सप्तपदी.. एक सुरमयी प्रवास मराठी कथा: Marathi Katha भाग ७
पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, अर्णव आणि विधिषा पोलीस स्टेशन मधून घरी आले. पण अर्णवला विधिषा सोबत काही वाईट घडणार काय असं वाटू लागलं. त्यामुळे अर्णव आणि त्याचे मित्र विधिषाच्या घरावर लक्ष ठेवून होते. पहाटे वरद आणि बाबा विधिषाला गावी घेऊन जाण्यासाठी बाहेर पडले. अर्णव आणि त्याचे मित्र त्यांना अडवत होते पण ते कोणाचंच ऐकत नव्हते. अर्णवच्या आईने विधिषाचा हात पकडून घरी आणलं. दोघांचा लग्न सोहळा पार पडला. जाधवांची मुलगी नाईकांची सून झाली. आता पुढे..
भाग ७
अर्णव मटकन खाली बसला. बातमी मनाला सुन्न करणारी होती. सर्व अर्णवच्या आजूबाजूला गोळा झाले. अक्षरा,अर्पिता आई त्याला विचारू लागले. पण तो डोक्याला हात लावून बसला होता. डोळ्यांतून अश्रुधारा वाहत होत्या. काय झालंय काहीच समजायला मार्ग नव्हता.त्याचं रडणं थांबत नव्हतं. भावेश त्याच्या जवळ आला. त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला.
“अर्णव, काय झालं? कोणाचा फोन होता? सांग यार! जीव टांगणीला लागलाय.”
भावेशचा चिंताग्रस्त चेहरा पाहून अर्णवचा बांध फुटला. त्याने भावेशला घट्ट मिठी मारली. आणि तो त्याच्या गळ्यात पडून रडू लागला.
“भावेश, आपले विजू भावोजी!!”
“काय झालं विजू भावोजींना?”
भावेश रडवेला होऊन विचारू लागला.
“विजू भावोजी आपल्याला सोडून गेले रे!!”
अर्णव मोठ्याने रडू लागला. पूजेचं ताट घेऊन येणाऱ्या अक्षराच्या कानावर ते शब्द पडले. हातातल्या पुजेच्या ताटासकट ती खाली जमिनीवर कोसळली. आई तिला सावरायला धावली. काही क्षणापूर्वी आनंदी असणाऱ्या नाईकांच्या घरावर दुःखाची अवकळा पसरली
लग्नासाठी यायला निघालेल्या अर्णवच्या भावोजींच्या गाडीचा अपघात झाला होता. अर्णवचं लग्न अचानक घाई गडबडीत ठरल्यामुळे त्यांनी अक्षरा आणि सार्थकला पुढे पाठवून दिलं होतं आणि नंतर ते ऑफिसची कामे उरकून जाणार होते. वाटेत येताना त्यांचा अपघात झाला होता. आणि ते जागीच मरण पावले होते. सारं घर शोक सागरात बुडून गेलं. काही वेळापूर्वी अर्णवच्या लग्नात नटूनथटून सौभाग्य लेण्यात वावरणारी अक्षरा विधवा झाली. विधिला तर काहीच उमजेना. आपल्या लाडक्या नंणदेच्या वाट्याला इतकं दुःख यावं तेही आपल्या आनंदाच्या दिवशी! तिचे डोळे पाण्याने डबडबले. अर्णव एकटक शून्यात पाहत बसला होता.
“आता मला अक्षराला सावरायला हवं. मीच जर असा कोलमडून गेलो तर तिच्याकडे कोण पाहिल”
अर्णव स्वतःशीच बोलत होता. पुढचं कार्य उरकायला हवं होतं. त्याने स्वतःला सावरलं. इतक्यात अर्णवची काकू म्हणाली,
“अर्णव, तू आणि अमेय दोघे अक्षराला आणि आईबाबांना सोबत घेऊन जा. अर्पिताच्या घरीसुद्धा हे कळवायला हवं. आम्ही कळवतो जवळच्या सर्व नातेवाईकांना. तुम्ही जाऊन या आम्ही विधीसोबत थांबतो दोन दिवस. नव्या नवरीला आता तिथे घेऊन जाणं योग्य नाही.. तुम्ही जा.. आम्ही आहोत”
अर्णवने होकारार्थी मान डोलावली. पण त्याला विधीची काळजी वाटत होती. त्याने भावेश आणि काही मित्रांना बोलावून विधी आणि तिच्या घरच्यांवर लक्ष ठेवायला सांगितलं. अर्णव विधीला समजावून सांगू लागला.
“विधी, आम्हाला अक्षरासोबत तिच्या सासरी जावं लागेल. तू तुझी काळजी घे. आम्ही येईपर्यंत कुठेच घराबाहेर जाऊ नकोस”
अर्णव विधीला पुन्हा पुन्हा बजावून सांगत होता. तिला काही सूचना दिल्या आणि आपल्या काका-काकू आणि चुलत बहिणींच्या भरवश्यावर विधीला सोपवून ते तातडीने घटनास्थळी पोहचला. अक्षराच्या सासरच्या लोकांना कळवण्यात आलं. अक्षरा, अर्णव आपल्या आईवडिलां समवेत त्यांचा मृतदेह घेऊन अँम्बुलन्सने त्यांच्या गावी घेऊन आले. त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. अक्षरा धाय मोकलून रडत होती. सार्थक आपल्या रडणाऱ्या आईला केविलवाणा चेहरा करून पाहत होता. त्या दोन वर्षांच्या निरागस चिमरुड्या बाळाला आपले बाबा या जगात नाहीत ते आता पुन्हा कधीच येणार नाहीत हे तरी कसं समजणार? तो आपल्या आईचे डोळे पुसत होता.
अंतिमविधी करून अर्णव अक्षरा आणि सार्थकला घेऊन आईबाबांसमवेत घरी परत आला. अक्षराच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. वयाच्या अवघ्या सव्वीसाव्या वर्षी अक्षराच्या नशिबी वैधव्य आलं होतं. विधी बाहेर गॅलरीत छोट्या सार्थकला चिऊ- काऊ दाखवत घास भरवत होती. सार्थक तिच्याकडे छान रमला होता. सांत्वनासाठी चाळीतली आजूबाजूची शेजारीची माणसं जमू लागली. अक्षराचं बदलेलं रूप पाहून सर्वजण हळहळत होते. चाळीतल्या बायकांमध्ये कुजबुज सुरू होती. इतक्यात मोघे काकू आल्या. आपल्या तिखट स्वभावामुळे त्या संपूर्ण दोन चाळीत प्रसिद्ध होत्या. विधीकडे कडवट नजर टाकत मुद्दाम तिला कमी लेखत म्हणाल्या,
“नाईक वहिनी, आपल्या अक्षराचं वाईट झालं ओ. इतक्या लहान वयात इतकं डोंगराएवढं दुःख वाट्याला आलं.”
मोघे काकू डोळ्यांत उसणं पाणी आणून बोलत होत्या. अक्षराला अजूनच रडू फुटू लागलं.
“पण काहीही म्हणा नाईक वहिनी, तुम्ही अर्णवच्या लग्नाची घाईच केली बघा. तुम्ही विधिषाची आणि अर्णवची पत्रिका जुळतेय का हे पाहिलं होतं का? काय माहीत तिच्या पत्रिकेत मंगळ वैगेरे असला तर! मग अशी संकटं येणारच ना”
मोघे वहिनी तोंडाला येईल ते बरळत होत्या आणि बाकीच्या बायका त्याला दुजोरा देत होत्या. त्यात अजून भर म्हणजे सावंतवहिनीं आगीत तेल ओतत म्हणाल्या,
“अगदी खरंय.. उगीच नाही आपल्या पूर्वजांनी शास्त्र लिहून ठेवलं. कुंडली पत्रिका, शुभ मुहूर्त जुळवूनच शुभकार्य करायचं असतं. बरोबर का नाही ओ मोघे वहिनी.!”
सावंत वहिनीच्या बोलण्यावर मान डोलावून होकार देत मोघेकाकू म्हणाल्या,
“हो अगदी खरंय सावंत वहिनी तुमचं. राग नका मानू हं नाईक वहिनी, पण तुमच्या सुनेचा पायगुण चांगला नाही बरं का? पांढऱ्या पायाची आहे जणू.. अपशकुनी.. तीने सून म्हणून या घरचा उंबरठा ओलांडला आणि तिकडे अक्षराच्या नवऱ्याचा अपघात झाला. मी आपलं तुम्हाला सांगण्याचं काम केलं. उगीच तुम्हाला असं नको वाटायला मी तुमच्या सुनेविरुद्ध कान भरतेय. अजून काय काय पाहावं लागणार आहे देवच जाणो! सावध व्हा बरं नाईक वहिनी”
त्यांचं संभाषण विधीच्या कानावर पडत होतं. कुणीतरी गरम शिसे कानात ओतावं. असं विधीला वाटलं. डोळ्यातलं आभाळ वाहू लागलं.
“मी अपशकुनी! काय ऐकतेय मी.! आता आई अक्षरा माझा दुस्वास करतील. काय करू मी? खरंच माझ्या पायगुणामूळे झालं हे?”
विधीच्या मनात विचारांचं वादळ फेर धरू लागलं. इतक्यात अर्णवची आई ताडकन उठून उभी राहिली.
“खबरदार मोघे वहिनी, यापुढे एक शब्द जरी तोंडांतून बाहेर काढलात तर! माझ्या सुनेला काही अभद्र बोललात तर! तिच्यामुळे काहीच झालेलं नाहीये. कर्ता करविता तो आहे त्याच्या मर्जीशिवाय पानही हलत नाही. त्यात माझ्या विधीचा काहीही दोष नाही. आणि हो, काय तुम्ही शुभमुहूर्त घेऊन बसलात. ज्या क्षणात चैतन्य आहे तोच शुभमुहूर्त.. चांगल्या कामासाठी कशाला हवाय ओ मुहूर्त? जग कुठे चाललंय आणि तुम्ही कुठे आहात मोघे वहिनी?”
