मृतात्मा (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
मृतात्मा

आचार्यच्या पत्नीने गंगारावच्या तोंडावरून ते कातडे काढले असेल तरीही आचार्य अजून धक्क्यातून सावरला नव्हता. धनी आणि मणीने हे पाहिले.

“चल मणी हा पूर्ण मानव आहे.” धनी म्हणाला.

ते दोघे आत आले.

“गुरुजी तो पूर्ण मानव आहे.” मणी म्हणाला.

आचार्यला भानावर आणायला धनी आचार्यच्या कानाजवळ आणि मणी गंगारावच्या कानाजवळ जोरात स्वाहा म्हणून किंचाळले. त्या आवाजाने तो जागा झाला.

“मी कुठे आहे? तुम्ही कोण आहात?” त्याने आजूबाजूला बघत विचारले.

“तुम्ही महान गुरू आचार्य तथाचार्य यांच्या घरी आहात.” धनी म्हणाला.

त्याने आचार्यला पाहिले आणि त्याला नमस्कार केला.

“ही कुठली पद्धत आहे घरात शिरण्याची? तेही अशी लांडग्याची कातडी पांघरून?” आचार्य चिडून पण घाबरत म्हणाला.

“माफ करा आचार्य मला हा आजार आहे देवाच्या कृपेने आणि हे कातडे तुम्हालाच भेट म्हणून आणले आहे.” तो म्हणाला.

त्याने ते कातडे त्याला देण्यासाठी पुढे केले तसे आचार्यने घाबरून आणि रागात ते लांब ठेव म्हणून सांगितले. त्याने ते पुन्हा स्वतःच्या हातात धरले.

“देवाच्या कृपेने तुम्ही इथेच कसे आलात?” आचार्य म्हणाला.

“मी तुम्हालाच भेटायला आलो होतो. माझी समस्या तुम्हीच सोडवू शकता.” तो म्हणाला.

यावर धनी मणी काहीतरी कुजबुजले.

“आमची भक्तांना भेटण्याची वेळ सकाळची असते. आत्ता तुम्ही जा आणि सकाळी या.” आचार्य म्हणाला.

“ठीक आहे देवाच्या कृपेने.” तो म्हणाला.

गंगाराव तिथून निघू लागला तर आचार्यनेच त्याला अडवले.

“आता आलाच आहेस तर सांग काय समस्या आहे?” त्याने विचारलं.

“माझ्याकडून एका व्यक्तीने धन उधार घेतले होते पण तो स्वर्गवासी झाला आणि त्याच्या कुटुंबीयांनी मला एक हवेली त्या बदल्यात दिली.” तो म्हणाला.

“काहीतरी मिळालं आहे ना! मग घे ना ती हवेली.” आचार्य वैतागून म्हणाला.

“नाही आचार्य. ती हवेली कोणीच घेऊ शकत नाही. ती शापित आहे. तिथे एक मृतात्मा आहे.” तो म्हणाला.

“क… काय काय बोलतोयस तू? हे सर्व काल्पनिक असतं. भूत, प्रेत, पिश्चाच हे सर्व मनाचे खेळ आहेत.” आचार्य म्हणाला.

“नाही आचार्य मलाही आधी तेच वाटत होतं म्हणून मी हवेलीत गेलो.” तो सांगू लागला आणि भूतकाळात गेला.

तो त्या हवेलीत गेला. खूप जुनी आणि अस्वच्छ हवेली पाहून आणि त्यात आधीच अश्या ऐकीव गोष्टींमुळे तो जरा घाबरत आत गेला. बाहेर ढग गडगडत होते, खूप अंधार होता आणि वारा सुटला होता. हवेलीत वर जाणाऱ्या जिन्यावरून तो वर जाण्याचा विचार करत होता एवढ्यात त्याला घुंगरांचा आवाज आला. त्याने आजूबाजूला पाहिले पण कोणीही नव्हते. त्याने जिन्यावरून चढायला सुरुवात केली आणि पुन्हा आवाज आला. त्याने एकदम मागे वळून पाहिले पण कोणीच नाही म्हणून तो पुन्हा सरळ झाला तर त्याच्या समोर एक बाई उभी होती. आता याची भीतीने गाळण उडाली. तो तिथून पळ काढू लागला तर तिने त्याला मागून जोरात धक्का मारला आणि तो खाली पडला.

हे सर्व त्याने आचार्यला कथन केले.

“बास. बास. आम्हाला वाटतंय तुला फक्त या झोपेत चालण्याच्या आजारावर उपचाराची गरज नाहीये तर तुझे डोकेही बिघडले आहे त्याचाही इलाज करून घे. आमच्या या पवित्र वास्तूमध्ये असल्या भुताच्या गोष्टी करतोस? जा. यात आम्ही काहीही करू शकत नाही. हे तुझे भ्रम आहेत.” आचार्य म्हणाला.

