सून नावाचा चष्मा (भाग ३)
“कशाला, काही गरज आहे का तसली थेरं करायची?” उमाताई
“हौस असते पोरांना.” शंकरराव
“असली कसली हौस? आणि हिंडलेच असतील ना इतके दिवस गळ्यात गळे घालून, मग आता काय गरज आहे त्याचे फोटो काढायची? हे बघा, त्यांना फोटो काढायचे तर काढू द्या पण ते फोटो स्वतःपुरते मर्यादित ठेवा म्हणा. उगी फेसबुकवर वगैरे टाकून सगळ्या दुनियेत आमचं हसू करू नका म्हणा.” उमाताई चिडचीड करू लागल्या; पण त्या नेमक्या कोणत्या करणाने ते शंकररावांना काही कळायला मार्ग नव्हता.
दिवस सरत होते. नातेवाईकांकडून, मैत्रिणींकडून उमाताईंच्या डोळ्यांवर सून नावाचे चष्मे चढतच होते. आपल्या होणाऱ्या सुनेकडे, तिच्या प्रत्येक वागण्या-बोलण्याकडे उमाताई त्या चष्म्यातूनच बघायला लागल्या होत्या.
बघता बघता उमाताईंच्या मुलाचं, अमितचं लग्न झालं आणि अर्पिता सून म्हणून घरात आली. लग्न झाल्यावर दोन दिवसांतच अमित आणि अर्पिता दुबईला फिरायला गेले. तिथून आल्यावर लगेच मुंबईला गेले आणि त्यांनी त्यांचं ऑफिस जॉईन गेलं. उमाताईंना सुनेचा म्हणावं तसा काही सहवास मिळाला नाही. त्यामुळं अर्पिता नेमकी कशी आहे हे त्यांना कळतच नव्हतं. लोकांनी डोळ्यांवर चढवलेल्या चष्म्यातूनच त्या तिच्याकडे बघत होत्या आणि तिच्यासोबत तुटक वागत होत्या.
अमित मुंबईला गेल्यावर काही दिवसांनंतर त्यांनं उमाताईंना आणि शंकररावांना मुंबईत येण्याचा आग्रह केला. खरंतर तिकडे जाण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती; पण केवळ अमितचं मन राखण्यासाठी त्या मुंबईला गेल्या.
पहाटेच उमाताई आणि शंकरराव मुंबईला पोहोचले. स्टेशनवरून टॅक्सी करून दोघे अमितच्या घरी पोहोचले.
“सॉरी हां आई, आज खरंच खूप महत्वाची मिटिंग आहे. मी ती मिटिंग अजिबात टाळू शकणार नाहीये.” ते दोघे घरी पोहोचतच नाही की अर्पिता लगेच म्हणाली आणि बॅग घेऊन ऑफिसला जायला निघाली सुध्दा.
“तू गेल्यावर बघ तिला महत्वाची मिटिंग येईल..” उमाताईंच्या डोळ्यावरचा सुनेचा चष्मा अजूनच घट्ट झाला.
आई-बाबा आले म्हणून अमितने वर्क फ्रॉम होम घेतले होते. उमाताई फ्रेश होऊन तयार झाल्या आणि स्वयंपाक करायला लागल्या. अमित त्यांना स्वयंपाक घरात कुठलं सामान कुठं ठेवलंय ते काढून देत होता.
“एरवी आपली मुलं हाताने पाणी पीत नाहीत; पण बायको आली की…” उमाताईंच्या डोळ्यांवरचा अजून एक चष्मा घट्ट झाला होता.
उमाताईंनी स्वयंपाक आटोपला आणि सगळ्यांनी जेवणं आटोपली. दुपारच्या वेळी उमाताई लोळत पडल्या होत्या. अमितचं ऑफिसचं काम सुरू होतं.
‘एकदा ऑफिसात गेलं की मग काय, कधी सहा वाजता यायचं तर कधी सात तर कधी आठ…’ उमाताईंच्या डोळ्यावर सून नावाचा अजून एक चष्मा घट्ट होत होता. तितक्यात दारावरची बेल वाजली. अमितनं दरवाजा उघडला. अर्पिता आलेली होती.
क्रमशः
©® डॉ. किमया मुळावकर
©® डॉ. किमया मुळावकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा