सौदामिनी भाग 2

सौदामिनी कुठे असेल?
सौदामिनी. भाग-२

मागील भागात आपण पाहिले आजीच्या सौदामिनी नावाच्या मैत्रिणीचा शोध घ्यायचे अभय ठरवतो. आता पाहूया पुढे.

सुमन आजीचा निरोप घेऊन अभय आणि आजी घरी निघाले. मूळचे कोकणातील सावंतवाडी येथील असणारे अभयचे घराणे. इंजिनियर असलेला अभय वर्क फ्रॉम होम असेल तेव्हा महिना महिना कोकणात येऊन रहात असे.


"अभय ती त्रिमूर्ती काय विचारत होती तुला?" रुक्मिणी म्हणाली.


"त्रिमूर्ती? कोण गं आजी?" मुद्दाम साळसूदपणे अभय म्हणाला.


"अरे ते दिग्या, मध्या आणि दिन्या." रुक्मिणी पटकन बोलून गेली आणि जीभ चावली.


"काही नाही ग्रेटा गार्बो का नाही आली विचारत होते." अभय मोठ्याने हसला.


नंतर काहीही विषय निघाला नाही. घरी पोहोचल्यावर अभय फ्रेश होऊन बसला आणि मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून मॅसेज आला. अभयने मॅसेज उघडला.


"इंडियन ग्रेटा गार्बो." समोरील फोटो बघून तो पटकन बोलून गेला.

‘आमच्या कॉलेजची ही अप्सरा शोधशील ना? -माधव साखरदांडे.’


अभय हसला आणि त्याने पुढचे काम करायला घेतले. अभयने तो फोटो फेसबुकवर अपलोड केला आणि त्याच्या सगळ्या मित्रांना टॅग केले.


एक दिवस अचानक एका अनोळखी नंबरवरून अभयला फोन आला.

"हॅलो, मिस्टर अभय सावंत?" पलीकडून एक गोड आवाज आला.


"येस, मे आय नो हु इज ऑन लाईन?" अभयने विचारले."


आय अभय, पेहले हे सांग तू मेरा फोटो फेसबुक वर का टाकला रे." पलीकडून पोरगी पेटली होती.


"एक मिनिट मिस, व्हॉट ऐवर आधी हे असले भयंकर मराठी बोलू नका. तुम्ही कोण आहात? मिस वर्ल्ड?" अभय भयंकर चिडला.


"ओय ,ये सौदामिनी करके फोटो टाकला हाय ना तो माझा आहे." तिने ओरडुन उत्तर दिले.


"काय? तो फोटो माझ्या आजीच्या मैत्रिणीचा आहे. सौदामिनी प्रधान." अभयची आता सटकली होती.


"ओ अभय कोणाला चिट करते है,मेरा नाम भी रुक्मिणी है।" पलीकडून ती चिडली.


तिने रागावून फोन ठेवला आणि नंतर तिचा फोटो पाठवला. फोटो बघताच अभय उडाला. कसे शक्य आहे? किती कमाल साम्य आहे? अभय मनाशी विचार करत होता. आता आजीला सांगावेच लागणार आहे.

त्याने हळूच आजीचा अंदाज घेतला. "आजी, काय करतेय तिकडे?" अभय अगदी गोड आवाजात म्हणाला.


"काय झाले छोटे दुर्वास? काय नवीन भानगड?" रुक्मिणी बारीक नजरेने बघत म्हणाली.


"आजी,हा फोटो बघ." त्याने रुक्मिणीने पाठवलेला फोटो दाखवला.


"हुबेहूब सौदामिनी दिसते. कोणाचा आहे हा फोटो?" रुक्मिणीदेखील गोंधळली.


"आजी, कोणीतरी रुक्मिणी आहे. ती खूप विचित्र मराठी बोलते." अभयने माहिती पुरवली.


"तिला म्हणावे तुला आजी आहे का? असेल तर फोटो पाठव." रुक्मिणी नकळत आनंदी झाली होती. त्याने सरळ फोन लावला.


"मिस रुक्मिणी, तुमची आजी आहे का तुमच्यासोबत?" अभयने सरळ प्रश्न विचारला.


"आजी? नही है।" समोरून उत्तर आले.


"अच्छा म्हणजे देवाघरी गेली." अभय म्हणाला.


"डफर मतलब मेरे घरपे सिर्फ आजोबाचा फोटो हाय." तिने उत्तर दिले.


"मिस रुक्मिणी प्लीज तुमच्या आजीचा एखादा फोटो असेल तर बघाल?"


त्याने तिला विनंती केली आणि फोन ठेवून दिला."


रुक्मीणी मात्र पुन्हा तिची जखम चिघळल्याने अस्वस्थ झाली होती. डॉक्टर श्रीकांत सिंग यांची एकुलती एक मुलगी असलेली रुक्मिणी . लेडी श्रीराम महाविद्यालयाची टॉपर आणि आता रॉ एजंट होण्यासाठी जीवापाड मेहनत करणारी रुक्मिणी.
आजवर आपल्याला आजी का नाही? ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र शोधू शकली नव्हती.


लहान असताना इतर मुलींच्या आज्या त्यांचे लाड करत तेव्हा ती आईला सतत विचारायची. आपल्या घरात आजीचा फोटो का नाही? कशी दिसते माझी आजी? परंतु वाढत्या वयाबरोबर ती आजी नसण्याची खंत विसरली होती. मात्र आता पुन्हा तोच प्रश्न पुन्हा समोर आला होता.


