वरात त्याला तंबी दिली.

मोहित रागिनीचा भाऊ होता. दोन वर्षापासून तो हात धुवून ओवीच्या मागे लागला होता.

ओवीला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं. कॉलेजपासून तिचं मानववर प्रेम होतं. त्याच्याशी तिचं लग्न ठरलं ही गोष्ट मोहितला पचनी पडलं नाही आणि सहनही झाले नाही.

तो खूप दारू पीत होता. त्याचबरोबर सनकीही होता. त्याच सणकीपणात त्याने नदीत उडी मारून आत्महत्या केली.

पण आत्महत्या करायच्या आधी त्याने त्याच्या बहिणीला रागिणीला पत्र पाठवले होते ज्या पत्रात त्याच्या मृत्यूसाठी त्याने ओवीला जबाबदार ठरवले होते.

ते पत्र वाचून रागिणीच्या पायाखाली जमीन सरकली आणि तिला ओवीचा खूप राग आला.

"माझ्या भावाने त्या ओवीच्या पायात स्वतःचा जीव गमावला. काय कमी होती माझ्या भावामध्ये की तिने माझ्या भावाला नकार देऊन त्या मानवशी लग्न करण्यास होकार दिला. तिच्यामुळे फक्त तिच्यामुळे माझ्या भावाने जीव गमावला. मी तिला कधीही सुखी राहू देणार नाही. माझा भाऊ जसा तिच्यासाठी तडफडला तशी मीही तिला तसेच तडफडून मारणार." रागिनी भावाच्या मृत्यूसाठी ओवीला जबाबदार मानत मनात दात आवळत म्हणाली.

यासाठी तिने एका तांत्रिकाची मदत घेत त्याच्याकडे गेली.

"माझी इच्छा आहे की माझ्या भावाचा मुक्त होऊ नये. ओवीच्या लग्नाच्या दिवशी माझ्या भावाची आत्मा बांधेन जेणेकरून तो स्वतः त्याच्या मृत्यूचा सूड घेऊ शकेल." तिने तांत्रिकला सांगितले.

रागिणीने मोहितचा आत्मा लग्नाच्या दिवशी ओवीसोबत बांधण्याची तांत्रिकाकडून विधी करून घेतली.

लग्नाच्या दिवशी रागिनीने ओवीच्या चुनरीवरती रक्ताचा टिळा लावून मोहितची राखेचा शिडकावा केला.

त्यामुळे मोहिताचा आत्मा ओवी सप्तपदी घेताना तिच्यासोबत बांधली गेली.

नंतर:-

जेव्हा गुरुजींनी ती आत्मा ओवीच्या  शरीरातून काढला तेव्हा ती पुन्हा रागिनी जवळ आली आणि ती तिला घेऊन गेली.

कारण एखाद्या आत्मा जर त्याने दुसऱ्यावरती सोडला असेल आणि त्याला तो मारू येऊ शकला नाही तर तो पुन्हा फिरून ज्याने तो आत्मा बांधला होता त्याच्याकडे परत येतो.

गुरूजींनी ओवीला वाचवले पण रागिनीच्या सूडाच्या भावनेने तिने स्वतःचा जीव गमावला.

समाप्त:-

सूडाच्या भावनेने केलेले कर्म त्याच्यावरच उलटते.

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. अंधश्रद्धा पसरवणे हा हेतू नसून निव्वळ मनोरंजन म्हणून ही कथा वाचावी.


0

🎭 Series Post

View all