अरे! मोहन
ये! ये!! कसा आहेस?
मी बरा आहे जगदीश तु बोल तु कसा आहेस?
मी एकदम मजेत!
बस ना बस!
अग ! मोहन आलाय जरा चहा टाक!
हो करते! आतुन आवाज आला.
बोल मोहन काही विशेष?
जगदीश कस सांगु या लॉक डाऊन ने तर पार कंबरडेच मोडलय रे!
खरं आहे मोहन! पण करणार? सगळ्यांची परिस्थीती सारखीच आहे !
जगदीश! अरे एक काम होत.माझी सध्या फ़ार वाईट परिस्थीती आहे. गेले काही महिने गाडीचे हप्ते चुकलेत या महिन्यात हप्ता नाही भरला तर गाडी उचलून नेवू म्हणतात. म्हणुन मला वीस हजार रुपए पाहिजेत होते!
मोहन! उगाच काही कारण सांगत बसण्यापेक्षा तुला वाईट वाटलं तरी चालेल पण माझीही आर्थिक स्थिती फ़ार बिकट आहे.मला नाही जमणार मित्रा!
भाऊजी कसे आहात? घ्या चहा घ्या!
मी बरा आहे वहिनी!
चल! जगदीश निघतो!
अहो भाऊजी! जेवून जा!!
नाही वहिनी! पुन्हा कधीतरी!!
मोहन निराश मनाने जगदीशच्या घराबाहेर पडला. अडी- अडचणीला नेहमी मदत करणारा जगदीश इतका सरळ नकार देतो यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.
काय करु आणि काय नाही. मोहनला काही सुचत नव्हते. गाडी नेली तर आपली गावात काय इज्जत राहील?.. आणि पोटा पाण्याच काय?
मोहन विचार करत होता. सगळे पर्याय तपासुन पाहत होता. तसं त्याने आधी इतर पर्यायांचा विचार केला नव्हता. कारण जगदीशवर त्याचा पुर्ण विश्वास होता. आता त्यानेच स्पष्ट नकार दिल्याने इतर पर्याय शोधणे गरजेचे होते.
तरी अजुन त्याच्या कडे पंधरा दिवस होते. या पंधरा दिवसांत आपण काहीतरी बंदोबस्त नक्की करु असा त्याला विश्वास होता.
अरे रामदास! जरा काम होत तूझ्या कडे.मला जरा दहा हजार उसने हवे होते!!
मोहन! तुला तर माहितच आहे सध्या काय परिस्थीती आहे. तरी पण तु माझा मित्र आहेस म्हणून चार-पाच हजार करु शकतो. बोल कधी पाहीजेत?
दोनतीन दिवसांनी मिळाले तर बरं होईल!
दादा कसा आहेस?
मी बरा आहे मोहन! तु?
दादा मी बरा आहे!
दादा मला जरा पाचेक हजार रुपए पाहीजे होते!
का रे! काय झाल?
दादा हप्ते वाले सांगतात या महिन्यात हप्ता भरला नाही तर गाडी उचलू!
मोहन! कीतीचा हप्ता आहे?
दादा! सगळे धरून वीस हजार लागतील!
असं! मी जास्त नाही पण पाच देईन! चालेल ना?
हो दादा! चालेल मी बाकीचे करतो कुठेतरी!!
मोहनने हप्त्या साठी अनेक मित्र, नातेवाईक यांच्या कडे त्यांच्या एपती नुसार साकडे घातले. त्यांतील बहुतेकांनी आश्वासन दिले.तरी आकडा जेमतेम पंधरा सोळा पर्यत जात होता. आता बाकीचे चारपाच हजार कुठुन आणायचे असा विचार करत असताना त्याला त्याचा मित्र सनीची आठवण झाली.जो त्यांच्या विभागाचा जि. प. सदस्य होता.
अरे! मन्या ये ये!!
सनी मोहनला लहानपणापासून मन्या अशीच हाक मारी.
साहेब! एक काम होत.
अरे मन्या! बिनधास्त बोल!
मन्या! पैसे पाहिजेत ना?
किती पाहिजेत तुला बोल?
साहेब! माझ्या पिकप जीपचे हप्ते भरायचे आहेत.मला वीस हजार हवेत!
दहा जणांकडे हात पसरणे पेक्षा सनी कडेच मागू ना सगळे पैसे असा विचार मोहनने केला.
वीस हजार? अरे बस का मन्या तूझ्या साठी काही पण. तु जर पन्नास संगितले असते तरी दिले असते.
बोल कधी पाहीजेत पैसे?
साहेब! दोन तारखेला हप्ता भरायचा आहे. या महिन्याच्या तीस तारखे पर्यंत मिळाले तर बरं होईल साहेब!
मन्या! अरे साहेब साहेब काय? आपण मित्र ना? मग? मला नावाने हाक मारत जा!
असं कस साहेब? मान आहे तुमचा तो!
बरं! बरं!! माझ ऐका रस्त्याचे बिल आहे पेंडिंग या महिन्याच्या पंचवीस सव्वीस तारखेपर्यत होईल. तुला तीसच्या आत पैसे देतो!
सनीच्या या बोलण्याने मोहनला खुपच आनंद झाला. आता त्याची मोठी काळजी मिटली होती.
अहो! मोहन भाऊजी किती चांगले आहेत. आपल्याला नेहमीच अडी अडचणीत मदत करतात. आज त्यांना तुम्ही सरळ नकार दिलात कस वाटल असेल त्यांना?
उमा! अगदी बरोबर आहे तूझ पण मी तरी काय करु सांग ना? सध्या आपण देखिल किती कर्जात आहोत! माझी दहा बारा लाखाची बिल काम होवून सुद्दा नुसतीच अडकलीत. ही सगळी कारण कुठे सांगत बसु मोहनला!
आणि त्याला दोन तारखेला हप्ता भरायचा आहे.तोपर्यंत एखाद बिल निघाल तर देवू त्याला.जगदीश उमाला समजावत म्हणला.
( तारीख सत्तावीस वार बुधवार जगदीशने मोहनला फोन केला.)
हॅलो ! मोहन कुठे आहेस?
मी घरी आहे जगदीश!
अच्छा! तु ते हप्ते भरण्यासाठी पैश्याचे सांगत होतास त्याचा झाला का बंदोबस्त?
हो! हो!! झाला.
कोणाकडून घेतले?
जावू दे ना जगदीश! तुला काय करायचे? तुला संगितले तर तु नकार दिलास .इतके बोलून मोहनने फोन कट केला.
उमा! अग आत्ताच मोहनला फोन केला तर माझे ऐकण्या आधीच त्याने कट केला.
अहो! त्या दिवशी तुम्ही पैसे द्यायला नकार दिला म्हणून रागवले असतील.
अहो! तुम्ही परत एकदा भाऊजीनां फोन!!
बर ठीक आहे!
हॅलो ! मोहन!!
हा! जगदीश बोल!!
मोहन! फोन कट केलास काय झाल?
जगदीश! माझा झालाय बंदोबस्त!!
ठीक आहे! पण तुला पैसे कोणी दिले ?
जगदीश! माझा लहानपणीचा मित्र संजय पाटील (सनी) त्याच्या कडे मागितले मी!!
मोहन! सनीने तुला पैसे दिले की देणार आहे?
तीस तारखेपर्यंत देणार आहे!
ठीक आहे मोहन! काय असेल तर फोन कर!!
(तारीख तीस वार शनिवार)
हॅलो ! साहेब!! मोहन बोलतोय!
अरे! बोल बोल मन्या! मला आठवण आहे. आज तीस तारीख तुला वीस हजार रुपए द्यायचे आहेत ते! मी संध्याकाळी फोन करतो तुला!
सनीला इतक्या कामाच्या व्यापात आपले पैश्यांच काम लक्षात आहे याचे मोहनला समाधान वाटले. आज संध्याकाळी पैसे मिळणार म्हणून तो निर्धास्त झाला.
हॅलो! साहेब! मोहन बोलतोय!
अरे मन्या बोल! बोल!!
साहेब ! ते आपल्या कामाच संध्याकाळी म्हणाला होता?
मन्या! अरे! मी जरा अर्जंट मीटिंगसाठी बांधकाम सभापती साहेबांसोबत बाहेर आहे. तूझ काम मी उद्या आलो की करतो.
(तारीख एक)
हॅलो साहेब! मी मोहन बोलतोय!
अरे मन्या! तूझे दोन मिसकॉल पाहिले. पण काय करू रात्री मीटिंगला उशीर झाला. माझीही दोनचार काम सभापती साहेबांकडे रखडलेली होती.म्हणून त्यांना जेवायला हॉटेलात घेवून गेलो. मग काय रात्रीचे दोन वाजले. आत्ता उठलो बघ! तूझे मिसकॉल पहिले तसा तुलाच पहिला फोन केला. तु एक काम कर घरी ये! तो पर्यंत मी आंघोळ करतो मग बेंकेत जावू. तु ये लवकर!
मोहनच्या जीवात जीव आला. त्याने लगेचच कपडे केले व घाई घाईत घरा बाहेर पडणार इतक्यात त्याचा फोन वाजला.
हॅलो ! अरे मन्या! मला आठवणच नव्हती की आज रविवार आहे. तु एक काम कर उद्या सकाळी अकरा-साडेअकराला ये मग जावू बेंकेत!
(तारीख दोन वार सोमवार वेळ सकाळचे दहा वा.)
हॅलो ! मोहन माळी का?
हो! बोलतोय!!
मी फायनान्स कंपनी कडुन बोलतोय. आज तुम्ही दुपारी दोन वाजेपर्यंत थकीत हप्ते भरले नाही तर नाईलाजाने तुमची गाडी जप्त करावी लागेल. तुमची एकूण थकीत रक्कम आहे वीस हजार दोनशे पन्नास! धन्यवाद.
कंपनीचा संदेश ऐकून मोहनला दरदरून घाम फुटला. कारण या आधी त्याने सनीला सात-आठ वेळा फोन केला होता पण सनीचा फोन बंद दाखवत होता.
काय करु आणि काय नाही त्याला काहीच सुचत नव्हते. कारण जे मित्र, नातेवाईक थोडेफार देणार होते त्यांना सनी पैसे देणार आहे म्हणून नाही संगितले होते.
सनी डोक्याला हात लावून बसला.
काय झाल हे?आता गाडी जाणार मग आपले कस होईल? सनीने आपल्याला फसवले. त्याच्या भरवशावर राहिलो म्हणून ही वेळ आली.
त्या पेक्षा जगदीश बरा त्याने स्पष्ट नकार दिल्या मुळे मला इतरांकडुन पंधरा सोळा हजार रुपए मिळत होते. आणि त्यात अजुन चारपाच हजार करून वीस हजार केले असते. मात्र आपण त्या राजकारणी सनी वर विश्वास ठेवला आणि ही वेळ आली आपल्यावर मोहन स्वतःलाच दोष देत होता.
तरी मोहनने शेवटचा उपाय म्हणून सनीला पुन्हा फोन लावला. आताही सनीचा फोन बंदच दाखवत होता. मोहनची शेवटची आशाही धुळीस मिळाली.
आता तर बदनामी आणि भविष्याची चिंता त्याला सतवू लागली. डोक्यात विचारांचे काहूर माजले. आत्महत्या करु की काय? असा विचार देखिल त्याच्या मनात येवुन गेला. इतकी त्याच्या मनाची वाईट अवस्था झाली.
इतक्यात त्याला एक हाक ऐकू आली.
कुणी आहे का घरात?
अरे! उमा वहिनी तुम्ही? जगदीश पण आलाय?
नाही भाऊजी! ते आमदार साहेबांसोबत तालुक्याला गेलेत. त्यांच्या बिलाच्या कामासाठी.
तुम्ही बसा उमा वहिनी! मुलं आणि ही जरा शेतावर गेलीय. ते कंपनी वाले येणार आहेत ना म्हणून मी घरी थांबलोय.
भाऊजी! तुम्ही फ़ार घाबरल्यासारखे वाटता काय झाल?
काय सांगु उमा वहिनी!
आता दोन वाजता कंपनीवाले येणार आहेत. आणि आज जर त्यांना पैसे मिळाले नाही तर ते गाडी उचलून नेतील. मला आपले जि. प. सदस्य साहेब पैसे देणार आहेत. त्यांना सकाळ पासुन फोन लावतोय पण त्यांचा फोनच बंद येतोय. म्हणून मला भीती वाटतेय.
बर वहिनी! आज इकडे तुम्ही अचानक?
हो! यांनीच पाठवलय त्यांचे कधीपासून रखडलेले एक बिल निघाल म्हणून तुमच्या व मुलांसाठी मिठाई घेवून आलेय!
उमा वाहिनीचे ते बोलणे म्हणजे आपल्या जखमेवर मीठ चोळल्या सारखे मोहनला वाटले.
म्हणून जगदीश त्या दिवशी विचारत होता तर की, पैश्यांची व्यवस्था झाली की नाही?
आता मात्र मोहनला मेल्याहून मेल्या सारखे वाटले. तेंव्हाच जर आपण जगदीशला संगितले असते तर आता ही वेळ आली नसती आपल्यावर. पण सनी पैसे देणार म्हणून माझाही अहंकार जागृत झाला हो ना! मोहन मनातल्या मनात स्वतःला दूषण देत होता.
भाऊजी! मी जरा घाईत आहे! ही मिठाई घ्या.यांनी खास तुमच्यासाठी दिलीय.
भाऊजी! मिठाई जरा चाखून तर पहा!
उमा वहिनीच्या आग्रहामुळे मोहनने मिठाईचा बॉक्स हातात घेवून हळुच उघडला.त्यात मिठाई व एक खाकी लिफ़ाफ़ा होता. त्याने तो उघडला तर त्यांत पैसे होते .मोहनने ते मोजले तर पंचवीस हजार रुपए होते.
वहिनी! हे काय?
भाऊजी! मिठाई आहे ती!!
तुमच्या मित्रानं खास तुमच्यासाठी दिलेली मिठाई!
त्यांना माहिती होत आज तुमचा हप्ता भरायचा आहे. आता वीस हजाराचा हप्ता भरा आणि पाच हजार तुम्हांला खर्चाला ठेवा.
उमा वहिनींच्या या बोलण्याने मोहनच्या डोळ्यांत अश्रू आले.
पण वहिनी! मला एक समजत नाही. जगदीशला कस माहिती की, मला पैसे मिळाले नाही?
जाऊ दया ना भाऊजी! तुम्हांला पैसे मिळाले तुम्ही हप्ता भरा!!
नाही वहिनी तुम्ही सांगाच!
भाऊजी! जेंव्हा तुम्ही फोनवर सनी साहेबांचे नाव संगितले तेव्हाच आमचे हे समजले की, तुम्हांला पैसे मिळणार नाहीत. कारण त्या सनी साहेबांनी अशीच आश्वासने देवून किती तरी लोकांना फसवले आहे .आमचे यांचेच जवळ जवळ तीन लाख घ्यायचे आहेत त्यांच्या कडून.
पैसे तर घेतले आणि साध मोरीच देखिल काम दिल नाही. परत पैसे मागितले तर नुसती खोटी आश्वासन. त्यामुळे तुम्हांला सनी कडुन पैसे मिळणार नाही याची आमच्या यांना खात्री होती. नशिबाने शुक्रवारी एक बिल निघाले. म्हणून त्यांनी लगेचच तुम्हांला फोन लावला.
अरे देवा! हे काय झाल माझ्या हातून? सनी पैसे देणार म्हणून मी जगदीशला मोठ्या अहंकारात संगितले आणि फोन कट केला. कस वाटले असेल जगदीशला?
भाऊजी! तुम्ही काळजी करु नका त्यांना अजिबात वाईट वाटलेले नाही. कारण परिस्थीतीच अशी होती की,त्यांनी स्पष्ट नकार दिल्यामुळे तुम्हांला वाईट वाटण साहजिक होत.
मोहनला समजले जगदीश किती चांगला आहे. त्याच्या कडे पैसे नव्हते म्हणून त्याने नकार दिला. निधान खोट आश्वासन तरी दिल नाही.
आणि एक सनी ज्याने शेवट पर्यंत मला आश्वासनात खेळवत ठेवले. व शेवटी विश्वासघात केला.
आज मोहनला जगदीशच्या नकाराने चांगलाच धडा मिळाला.जमत नसेल तर स्पष्ट नकार दया. उगाचच समोरच्याला आश्वासनात गुंतवून ठेवू नका.
आज मोहनला जगदीशच्या नकाराने चांगलाच धडा मिळाला.जमत नसेल तर स्पष्ट नकार दया. उगाचच समोरच्याला आश्वासनात गुंतवून ठेवू नका.
चंद्रकांत घाटाळ
7350131480
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा