Login

"सृजनाचा सोहळा"

Juni bandana totat babani aiechi jaga ghetali ani srujanacha ya sohalalya vishasane aplese kele.
"सृजनाचा सोहळा"
​आई परदेशी अन् बाबा झाले आई!
​माझ्या नोकरीच्या स्वरूपामुळे माझे अनेकदा परदेशी दौरे असतात. आजही मी ऑफिसच्या कामासाठी परदेशात होते.
माझा नवरा घरचा व्याप आणि त्याची व्यस्त जीवनशैली असूनही सगळं मस्त सांभाळून घेतो. तो मला सतत प्रोत्साहन देतो, म्हणूनच मी निर्धास्तपणे माझे करिअर करू शकते.
​पण आजची घटना मनाला स्पर्शून जाणारी होती.
सकाळीच लेकीचा फोन आला. तिचा तो रडवेला आणि गोंधळलेला आवाज ऐकून काळजात धस्स झालं.
मी काळजीपोटी विचारलं, "अगं काय झालं?" लेक रडत रडत म्हणाली, "आई, आज तू इथे हवी आहेस. मला पिरियड्स सुरू झालेत, हे सगळं मी कशी हँडल करू?"परत क्षणभर आईच्या काळजीनं काळजात धस्स झाले.
​तिचा तो प्रश्न ऐकून क्षणभर मला माझा जुना काळ आठवला. अचानक तो 'लाल रंग' दिसला की उडालेली माझी तारांबळ, भीतीपोटी कोपऱ्यात बसणं पालथा तांब्या चार दिवस वेगळे बसणं आणि माझ्या आईने कपाळाला हात लावून 'आता कटकट सुरू झाली' अशा नजरेने पाहणं. बाबांना यातलं काहीच कळू न देणे. पुरूषांना असल्या गोष्टी पासून दुर ठेवणं. इ.
पण मी मनात पक्कं ठरवलं होतं, माझ्या लेकीला हा अनुभव वेगळा द्यायचा.तिला विश्वास द्यायचा.
​लेक पुढे म्हणाली, "आई, खूप पोट दुखतंय गं! शाळेत याबद्दल धडे मिळालेत, पण आता प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा भीती वाटतेय. तू जवळ नाहीस. आता बाबांना कसं सांगायचं?"
मी तिला शांत केलं आणि धीर दिला, "अगं, बाबा तर तुझा 'टेडी' आहे, तो तुझा बेस्ट फ्रेंड आहे. बघ तो परिस्थिती कशी हँडल करतो!"
​मी लगेच पतीराजांना फोन लावला आणि परिस्थिती सांगितली,
"लेकीला आज तिच्या बाबा नामक 'टेडी'ची गरज आहे. माझ्या जागी आता तुम्हालाच तिची आई बनावं लागेल."
सुरुवातीला तो थोडा भांबावला, पण लगेच परिस्थितीचं गांभीर्य ओळखून त्यांनी ऑफिसला रजा टाकली आणि परीस्थितीला सामोरे जायला सज्ज झाला.
मी फोनवरून त्यांना सूचना दिली. ऐक "माझ्या कपाटात पॅड्स आहेत खालच्या कप्प्यात ते गुपचूप कसलाही गाजावाजा न करता तिच्या कपड्यांत गुंडाळून तिला नेऊन दे."
तिला बाथरूम मध्ये जायला सांग आणि मला बाथरूम मधून फोन करायला सांग, बाथरूम मधील परिस्थिती मी हॅंडल करते.
तु बाहेरचे सगळे सांभाळून घे. ​बाबांनी खरोखरच कंबर कसली! ते हळुवार तिच्या रूममध्ये गेले आणि म्हणाले, "बबडे, आई नाही म्हणून काय झालं, तुझे बाबा आहेत ना!"
"हे घे तुझं कपडे बाथरूम मध्ये जा. आई समजून सांगेल तुला. मी बाहेर आहेच काही लागले तर आवाज दे!"
त्यांनी बेडची चादर बदलून व्यवस्थीत मशीनला लावली.दुसरी चादर टाकून उशाशी तिचा आवडता टेडी ठेवला.पोट शेकण्यासाठी गरम पाण्याची पिशवी तयार ठेवली.
मधून मधून बबडे बबडे म्हणत तिला धीर देणं चालूच होते. काही लागले तर सांग हं मी बाहेर आहे म्हणत होता.
हे सगळं बघून आमचा छोटा
आरव थोडा भांबावला, पण "ताईला बरं नाही का? मी पण मदत करतो," म्हणत तो आपला खेळण्यांचा पसारा आवरू लागला.
बाबांनी लेकीच्या आयुष्यातील बदलाचा स्विकार करण्यासाठी लेकीसाठी गोडाचा शिराही बनवला.आई आणि युट्यूबची मदत घेऊन.
लेकीचा आत्मविश्वास वाढावा म्हणून त्यांनी स्वतःहाला पुर्ण पणे झोकून दिले होते. लेकीला आता बाबांत आईच दिसू लागली.थोड्या वेळाने परीनं फोन आला.
थोड्या वेळापूर्वी अस्वस्थ असलेली परी आता ती आनंदाने सांगू लागली.
"आई आज बाबांना हे सगळे कसे सांगायचे याची मला लाज वाटत होती.
" पण बाबांनी आज तुझी उणीव भासू दिली नाही.आज त्यांनी माझ्यासाठी काय नाही केले!" म्हणत परी पुन्हा रडायला लागली.
बाबांनी परत तितक्याच मायेनं तिला जवळ घेतले. 'ये पापा कि परी' म्हणत तिच्या कपाळाचे चुंबन घेतले. आई आरवने पण खुप मदत केली.
" रात्री पुन्हा लेकीचा फोन आला, तेव्हा तिच्या हातात बाबांनी बनवलेलं गरमागरम वाफाळलेलं सूप होतं आणि चेहऱ्यावर एक निवांत हसू होतं.परत परत म्हणत होती." आई थॅंक्स बाबांनी इतके इझी करून टाकले की, मला आता संकोच वाटत नाहीये. उलट मला बाबांच्या वर प्राऊड फिल होतोय!"
निसर्गानं स्त्रीच्या पदरात घातलेले मातृत्व निर्मितीचं हे देणं ती किती समर्थपणे स्विकारतेय, हे पाहून आभिमान वाटला.
तंत्रज्ञान आणि मोकळ्या वातावरणामुळे ही मुले आज बिनधास्त झाली आहेत. विचारातच मी फोन खाली ठेवला.
त्यानंतर मी माझ्या आईला (लेकीच्या आजीला) फोन लावला आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. तिला सांगितलं की, कसं आज तिच्या जावयाने आईची भूमिका बजावली आणि लेकीला या बदलात साथ दिली.
पण माझी आई मात्र आजही जुन्याच विचारांनी आणि काळजीने धास्तावली होती. ती हळहळत म्हणाली, "स्त्रीची या कटकटीतून मुक्तता नाहीच गं, आता तिचेही तेच दिवस सुरू झाले..."असे म्हणत होती. पण माझ्यातील 'नव्या रूपातील आई मात्र हा बदल स्विकारायला सज्ज झाली होती.
तिच्या बोलण्यात आजही ती जुनी धास्ती होती, पण मी तिला समजावलं, "आई, काळ बदललाय.आज वडील स्वतः मुलीला या काळात आधार देत आहेत, त्यामुळे मुलीचा आत्मविश्वास वाढतोय."
माझ्या अनुपस्थितीत 'आई'ची भूमिका निभावणारा माझा नवरा खंबीरपणे पाठीशी होता, म्हणूनच आज मी परदेशात असूनही ताठपणे मीटिंगला सामोरी जाऊ शकले.म्हणतात ना एका कर्तव्यनिष्ठ पुरूषाच्या मागे स्त्री असते.
पण मी तर म्हणेन माझ्या मागे माझा नवरा खंबीरपणे उभा आहे. जो माझ्या अनुपस्थितीत आईची भुमिका उत्तमरीत्या निभावून नेतो. म्हणून मी देखील कर्तव्यनिष्ठ स्त्री म्हणून समाजात वावरू शकते.
आज मला जाणीव झाली की जेंव्हा वडील आपल्या मुलीला या काळात आधार देतात, तेंव्हा त्या मुलीचा आत्मविश्वास कित्येक पटीने वाढतो. सृजनाचा हा सोहळा आता भीतीचा नाही तर आभिमानाचा झालाय.
निसर्गाचं हे देणं माझ्या लेकीनं माझ्या अनुपस्थितीत घरातल्या पुरूषांसमवेत कसलेही भय न बाळगता ज्या सहजतेने स्विकारली, ते पाहून माझा ऊर भरून आला.
​©️®️ सौ. उज्वला रवींद्र राहणे
0

🎭 Series Post

View all