सून नावाचा चष्मा (भाग १)
“लव्ह मॅरेज आहे म्हणे आपल्या उमाच्या मुलांचं!” सुनंदाताई
“हो ना! मग तर सगळं अजूनच अवघड.” कुसुमताई
“अरेंज मॅरेज केलेल्या मुलींनाही आजकाल सासू सासरे सोबत नको असतात. मग लव्ह मॅरेजवाल्या तर कशा असतील काही विचारायची सोयच नाही. त्यांचा तर नवरा आधीपासूनच त्यांच्या मुठीत असतो. ” कांताबाई
“नाही तर काय गं, ह्या आजकालच्या मुली! ह्यांना मेली कसली लाजही नाही. काय ते कपडे घालतात. काय ते मेकअप. जसं काही ह्याच म्हणून नोकऱ्या करतात आणि ह्याच म्हणून पैसे कमवतात. ह्यांच्यासाठी सासवा कमी आणि घरातल्या नोकरच जास्त असतात. सकाळी लवकर उठायचं नाही, उठलं तरी भराभर आवरायचं नाही. ऑफिसची वेळ झाली की हातातलं काम फेकायचं आणि बॅग उचलली की निघाल्या ऑफिसात. मग काय, कधी सहा वाजता यायचं, कधी सात वाजता नाही तर आठ वाजता. आपण आहोतच घरातले सगळे कामं करायला, ह्यांच्या नोकर.” सुलभाताईंचं मन अगदी भरून आलं होतं.
“अगं, तुझी सून तरी म्हणायला नोकरी करते. कमीत कमी चार पैसे कमावते तरी; पण माझी तर घरात असूनही सतत सगळ्यांना फैलावर घेत राहते. तरी बरं एकच लेकरू आहे; पण त्याच्याही प्रत्येक गोष्टीचा एवढा इश्यू करत राहते ना जसं काही हीला म्हणूनच लेकरू झालंय. आम्ही तीन-तीन लेकरं कसे सांभाळलेत आम्हालाच माहीत.” कुसुमताई
“हो गं. त्यांच्या मनासारखं नाही झालं तर त्या तयारच असतात लगेच वेगळं व्हायला. तुम्हाला सांगू का, मुलगा असल्यापेक्षा ना मुलगा नसलेले लोकं जास्त खुश आहेत.” कांताताई
“मग काय तर, ह्या मुलांचे लग्नं झाले की हे झाले लगेच बायकोचे. आपल्या पिढीचं मेलं नशीबच फुटकं! आपण आधी सासुरवास भोगला आता सूनवास भोगतोय.” कुसुमताई म्हणाल्या.
सोसायटीतल्या बागेत कांताताई, सुलभाताई, कुसुमताई, सुनंदाताई सगळ्या मैत्रिणी भेटल्या होत्या. आज नेमका उमाताईंना तिथं यायला उशीर झाला होता. उमाताईंच्या मुलाचं लग्न जुळल्याची बातमी त्यांना कळली होती. तेवढ्यात उमाताई तिथं आल्या. त्यांच्या कानावर या बायकांच्या गोष्टी पडल्या होत्या.
“उमे, अगं आलीस होय! मग पेढे, लाडू काही आणलेस की नाही?” कांताबाई त्यांना बघून म्हणाल्या.
“नाही गं. हे गेलेत मार्केटमध्ये. येताना आणतील. पाठवून देईल घरी.” उमाताई म्हणाल्या.
“बरं ते जाऊ दे, लग्नाची तारीख कधीची काढलीये?” सुनंदाबाई
“पुढच्या महिन्यातली सतरा.” उमाताई
“लवकरच काढली. मग बाकी तयारी वगैरे? आणि मेन म्हणजे लग्नाची खरेदी कधी आणि कुठं करणार?” कुसुमताई
“मुलीकडे लग्न आहे. त्यानंतर इकडे रिसेप्शन ठेवलं आहे. ह्या शनिवार-रविवार नवरदेव नवरीचे कपडे ते दोघं तिकडेच मुंबईत घेणार आहेत. पुढच्या शनिवारी आम्ही जाऊ तेव्हा आमची आणि बाकीची खरेदी करून घेऊ.” उमाताई
“झाली ना सुरुवात, आता एकेक रंग दिसतीलच.” सुलभाताई
“म्हणजे? मला कळलं नाही काही. अगं दोघं एकाच ऑफिसात आहेत तर घेतील ना कपडे त्यांच्या सोयीने आणि आवडीने. आम्ही गेलोही त्यांचे कपडे घेताना तरी खरेदी त्यांच्या आवडीनेच होणार ना.” उमाताई म्हणाल्या.
क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा