Login

सोपं नसतं... भाग 1

एकत्र कुटुंबात सहजासहजी बाहेर पडणं सोपं नसतं
"अगं बाई घरी सासू सासरे असतात, असं पटकन बाहेर नाही निघता येत"

"काहीही कारण देऊ नकोस, दरवेळी हेच कारण असतं तुझं..तरी तुला मी कालच सांगितलं होतं मग वेळेवर आवरून निघायला काहीच हरकत नव्हती"

रोहिणी आणि मेघना, दोघी शेजारी. सोसायटीच्या कार्यक्रमात दोघींचा पुढाकार असायचा, दोघीही उत्तम कलाकार असल्याने गणपती असो, नवरात्र असो..सगळीकडे त्यांना भाव असायचा. रोहिणीला संगीत आणि नृत्य छान जमायचं तर मेघना उत्तम चित्रकार आणि कलाकुसर करण्यात तरबेज होती.

यावेळी गणपतीची आरास आणि सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची जबाबदारी दोघींवर होती. दोघींची ठरवलं की आपण हा कार्यक्रम असा करायचा की पूर्ण सोसायटी बघतच राहायला हवी.

(आदल्या दिवशी)

"मेघना, उद्या आपण सर्व बायकांची मिटिंग घेऊ दुपारी चार वाजता..म्हणजे कसं तोपर्यंत सर्वांचं आवरूनही होतं, तू आरास करण्यासाठी जे काही ठरवलं आहे ते सर्वांना सांग..त्यानुसार कामं वाटून घेऊ..आणि मी कार्यक्रमात काय काय खेळ आणि नाचगाणी असतील याचा आराखडा सांगेन"

"चालेल..यावेळी चांद्रयान थीम वर बनवूया, मस्त अवकाश आणि अंतराळ सगळं दाखवू"

"मस्तच आयडिया आहे की, सगळं प्लॅनिंग करून ठेव, कोणाकडे काय द्यायचं ते"

"हो मी लिहूनच ठेवते..मीटिंगमध्ये सर्वांना कामं वाटून देऊ.."

मेघना आणि रोहिणी यावेळी कमालीच्या उत्सुक होत्या. एक तर आपल्या आवडीच्या कामात त्यांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती आणि काम उत्तम झालं की सर्वांची वाहवा मिळणार होती.

मेघनाच्या घरी सासू सासरे आणि कॉलेजमध्ये शिकणारी नणंद होती. घरातलं सगळं बघून सोसायटीची कामं बघण्यात तिची धावपळ व्हायची पण वेळापत्रक बनवून ती प्रत्येक काम चोख होण्यासाठी प्रयत्नशील असायची. याउलट रोहिणी आणि तिचा नवरा म्हणजे अगदी राजाराणीचा संसार, कुणाचीही लुडबुड नव्हती. संध्याकाळी एखाद्यावेळी स्वयंपाक केला तर केला नाहीतर बाहेरून मागवा. रोहिणीचा नवराही तिच्यावर कसलीही बंधनं टाकत नव्हता.

दोघींचा आपली कला दाखवायची संधी मिळाली असली तरी त्यासाठी दोघींचा संघर्ष खूप वेगळा होता. मेघनाला सहजासहजी काम करणं आणि घरातून बाहेर पडणं शक्य नसायचं तर याउलट रोहिणी हवं तेव्हा हव्या त्या कपड्यात कधीही बाहेर पडायची.

दुपारचे चार वाजत आले होते, रोहिणी साडेतीनपासूनच छानश्या कपड्यात तयार होऊन बसली होती, तिकडे मेघनाच्या मागची कामं मात्र संपत नव्हती. पावणेचार वाजता तिची मुलं शाळेतून आली आणि भूक लागली म्हणून ओरडू लागली. आजच्या दिवस हा चिवडा आणि बिस्किटे घ्या असं मेघनाने सांगितलं, पण मुलांनाही आजच चेव यायचा होता..त्यांना बटाटेवडेच खायचे असा त्यांनी हट्ट धरला. मेघनाने वैतागून बटाटे उकडत टाकले, सासूबाईंना गॅस बंद करायला सांगू असा विचार करताच त्या बेडरूममध्ये झोपायला निघून गेल्या. नणंदबाई घरी आल्यावर मेघनाला जरा हायसं वाटलं.

"ताई, मला ना जरा असं असं काम आहे, चार वाजता जायचं आहे.."

नणंदेने डोक्याला हात लावला,

"अगं वहिनी आजच का..खाली माझी मैत्रीण उभी आहे..आम्हाला प्रोजेक्ट साठी बाहेर जायचं आहे, फ्रेश व्हायला आले मी फक्त.."

मेघना हिरमुसली,

"वहिनी, मी नाही जात चल..तू जा मिटींगला..मी बघते मुलांकडे.."

नणंद खूप समजुतदार होती, मेघनाला बरं वाटलं आणि ती तयारीला गेली. कुकरचा गॅस बंद केला आणि मुलांना सांगितलं की बटाटे वडे बनायला वेळ लागतो, आल्यावर बनवून देईन. घड्याळात पाहिलं तर चार वाजायला 3 मिनिटं बाकी होती, रोहिणीचे फोनवर फोन सुरू होते. मेघनाने आरशात पाहिलंही नाही आणि एक चुरगळलेला ड्रेस शोधून पटकन अंगावर चढवून ती निघाली, तोच दारात सासूबाईंच्या माहेरची लोकं आली.

झालं, राहिलं सगळं!

मेघनाने नणंदेला सांगितलं,

"माझं आता काही जाणं होणार नाही, तुझं तरी काम करून घे..जा तू.."

नणंदेला वाईट वाटलं पण नाईलाज होता. सासूबाईंनी त्यांच्या माहेरची लोकं आली म्हणून मेघनाला त्यांच्या सरबराई करण्यात चांगलंच अडकवून ठेवलं. मेघनाने किचनमध्ये जाऊन रोहिणीला फोन केला..

"अगं घरी पाहुणे आलेत, मला येता येणार नाही मिटींगला"

"अशी काय करतेस? अगं तुझ्या घरी इतकी लोकं आहेत, ते बसतील की त्यांचा सोबत"

"तसं नसतं गं बाई.."

रोहिणीने रागावून फोन ठेऊन दिला.

दुसऱ्या दिवशी परत चार वाजता मिटिंग ठरली.

मेघनाने ठरवलं, आज काहीही झालं तरी मिटिंग चुकवायची नाही. लवकर उठून तिने चार कामं जास्तीची केली. मुलांसाठी लवकर नाष्टा बनवून ठेवला. घरातलं काम वेळेत पूर्ण केलं, साडेतीन वाजले आणि तिने तयारीला सुरवात केली, तोच किचनमध्ये खाड्खुड ऐकू येऊ लागली. तिने जाऊन पाहिलं तर सासूबाई खोबरं किसत होत्या. मेघनाला शंका आली आणि ती घाबरलीच.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all