अर्णवची आई प्रचंड चिडली होती. आपला मोर्चा सावंत वहिनीकडे वळवत ती रागाने म्हणाली,
“सावंत वहिनी तुम्ही काय कुंडली, पत्रिका घेऊन बसलात ओ? मला एक सांगा तुमची शाल्मली आणि तुमचा जावई पराग या दोघांचे तर चांगलेच गुण जुळले होते. चांगला मुहूर्त साधूनच लग्न केलं होतं ना! मग का आली परत नवऱ्याचं घर सोडून? माफ करा सावंत वहिनी, हे बोलून मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं. शाल्मली मला माझ्या मुलींसारखीच आहे. तिचं वाईट व्हावं असं मला मुळीच वाटत नाही. पण विधीही कोणाची तरी मुलगी आहे. माझी सून नसून मुलगीच आहे हे विसरू नका. आपल्या मुलीला कोणी बोललं तर राग येतोच न आपल्याला. मग इतरांच्या मुलींना बोलण्याचा काय अधिकार आपल्याला?”
”मोघे वहिनी, तुमची अभिज्ञा लग्न करून सासरी गेली आणि दोन दिवसांतच तिचे सासरे वारले. मग मला सांगा आपली अभिज्ञा अपशकुनी आहे? तिच्या सासरच्या लोकांनी अभिज्ञाला असं वागवलं असतं तर तुम्हाला कसं वाटलं असतं? तिचे सासरे हृदयविकाराच्या झटक्याने गेले. त्यात तिचा काय दोष? अभिज्ञाच्या सासरच्या लोकांनी समजून घेतलाच ना? ”
अर्णवच्या आईच्या डोळ्यांतून अंगार बरसत होता. इतका वेळ आसवं गाळत बसलेली अक्षरा खुर्चीचा आधार घेऊन उभी राहिली. मोघेवहिनी आणि सावंतवहिनीकडे पाहत म्हणाली.
“काकू, जे घडलं त्यात माझ्या वहिनीचा काहीच दोष नव्हता. ते माझं प्राक्तन होतं. तिच्या येण्याने आमच्या घरात फक्त आनंदच आलाय. आमच्या घरची लक्ष्मी आहे ती. तुम्ही तिला काही बोलायचं नाही. तुम्हाला माझं दुःख कमी करता येत नसेल तर निदान अपशब्द बोलून ते दुःख वाढवू तर नका”
अर्णवच्या आईचा अवतार पाहून आणि अक्षराचं बोलणं ऐकून मोघेवहिनी, सावंत वहिनी चांगल्याच वरमल्या. विधीच्या डोळ्यांतून अविरत पाऊस कोसळत होता. तिने सार्थकला खाली बसवलं. आणि धावत अर्णवच्या आईजवळ आली.
“आईई..!!”
आपल्या सासूबाईंना घट्ट मिठी मारली. अक्षराला जवळ घेतलं. अक्षरा तिच्या गळ्यात पडून रडू लागली. विधीने तिचे डोळे पुसले. आणि सासूबाईंना म्हणाली,
“आई, मला खूप अभिमान वाटतोय की माझी सासू इतक्या आधुनिक विचारांची आहे. जुने संस्कार जपताना नव्याचा अव्हेर त्यांनी केला नाही. चुकीच्या जुन्या रूढी परंपरा यांना तिलांजली देत त्यांनी योग्य ते स्वीकारलं. चुकीला चूक म्हणण्याची हिंमत आहे त्यांच्यात. आई.. तुम्ही माझी आई झालात. अक्षरा नणंद असूनही मोठ्या बहिणीसारखी पाठीशी उभी राहिली. इतकं चांगलं सासर मिळाल्यावर अजून काय हवं असतं एखाद्या मुलीला?”
विधी बोलत होती. सर्व बायका त्यांचं बोलणं ऐकत होत्या. आता त्यांच्या कुजबुज करण्याला चांगलाच चाप बसणार होता. मोघेवहिनी, सावंतवहिनी यांच्या बोलण्याला चांगलाच आळा बसणार होता. विधीचा चेहऱ्यावर आपल्या सासूविषयीची हृदयात वावरणारी कृतज्ञतेची भावना झळकत होती. अर्णवच्या आईने दोघीनीही जवळ घेतलं. त्यांना पोटाशी घट्ट धरून दोघींच्याही भाळावर ओठ टेकवत उद्गारल्या.
“गुणाच्या ग माझ्या पोरी”
पुढे काय होतं? विधीला मिळलेलं सुखाचं दान असंच टिकून राहील का? सप्तपदीचा प्रवास सुरमयी असेल का?
पाहूया पुढील भागात..
क्रमशः
© निशा थोरे..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा