Login

सप्तपदी एक सुरमयी प्रवास..भाग ३ (मराठी कथा: Marathi katha)

ही एक अनोखी कौटुंबिक कथा एका विधिषाची तिच्या सप्तपदीच्या सुरमयी प्रवासाची..

सप्तपदी.. एक सुरमयी प्रवास मराठी कथा: Marathi Katha भाग ३

पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, विधिषा आपल्या भूतकाळातल्या आठवणीत रमली होती. विधिषा आणि अर्णव दोघे एकाच परिसरात राहत होते. दोन्ही घरचे वातावरण पूर्णपणे भिन्न होते. अर्णवची आर्थिक परिस्थिती बेताची तर विधिषा श्रीमंतीत वाढलेली एकुलती एक मुलगी. अर्णवच्या बहिणीचं लग्न जुळवण्यासाठी तिचे काका तिला सांगलीला घेऊन गेले. आता पुढे.. 

भाग ३

अक्षरा आपल्या काकांसोबत सांगलीला आली. तिला पाहून मावशीला खूप आनंद झाला. ताई घरी आली म्हणून  मावस भावंडंही खुश झाली होती. अक्षरा मावशीला घरकामात मदत करायची. लहान भावंडांचा अभ्यास घ्यायची.  तिलाही थोडा निवांत वेळ मिळाला. रोजच्या बाबांच्या कटकटीतून सुटका मिळाली होती. काका आणि मावशीची अक्षरासाठी वरसंशोधन मोहीम सुरूच होती. काही दिवसांतच अक्षरासाठी एक चांगलं स्थळ सांगून आलं. मुलगा बीएससी(केमिस्ट्री) होता. मिरजेला एका खाजगी कंपनीत नोकरीला. वडील रिटायर्ड आर्मी ऑफिसर. एकत्र कुटुंब. काकांना स्थळ आवडलं होतं. काकांनी मुलगी पाहण्याचा कार्यक्रम त्यांच्या घरीच उरकून टाकला. मुलाकडच्या मंडळीना अक्षरा पसंत पडली.  त्यांनी होकार कळवला. बैठक बसली. साखरपुडा, लग्नाचा अर्धा खर्च वाटून घेण्याचं ठरलं. अक्षराच्या वडिलांच्या बजेट मध्ये लग्न बसवलं. 

ही आनंदाची बातमी सांगण्यासाठी काकांनी अक्षराच्या आई वडिलांना फोन केला. त्यांना ही बातमी सांगितली. यावर तिचे वडील त्यांना म्हणाले,

“मूलाकडच्या लोकांना अक्षरा पसंत पडली हेच खूप आहे तुम्ही लग्नाची तारीख ठरवून टाका. माझ्या धाकट्या मुलीला,अर्पिताला माझ्या बहिणीच्या मुलाला द्यायचं आहे. आधीच ठरलं होतं. दोघींची लग्न एकाच मांडवात उरकून टाकू. खर्चही वाचेल” 

अर्णवच्या  वडिलांनी दोन्ही लग्नाचा खर्च कमी करण्यासाठी केलेलं नियोजन काकांनाही पटलं. त्यांनीही लग्न ठरवून टाकलं. १५ मे लग्नाची तारीख काढण्यात आली आणि एकदम साध्या पद्धतीने सोलापूरला गावी दारापुढे मांडव टाकून दोघी बहिणींची लग्नं उरकण्यात आली. मुलींची लग्नात ना हौस ना मौज.! डोक्यावरचा भार कमी झाल्यासारखं तिच्या वडीलांनी सुटकेचा निःश्वास सोडला. काही दिवसांनी अर्णवच्या काकांना त्यांच्या कंपनीकडून राहण्यासाठी घर मिळालं आणि मग  ते दोघे नवरा बायको आपल्या नवीन घरी निघून गेले. आता घरात अर्णवचे आईवडील, अर्णव आणि अमेय चौघेच जण राहत होते. 

ऋतुचक्र वेगाने फिरत होते. अक्षराच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती. तिच्या पोटी एक गोड मुलाने जन्म घेतला होता. अक्षराने आवडीने तिच्या मुलाचं ‘सार्थक’ नाव ठेवलं. अक्षराचा  सुखी संसार सुरू झाला होता. तिच्या धाकट्या बहिणीला अजून काही मुलबाळ नव्हतं. तरीही दोघी बहिणी आपपल्या सासरी सुखाने नांदत होत्या.