“तुम्ही एक काम करा महोदय आमच्या स्वामींचे नाव घ्या. त्यांच्या नावानेच तिथले सगळे आत्मे पळून जातील.” त्याची पत्नी म्हणाली.

“आमचे गुरुजी इतके महान आहेत की त्यांच्या नावानेच सगळे पळून जातील. दिवसभर त्यांच्या नावाचा जप करा.” धनी म्हणाला.

पण पुन्हा आचार्यने त्याला हे तुझे भास आहेत असं सांगितलं.

“तुम्हाला हे भास वाटत असतील तर एकदा माझी पाठ बघा देवाच्या कृपेने.” तो म्हणाला.

त्याने आचार्यकडे पाठ केली तर त्याच्या कपड्यावर एक हाताच्या पंजाचा निशाण उमटला होता. आचार्य ते पाहून घाबरला पण तसे न दाखवता बोलू लागला; “हा तुझा तूच केला नाहीये कशावरून?”

“आचार्य मी माझ्या पाठीवर माझ्याच पंजाचा निशाण कसा करू शकतो?” तो म्हणाला.

लगेच त्याने स्वतःचा हात पाठीवर जातोय का हे पाहिले. धनी आणि मणी देखील तसेच करत होते.

“मग दुसऱ्या कोणाकडून करून घेतला असशील.” आचार्य म्हणाला.

“मी असं का करेन आचार्य? खरंच ती हवेली झपाटलेली आहे. देवाच्या कृपेने.” तो म्हणाला.

“आम्ही यात तुझी काही मदत करू शकत नाही. आम्हाला काय सर्वसाधारण तांत्रिक समजलं आहेस का? तू ये.” आचार्य म्हणाला आणि त्याला तिथून घालवून दिले.

“हा खरंच अक्कल गहाण ठेवून आलेला होता नाहीतर इथे कशाला आला असता? त्या महा बुद्धिमान पंडित रामाकृष्णाकडे गेला नसता का.” मणी म्हणाला.

“हो. खरंच हा चुकीच्या ठिकाणी आला.” धनी म्हणाला.

आचार्यने ते ऐकले.

“ए धनी, मणी! जा त्याला थांबवा आणि सांगा उद्या दरबारात ये आम्ही त्याच्या समस्येचे निवारण करू.” आचार्य म्हणाला.

“जशी आज्ञा गुरुजी.” दोघे एकदम म्हणाले आणि गेले.

आचार्य टकलावर हात फिरवत उद्या पंडित रामाला कसे यात अडकवायचे याचा विचार करू लागला.
**************************
दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे दरबार भरला.

“महामंत्री! आजची कार्यवाही सुरू करण्यात यावी.” राजा म्हणाला.

महामंत्री उठून उभे राहिले आणि काही बोलणार इतक्यात आचार्य उभा राहिला.

“महाराज माफ करा आम्ही मध्येच बोलतोय पण आम्हाला जे सांगायचे आहे ते थोडे महत्त्वाचे आहे म्हणून आम्ही आमच्याकडे तुमचे लक्ष वेधून घेऊ इच्छितो.” आचार्य म्हणाला.

“आमचे लक्ष कायम तुमच्याकडेच आकर्षित असते आचार्य.” राजा म्हणाला.

“आमचे अहोभाग्य महाराज. आज आम्ही तुम्हाला गंगाराव यांची भेट घालून देऊ इच्छितो. त्यांची एक समस्या आहे जी सोडवली जावी अशी त्यांची इच्छा आहे. ते खास गुंटुर मधून आले आहेत.” आचार्य म्हणाला.

त्याने लगेच गंगारावला त्याची समस्या राजाला सांगायला सांगितली. त्याने सर्व काही कथन केले. तो सांगत असताना रामा थोडा घाबरला होता पण कसेबसे सावरून तो बसला. त्याचे सर्व सांगून झाल्यावर राजा सकट सगळा दरबार हसू लागला.

“हे सर्व काल्पनिक आहे आणि तुमच्या मनाचे खेळ आहेत. ही फक्त एक अंधश्रद्धा आहे.” राजा म्हणाला.

आचार्य लगेच त्याच्या जागेवरून उठून राजा समोर उभा राहिला आणि बोलू लागला; “महाराज फक्त हेच नाही तर अश्या कित्येक लोकांच्या मनात हे भय बसलेले आहे. अंधश्रद्धा आणि श्रद्धा यातील फरक हा लोकांना कळायला हवा. भूत, प्रेत, आत्मा हे सर्व काल्पनिक आहे हा संदेश समाजात जाणे खूप महत्त्वाचे आहे महाराज.”

“बरोबर आहे तुमचे आचार्य. हा समज दूर व्हायलाच हवा पण यावर काय उपाय करता येईल याचा तुम्ही काही विचार केला आहे का?” राजाने विचारलं.

“होय महाराज आम्ही विचार केला आहे.” आचार्य म्हणाला.

“काय आहे यावर उपाय?” राजाने विचारलं.

“महाराज यावर एकच उपाय आहे, दरबारातील कोणीतरी एक पूर्ण रात्र एकट्याने त्या हवेलीत काढायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुखरूप परत यायचे. यामुळे आपोआप लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर होतील.” आचार्य म्हणाला.

“उपाय तर चांगला आहे आचार्य. यामुळे सगळ्यांना विश्वास बसेल असे भूत, प्रेत काहीही नसते.” राजा म्हणाला.

“धन्यवाद महाराज.” आचार्य म्हणाला.

“तर दरबारातील कोण तयार आहे हे कार्य करायला?” राजाने सगळ्यांना विचारले.

सर्वजण एकमेकांकडे बघून खाली मान घालून आपापसात कुजबुजत होते. कोणीही यासाठी स्वतःहून तयार होत नव्हते.

“आचार्य! तुम्हीच सांगा यासाठी कोण व्यक्ती उचित ठरेल?” राजाने विचारलं.

“आमच्या मते तरी या दरबारात फक्त एकच व्यक्ती आहे जी कामासाठी उचित आहे.” आचार्य म्हणाला.

“कोण आचार्य?” राजाने विचारलं.

“या कामासाठी बुद्धिमान व्यक्ती हवी. ज्याच्यावर संपूर्ण जनता विश्वास ठेवेल आणि अशी व्यक्ती म्हणजे आपले सल्लागार महोदय पंडित रामाकृष्णा आहेत.” आचार्य म्हणाला.

हे ऐकून रामा घाबरला.

“रामा तुला तर आत्म्याचे नाव काढले तरी ताप येतो. हा आचार्य तर तुला आत्म्याच्या स्वाधीन करायला निघाला आहे.” बंधू म्हणाली.

“हे आचार्य आत्ताच माझे जीवन संपवण्याच्या मागे लागलेत पण मी नाही असं होऊ देणार.” रामा म्हणाला.

इतक्यात राजाने त्याला बोलावले; “पंडित रामाकृष्णा! तुम्हाला या बाबतीत काय म्हणायचे आहे?”

रामाने काहीतरी विचार केला आणि तो राजा समोर येऊन उभा राहिला.

“महाराज मला फक्त एक गोष्ट सांगायची आहे. जसे हिरा हिऱ्याला कापतो तसेच श्रद्धा अंधश्रध्देला कापेल महाराज. या कार्यासाठी अशी व्यक्ती हवी जिच्यावर लोक श्रद्धा ठेवतात, त्या व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवता येऊ शकतो आणि अशी व्यक्ती म्हणजे आदरणीय आचार्य आहेत महाराज.” रामा म्हणाला.

“क.. काय? आम्ही? आम्ही हे कार्य कसे करणार? आम्ही जर त्या हवेलीत गेलो तर आमच्या अनुष्ठानाचे काय? आमच्याशिवाय दरबार कसा चालणार?” आचार्य बिथरून म्हणाला.

“घे मणी हा म्हातारा पंडित रामासाठी खड्डा खणायला गेला पण स्वतःच त्यात पडला.” धनी कुजबुजला.

“हो. आता तर या म्हाताऱ्याची तिरडी उचलली गेलीच समजायचं.” मणी म्हणाला.

“आम्हाला पंडित रामाकृष्णा म्हणतायत ते पटलं आचार्य. अजून नगरातील लोक पंडित रामा यांना नीट ओळखत नाहीत. तुम्ही सर्वांच्या श्रद्धा स्थानी आहात त्यामुळे याचा प्रभाव जास्त होईल.” राजा म्हणाला.

“पण महाराज…” आचार्य बोलत होता त्याला मध्येच तोडत रामा बोलू लागला; “आचार्य तुमचे जीवन तुमचे नाहीये.”

“हे काय बोलताय? आमचे जीवन आमचे नाही तर कोणाचे आहे?” आचार्य म्हणाला.

“किती भोळे आहेत महाराज आपले आचार्य. आचार्य म्हणजे तुमचे जीवन सर्वांना समर्पित आहे त्यामुळे हे कार्य तुम्हालाच करावे लागेल.” रामा म्हणाला.

यावर आचार्य वाद घालू लागला आणि रामाने त्याची प्रशंसा करून त्याच्याच तोंडून या कार्यासाठी तोच कसा योग्य आहे हे वदवून घेतले. महामंत्री देखील हसू लागले आणि राजाने देखील आचार्यला त्या हवेलीत जाण्याची आज्ञा दिली.

