Login

स्पर्शगंध भाग १

स्पर्शगंध भाग १
" इशिता, अगं किती त्या क्रीम्स आणि सिरम्स तोंडाला फासतेस ? हे बघ, सगळं केमिकल आहे यात ! थोड्या वेळाने तुझा चेहरा चकचकेल खरा, पण आतून त्वचा बिघडून जाईल ना ग पोरी ! "

मंदाकिनीबाईंनी बागेतून ओरडून सांगितलं.
इशिताने हातातला हाय-एंड ब्रँडेड सीरमचा बाटली टेबलावर आदळली आणि गॅलरीत येऊन म्हणाली,

" ओह प्लीज आई ! हे जगप्रसिद्ध ब्रँडचं सीरम आहे. लंडनमध्ये असताना मी हेच वापरायचे. आणि तुम्ही काय करताय तिथे खाली ? पुन्हा ती माती उकरत बसलात का ? माझे पाहुणे येणार आहेत थोड्या वेळात, प्लीज हात धुवून घ्या आधी."

मंदाकिनीबाईंनी आपल्या मातीने माखलेल्या हातांकडे पाहिलं आणि त्या मृदू हसल्या.

" अगं इशिता, ही माती नाहीये, हे सोनं आहे. आपल्या बागेतल्या या कडुलिंबाच्या आणि कोरफडीच्या पानात जे गुणधर्म आहेत ना, ते तुझ्या त्या लंडनच्या बाटलीत शोधून सुद्धा सापडणार नाहीत."

इशिताने वैतागून एक सुस्कारा सोडला. इशिता, एक कॉर्पोरेट कॉस्मेटोलॉजिस्ट आहे . तिने नुकताच आपल्या नोकरीचा राजीनामा दिला होता. मंदाकिनीबाई, एक साध्या राहणीच्या पण आयुर्वेदिक ज्ञानाचा खजिना असलेल्या सासूबाई. या दोघींच्या जगात एक मोठी दरी होती.

दोन तासांनंतर इशिताच्या मैत्रिणी घरी आल्या. गप्पागोष्टी रंगात आल्या होत्या, पण अचानक इशिताची खास मैत्रीण, स्नेहल, जोरात ओरडली.

"अगं इशिता, हे बघ माझ्या चेहऱ्याला काय झालंय ? खूप आग होतेय ! "

सगळ्यांनी पाहिलं तर स्नेहलचा चेहरा लाल झाला होता आणि त्यावर बारीक पुरळ येऊ लागले होते. स्नेहलने इशिताने सुचवलेलं एक नवीन महागडं फेशियल मास्क लावलं होतं. इशिता घाबरली.

" अरे देवा ! ही तर रिॲक्शन आलीय. थांब, मी डॉक्टरांना फोन करते."

इशिता फोन शोधत असतानाच मंदाकिनीबाई शांतपणे हॉलमध्ये आल्या. त्यांच्या हातात एक छोटी मातीची वाटी होती.

" इशिता, थांब. फोन नंतर कर. आधी हा लेप लाव तिच्या चेहऱ्यावर."

" आई, काहीही काय सुचवताय ? आधीच तिचा चेहरा बिघडलाय आणि तुम्ही तुमचं काहीतरी घरगुती लेप लावायला सांगताय ? काही इन्फेक्शन झालं तर ? " इशिताने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.
पण स्नेहलला आगीमुळे सहन होत नव्हतं. तिने स्वतःच हात पुढे केला.

" इशिता, प्लीज ! मला खूप त्रास होतोय. काकू , जे काही आहे ते लावा पटकन."

मंदाकिनीबाईंनी अगदी हळुवारपणे तो थंडगार, हिरव्या रंगाचा लेप स्नेहलच्या गालावर लावला. अवघ्या दोन मिनिटांत स्नेहलचा श्वास शांत झाला.

" ओह माय गॉड ! हे खूप थंड वाटतंय. आग पूर्णपणे थांबलीये."

अर्ध्या तासानंतर स्नेहलचा चेहरा पुन्हा पूर्ववत झाला होता. लालसरपणा गायब झाला होता आणि तिची त्वचा अधिक टवटवीत दिसत होती. इशिता सुन्न होऊन उभी होती. तिने स्वतः कॉस्मेटोलॉजी शिकली होती, पण तिला हे माहित नव्हतं की इतक्या जलद गतीने एखादा नैसर्गिक लेप न्यूट्रलायझर म्हणून काम करू शकतो.

पाहुणे गेल्यावर इशिता स्वयंपाकघरात गेली. मंदाकिनीबाई तिथे ओटा साफ करत होत्या.

" आई... ते काय होतं ?
त्यात काय काय घातलं होतं तुम्ही ? " इशिताने कुतूहलाने विचारलं.
मंदाकिनीबाईंनी हसून उत्तर दिलं,

" काही नाही ग ! थोडी ताजी कोरफड, चंदन, वाळा आणि आपल्या बागेतली माती... जी तुला मगाशी घाण वाटत होती."

इशिताने त्यांच्या हातातील ती वाटी पुन्हा एकदा निरखून पाहिली. तिला जाणवलं की, आपण ज्या ग्लो आणि स्किन हेल्थसाठी लंडनच्या लॅबमध्ये तासनतास घालवले होते, तो खजिना आपल्याच घरात, सासूबाईंच्या अनुभवात दडलेला आहे.

त्या रात्री इशिताला झोप लागली नाही. तिच्या डोक्यात एक बिझनेस आयडिया चक्रावून फिरत होती. तिने आपला लॅपटॉप उघडला आणि मार्केट रिसर्च करायला सुरुवात केली. जगाला आता ऑर्गेनिक हवं होतं, पण शुद्धतेची खात्री देणारं कोणी नव्हतं.
तिने विचार केला,

" माझं मार्केटिंग कौशल्य आणि आईंचं हे पारंपारिक ज्ञान... जर आम्ही एकत्र आलो तर ? "

सकाळी उठल्यावर इशिताने उत्साहाने मंदाकिनीबाईंना गाठलं.

" आई, मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. आपण एक बिझनेस सुरू करूया. आपण हे तुमचं उटणं आणि लेप जगभरात विकूया ! "
मंदाकिनीबाईंनी तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं.

"अगं, मला कुठे काय येतंय बिझनेस मधलं ? मी फक्त जुन्या पद्धती जाणते."

" आई, तीच तुमची ताकद आहे. आपण आपल्या ब्रँडचं नाव ठेवूया.स्पर्शगंध."

पण मंदाकिनीबाईंनी एक अट घातली, जिने इशिताला विचार करायला भाग पाडलं.

" इशिता, बिझनेस करायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव. माझी कला मी विकायला देईन, पण त्यात एक थेंब सुद्धा केमिकलचा असता कामा नये. आणि नफा मिळवण्यासाठी तू कधीही ग्राहकांशी खोटं बोलणार नाहीस. मान्य आहे तुला ? "

इशिताने त्यांचा हात हातात घेतला.