Login

विलक्षण पोपट (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
विलक्षण पोपट

नेहमी सारखा दरबार भरला होता.

“महामंत्री! आज तुम्ही खास दोन्ही महाराण्यांना दरबारात येण्याची विनंती केली होती आणि त्या आल्यात. याचे काही विशेष कारण?” राजाने विचारलं.

“महाराज ही विनंती आमची नाही तर आपल्या पाहुण्यांची आहे. आज दरबारात एक खास व्यक्ती येणार आहेत. शमशेर खान खास कंधार मधून आले आहेत आणि ते पक्षी विशेषज्ञ आहेत म्हणूनच दोन्ही महाराण्यांना येण्याची विनंती केली होती. त्यांचा असा दावा आहे त्यांच्याकडे असलेले पक्षी ना आजवर कुठे पाहिले गेले ना असे नाहीयेत. आज त्यांनी खास त्यांचा पोपट आणला आहे जो माणसांच्या भाषेत बोलतो. फक्त एक दोन शब्द नाही तर संपूर्ण गप्पा मारतो. जर महाराजांची आज्ञा असेल तर त्यांना….” महामंत्री बोलत होते.

“हो. हो. नक्कीच. असे सर्व ऐकल्यावर तर आमचीही उत्सुकता ताणली गेली आहे.” राजा म्हणाला.

लगेचच शमशेर खानला बोलवण्यात आले. तो एक पोपट घेऊन आला. त्याने राजाला प्रणाम केला.

“शमशेर खान! असं ऐकलं आहे तुमचा हा पोपट बोलतो?” राजा म्हणाला.

“होय महाराज. हाच तो पोपट आहे जो गप्पा मारतो. हा पोपट म्हणजे खुदाची देण आहे. याचा रंग, रंगीबेरंगी पंख याला सुंदर बनवतात. काय मिठू? तुझी इच्छा पूर्ण झाली. आज विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय स्वतः तुझ्यासमोर आहेत. काही बोलणार नाहीस?” तो म्हणाला.

राजा लगेच उत्सुकतेने सरसावून बसला. त्याने त्याच्या मिशीला पिळ दिला आणि पोपट काय बोलतोय हे ऐकू लागला. शमशेर खानने लगेच त्याच्या हातावर असलेल्या पोपटाला राजाला नमस्कार करायला सांगितले. त्याने हिंदी मिश्रित उर्दूत राजाला प्रणाम केला.

“मिठू त्यांच्या भाषेत बोल. तुला तर सर्वच भाषा ज्ञात आहेत.” शमशेर खान म्हणाला.

“धन्यवाद महाराज. आज साक्षात तुम्हाला समोर बघून मला माझ्या सौभाग्यावर विश्वास बसत नाहीये. खूप काळापासून तुमच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता हा मिठू. माझे अभिवादन स्वीकार करावे महान सम्राट.” पोपट म्हणाला.

सगळे असा बोलणारा पोपट पाहून चकित झाले होते.

“अद्भुत! खरंच अद्भुत.” राजा हसत हसत म्हणाला.

“महाराज जर तुमची आज्ञा असेल तर हा मिठू या देवींबद्दल काही बोलेल तर चालेल?” त्याने राण्यांकडे हात करून विचारलं.

“अवश्य.” राजा म्हणाला.

त्याने लगेच राण्यांबद्दल त्या पोपटाला बोलायला सांगितले. एका सेवकाने पोपटाला बसण्यासाठी एक लाकडी खांब आणून दिला. त्याने पोपटाला तिथे बसवले.

“सृष्टीच्या सर्वात सुंदर राण्यांना माझे नमन स्वीकार असू दे. किती सुंदर तेज, विलक्षण आभा, किती सुंदर आहेत विजयनगरच्या दोन्ही महाराणी.” पोपट म्हणाला.

सगळे आश्चर्याने फक्त पाहत होते. दोन्ही राण्या देखील आनंदी झाल्या होत्या.

“आम्हाला हा पोपट हवाय महाराज.” छोटी राणी म्हणाली.

राजाने फक्त तिचा उत्साह बघितला. एवढ्यात शमशेर खान बोलू लागला; “अजून याची खास गोष्ट तर सांगितलीच नाही महाराज. हा मिठू खुदाच्या देणीमुळे कोणाच्या मनात काय सुरु आहे, कोण कसा आहे हेही सांगू शकतो.”

“आम्ही नाही मानत एक पक्षी एखाद्या विषयी असं सगळं सांगू शकेल.” मोठी राणी म्हणाली.

“नाही नाही महाराणी. हे खरं आहे आणि एक महत्त्वाची गोष्ट हा जे काही बोलतो ते खरं बोलतो.” तो म्हणाला.

“तर मग ठीक आहे. तुमच्या या पोपटाला सांगा की महाराजांच्या बाबतीत काहीतरी बोल. जर ते खरे निघाले तर आम्ही मानू की हा खरंच एक विलक्षण पोपट आहे.” ती म्हणाली.

“जर महाराणी चिन्नादेवी असं इच्छितात तर आम्हाला काहीच समस्या नाही.” राजा म्हणाला.

“ठीक आहे महाराज पण सावध करणे माझे काम आहे म्हणून सांगतो, मी आधीच सांगितलं हा पोपट जे काही बोलतो ते खरं बोलतो. जर काही वर खाली झाले तर..” तो बोलत होता पण त्याला तोडत राजा बोलू लागला; “जे सत्य लपवतात ते घाबरतात. सांगा त्याला बोलायला.”

त्याने लगेच पोपटाला राजाविषयी बोलायला सांगितले.

“एक राजा, महाराजांचा महाराजा, प्रजाच ज्याची संतान, प्रजाच त्याचा इमान. कधीच करत नाही आराम, सतत करतो काम. रक्षक आहे तो सगळ्यांचा, करतो प्रेम आपल्या दोन्ही महाराण्यांवर, गुंजेल एक दिवस इतिहास या महालाचा त्यांच्या प्रेम कहाणीने. न्याय स्वरूप मूर्तिमंत उदाहरण, देवासमान महाराज श्री कृष्णदेवराय यांनाच तर संबोधतात.” पोपट म्हणाला.

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. तो जे काही बोलला होता ते खरंच होतं आणि एका पक्ष्याने एवढं बोलल्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते.

“महाराज आम्हाला हा पोपट हवाय.” छोटी महाराणी पुन्हा म्हणाली.

“हा तुमचा पोपट तर खरंच खूप विलक्षण आहे. याला जरा आमच्याबद्दलही बोलायला सांगा. जरा बघूया काय म्हणतो आमच्याबद्दल.” महामंत्री म्हणाले.

राजाने देखील त्याला संमती दिली. त्याने पोपटाचा खांब त्यांच्या समोर आणून ठेवला आणि पोपटाला त्यांच्याबद्दल बोलायला सांगितले.

“खरा आहे हा. निश्चयाने कठोर आहे हा. जीवन ज्याचे महाराजांच्या नावे आहे हा मंत्री महान आहे. वेळ आल्यावर आपल्या राजासाठी देऊ शकतो स्वतःचे प्राण. जर जाईल राजाच्या विरुद्ध कोणी तर घेऊ शकतो आपल्या अपत्याचा जीवही.” पोपट म्हणाला.

ते ऐकून राजा सकट सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता शमशेर खान आचार्यच्या दिशेने गेला. आचार्य त्याच्याबद्दल बोलायला नाहीच म्हणत होता.

“धनी आता या म्हाताऱ्या सोबत आपली उचल बांगडी व्हायच्या आत आपण निघून जाऊ.” मणी कुजबुजला.

“नाहीतर काय! याच्यामुळे आज आपणही उघडे पडणार.” धनी म्हणाला.

आचार्य त्याच्याबद्दल ऐकून घ्यायला तयारच नव्हता पण रामाने मध्येच बोलून ऐकून तर घेऊ म्हणून कसेबसे जोर आणून त्याला तयार व्हायला भाग पाडले.

“महादुष्ट, महापापी, छळ आणि कपट ज्याच्या नसानसात भरले आहे तो काय समजू शकणार या महान आत्म्याची वसुंधरा.” पोपटाने बोलायला सुरुवात केली. आधी आपल्याबद्दल आता सर्व बाहेर येणार हे जाणून आचार्य स्वतः घाबरला होता आणि महामंत्री आणि रामा मनोमन खुश होते पण भलतेच घडले. पोपटाने त्याची प्रशंसा केली.

“हा पोपट काय वेडा झालाय का? या म्हाताऱ्याची प्रशंसा करतोय.” धनी कुजबुजला.

“मलाही तेच वाटतंय. या महापाप्याला देवदूत म्हणतोय.” मणी म्हणाला.

“हा पोपट आम्हाला हवाय.” छोटी राणी पुन्हा म्हणाली.

राजाने तिला हातानेच थांब अशी खूण केली. रामा आणि मंत्री मात्र हा पोपट असे कसे बोलला म्हणून विचार करत होते. शमशेर खानने राजाची परवानगी घेतली आणि पुढे निघाला.

“अरे रामा हा पोपट आचार्यबद्दल खोटं का बोलतोय?” बंधूने विचारलं.

“मीही तोच विचार करतोय बंधू.” रामा म्हणाला.

“घ्या! त्या पोपटाचा प्रभाव तुझ्यावरच जास्त आहे.” बंधू म्हणाली.

“म्हणजे?” रामाने विचारलं.

“बघ तो पोपट तुझ्या जवळ येतोय.” बंधू म्हणाली.

शमशेर खानने तो पोपट त्याच्या समोर ठेवला आणि आता रामाबद्दल त्याला बोलायला सांगितले. घडले उलटेच! त्या पोपटाने रामाबद्दल चुकीचे आणि वाईट सर्व सांगितले. त्याचे शेवटचे वाक्य होते; “ज्याने याला विशेष सल्लागार हे महत्त्वाचे पद दिले असेल तो जगातला सर्वात मूर्ख माणूस असेल.”

हे वाक्य ऐकताच महामंत्री चिडून; “शमशेर खान!” असे ओरडले आणि तलवार बाहेर काढली.

“महामंत्री जी! तलवार म्यानात ठेवा.” राजा म्हणाला.

“पण महाराज आम्ही तुमच्या बद्दल असे काही ऐकून घेऊ शकत नाही.” ते म्हणाले.

“महामंत्री तो केवळ एक पक्षी आहे. त्याला काहीच फरक कळत नाही. यावेळी त्याच्याकडून पंडित रामाकृष्णा बद्दल बोलताना चूक झाली आहे. तो तेच बोलला जे त्याला सत्य वाटले पण आहे तर शेवटी एक निरागस पक्षीच. त्यामुळे ही चूक माफ करण्यायोग्य आहे.” राजा म्हणाला.

“महाराज आम्हाला हा पोपट हवाय. हवाय आम्हाला हा पोपट.” छोटी महाराणी पुन्हा म्हणाली.

“महाराणी! आम्हाला तुमच्या भावना समजल्या आहेत. शमशेर खान! विलक्षण आहे हा तुमचा पोपट आणि त्याचे सत्यही. जर तुम्हाला काही आपत्ती नसेल तर आम्ही तो खरेदी करू इच्छितो. सांगा! काय मूल्य आहे तुमच्या या पोपटाचे?” राजा म्हणाला.

“माफ करा महाराज! पण हा पोपट म्हणजे माझे पोट आहे. जर मी हाच विकला तर माझा रोजगार जाईल परंतु हे माझे अहोभाग्य आहे की महराजांनी माझ्याकडे काहीतरी मागितले आहे. जर या पोपटाच्या बदल्यात मला एक लाख सुवर्ण मुद्रा मिळाल्या तर हा पोपट मी देऊ शकतो.” तो म्हणाला.

“महाराज! जर आज्ञा असेल तर मी काही बोलू शकतो?” रामाने विचारलं.

“बोला पंडित रामाकृष्णा.” राजाने संमती दिली.

रामा उठून पुढे आला आणि बोलू लागला; “क्षमा करा महाराज पण तुम्हाला असे वाटत नाही का? की, हे जी धनराशी या पोपटासाठी मागत आहेत ती जरा जास्त पेक्षाही जास्त आहे.”

“तेच तर! तेच तर. सगळा खेळ दृष्टीचा आहे सल्लागार महोदय. कारण महाराज ज्या दूर दृष्टीने हा पोपट घेण्याचा विचार करत आहेत त्या दृष्टीने आम्हीही पाहू शकतोय. उद्या या पोपटाला अजून विशेष प्रशिक्षण दिले गेले तर युद्धात शत्रू पक्षाची योजना आधीच कळून येईल. याशिवाय शमशेर खान त्यांच्या उपजीविकेचे साधन देत आहेत म्हणल्यावर एवढी धनराशी तर देणे होतेच. आम्ही तर म्हणतो पाच लाख सुवर्ण मुद्रा देखील कमीच आहेत.” आचार्य म्हणाला.

“परंतु आचार्य..” रामा बोलत होता पण त्याला तोडत आचार्य पुन्हा बोलू लागला; “काय किंतू, परंतु? या विलक्षण पोपटासमोर पाच लाख सुवर्ण मुद्रा देखील कमीच आहेत.”

“महामंत्री जी! राज कोषातून पाच लाख सुवर्ण मुद्रा मागवण्यात याव्यात आणि यांना त्यांच्या पोपटाची किंमत देण्यात यावी.” राजा म्हणाला.

“महाराज पण…” महामंत्री बोलत होते पण त्यांना तोडत राजा बोलू लागला; “जे सांगितलं आहे ते करा मंत्रीवर.”

“परंतु महाराज…” रामा बोलत होता पण त्याला तोडत आचार्य बोलू लागला; “हे काय आहे सल्लागार महोदय! सकाळी घरातून निघताना किती किंतु परंतु सोबत घेऊन निघता? नक्की समस्या काय आहे तुमची?” आचार्य म्हणाला.

“क्षमा करा आचार्य. क्षमा करा महाराज पण कोणी बाजारात साधा चार आण्याचा खुळखुळा जरी घ्यायला गेला तरीही तो चार वेळा वाजवून बघतो. इथे तर पाच लाख सुवर्ण मुद्रांची गोष्ट आहे. माझे म्हणणे फक्त एवढेच आहे की, एक दोन दिवस थांबून जरा पहावे. जर त्यानंतरही या पोपटाचे वैशिष्ट्य असेच राहिले तर जसे महाबली सम्राट उचित समजतील तसे व्हावे.” रामा म्हणाला.

“आम्हीही या गोष्टीशी सहमत आहोत.” महामंत्री म्हणाले.

“आचार्यवर! तुमचे याविषयी काय मत आहे?” राजाने विचारलं.

“हे बघा महाराज….” आचार्य बोलता बोलता अचानक वरमला आणि बोलू लागला; “काहीच समस्या नाहीये महाराज. बघूया दोन दिवसांनी. महाराज! आमची तुम्हाला विनंती आहे की जर महाराजांची परवानगी असेल तर आम्ही शमशेर खानना आमचे अतिथी म्हणून दोन दिवस आमच्या घरी घेऊन जाऊ इच्छितो आणि या दोन दिवसात पोपटाची प्रतिभाही पारखून घेतो.”

“चालेल. तुम्ही स्वतः सर्व पारखणार असाल तर आमची चिंताच मिटेल. शमशेर खान! तुम्हाला काही आपत्ती नाही ना यात?” राजा म्हणाला.

“जो हुकूम महाराज.” तो म्हणाला.

“हे सर्व काय सुरू आहे रामा? आज तर या पोपटाने तुझ्या सर्व मानाच्या चिंधड्या उडवल्या.” बंधू म्हणाली.

“तो प्रश्नच नाहीये बंधू. खरा प्रश्न तर तो आचार्यबद्दल चांगलं कसा बोलला हा आहे. काहीतरी गडबड नक्कीच आहे.” रामा म्हणाला.

“पण काय रामा?” बंधू म्हणाली.

रामा शमशेर खानकडे बघत विचार करू लागला.