Login

सोशिक

Soshik
©®विवेक चंद्रकांत....

मी तसा फार सोशिक प्राणी आहे.( मी तसा लग्नानंतर झालो का हे कृपया विचारू नका.)पण तो सोशिकपणा माझ्या चेहऱ्यावर पण दिसतो का असा मला नेहमी प्रश्न पडतो.

माझ्याकडे कामाला एक माणूस आहे.बराच जुना आहे.त्याला तंबाखू खायची सवय आहे.मी त्याला त्यासंबधी बोलत नाही कारण त्याची तंबाकु सोडवण्यासाठी त्याच्या बायकोने बरेच प्रयत्न केले, पण एकवेळ तुला सोडेल पण तंबाकु सोडणार नाही असे त्याने सांगितले.त्यामुळे असे काही मी सांगितले तर नौकरी सोडेल पण तंबाकु सोdnar नाही असे बाणेदार उत्तर तो देईल याची मला खात्री आहे. असो .तर आम्ही दोघेही रिकामे असतो तेव्हा तोही बसून राहतो पण जेव्हा काही काम करायचे असले आणी त्याला हाक मारली की तो तंबाकु चोळत असतो. मग तो हळूच ती तोंडात टाकून डुलत डुलत येतो.तोपर्यंत पाच मिनिटाची खोटी होते.नेमके काम आल्यावर हा तंबाखू मळायला घेतो की त्याने तंबाकु काढली की कामवाले येतात हे मला अजूनपर्यंत कळलेले नाही.

माझा रात्री घरी येण्याचा साधारण फिक्स टाइम्स आहे.मी घरी येतो तेव्हा माझी बायको फोनवर बोलत असते. मग ती हाताने पाच मिनिटे थांबायचा इशारा करते.पाचचे पंधरा वीस मिनिटे होतात पण माझी तिला बोलण्याची हिम्मत होत नाही कारण ती माझ्या बाहेरगावी राहणाऱ्या मुलाशीच बोलत असते.दोघे माय लेक रोज काय बोलतात कोणास ठाऊक? सासरी गेलेल्या मुलीशी बोलत असेल तर ठीक..काही गाऱ्हाणी असतात.मुलाशी काय बोलायचे असते रोज? तर सांगायचं असे की मी घरी येताच ती लेकाला फोन लावते की नेमके त्याचं वेळेस लेकाचा फोन येतो हे मला कळलेले नाही..जेवणासाठी रोज वाट पाहावी लागते हे नक्की.

मी केस वाढले की सलून ला जातो.एकादे गिर्हाईक असते.लवकर काम होऊन जाईल म्हणून आपण सुखाने बसावे तर एकदम 2-3 लोक येतात.कोणाला लग्नाला जायचे असते. कोणाला अर्जेन्ट काम असते त्याच्यातले एकदोन मला विनंती करतात कधीतरी सलूनवालाच मला म्हणतो "वैद्य सर जरा दहा मिनिट थांबता का ? तुमचे जरा निवांत मस्त करून देतो". त्या दहा मिनिटाचे एक दीड तास कसे होतात मलाही कळत नाही. ( नंतर तो माझे केसबीस घाईघाईतच कापतो.कसले निवांत आणी कसले काय).घरी येईपर्यंत दुपार झालेली असते.दारात पाय ठेवताच पत्नी ओरडते " केस कापायला गेले होते की गावभर भटकायला?" मी काहीच बोलत नाही पण माझा चेहरा अजूनच सोशिक होत असावा.....
©® डॉ.विवेक चंद्रकांत वैद्य .नंदुरबार.