सौदामिनी भाग 4

लेडी बाँड कोण असेल?
सौदामिनी. भाग ४

रुक्मिणी आणि अभयवर हल्ला झाला आणि आता सौदामिनी कुठून गायब झाली ते सापडले होते. तसेच नूर नावाच्या गायिकेचा पत्ता सापडला होता. आपली आजी जिवंत आहे का? याचे उत्तर रुक्मिणीला मिळेल का? पाहूया पुढे.


"रुक्मिणी माझी सौदामिनी सापडली तर पुळ्याच्या गणपतीला येईल असा नवस बोलले आहे. नक्कीच यश मिळेल बघ." आजी हातावर दही देत म्हणाली.


अभय आणि रुक्मिणी मुंबईच्या दिशेने निघाले. पाठलाग होत असल्याने रुक्मिणी सावध होती. तेवढ्यात तिला एक फोन आला तिने फोन ठेवला आणि शांत बसली. अभय मात्र गाडी चालवत असताना माहिती मिळवत होता. त्याने एका सहकाऱ्याला कामाला लावले होते.


"अभय, लेफ्टनंट हंबीरराव पाटील यांची लक्ष्मी नावाची कोणी बायको आहे हेच त्यांच्या गावी कोणाला माहित नाही. त्यांची वृध्द बहीण आणि भाऊ गावी आहेत. भारत सरकारने त्यांना काहीही संपर्क केला नाही असे त्यांचे म्हणणे आहे." समोरून फोन ठेवला. " अभय,ही लक्ष्मी सापडली पाहिजे." रुक्मिणी म्हणाली.


"नुर सापडली तशी ना?" अभय असे म्हणाला आणि रूक्मिणी बघतच राहिली.


अभय हाच योग्य व्यक्ती असल्याची तिला खात्री पटली आणि तिने आपले सत्य त्याला आजी सापडली की सांगायचे ठरवले. वाटेत दोन ठिकाणी थांबून तिथल्या लोकांना गुप्त माहिती पोहोचवून दोघे पुढे निघाले. संध्याकाळ होत आली होती. गाडीने मुंबई शहरात प्रवेश केला.


रूक्मिणीने भारतीय लष्कराच्या पुणे ऑफिसशी संपर्क केला. लेफ्टनंट मोहिते यांची पेन्शन आणि इतर लाभ त्यांची पत्नी लक्ष्मी हिला देण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते. आता फक्त पेन्शन ज्या खात्यात जमा होते ते शोधले म्हणजे लक्ष्मी सापडणार होती. तेवढ्यात अभयच्या मोबाईलवर एक लोकेशन आले.


"रुक्मिणी नुरचे लोकेशन आले आहे. धारावी झोपडपट्टी." अभयने गाडीमध्ये लोकेशन सेट केले आणि दोघेही त्या लोकेशनवर जायला निघाले.


एक तासाचे अंतर होते. लवकरच नुर सापडणार होती. एका चिंचोळ्या बोळीच्या तोंडावर गाडी थांबली. अजून दोन किलोमीटर दाखवत होते. रुक्मिणी तयारीत होती. गाडी एका ठिकाणी सुरक्षित लावून त्या माणसाला पाचशे रुपये देऊन हे आत शिरले. धारावी म्हणजे भूलभुलैया. पाऊण तास पायपीट केल्यावर ते दोघेही तिथे पोहोचले. अभयचा माणूस लांबून नजर ठेवून होता. त्याने खुणावताच अभयने दार वाजवले. समोर साठीच्या वरची एक वृद्ध परंतु देखणी स्त्री उभी होती.


"हमे नुरसे मिलना है।” अभय म्हणाला.


"इस नाम का यहाँ कोई नहीं है।" असे म्हणून ती दरवाजा लावणार इतक्यात रुक्मिणी पुढे आली.


तिला बघताच त्या वृद्ध स्त्रीने दोघांना अक्षरशः खेचून आत घेतले. "आपको सौदामिनी दिदीने भेजा ना? दिदी जिंदा है ना?" नुर रुक्मिणीचे हात पकडुन विचारत होती.


“वो चली गयी पाकिस्तान. गद्दार जासूस." रुक्मिणी मुद्दाम म्हणाली आणि समोरच्या वृध्द स्त्रीने तिच्या कानाखाली एक जोरदार कानाखाली मारली.


“क्या बोली? जासूस? अरे देवी होती दिदी. मै पाकिस्तानी नही थी। आमचं गाव त्यांनी जिंकल. मी माझ्या अब्बा सोबत गाणं गायची. दिदी मला खूप प्यार करत असे." नुर सांगत होती.


"मग त्याचा फायदा घेऊन तूच खबर दिली ना?" अभय म्हणाला.

"नाही बेटा, उलट मी तिकडून बातम्या आणून दिदीच्या एका सहेलीला द्यायची. लेडी बाँड नाम था उसका।" नुर म्हणाली.

"लेडी बाँड अशी कोणीच रॉ एजंट नाही. ती फक्त अफवा आहे." अभय चिडून म्हणाला. " नाही अभय, लेडी बाँड होती. पण ती आता कुठेय माहित नाही." रुक्मिणी पटकन बोलून गेली आणि अभय हसला.


"बेटा हमला होणार मला समजले. मी दिदीला खबर द्यायला निघाले. पण वाटेत मला काही माणसांनी पकडले आणि नंतर मला जाग आली तेव्हा ते मला मुंबईला घेऊन आले होते. तोपर्यंत हमला झाला होता. माझ्यावर संशय जाणार असल्याने मी मुंबईत आल्यावर त्या माणसांच्या तावडीतून पळाले आणि मग मी पळतच राहिले." नुर थांबली.


"अभय आता हिला इथे नाही ठेवू शकत आपण." थोड्याच वेळात तिथून तिघेही वेगाने बाहेर पडले.


इकडे आजी अभयची खोली साफ करायला आली असताना तिने समोर ठेवलेल्या प्रिंट पाहिल्या त्यात पाच फोटो होते. पाचवा फोटो अगदी अस्पष्ट होता. परंतु त्यातील स्त्रीचे डोळे आजीला आपल्याकडे ओढत होते. अभय आणि रूक्मिणी नुरला घेऊन बाहेर पडले आणि त्यांच्या मागावर दबा धरून बसलेली एक गाडी निघाली.


अभय आणि रुक्मिणी प्रचंड सावध होते. त्यांनी गाडी सुरू केली. धारावीच्या एका बोळात अचानक समोरून दुसरी गाडी येऊन थांबली. मागे देखील एक गाडी उभी होती.,

"तुझा फोन माझ्याकडे दे. विश्वास ठेव तुम्हाला काहीही होणार नाही." आपण घेरलो आहोत याची कल्पना येताच रुक्मिणी म्हणाली.


अभयकडून फोन घेतला आणि रुक्मिणी गाडीच्या छतावर चढली. एका क्षणात तिने एका झोपडीच्या छतावर उडी मारली आणि ती पुढच्या क्षणी गायब झाली. नुर आणि अभय दोघांना पकडून काळया रंगाची इनोवा गाडी बाहेर पडली. दोघांच्या अंगावर पट्टी बांधली होती.


इकडे रुक्मिणी विजेच्या चपळाईने तिथून बाहेर पडली. तोपर्यंत लक्ष्मीची पेन्शन जमा होत असलेल्या बँकेचे नाव आणि शाखा समजली होती. त्यावर असलेला पत्ता देखील दिला होता. तो पत्ता मुंबईतच असल्याचे तिच्या लक्षात आले.


"करुणा, रूक्मिणी हीअर. आय नीड बॅकप. मी एक पत्ता देते आणि डिटेल्स टाकते. तिथे जे कोणी असेल त्याला उचल." फोन ठेवला आणि रूक्मिणीने आपल्याकडे असलेला अत्याधुनिक जी. पी.एस ट्रॅकर काढला. त्यावर तिने पासवर्ड टाकला आणि क्षणात तिच्या चेहऱ्यावर हसू परत आले.

अभय घाबरला अजिबात नव्हता. क्राईम स्टोरी शोधताना अनेक प्रसंग आले होते. त्यामुळे तो प्लॅन बी ठेवत असे. फक्त यांनी गाडी थांबवायला हवी होती.


"चला रे, यांना आत घेऊन चला." एकाने आवाज दिला.


नुर आणि अभय दोघांनाही एका अंधाऱ्या खोलीत फेकण्यात आले.


"बेटा, तुम भाग जाओ।" नुर रडत म्हणाली.


"रडू नका. काही होणार नाही. थोडा वेळ जाऊ द्यात." अभय शांतपणे कानोसा घेत होता.


करुणा दिलेल्या पत्त्यावर पोहोचली. तिथे एक म्हातारी रहात होती. तिचेही नाव लक्ष्मी होते. पण तिला पोलिसी खाक्या दाखवला आणि ती पटापट बोलायला लागली. दरमहा घेतलेली पेन्शन आणि सगळी संपत्ती नावाला तिच्याकडे होती. प्रत्यक्ष वेगळीच व्यक्ती होती. तिने करुणाला त्या पत्त्यावर घेऊन जायचे कबूल केले.


रुक्मिणी ट्रॅकर सोबत पुढे जात होती. फक्त अभयला काही होता कामा नये. तिच्या डोळ्यासमोर रुक्मिणी आजीचा चेहरा येत होता. तेवढ्यात आजीचा फोन आला. अभयचा फोन तिने हातात घेतला आणि बॅटरी डेड झाली. आजिशी बोलता आलेच नाही. परंतु थांबायला वेळ नव्हता. दोन जीव धोक्यात होते. एकीकडून करुणा आणि दुसरीकडे रुक्मिणी आपापल्या ध्येयाकडे निघाल्या होत्या.

कोण असेल लेडी बाँड?
लक्ष्मी कोण आहे?
रुक्मिणीला आजी सापडेल का? वाचा अंतिम भाग.
®®प्रशांत कुंजीर.

__________

🎭 Series Post

View all