Login

सून नावाचा चष्मा (भाग ४)

कथा सासू सुनेच्या नात्याची
सून नावाचा चष्मा (भाग ४)

“सॉरी हां आई बाबा. आज खूप महत्वाची मिटिंग होती. हा प्रोजेक्ट आमच्या कंपनीला मिळालं ना तर माझं।प्रमोशन पक्क आहे.” अर्पिता अगदी आनंदात सांगत होती. उमाताई मात्र अगदी तुटकच तिच्या बोलण्याला प्रतिसाद देत होत्या.

अर्पिताने रात्रीचं सगळं जेवण उमाताई आणि शंकररावांच्या आवडीचं बनवलं होतं.

दुसऱ्या दिवशी उमाताई झोपून उठल्या होत्या तेव्हा अर्पिताचा जवळपास सगळा स्वयंपाक झाला होता.

“आई, बाबा, उठलात तुम्ही. चला, पटकन आवरून घ्या. आपण मुंबई दर्शनाला जातोय.” अर्पिता म्हणाली.

“ऑफिस नाही का तुला?” शंकरराव

“सुट्टी घेतली आहे आठवडाभर.” अर्पिता म्हणाली.

“राहू दे. मुंबई दर्शनासाठी त्या बसने जावं लागतं. मला सहन नाही होत बसचा प्रवास.” उमाताई


“हो. मला माहित आहे. म्हणूनच मी गाडी बुक केली आहे. तसंही ते बसवाले एका दिवसात मुंबई फिरवून आणतात आणि आपण काही एकाच दिवसात सगळी मुंबई पाहणार नाहीयेत. मस्त शांततेत दोन तीन दिवसांत बघू. तुमच्यासाठी मी डब्बाही बनवून घेतला आहे म्हणजे तुम्हाला बाहेरचं काही खायचा त्रास नको.” अर्पिता एकदम उत्साहात म्हणाली आणि तयारीला लागली.


“आई, अजून एक.” अर्पिता


“काय गं?” उमाताई


“परवा मी दुकानात गेले होते तर मला हा ड्रेस तिथं दिसला आणि तुमचीच आठवण झाली. हा रंग तुमच्यावर खूप चांगला दिसेल. मला अमित म्हणाला की तुम्ही ड्रेस घालत नाहीत, तरी मी आणला हा ड्रेस. आवडला तर घाला नक्की.” अर्पिता त्यांच्याजवळ ड्रेसची पिशवी देऊन स्वतःची तयारी करायला गेली. उमाताईंनी ड्रेस पाहिला, त्यांच्या आवडीचा रंग होता.

‘लग्न झाल्यावर कितीदा वाटलं की ड्रेस घालावं; पण सासूबाईंनी नकार दिला आणि ड्रेस घालणं बंद झालं ते कायमचंच…’ ड्रेसवर हात फिरवत उमाताई मनाशीच म्हणाल्या.


“दिलाय तिने एवढ्या आवडीने तर घाल की.” शंकरराव म्हणाले. उमाताई ड्रेस घालून तयार झाल्या. अर्पितासोबत दोघे मुंबई दर्शनासाठी निघाले. दिवसभर अर्पिताने उमाताई आणि शंकररावांची व्यवस्थित काळजी घेतली. मुंबईतल्या बऱ्याच ठिकाणांची अगदी सखोल माहिती सांगितली. उमाताईंनी जेवढा तिच्याबद्दल वाईट विचार केला होता तेवढी वाईट त्यांना ती वाटत नव्हती; पण त्यांच्या डोळ्यांवर आणि डोक्यावर चढलेला सून नावाचा चष्मा काही उतरायचा नाव घेत नव्हता. राहून राहून अर्पितामध्ये त्या दोष शोधू बघत होत्या.


अर्पितासोबत मुंबई दर्शनात दोन-तीन दिवस अगदी व्यवस्थित गेले.


क्रमशः
©® डॉ. किमया संतोष मुळावकर

0

🎭 Series Post

View all