सौदामिनी भाग 1

एका विलक्षण शोधाची कथा
सौदामिनी. भाग १

"आज्जी, आवर लवकर. तुला गेट टुगेदर मध्ये आजच पोहोचायचे आहे." अभय खालून ओरडत होता.


‘अभ्या याबाबतीत अगदी आजोबावर गेलाय. तरी बरं आज ह्यांची ट्रीप आहे. मला निवांत आवरता आले.’ स्वतःशीच संवाद साधत रुक्मिणीताई खाली आल्या.

इतके छान तयार झाल्या तरी त्यांच्या चेहऱ्यावर असलेला उदास भाव लपत नव्हता. त्या शांतपणे गाडीत बसल्या.

"आजी,निघुया का?" अभयच्या प्रश्नावर त्यांनी होकारार्थी मान डोलावली.


"आजी,तुम्ही कॉलेजात खूप धमाल करायचा का? सांग ना? तुला मित्र मैत्रिणी होते का?" अभय प्रश्न विचारत होता आणि रुक्मिणी फक्त ‘हो’ किंवा ‘नाही’ एवढेच उत्तर देत होती.


"आजी, खरतर इतक्या वर्षांनी सगळे भेटणार पण त्याचा तुला आनंद झाला नाहीय का?" अभय असे म्हणताच रुक्मिणीने आपले भरून आलेले डोळे पुसले.


"अभय, सगळे भेटतील पण तिथे सौदामिनी नसणार रे." दाटून आलेला हुंदका तिने कसाबसा आवरला.


"आजी मेकअप खराब होईल बरं." अभय विषय बदलत म्हणाला.


पुढे प्रवासात अभयच्या डोक्यात एकच नाव होते.. सौदामिनी.


‘कोण असेल ही सौदामिनी?’ अभयच्या डोक्यात आता हा प्रश्न सतत नाचत होता.

त्याने खरतर आजीला कार्यक्रम स्थळी सोडून पुण्यात फिरायचे ठरवले होते पण तो बेत त्याने मनातच रद्द केला. सकाळी सहा सात वाजता पुणे प्रचंड प्रसन्न भासत होते. ताम्हिणी घाटातून पुणे मुंबई रस्त्यावर गाडीने प्रवेश केला. बावधन गावाच्या बाहेर एका प्रशस्त बंगल्याबाहेर गाडी थांबली. ‘सुमनगंध!’ नावाप्रमाणे बंगल्याच्या भोवती फुलेच फुले होती. थोड्याच वेळात एक विलक्षण देखणी आजी बाहेर आली.


"सुमे,अगदी होती तशी आहेस बाई अजून." रुक्मिणी तिच्या गळ्यात पडून म्हणाली.


"तू काही कमी नाहीस. उगीच तो दुर्वास ऋषी तुझ्या अर्ध्या वचनात आहे का?" सुमन हसून म्हणाली.


"सुमे, आता हे सगळे तिकडे पोहोचेल." रुक्मिणी हसली.


"आजी, आजोबांची सगळी सिक्रेट मीच सांगायचो तुला. पण तू मात्र मला काही सिक्रेट सांगितले नाहीस." अभय मुद्दाम म्हणाला.


"अगो बाई,रुक्मिणी काय लपवलं? ते पण ह्या वयात?" सुमनआजी हसून म्हणाली.


"नाही गं,काहीही बोलतो हा." रूक्मिणीने उत्तर दिले.


"मग ही सौदामिनी मला कशी माहित नाही?" अभय पटकन बोलून गेला.

हे नाव ऐकताच सुमनदेखील एकदम शांत झाली.


"अभय, आज नको ती आठवण. सौदामिनी कुठे असेल? हा प्रश्न आजवर आम्ही कधीच मनातदेखील उच्चारला नाही." रुक्मिणी डोळे पुसत म्हणाली.


"आजी, किमान एखादा फोटो असेल ना?" अभय चिवटपणे प्रयत्न करतच होता.


"छे,तेव्हा काही फोटोचे फॅड नव्हते. चल तू फ्रेश होऊन ये बरं." सुमनआजी त्याला सरळ आत हुसकावत म्हणाली.


सुमनच्या घरी मस्त पाहुणचार घेऊन ते नियोजित कार्यक्रमास जायला निघाले. तिथे गेल्यावर म्हाताऱ्या पानांचे हिरवे देठ बघून अभय अगदी थक्क झाला.

"मध्या, ती बघ रुक्मिणी अजूनही काय सुंदर दिसते." एक आजोबा हळूच म्हणाले.


"दिग्या, आता आजोबा झालो आपण. त्याकाळी असलेले एकतर्फी प्रेम." दुसरे आजोबा म्हणाले.


"मध्या म्हातारा तू असशील. मी आजही सौदामिनी समोर आली तर तिला प्रपोज करेल आहेस कुठे?" पहिले आजोबा म्हणाले.


"रुक्मिणी आणि सुमन दोघीच आल्यात. त्यांना माहीत असेल का रे तिचा पत्ता?" दिगंबर आजोबा बोललेच.


"नाही रे, माहित असता तर त्या दोघीच आल्या असत्या का?" माधव आजोबांनी उत्तर दिले.

"किमान एकदा तिला पाहता आले असते." दिगंबर आजोबा निराश झाले.


"दिग्या नाराज होऊ नकोस. माझ्या घरी आपला कॉलेजच्या नाटकातला फोटो आहे. त्यात सौदामिनी आहे." माधव आजोबा म्हणाले. इतका वेळ नुसते ऐकत असणारा अभय हळूच पुढे झाला.

"आजोबा,बसू का इथे?" अभय हळूच खुर्ची सरकवत म्हणाला.

"अरेच्चा! आयाळ झडलेल्या सिंहांच्या कळपात बछडा?" मागून एक आजोबा हसून म्हणाले.

"ते आजीला सोबत म्हणून आलोय." अभय हळूच म्हणाला.

"कोण रे तुझी आजी?" अभयकडे बारीक डोळे करून बघत दिगंबर आजोबा म्हणाले.

" थांब, मी सांगतो दिग्या. रुक्मिणीचा नातू आहे हा. डोळे बघ सेम दुर्वास ऋषी सारखे आहेत." माधव आजोबांनी उत्तर दिले.


खरे तर आजोबांना असे बोललेले अभयला अजिबात आवडले नव्हते.

“नाव काय रे तुझे? काय करतोस तू?" तितक्यात तिसरे आजोबा म्हणाले.

"अभय नाव आहे माझे. मी क्राईम न्यूज स्टोरी लिहितो." अभयने उत्तर दिले. तेवढ्या वेळात तिघांच्या खाणाखुणा चालू होत्या.

" काही विचारायचे आहे का?" अभय बारीक डोळे करत बोलला." तू आमचे एक काम करशील?" तिघेही हळूच म्हणाले. एकच नाही तर तीन मासे गळाला लागलेले बघून अभय हसला आणि त्याने होकार दिला.

“तुझ्या आजीला एक विचारायचे होते?" माधव आजोबा घाबरत म्हणाले.

"काय प्रपोज करायचे आहे का? तसे तुम्ही माझे आजोबा शोभला असतात." अभय हळूच माधव आजोबांना बोलला तसे तिघेही लाजले.


"तसे नाही रे, ते काम असं होतं की आमची एक मैत्रीण कोणाच्या संपर्कात नाही. तिच्याबद्दल रुक्मिणीला विचारायचं होतं." दिगंबर आजोबा एका दमात बोलून मोकळे झाले.


"एवढंच होय? काय नावं त्या मैत्रिणीचं?" अभयने पुढील प्रश्न विचारला.

"सौदामिनी प्रधान." तिघांनी एका सुरात उत्तर दिले.


“अच्छा; पण हे नाव आजी कधीच घेत नाही. तरीही तुमच्याकडे एखादा फोटो असेल तर मी शोधून देऊ शकतो." अभयने पुढचा फासा टाकला.


"फोटो माझ्या घरी आहे." माधव आजोबा हळूच म्हणाले.

"हे माझे कार्ड. फोटो व्हॉट्स ॲप करा." अभय म्हणाला. तेवढ्यात रुक्मिणी येत असलेली पाहून हे तिघे सटकले.

“काय म्हणत होते रे तिघे?" रुक्मिणी आजी म्हणाली.


"काही नाही. माझ्या क्राईम स्टोरी बद्दल बोलत होतो." अभयने थाप मारली.

त्यानंतर कार्यक्रमात अभय बराच काळ फिरत होता. सगळीकडे एकच चर्चा होती ती म्हणजे सौदामिनी प्रधान कुठे असेल?

कोण आहे ही सौदामिनी प्रधान?अभय तिला शोधू शकेल का?
वाचत रहा.. सौदामिनी.

क्रमश:
©®प्रशांत कुंजीर.

🎭 Series Post

View all