विधिषा आता कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती. आणि अर्णव इंजिनिअरिंगच्या फायनल वर्षाला. गेली वर्षभर येता जाता फक्त  एकमेकांना पाहत होते. विधिषाला अर्णवचा कष्टाळू स्वभाव आवडू लागला होता. दिसायला रंगाने सावळा असला तरी अर्णवचा स्वभाव खूप शांत, प्रेमळ होता. दोन्ही बहिणींची लग्न झाल्यानंतर अर्णव आईला घरकामात मदत करत होता. आईची काळजी घेत होता. ह्याच गोष्टींमूळे विधिषाच्या मनात अर्णवविषयी जिव्हाळा निर्माण होऊ लागला. प्रेमांकूर रुजू लागला होता. नवी पालवी फुटू लागली होती. 

अर्णवलाही विधिषा आवडू लागली होती. तिचा शान्त, लाघवी स्वभाव त्याला भुरळ घालत होता. विधिषा दिसायला सुंदर, गव्हाळ वर्ण, नाकी डोळी नीटस.. तिचे ते लांबसडक काळेभोर केस, नाजूक जिवणी, पाणीदार डोळे अर्णवला मोहित करत होते. तिच्या सारखी सुसंस्कारी मुलगी आयुष्यभराचा जोडीदार म्हणून अर्णवला हवी होती. त्याच्या मनात विधिषाच्या विचारांनी घर केलं होतं. ध्यानी मनी, स्वप्नी तिचाच वावर होता.  जळी, स्थळी,काष्टी पाषाणी फक्त त्याला विधिषा दिसत होती. विधिषा दारासमोर खूप सुंदर सुंदर रांगोळ्या काढायची. सुरेख रंग भरायची. अर्णव तिने काढलेल्या रांगोळ्यांकडे एकटक पाहत बसायचा. रांगोळ्यातली रंगसंगती खूप सुंदर असायची. विधिषा आपल्याही आयुष्यात असेच सुरेख रंग भरून आपलं आयुष्यही रंगीत बनवेल. अशी जणू त्याला खात्रीच वाटू लागली होती. त्याच्या मनाने कधीच विधिषाला जीवनसंगिनी म्हणून निवडलं होतं.पण विधिषाला हे सारं सांगण्याची त्याची हिंमत होत नव्हती. 

विधिषाचं कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं. वार्षिक परीक्षा अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली होती. त्यामुळे विधिषाने आपलं पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. घरापासून थोड्या अंतरावर एक वाचनालय होतं. रोज संध्याकाळी विधिषा वाचनालयात जाऊन अभ्यास करत होती. रोज संध्याकाळी तिची अन अर्णवची तिथेच वाचनालयात गाठ पडायची. रोज तो विधिषाशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. पण धीर होत नव्हता. 

एक दिवस अर्णव आपल्या मित्रांसोबत ‘मैत्री’ कट्ट्यावर गप्पा मारत बसला होता. अर्णवचे मित्र त्याला विधिषावरून चिडवत होते. इतक्यात अर्णवचा सर्वात जवळचा मित्र भावेश अर्णवला समजावणीच्या सुरात  म्हणाला,

“काय यार अर्णव! किती दिवस वाट पहात बसणार आहेस? किती दिवस असं मनातल्या मनात प्रेम करणार आहेस? तिला कळू तर दे तुझ्या मनात काय आहे? विचार तर तिला. काय म्हणतेय ते तर बघ.”

“अरे यार, मला भीती वाटतेय. ती मला नाही म्हणाली तर!”

अर्णव भावेशकडे पाहून म्हणाला.

“का नाही म्हणेल? तीही तुझ्याकडे पाहत असते. तुला छान स्माईल देते. तिच्या मनात प्रेम असेलच ना! पण मी म्हणतो विचारायला काय हरकत आहे? जास्तीत जास्त काय होईल, तू आवडत असशील तर हो म्हणेल नाहीतर एक कानशिलात लावून देईल. हाय काय अन नाय काय!”

डोळे मिचकावत भावेशने त्याच्या शेजारी बसलेल्या पिंट्याला टाळी दिली. साऱ्या मित्रांमध्ये एकच हास्याचा स्फोट झाला. अर्णवचा चेहरा लाजून गोरामोरा झाला. मग थोडं गंभीर होत भावेश बोलू लागला,

“हे बघ अर्णव, तुम्ही दोघे इतक्या दिवसांपासून एकमेकांकडे पाहत आहात. पण गाडी पुढे काही जातच नाही. तू एक काम कर. तू तुझ्या सुंदर अक्षरात विधिषाला एक पत्र लिही. तुझ्या मनात तिच्याबद्दल जे काही आहे ते सर्व त्या पत्रात लिही. तीची ती मैत्रीण मैथिली आमच्या शेजारीच राहते. तिला सांगू पत्र विधिषाला द्यायला. तिच्याकरवी विधिषापर्यंत पोहचवू निरोप. बघू काय होतं ते? तू आजच पत्र लिहून काढ. काय म्हणतोस?”

सर्व मित्रांनी भावेशच्या बोलण्याला दुजोरा दिला. मग अर्णवनेही मान डोलावली.  थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. एकमेकांची मस्करी करून झाली. आणि मग काही वेळाने सर्वजण एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या घरी परतले. अर्णवही घरी आला. बाबांचा गोंधळ सुरूच होता. त्यांच्या त्या बडबडीकडे दुर्लक्ष करण्यापलीकडे दुसरा काहीच मार्ग नव्हता. त्याने कसंबसं रात्रीचं जेवण उरकलं. आणि तो गॅलरीत अभ्यासासाठी येऊन बसला. मंद गार वारा सुटला होता. निळ्याभोर आकाशात चांदण्याची फुले उमलली होती. आणि त्यांच्या संगतीत तो लबाड चांदवा खुलून दिसत होता. अर्णव ते मोहक दृश्य न्याहाळत बसला होता. इतक्यात त्याला भावेशने सांगितलेल्या पत्राची आठवण झाली. 

“खरंच लिहू का पत्र? पण विधिषाला आवडेल का? आणि नाही आवडलं तर! आता निदान पाहून हसते तरी नंतर या पत्रामुळे तेही बंद झालं तर!”

अर्णवच्या मनात नाना विचार येऊ लागले. हो, नाही म्हणता म्हणता तो शेवटी पत्र लिहायला बसला.  तो पुन्हा पुन्हा वहीच्या पानावर लिहीत होता, खोडत होता. पण त्याच्या मनासारखा भावार्थ कागदावर उमटत नव्हता. त्याच्या अवतीभोवती बरेच कागदाचे बोळे पडलेले होते. मध्यरात्र उलटून गेली तरी पत्र लिहून पूर्ण होत नव्हतं. आणि मग अखेरीस त्याला हवं तसं पत्र लिहून झालं.. मनातलं प्रेम पानांवर दाटून आलं. त्याने पत्राची घडी घातली. आणि पुस्तकात जपून ठेवलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी अर्णव भावेशच्या घरी आला. काकूंनी दारातून अर्णवला आवाज दिला.

“अरे अर्णव तू.! ये ये..! बस हा. भावेश अंघोळीला गेलाय. बस तू.. तुझ्यासाठी गरम गरम इडली चटणी घेऊन येते. मी तेच बनवत होते”

असं म्हणत भावेशची आई पटकन स्वयंपाकघरात निघून गेली. 

“अहो काकू, नको.. मी आताच नाश्ता करून आलोय.”

खुर्चीत बसत अर्णव उतरला. काकू एका डिशमध्ये गरम गरम इडली चटणी घेऊन बाहेर आल्या. अर्णवच्या हातात डिश देत त्या म्हणाल्या,

“खा रे बाळा, तू काय भावेश आहेस? भूक लागली तरी सांगायचा नाहीस. लहानपणापासून ओळखते मी तुला. माझ्यासाठी तू आणि भावेश मला काय वेगळे आहात का? खाऊन घे पटकन!”

काकूंनी अर्णवच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. इतक्यात भावेश अंघोळ आटोपून बाहेर आला. अर्णवकडे पाहत हसून म्हणाला.