दरबार संपला आणि रात्र झाली होती. आचार्य आता त्या हवेलीत जायचे म्हणून बिथरला होता. त्याची पत्नी त्याला ओवळत होती.

“आम्हाला खात्री आहे स्वामी तुमच्या दर्शनाने तिथल्या सगळ्या वाईट शक्तींना चांगली गती मिळेल. जा आणि त्यांचा उध्दार करून या.” ती म्हणाली.

“हे असं वाटतंय जणू बळी जाणाऱ्या बकऱ्याला ओवाळले जात आहे.” मणी कुजबुजला.

“हम्म. नाहीतरी म्हाताऱ्याचा आता बळीच जाणार आहे.” धनी म्हणाला.

आचार्यची काही घरातून निघण्याची हिंमत होत नव्हती.

“गुरुजी आता निघा उशीर होतोय. मुहूर्त टळून चालला आहे.” मणी म्हणाला.

“आम्ही एकटे नाही तुम्ही दोघेही आमच्या सोबत येणार आहात.” आचार्य म्हणाला.

“नाही गुरुजी.” दोघे एकदम म्हणाले.

त्याने मणीच्या कानाखाली मारली तरीही दोघे नाहीच म्हणत होते.

“ठीक आहे. आमच्या सोबत येऊ नका. कोतवालला सांगून तुम्हाला कारागृहात बंदी करतो मग बसा आजन्म तिथेच सडत.” आचार्य म्हणाला.

त्याबरोबर दोघांनी त्याचे पाय धरले.

“केव्हाचे तेच तर सांगतोय गुरुजी चला निघूया.” धनी म्हणाला.

“उठा उठा माझ्या मुलांनो चला.” आचार्य म्हणाला आणि तिघे निघाले.

ते तिघे हवेलीच्या बाहेर येऊन पोहोचले. आजही वातावरण ढगाळ होते. धनी आणि मणी खूप घाबरले होते. ते हवेलीच्या दारासमोर उभे होते.

“तुम्ही दोघे तर असे घाबरताय जसे आपल्या स्वागतासाठी आत्मा दार उघडणार आहे.” आचार्य म्हणाला आणि हसू लागला.

एवढ्यात दार उघडले गेले आणि ते दोघे ओरडले.

“मुर्खांनो! चला आत हवेने उघडले गेले असेल. असेल नाही हवेमुळेच उघडले गेले आहे.” आचार्य म्हणाला.

तोही मनातून घाबरला होता पण आत गेला. थोडे आत गेल्यावर सगळे हवेली बघत होते.

“जळमटे, धूळ, माती हे सर्व बघून वाटतंय शतकानु शतके ही हवेली बंदच आहे. हे वातावरण आत्म्यांना आवडते. गुरुजी अजूनही वेळ आहे चला परत जाऊया.” मणी म्हणाला.

“घाबरु नका. आपल्याला काही वाटले तर बघा दार अजून उघडेच आहे पटकन पळून जाऊ.” आचार्य म्हणाला.

त्याबरोबर दार आपोआप लावले गेले आणि धनी, मणी त्या दिशेने पळाले.

“ए! कुठे जाताय? थांबा.” आचार्य घाबरून ओरडला आणि त्यांच्या मागे गेला.
************************
इथे रामाच्या घरचे सगळे पुन्हा अम्मा भोवती बसले होते. अम्माची कालची गोष्ट ऐकण्यासाठी सगळे जमले होते.

“अम्मा कालची गोष्ट पूर्ण सांगा ना.” शारदा म्हणाली.

ती खुणा करू लागली; “काल मी कुठे होते?”

“इथेच तर होतीस. इथेच बसली होतीस.” रामा म्हणाला.

यावर अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “या म्हणतायत गोष्टीत कुठे होते.”

यावर अम्माला आठवले आणि ती खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “तर त्या छलाव्याने अम्माला उचलून घराबाहेर आणलं. आता त्याने बैलाचे रूप घेतले होते आणि त्याच्या मोठ्या लाल डोळ्यांनी तो अम्माकडे बघत होता. तो त्याच्या दोन पायांवर उभा होता. त्याची मोठी मोठी शिंग होती.”

एवढं ऐकून झाल्यावर रामा हसू लागला.

“लामा हसायला काय दाल?” गुंडप्पाने विचारलं.

अम्मा खुणा करू लागली आणि शारदा बोलू लागली; “तुला नक्की भीती वाटतेय की हसू येतंय?”

“अम्मा मला तुझ्या गोष्टीची भीती वाटतेय पण आत्ता आचार्य ज्या स्थितीत असतील त्याची कल्पना करून हसूही येतंय.” रामा म्हणाला.

यावर सगळेच हसू लागले.

क्रमशः….

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all