सून नावाचा चष्मा (भाग २)
“अगदीच भोळी आहेस गं उमे. आता बघ एकुलता एक मुलगा आहे तुझा, तुलाही वाटत असेल ना त्याच्या लग्नाची खरेदी आपणही करावी; पण काय आता ते दोघेच कारणार.” सुनंदाताई
“तुझ्या मताला, आवडीला काही अर्थच राहणार नाही. त्यात तुम्ही तर आधीच तुमच्या मुलाला मुंबईत फ्लॅट घेऊन दिला आहे. सुनेची तर मज्जाच झाली. तसंही आजकालच्या मुलींना सासू सासरे नकोच असतात. तुम्ही इकडं आणि ते दोघं तिकडं. मग कधी दोन दिवसांसाठी गेलीस ना तर तेही तुझ्या सुनेला जमायचं नाही.” कुसुमताई
“आता लग्नाच्या खरेदीसाठी तुला विचारणार नाही.मग हळूहळू घरातल्या कोणत्याच गोष्टीत तुझं मत विचारात घेणार नाही. सगळं तुझ्या सुनेच्या मनानेच होईल.” सुलभाताई
“नाही तर काय गं, आजकालच्या पोरीच आहेत तशा. त्यांना आपली अडचणच होते. आणि एखादं लेकरू झालं की विचारूच नका. जगाच्या पाठीवर ह्यांना म्हणूनच लेकरं होतात. मग त्या लेकराला काय खाऊ घालायचं काय नाही, सगळं आपल्याला नव्यानं शिकावं लागतं. जसं काही आपले लेकरं आभाळातूनच पडले होते.” सुनंदाताईचं दुःख जरा जास्तच होतं.
“हो बाई उमे, सुरुवातीपासूनच जरा कडक राहा. लक्षात राहू दे घर तुझं आहे आणि ती लग्न करून घरात आलीये.” कांताताई
“बरोबर आहे गं. कधी तू तिच्याकडे गेलीस ना तर बघ बरोबर तू गेली की तिच्या महत्वाच्या मिटिंग राहतील, तिला घरी यायला वेळ होईल. ह्या नोकरी करणाऱ्या सुनांचं मला माहितीये ना, काही सणवार असले की बरोबर ह्यांना सुट्या मिळत नाहीत. म्हणजे मग सगळी मरमर फक्त आपणच करा.” सुलभाताई म्हणाल्या.
“ह्या लग्न करून आपल्या घरात येतात आणि ह्यांना आपलीच अडचण होते. अन् मग आपले मुलंही चालले गोंडा घोळत बायकोच्या मागे. एरवी कधी हाताने घेऊन पाणी पिणार नाहीत; पण बायको आली की लगे हे तिला मदत करायला तत्पर असतात.” कुसुमताई म्हणाल्या.
“म्हणूनच म्हणतेय, आधीपासूनच धाकात ठेव तिला. घरातही साड्या नाही नेसल्या तर कमीत कमी ड्रेस तरी घाल म्हणावं. नाहीतर ह्या सुलभाच्या सुनेसारखं घरातही तसले बाप्याचे कपडे घालेल तुझी सून.” सुनंदाताई
“मी काय म्हटलं नसेल का तिला; पण कसं आपलाच दाम खोटा अन् परायाशी झगडा मोठा असं होतं ना. आपला मुलगाच जर सुनेसमोर आपली काही इज्जत करत नसेल तर तीच कुठून करणार.” सुलभाताई म्हणाल्या.
“आणि आजकाल तर ते नवीनच फॅड आलंय, प्री-वेडिंग फोटोशूट का काय म्हणतात त्याचं. कसले कसले फोटो काढतात आणि मग बघतेय दुनिया सगळी. काही लोकं तर लग्नातही लावतात ते फोटो. ते बघून आपल्यालाच लाज वाटायला लागते. बरं, चला गं. दिवे लागणीची वेळ झाली. हे सून पुराण काही संपणार नाही.” कांताताई म्हणाल्या आणि सगळ्याजणी तिथून निघाल्या.
उमाताईही सून नावाचे असंख्य चष्मे डोळ्यांवर घालून घरी निघाल्या.
उमाताई घरी पोहोचल्या तेव्हा शंकरराव कुणासोबततरी फोनवर बोलत होते.
“उमे, अगं अमितचा फोन होता, आताच ठेवला बघ. अगं उद्या ते दोघं प्री-वेडिंग फोटोशूटला जाणार आहेत म्हणत होता.” शंकरराव म्हणाले.
क्रमश:
©® डॉ. किमया संतोष मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा