Login

सून नावाचा चष्मा (भाग ५ अंतिम)

कथा सासु सुनेच्या नात्याची

सून नावाचा चष्मा (भाग ५ अंतिम)

अर्पिता जेवढे दिवस घरी होती तेवढे दिवस तिने उमाताईंना एकाही कामाला हात लावू दिला नाही. उमाताईंच्या डोळ्यांवर तिच्याबद्दलचे एकेक चष्मे गळून पडत होते. तिने टाकलेल्या सुट्या संपल्या आणि ती परत ऑफिसमध्ये जायला लागली. ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी अर्पिता घरातलं सगळं आवरून जात होती. तिची होणारी तारांबळ उमताईंना बघवत नव्हती.

“अर्पिता, तुझं तू आवरून जात जा ऑफिसमध्ये. मी दिवसभर घरीच असते. बाकी मी करून घेत जाईल.” एक दिवस उमाताई तिला म्हणाल्या.


“अहो आई, इतके दिवस झाले तुम्ही सगळं करतच आलात ना. करेल मी सगळं. आणि विशेष म्हणजे होतंय ना मॅनेज. त्यामुळं तुम्ही मस्त आराम करा.” अर्पिता म्हणाली. पण उमाताईंना तिच्या एकटीवर सगळा भार टाकणं रुचलं नाही. त्याही घरातली कामं करायला तिला मदत करत होत्या.

उमाताईंच्या परत जाण्याचा दिवस आला; पण अर्पिताने त्यांना जबरदस्ती थांबवून घेतले. उमाताईही थांबल्या.

“आई, आता श्रावण सुरू होईल ना. सणवार सुरू होतील. माझी आई करायची तसं मला सगळं माहीत आहे; पण आपल्या घरातल्या ज्या काही पध्द्ती आहेत त्या तुम्ही मला सांगा. मी ऑफीस सांभाळून होईल तसं करेल सगळं.” अर्पिता उमाताईंना म्हणाली. उमाताईंनी तिला त्या त्या सणाच्या वेळी सांगितलं तसं तसं अर्पिताने सगळं अगदी मन लावून केलं. उमाताईंच्या डोळ्यांवरचे सुनेविषयीचे एकेक चष्मे गळून पडत होते.


दहा बारा दिवसांसाठी मुंबईला गेलेल्या उमाताई दिवाळी करूनच घरी परतल्या.

घरी परतल्यावर एका संध्याकाळी त्या सोसायटीच्या बागेत गेल्या. त्यांच्या मैत्रिणी तिथं आधीच जमलेल्या होत्या आणि नेहमीप्रमाणेच त्यांचा ‘सून’ हा आवडीचा विषय सुरू होता.


“काय मग उमा, कसा होता सूनवास? गेलीस तर चांगलीच अडकली गं तिकडं. मला वाटलं दोन दिवसाच्यावर तू काही राहायची नाहीस.” कांताताई म्हणाल्या.


“सूनवास.. नाही गं. तसं काही नसतं. ते म्हणतात ना ज्या रंगाचा आपण चष्मा घालू आपल्याला दुनिया तशीच दिसत असते.. हा सूनवास असाच आहे. तुम्ही फक्त दोष पाहिले तर तुम्हाला फक्त दोषच दिसणार.

खरं सांगू का, आजकालची पिढी धडपडी आहे. त्यांच्यात उर्मी असते नवनवीन शिकायची, करायची. आणि आपण काय करतो… त्या धडपडीला वेगवेगळी नावं ठेवून मोकळं होतो. आपल्याला काहीच करायला मिळालं नाही म्हणून आपण आपल्या सुनांचं कर्तृत्व सरळ नाकारतो. सून नावाचा चष्मा डोळ्यावरून काढून मग बघा जरा. तुमच्या सुनांत काही तर चांगलं असेल ना? दोषांवर चर्चा करण्यापेक्षा त्यांच्या गुणांची कदर करा. कदाचित तुमचं घर जगातलं सगळ्यात आनंदी घर असेल.” उमाताई म्हणाल्या आणि तिथून निघाल्या. सगळ्यांच्या डोळ्यांवरचे सून नावाचे चष्मे गळून पडले होते.