सोयीचं नातं-2

सोयीचं नातं
मुलाला कळेना, आई याआधी सुद्धा तेवढीच कामं करत होती. उलट आता किमान श्रिया सकाळचं आवरून तरी जाते.

आईचं रोजचं सुरू होतं. श्रियाचा नवरा, अरुण..तो कात्रीत सापडायचा. एकीकडे आई दुसरीकडे बायको. आईला आराम मिळावा असंही त्याला वाटायचं, दुसरीकडे बायकोने घरात बसून शिक्षण वाया घालवू नये असंही वाटायचं.

त्याने एक मार्ग काढला. आईला सांगितलं की उद्यापासून घरातली सगळी कामं मी आणि श्रिया करून मगच ऑफिसला जात जाऊ.

पण आईने साफ नकार दिला,

"तू मुलगा आहेस, बायको आल्यावर तू काम करणार? बायकोचा बैलच म्हणायचं की तुला.."

अरुण कितीही शांत असला तरी आता मात्र त्याचा संयम सुटला. श्रिया आणि त्याच्यात भांडणं होऊ लागली. आईला हेच हवं होतं, मग आई अरुणला श्रियाबद्दल अजूनच भडकवायची. दोघांमधले भांडणं विकोपाला गेले आणि शेवटी श्रिया वैतागून माहेरी निघून आलेली.

श्रिया माहेरी आली तसं आई वडिलांना वाईट वाटलं. आपली मुलगी इतक्या त्रासातून जातेय याचं त्यांना वाईट वाटलं. काही दिवस जाऊ दिले. आई वडिलांनी नीट विचार केला,

संसार मोडायचा इतकं काही खास कारण नाहीये. नवरा बायकोमधले हे क्षुल्लक खटके आहेत, आज ना उद्या सोडवले जातीलच. अरुणला ते नीट ओळखून होते, असा मुलगा शोधून सापडणार नव्हता.

त्यांनी हळूहळू मुलीला समजवायला सुरवात केली. श्रियाच्या आईने सगळं नीट विचारलं. आईच्या लक्षात आलं की चूक तिच्या सासूची आहे, अरुण ची नाही. मग सासूच्या नाक खुपसण्यामुळे या दोघांच्या संसारात का घाट पडावा?

आईने समजवलं, की सासूबाईंना समजून घे, त्यांचं बोलणं दुर्लक्ष कर...पण जे काही सहन केलं होतं ते फक्त तिला माहीत होतं. त्यामुळे तिने सासरी जायला साफ नकार दिला.

तिकडे तिच्या आजीचा आपल्या मुलीला, म्हणजेच श्रियाच्या आत्याला सारखा फोन सुरू असायचा. इकडे काय झालं, कसं झालं सगळी माहिती तिकडे पोहोचायची. मुलाच्या घरात काय सुरू आहे यात आजीला रस नसे, पण मुलीच्या घरी कोण आलं, कोण गेलं, जेवायला काय बनवलं याची एकूनेक माहिती आजीकडे असायची.

आजीचा कळवळा आपल्या मुलीकडे जास्त. सतत मुलीचे आणि आपल्या नातवाचे, म्हणजेच श्रियाच्या आतेभावाचे विचार डोक्यात सुरू. श्रियाची आत्या, तिला मनोमन असं वाटे की श्रियाला आपण सून बनवावं. मामेबहिणीशी लग्न करणं ही प्रथा आजही सुरूच आहे म्हणा. पण श्रिया आणि तिचा आतेभाऊ यांची बरोबरी होऊच शकत नव्हती. श्रिया सात्विक आणि शिकलेली मुलगी, याउलट तिचा आतेभाऊ कमी शिकलेला, नोकरी धंदा न करणारा आणि फक्त बापाच्या कमाईवर पैसे उधळणारा होता. श्रियाला असा कामचुकार मुलगा आवडेल तरी कसा?

आजीला त्याची फार काळजी होती. आजीच्या मते तिचा नातू हिरा होता. दिसायला देखणा, राजबिंडा, हुशार आहे असं आजी नेहमी म्हणायची. त्याच्या चुकांवर पांघरून घालायची. पण आजीला हेही माहीत होतं की त्याला कुणीही मुलगी देणार नाही. म्हणूनच आजीने श्रियाला त्याच्या गळ्यात मारायचं ठरवलं. कारण दुसरी मुलगी त्याला सहन करणार नाही, तिच्या घरचे असा जावई ठोकून काढतील, त्यापेक्षा आपापलं नात्यातलं असलं तर त्याच्या चुकांवर अजूनच पांघरून घालता येईल हे आजीला समजलं होतं.
****

🎭 Series Post

View all