सप्तपदी.. एक सुरमयी प्रवास मराठी कथा: Marathi Katha भाग ९
पुर्वार्ध:- कथेच्या मागील भागात आपण पाहिलं की, विधी अर्णवच्या घरात छान रुळली.सासूच्या मायेची पखरण तिला मिळत होती. छोट्याश्या घरातही ती आनंदी होती. विधीचे आईबाबांना लोक निंदेला घाबरून तो परिसर सोडून तिथून निघून गेले. शेवटची भेटही वरदने घडू दिली नव्हती. विधीला खूप वाईट वाटलं. पण तिने साऱ्या गोष्टी स्वीकारल्या होत्या. सासरची माणसंच आता तिचं जग होतं. तिची शेवटच्या वर्षाची अंतिम परीक्षा सुरू झाली. स्वतः अर्णवची आई तिला परीक्षा केंद्रावर सोडवत होती. कायम तिच्या सोबत होती. परीक्षा संपली. आता पुढे..
भाग ९
विधीची परीक्षा संपली होती. आज तिला थोडं निवांत वाटत होतं. एका मोठ्या टेन्शनमधून सुटल्या सारखं. परीक्षा तर संपली पण निकाल चांगला लागेल का? मी पास होईन का? हीच चिंता तिला सतावत होती. अर्णवचीही परीक्षा सुरू झाली होती. तो रात्रभर जागून गॅलरीत बसून अभ्यास करत होता. विधी विचार करू लागली. इतक्यात अर्णव घरी आला. विधीला शांत बसलेलं पाहून त्याने तिला विचारलं,
“काय झालं विधी? कसला विचार करतेय? कोणी काही बोललं का?”
“नाही रे अर्णव, मी विचार करत होते. बघ ना रे, प्रेमात पडलं की सगळं किती सहज सोप्पं वाटतं ना..! पण खरंच हा सप्तपदीचा प्रवास इतका सुखकर असतो? कॉलेजच्या दिवसात वाटायचं आपण हे करू, आपण ते करू.. पटकन शिक्षण संपवून नोकरी मिळवू आणि लग्न करून सुखी संसार करू? पण स्वप्नं आणि सत्य किती तफावत असते ना..! किती खाचखळगे, उतार चढाव असतात न.! खडतर वाटेवरचा हा रक्तबंबाळ करणारा प्रवास करायलाच हवा न.!”
“अगदी खरंय विधी, इतकी संकटं येतील असं मला कधी स्वप्नांतही वाटलं नव्हतं. पण विधी, आपण सोबत आहोत न.! त्या प्रत्येक संकटाशी आपण मिळुन झुंज देऊ. विधी, प्रत्येक मुलीची आपल्या जोडीदाराची, लग्नाची, लग्नानंतरच्या आयुष्याची स्वप्नं असतात न. मला माफ कर ग, तुझी स्वप्नं फार वेगळी होती. मी नाही पूर्ण करू शकलो.पण मी तुला वचन देतो विधी. जे जे मी आता तुझ्यासाठी करू शकलो नाही ते मी सगळं तुला देईन तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेन.आपण लग्नात सप्तपदीच्या वेळीस घेतलेली सर्व वचने मी मनापासून पालन करेन. कायम तुला सुखात ठेवण्याचा प्रयत्न करेन.आपल्याला लवकरच नोकरी शोधावी लागेल न. आता बाबांवर अजून जबाबदारी नको. मला आता कुटुंबाची जबाबदारी माझ्या शिरावर घ्यायची आहे. मला खात्री आहे मी नक्कीच ही जबाबदारी उत्तम रीतीने सांभाळू शकेन. तुझा आहे न विश्वास माझ्यावर?”
“हो रे राजा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. आणि मी तुझ्याबरोबर खूप सुखात आहे. तू माझ्या सोबत आहेस हेच सुख आहे बघ. बाकीच्या गोष्टी तर नंतरही मिळतीलच ना”
विधीने हसून अर्णवचा हात हातात घेतला. आणि ‘मी तुझ्या सोबत आहे, कायम असेन’ हा विश्वास दिला. त्या तिच्या आश्वासक स्पर्शाने त्याला जणू उभारी मिळाली होती.