रुक्मीणीने आता तिच्या वडिलांना न विचारता गुपचूप शोध घ्यायचा असे ठरवले. त्यासाठी आधी तिने तिच्या आजोबांची माहिती काढायला सुरुवात केली. आपल्या वडिलांना कर्नल सिंग यांनी दत्तक घेतले असल्याचे तिला ठाऊक होते. त्यामुळे आधी त्यांच्या खऱ्या वडिलांचा शोध लावणे आवश्यक होते. आता त्याकामी एकच व्यक्ती मदत करू शकत होती. तिचे आजोबा कर्नल जोगिंदर सिंग. रुक्मीणीने आजोबांना आपण त्यांच्याकडे येत असल्याचे कळवले.


"आई, मी आज आजोबाके यही रहुंगी." तिने आवाज दिला आणि घराबाहेर पडलीदेखील.


पंजाबातील त्या समृध्द गावात असलेल्या कर्नल जोगिंदर सिंग यांच्या भव्य बंगल्यात आता ते एकटेच रहात असत. आपली नात आल्याचे कळताच त्यांना खूप आनंद झाला.


"ग्रँडपा आय वॉन्ट टू शो. समथिंग. हे बघा आणि ओळखा बरं." रुक्मिणी अभयने अपलोड केलेला फोटो दाखवून म्हणाले. कर्नल सिंग अनेक वर्षे महाराष्ट्रात असल्याने मराठी छान बोलत असत.


"हा फोटो कोणाचा आहे रुक्मिणी?" त्यांनी उलट विचारले.


"तेच मला शोधायचे आहे. तुम्ही पप्पांना दत्तक घेतले राईट? स्वतः अविवाहित असताना?" तिने सरळ विचारले. कर्नल सिंग शांत झाले.


"रुक्मिणी,आता तुला सगळे खरे सांगायची वेळ आली आहे. तुझ्या पप्पाचे खरे नाव आहे श्रीकांत माधवराव पाठक. मेरा जिगरी दोस्त माधव यांचा हा मुलगा. माधव आणि सौदामिनी दोघेही जणू एकमेकांसाठी बनलेले." कर्नल सिंग सांगत होते.


"एक मिनिट, सौदामिनी नाव होते का आजीचे?" तिने पुन्हा विचारले.


"हो, पुरे आर्मी ऑफिसर माधव से जलन मेहसुस करत. सौदामिनी होतीच तशी बुद्धिमान, सुंदर." कर्नल सिंग म्हणाले.


"पण मग तिचा काहीच उल्लेख तुम्ही केला नाहीत. माधव आजोबांचा देखील एकही फोटो नाही." रुक्मिणी म्हणाली.


"रुक्मिणी, कूछ सच बहोत दर्द देतात बेटा. एकोणीसशे चौऱ्याएंशी मध्ये एका अतिरेकी हल्ल्यात माधव मारला गेला आणि सौदामिनी गायब झाली. अनेकांना ती पाकिस्तानी हेर वाटते अजूनही." कर्नल सिंग दुखऱ्या आवाजात म्हणाले.


" काय? एका अधिकाऱ्याची पत्नी हेर? याचे कारण काय?" तिने पुन्हा विचारले.


"उसकी पाकिस्तानी गायिका नुरसे बहोत दोस्ती थी. सगळ्यांना वाटते तिथूनच ती माहिती पोहोचवत असे. त्या युद्धानंतर नूर कायमची मुंबईत रहायला आली. तिने गाणे सोडून दिले आणि आता ती कुठेय काहीही माहीत नाही." कर्नल सिंग म्हणाले.


"मला आजी आजोबांचा एक फोटो हवा आहे." तिने विनंती केली.


कर्नल सिंग यांच्याकडून फोटो घेऊन रुक्मिणी बाहेर पडली. ‘आपली आजी पाकिस्तानी हेर?’ तिला कल्पनाच करवत नव्हती. आता मात्र काहीही झाले तरी सगळे शोधायचे तिने ठरवले. एक वेगळाच निर्धार घेऊन रुक्मिणी बाहेर पडली.


घरी आल्यावर तिने अभयला फोन केला. " मिस्टर अभय,तुम्ही मला भेटू शकाल? पुणे किंवा मुंबईत?" तिने सरळ विचारले. अभयने होकार दिला.


रुक्मिणी ही तयारी करत असतानाच तिला रॉ ऑफिस मधून एक गुप्त मेल आला. त्यावरून तिला पाच व्यक्तींची माहिती गोळा करायची होती. त्यातील चार व्यक्ती महाराष्ट्रात होत्या. पाचवा फोटो नीट ओळखू येत नव्हता. तो स्पष्ट फोटो मिळावा. असा मेल करून तिने मुंबईची तिकिटे बुक केली. रुक्मीणीने आईला आपण महाराष्ट्रात जातोय असे सांगितले.


"रुक्मिणी, तुला काही पत्ते देते. शक्य झाले तर भेट घेऊन ये." डोळ्यांच्या कडा पुसत तिची आई डॉक्टर कुमुद म्हणाली.


बाबांना काहीच न सांगता ट्रेनिंगसाठी जात असल्याचा निरोप तिने दिला आणि रुक्मिणी बाहेर पडली. आपले मूळ शोधायला.

खरच सौदामिनी हेर असेल?
ती कुठे गायब झाली असेल?
वाचत रहा.
सौदामिनी.
©®प्रशांत कुंजीर.
_________

🎭 Series Post

View all