Login

सप्तपदी एक सुरमयी प्रवास..भाग १ (मराठी कथा: Marathi katha)

ही कथा एका विधिषा नावाच्या मुलीची.. तिच्या सप्तपदीच्या सुरमयी प्रवासाची..

सप्तपदी.. एक सुरमयी प्रवास मराठी कथा: Marathi Katha 

“जिथे सागरा धरणी मिळते

तिथे तुझी मी वाट पाहते

वेचित वाळूत शंख-शिंपले

रम्य बाल्य ते जिथे खेळले

खेळाचा उल्हास रंगात येउनी 

धुंदीत यौवन जिथे डोलते

तिथे तुझी मी वाट पाहते

जिथे सागरा धरणी मिळते

तिथे तुझी मी वाट पाहते..”


 

रेडीओवर  विधिषाचं आवडतं जुनं गाणं सुरू होतं. त्या गाण्याच्या तालात विधिषाही गुणगुणत होती. स्वयंपाकघरात भाजीला फोडणी घालता घालता तिची ही गुणगुण नेहमीचीच. ते गाणं सुरू झालं की, विधिषा अगदी जुन्या आठवणीत रमून जायची. जुहूच्या समुद्र किनाऱ्यावर झालेल्या भेटीगाठी डोळ्यांसमोर तरळू लागायच्या. 

“किती मोहरलेले दिवस होते ते!”

विधिषा मनातल्या मनात बडबडली आणि चेहऱ्यावर मिश्कील हसू आलं.  इतक्यात बाहेरच्या खोलीतून सासूबाईंनी तिला आवाज दिला,

“विधी, जरा इकडे ये ग.. माझी निळ्या रंगांची पैठणी कुठे ठेवली आहेस? आज रात्री मला ती नेसायची आहे.” 

“आले आई, एक मिनटं हं” 

विधिषाने भाजीच्या कढईवर झाकण ठेवलं. गॅसच्या मंद आचेवर भाजी शिजत ठेवून ती पटकन तिच्या खोलीत गेली. तिच्या कपाटातून एक पिशवी बाहेर काढली आणि ती आईच्या खोलीत आली. सासूबाईंच्या कपाटातून निळ्या रंगाची पैठणी त्यांच्याकडे देत हसून म्हणाली.

“ही काय आई, इथेच तर होती. आणि ना आई, त्या साडीवर तुम्ही माझे हे दागिने घाला. हे पहा! हा तनमनी, राणीहार ठुशी,सोन्याच्या पाटल्या, मोत्याची नथ तुम्हाला खूप शोभून दिसेल. आणि हो आई, मी तुमच्या आवडीचे मोगऱ्यांच्या फुलांचे गजरेही आणलेत. फ्रीजमध्ये ठेवले आहेत. रात्री आठवणीने माळा बरं. छान दिसेल तुम्हाला!, आज काय बाबा मज्जा आहे! आमच्या आई खूप छान दिसणार! आमच्या बाबांचं काही खरं नाही!” 

विधिषा पिशवीतून तिचे एक एक दागिने बाहेर काढून आपल्या सासूबाईंना, शांताकाकूंना देत मिश्कीलपणे हसून म्हणाली.

“चल ग, तुझं आपलं काहीतरीच! हे काय वय आहे का आता नटण्यामुरडण्याचं! आता तुमचे दिवस छान दिसण्याचे, फुलण्याचे.!” 

शांताकाकू मोहरून बोलल्या. 

“नाही हं आई, आज तुम्ही हे सगळं करणार आहात. मी तुम्हाला स्वतः माझ्या हाताने सजवणार आहे, नटवणार आहे.  मेहंदी सुद्धा काढणार आहे मी तुमच्या हातावर. तुम्ही अजिबात नाही म्हणायचं नाही.” 

विधिषा शांताकाकूंना लटक्या रागाने म्हणाली.