विधीचा संसार सुरू झाला. कधीही स्वयंपाकघरात पाऊल न टाकलेली विधी आता आपल्या सासूबाईंच्याकडून जेवण बनवायला शिकत होती. विधी कोकणातली आणि हे सोलापूरचे.. स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत खूपच फरक होता. विधी सासूबाईंच्या पद्धतीने स्वयंपाक करायला शिकली. सर्व चालीरीती समजून उमजून ती वागत होती. चांगली सून, वहिनी, पत्नी होण्याचा ती मनापासून प्रयत्न करत होती. चुकत होती.. शिकत होती. विधी अर्णवच्या घरी सर्वांची लाडकी झाली. सार्थकची आवडती मामी झाली.
अर्णवला इंजिनिअरिंग नंतर पुढे शिकायचं होतं पण घरची परिस्थिती हलाकीची होती. त्याने आपलं शिक्षण थांबवून नोकरी पत्करली. दिवसाचे बारा बारा तास तो काम करू लागला. आपल्या पत्नीला सुखात ठेवण्याच्या ध्यासाने तो पछडला होता. रात्रंदिवस तो कष्ट करत होता. विधीही पदवीधर झाली आणि तीही एका छोट्या खाजगी कंपनीत अकाउंट असिस्टंट म्हणून काम करू लागली. कधी काळी एका दिवसाचा पाकिटमनी आता तिच्या महिन्याभराचा पगार होता. आता खऱ्या पैशांची किंमत कळू लागली होती.
दिवस पुढे सरत होते. जानेवारीचा महिना सुरू झाला. संक्रातीचा सण आला. विधीचा अर्णवच्या घरातला पहिला संक्रांत सण. आईने तिच्यासाठी काळ्या रंगाची सोनेरी बुट्या असलेली साडी घेतली होती. आज नाईकांच्या घरी हळदीकुंकवाचा कार्यक्रम ठेवला होता. आईला खूप थाटामाटाने हळदीकुंकू साजरी करायचा होता. आईने चाळीतल्या सर्व बायकांना आमंत्रणं दिली होती. अर्णवच्या आईने तिळाचे लाडू बनवले. बायकांसाठी वाण घेऊन आली. गुलाबाची फुलं आणली. विधीने सर्वांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था केली. आज ती फार आनंदात होती. अक्षरा मात्र आतल्या खोलीत एकटीच सार्थकला घेऊन बसली होती. ती या सवाष्ण बायकांच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नव्हती. खूप वाईट वाटत होतं तिला. विधीला तिच्या जीवाची घालमेल समजू शकत होती. पण ती शांत होती.
संध्याकाळी झाली. विधी छान नटूनथटून तयार झाली. आईसुद्धा छान तयार झाली. हळूहळू सर्व बायका घरी जमू लागल्या.आईने सर्वांची बसण्याची व्यवस्था केली.आईने विधीला हळदीकुंकू द्यायला सांगितलं. विधीने होकारार्थी मान डोलावली.
“हो आई, पण त्याआधी मी एक गोष्ट करणार आहे. एक मिनिट हं आई..”
असं म्हणून विधी आतल्या खोलीत गेली. आत बसलेल्या अक्षराच्या हाताला धरून बाहेर आणलं. आणि तिला हळदीकुंकू लावून तिला वाण दिलं. अक्षरा अचंबित होऊन विधिकडे पाहतच राहिली. सर्व बायका एकमेकांकडे पाहत कुजबुजत होत्या.
“नाईक वहिनी, काय अभद्रपणा चालवला आहे हा? एका विधवेला हळदीकुंकू कसं दिलं? आता हिच्या हाताने कसं हळदीकुंकू घ्यायचं? आमच्या सौभाग्याला काही झालं तर? आम्हाला इथे बोलावून अपमानित करायचं होतं का?”
बायकांच्या गर्दीतून आवाज आला. विधी शांतपणे बोलू लागली.