“खा बेटे तू, आई तुझेच लाड करते. मला तर मुळीच विचारत नाही”

“हो मग, तो आहेच गुणी.! तुझ्यासारखा खादाड नाही”

काकूंच्या या वाक्यावर दोघेही खळखळून हसले. नाश्ता आटोपून काकूंचा निरोप घेऊन अर्णव आणि भावेश  दोघेही घराबाहेर पडले. घरापासून चालत थोडं दूर गेल्यावर दबक्या आवाजात अर्णव भावेशला म्हणाला,

“अरे भावेश, तू म्हणाला होतास न  विधिषाला पत्र लिही. हे बघ मी पत्र लिहिलंय. आता तू हे मैथिलीला दे. आणि तिला विधिषाला द्यायला सांग”

असं म्हणत अर्णवने त्याच्या बॅगेतून एक पुस्तक बाहेर कडून त्यातली चिठ्ठी त्याच्या हातावर ठेवली. त्रासिक मुद्रा करत भावेश त्याला म्हणाला,

“तू जरा वेडा आहे का रे? एखादया मुलीला असं प्रेमपत्र देतात का? बावळट कुठंचा!”

अर्णव अजाण बालकासारखा त्याच्याकडे पाहत होता. भावेशने एका स्टेशनरीच्या दुकानातून एक छान ग्रीटिंग कार्ड घेतलं. त्यावर ‘डिअर विधिषा’ असं सुंदर सुवाच्च अक्षरात नाव लिहलं. ग्रीटिंग कार्ड आणि पत्र एका गुलाबी रंगाच्या पाकिटात घालून पाकीट बंद केलं. थोडं पुढे गेल्यावर फुलांच्या दुकानातून गुलाब घेतलं. दोन डेअरी मिल्क चॉकलेट घेतलं. 

“दोन कशाला?”

अर्णवने प्रश्न केला.

“कळेलच तुला”

भावेशने हसून उत्तर दिलं आणि दोघेही मैथिलीच्या  कॉलेजच्या बाहेर तिची वाट पहात थांबले. इतक्यात मैथिली कॉलेजच्या गेटमधून बाहेर येताना दिसली. भावेशने तिला आवाज दिला. ती त्याला पाहून आश्चर्याने म्हणाली,

“काय रे भावेश, आज आमच्या कॉलेजवर दौरा? आज इकडे कुठे?”

“अग, तुझ्याचकडे आलो होतो. हे घे तुझ्यासाठी.”

हातातलं एक डेअरी मिल्क चॉकलेट तिच्यापुढे धरत भावेशने एक कटाक्ष अर्णवकडे टाकला. अर्णवला मगाशी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. तो गालातल्या गालात हसला. भावेशच्या हातातून ते चॉकलेट घेत मैथिली हसून म्हणाली,

“काय काम आहे भावेश? कशासाठी हे चॉकलेटचं आमिष?”

“मैथिली, हे पाकीट तुला विधिषाला देता येईल का? अर्णवचं पाकीट आहे हे. अर्णवला विधिषा आवडते. तिच्या मनात काय आहे? हे जाणून घ्यायचं आहे. आणि तिचा होकार असेल तर तिला आज संध्याकाळी ‘विश्वास कॅफे’ मध्ये भेटायला सांग” - भावेश

“हे कधी ठरलं?”

अर्णवच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले. आणि आश्चर्यकारक नजरेने तो भावेशकडे पाहू लागला. अर्णवचा हात किंचितसा दाबून त्याने त्याला शांत रहायला सांगितलं. अर्णव शांत बसून भावेशचं ऐकत होता. मैथिलीने होकारार्थी मान डोलावली “नक्की देते” असं म्हणत तिने भावेशच्या हातातलं पाकीट, गुलाब आणि चॉकलेट घेऊन आपल्या पर्समध्ये ठेवून दिलं. भावेश आणि अर्णवला बाय करून ती घरी जायला निघाली. 


 

पुढे काय होतं? अर्णवने पत्रात काय लिहलं असेल? विधिषा अर्णवच्या प्रेमाचा स्वीकार करेल का? पाहूया पुढील भागात..

क्रमशः

© निशा थोरे..

0

🎭 Series Post

View all