“हो बाई, तुला हवं ते कर. मी नाही अडवणार तुला.”

हसून शांताकाकूनी विधिषाच्या बोलण्याला होकार दिला. इतक्यात विधिषाला गॅसवर शिजत ठेवलेल्या भाजीची आठवण झाली आणि ती पटकन स्वयंपाकघराच्या दिशेने पळाली. विधिषाची ती लगबग बघून शांताकाकूंना हसू आलं. 

आज संध्याकाळी विधिषाच्या सासूसासऱ्यांच्या म्हणजेच विनायकराव आणि शांताबाईंच्या  लग्नाच्या चाळिसाव्या वाढदिवसाचा कार्यक्रम होता. मुलांनी पुन्हा एकदा आपल्या आईबाबांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं. लग्नसोहळ्याची जय्यद तयारी सुरू होती. कुटुंबातल्या जवळच्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना आमंत्रित केलं होतं. बंगल्याच्या टेरिसवर कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मधुर संगीत सुरू होतं. टेरिसच्या एका बाजूला बुफे जेवणाची सोय केली होती. अर्णव शांताकाकूंचा मोठा मुलगा आणि विधिषाचा नवरा पाहुण्यांची सोय पाहत होता. छोटा मुलगा अमेय डेकोरेशन करणाऱ्या मुलांना सूचना देत होता.  शांताकाकूंच्या दोन्ही मुली, अक्षरा आणि अर्पिता आपल्या सासरच्या मंडळींसमवेत हजर होत्या. एकीकडे मधुर सुगम संगीताचा कार्यक्रम सुरू होता. विधिषा शांताकाकूंना तयार करत होती. निळ्या रंगांची पैठणी शांताकाकूंच्या अंगावर खुलून दिसत होती. काळ्या केसात रुपेरी कडा डोकावू लागली होती. काळ्या पांढऱ्या केसांचा छोटासा अंबाडा घालून त्यावर विधिषाने मोगऱ्याचा गजरा चढवला. भांगेत लाल कुंकू रेखलं. हलकासा मेकअप केला. नाकात नथ, गळ्यात ठुशी, मंगळसूत्र, राणीहार घातला. कानात सोन्याची कर्णफुले, हातात सोन्याच्या पाटल्या घातल्या. आणि शांताकाकू तयार झाल्या. आपल्या हातांनी आपल्या सासूला सजवताना विधिषाला मनापासून आनंद होत होता. विधिषानेही मरून रंगांची शिफॉनची साडी नेसली होती. हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या आणि आणि गळ्यात  मोत्यांचा नेकलेस, मंगळसूत्र घातलं. काळ्याभोर केसांचा छान अंबाडा घालून तिने त्यावर मोगऱ्याचा गजरा माळला होता. डोळ्यांत काजळ, ओठांवर गुलाबी रंगांची लिपस्टिकची कांडी फिरवली. अर्णव सहज तिच्या खोलीत आला आणि तिला पाहून जागीच थिजला. 

“हाय,! विधी, कसली गोड दिसतेय यार!”

असं म्हणत अर्णवने तिला जवळ ओढून कवेत घेतलं. खरंच किती गोड दिसत होती.!! लग्नाला पंधरा वर्षे होऊनही तिच्या सौन्दर्यात तिळमात्रही फरक पडला नव्हता. ती आजही तितकीच किंबहुना अजूनच छान दिसत होती. 

“चल, तुझं आपलं काहीतरीच! दोन मुलांचा बाबा झाला आहेस पण अजूनही तुझा हा बालिशपणा काही जात नाही. वेळ काळ काही आहे की नाही! घरात पाहुण्यांची इतकी वर्दळ असताना तुला काय सुचतंय बघ! सोड ना, कोणीतरी पाहिल. माझा मेकअप खराब होईल ना! तू जा बरं बाबांना घेऊन ये वर. मी आलेच आईना घेऊन!”

विधिषाने लडिवाळपणे अर्णवला खोलीच्या बाहेर जायला सांगितलं. 

“थांब तुला बघतोच रात्री” 

असं म्हणत मिश्कीलपणे हसत अर्णव खोलीच्या बाहेर पडला. विधिषा लाजून गालातल्या गालात हसली. तिच्या पुढच्या कामाला लागली. सासूबाईंच्या खोलीत जाऊन त्यांना वर टेरिसवर घेऊन आली. एकीकडे शांताकाकूंना विधिषा तयार करत होती तर दुसरीकडे अमेय आपल्या वडिलांना, विनायकरावांना तयार करत होता. अर्णवने त्याच्या बाबांसाठी खास काळ्या रंगाचा कोट शिवून घेतला होता. त्याने विनायकरावांना तयार केलं आणि तोही बाबांना घेऊन टेरिसवर आला. दोघांनाही मोठया खुर्चीत बसवलं. 

विधिषाने शांताकाकूंना हळदीकुंकू लावलं.  पाच सवाष्ण बायकांसमवेत चाळीस कणकेच्या दिव्यांनी आईबाबांचं औक्षण केलं. आणि मग गुरुजींनी मंत्र म्हणत लग्नाच्या विधीला सुरुवात केली. या वयातही शांताकाकूंच्या चेहऱ्यावर लाजेची लाली उमटली होती. आज पुन्हा एकदा दोघेही लग्नाच्या बोहल्यावर चढले होते. विनायकराव आणि शांताबाई यांनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पहार घातले. विनायकरावानी शांताकाकूंच्या भांगेत कुंकू लावलं. सप्तपदीचा कार्यक्रम झाला. आणि दोघे पुन्हा एकदा लग्नाच्या रेशीमबंधनात गुंफून गेले. लग्नसोहळा पार पडला. सर्वांनी अक्षता टाकून आपले शुभ आशिर्वाद, भरभरून शुभेच्छा दिल्या. लग्नाच्या सर्व विधी आटोपल्यानंतर सर्वांनी सुग्रास पंचपक्वांनांचा आस्वाद घेतला. आणि पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसले. 

विधिषाने तिच्या चिमुरड्यांना, मुलांना जेवण भरवलं. मग अर्णव, अमेय, अक्षरा, अर्पिता या सर्वांनी आपल्या आईबाबांसोबत आपापली जेवणं आटोपली. वेदिका आणि वेदांशु शांताकाकूंच्या, आपल्या आजीच्या कुशीत विसावली होती. इकडेतिकडे बागडून छोटे कंपनी दमली होती. विधिषाही मुलांना आजीच्या मांडीवर पाहून निश्चिंत झाली. पाहुण्यांत जमलेल्या काही जणांनी व्यासपीठावर येऊन विनायकराव आणि शांताकाकूंबद्दल दोन शब्द बोलून आपलं मनोगत व्यक्त केलं. सर्वांनी त्यांच्यावर भरभरून शुभेच्छांचा वर्षांव केला. त्यानंतर विनायकराव आपल्या जागेवरून उठून उभे राहिले. व्यासपीठावर येऊन त्यांनी बोलायला सुरुवात केली,

“नमस्कार मित्रांनो, आज आमच्या मुलांनी पुन्हा एकदा आमच्या लग्नसोहळ्याचा घाट घातला. इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला. पुन्हा एकदा मला लग्नाच्या बेड्या ठोकल्या” 

विनायकरावांच्या या वाक्यावर जमलेल्या पाहुण्यांत हशा पिकल्या. कोणीतरी मोठ्याने ओरडलं, 

“सेकंड इंनिंग आजोबा, खूप अभिनंदन या बेडयांसाठी” 

विनायकरावांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. होकारार्थी मान डोलावून त्यांनी त्या शुभेच्छांचा स्वीकार केला. आणि ते पुढे बोलू लागले,

“खूप आभार मुलांनो, जीवनांच्या प्रत्येक वळणावर शांतीने मला साथ दिली. कठीण परिस्थितीतही माझी साथ कधीच नाही सोडली. खरंतर आयुष्याच्या या टप्प्यावर काय गमावलं, काय कमावलं? नाही सांगता येणार मला. गमावण्याची गणतीच होणार नाही  पण मी  माणुसकी कमावली. माझी गुणी मुलं हीच माझी आयुष्यभराची पुंजी, हीच माझी संपत्ती. माझ्या मुलांनी आम्हा दोघांनाही भरभरून प्रेम दिलं.. खरंच आम्ही दोघे खूप नशीबवान आहोत की, आम्हांला इतकी गुणी मुलं आहेत. त्यांनी स्वबळावर शून्यातून हे सारं वैभव निर्माण केलं. आमच्या घरात विधिषा सून बनून आली आणि घराला घरपण आलं. तिचा प्रवासही इतका सोप्पा नव्हता बरं. पण या घरात कधी सामावून गेली कळलंही नाही. आमची सून आमची मुलगी झाली. आज तिच्याशिवाय आमचं पानही हलत नाही. आमची दोन नातवंडं म्हणजे जणू ‘दुधावरची साय’ त्यांनी आमच्यातलं मूल कायम जिवंत ठेवलं. सगळं भरून पावलो आम्ही. काय हवं असतं ओ आयुष्यात..! याहून वेगळं सुख म्हणजे तरी काय असतं! आमच्या विधिषाने घराचं नंदनवन केलं. जगणं समृद्ध केलं. त्या हलाकीच्या परिस्थितीतही ती सोबत होती. अजूनही आहे. तुम्ही सर्वजण या सोहळ्याला आलात. प्रेम दिलंत, आशीर्वाद दिलेत मी तुमचा खूप आभारी आहे. असाच स्नेह कायम असू देत. धन्यवाद”

विनायकराव क्षणभर थांबले. गळ्यात दाटून आलेला उमाळा आवरला. अर्णवने बाबांचा हात धरून खुर्चीत बसवलं. विनायकरावांनी आपल्या सुनेकडे, विधिषाकडे पाहिलं. तिला बोलण्याची खूण केली. तिच्या डोळ्यांतही पाणी आलं. सासऱ्यांच्या शब्दांचा आदर राखत विधिषा दोन शब्द व्यक्त करण्यासाठी उभी राहिली. विधिषाने बोलायला सुरुवात केली.

“गुड एव्हनिंग फ्रेंड्स, आज आमच्या आईबाबांच्या लग्नाचा चाळीसावा वाढदिवस. चार दशकांचा प्रवास. खूप साऱ्या अनुभवांची शिदोरी. तुम्ही सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आमच्या आईबाबांना भरभरून शुभेच्छा दिल्यात. खूप छान वाटलं. मित्रांनो, पंधरा वर्षांपूर्वी माप ओलांडून मी या घरात प्रवेश केला. ‘विधिषा जाधवांची मी विधिषा नाईक’ झाले. माझ्या सासूसासऱ्यांनी मला मुलीच्या मायेने सांभाळ केला. आईंनी कायम साथ दिली.  मी आज जे काही आहे ते फक्त आमच्या आईबाबांमूळे.. हो, आमचे बाबा बरोबर म्हणाले. सप्तपदीचा तो प्रवास खरंच सोप्पा नव्हता. आज त्या विधिषाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तिच्या या प्रवासात खंबीरपणे उभे राहुन तिला साथ देणाऱ्या सासूसासऱ्यांची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे.”

विधिषा क्षणभर थांबली. अर्णवकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकला. आणि पुढे बोलू लागली. 

कोण होती ही विधिषा? काय होता हा सप्तपदीचा प्रवास? पाहूया कथेच्या पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे.

0

🎭 Series Post

View all