“मी असल्या गोष्टी मानत नाही. माणसाला माणूस म्हणून जगू देण्याचा अधिकार नसेल तर अशा कार्यक्रमाचा काय उपयोग? माझी नणंद विधवा झाली. त्यात तिचा काय दोष? माणसाचा जन्म मृत्यू आपल्या हातात नसतो मग अक्षरा ताईची यात काय चूक? आणि असा तिच्यात काय बदल झाला की या सौन्दर्यप्रसाधनावर तिचा अधिकार नसावा? माझ्या नंणदेला आपलं आयुष्य सुखाने समाधानाने जगण्याचा अधिकार नाही का? तुम्हीच सांगा. चुकीच्या रूढी परंपरा आपण सोडायला नको का?”
सर्वांना विधीचं बोलणं पटत होतं. आणि त्यांनी अक्षराला हळदी कुंकू लावू दिलं. अक्षराला आपल्या विधीचा खूप अभिमान वाटत होता. अर्णवच्या आईचा कंठ दाटून आला. आपल्या सुनेकडे कौतुकाने पाहत त्यांनी आपले डोळे पुसले. आणि विधीला आपल्या कुशीत घेतलं. आई म्हणाली,
“विधी, आज तू माझ्या सगळ्या विवंचना मिटवल्या. आमच्या नंतर मुलीचं माहेर तुटेल का ? अशी धास्ती नेहमी वाटायची. पण आता नाही तुम्हा दोघात त्यांचं माहेर कायम राहील.आमच्यानंतर तुम्ही दोघे त्यांचे आईबाबा व्हाल. तुझ्यासारखी समजूतदार सून मिळायला भाग्य लागतं पोरी. खरंच मी भाग्यवान.. तुझ्यासारखी निर्मळ मनाची मुलगी माझी सून आहे.”
अर्णवच्या आईने डोळे पुसले. सर्वांनाच विधीच्या निर्णयाचं कौतुक वाटत होतं. आईने सर्वांना हळदीकुंकू लावलं. विधीने तिळगुळ आणि वाण दिलं. अक्षराने सर्वांना अल्पोपहार दिला. आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
दिवस भरभर पुढे सरत होते. अक्षरा नोकरी करत होती. सार्थकला संभाळून नोकरी करणं शक्य नव्हतं म्हणून तीने सार्थकला विधिकडे सोपवलं. विधीनेही आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. काही दिवसांनी विधीला बाळाच्या येण्याची चाहूल लागली. सर्वजण खूप खुश झाले. सार्थक नंतर आता घरात नवीन पाहुणा येणार म्हणून सारेच आनंदात होते. अर्णवची आई होतीच काळजी घ्यायला. तिला काय हवं नको ते सगळं त्या आवडीने पाहत होत्या. विधीच्या आवडीचे पदार्थ करून देत होत्या. तिचे सर्व पथ्यपाणी, औषधे स्वतः जातीनं त्या पहात होत्या.
काही दिवसांनी विधीने दोन जुळ्या मुलांना जन्म दिला. अर्णव बाबा झाला. अर्णवच्या आईने स्वतः आपल्या सुनेचं बाळंतपण केलं. त्या दिवसात तिची काळजी घेतली. पुन्हा एकदा नव्याने सुख घरात नांदू लागलं. नोकरी घर, सासूसासरे, नणंदा साऱ्यांना संभाळून विधी नेटाने आपला संसार करत होती. कालांतराने अर्णव आणि विधीला सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये नोकरी मिळाली. नोकरी कायम झाली. आपल्या सुनेच्या सतत समजवून सांगण्याने बाबांनी हळूहळू मद्यपान करणं सोडून दिलं. घरात सौख्य आलं. पुढे अर्णवने त्याची राहिलेली सर्व स्वप्नं पूर्ण केली. बंगला बांधला. बंगल्याला आईचं 'शांताई' हे नाव दिलं. विधीच्या आईबाबांही त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी मुलांना माफ केलं.
आज आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी विधीला हे सर्व आठवत होतं.. सप्तपदीचा तो प्रवास डोळ्यासमोर पुढे सरकत होता..
पूर्णविराम..
©निशा थोरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा