Login

एसटीतील भांडण भाग -३अंतिम

बसमधील भांडणाच्या गमती जमती
जलद कथालेखन स्पर्धा नोव्हेंबर 2025
विषय - तोंड दाबून मुक्क्यांचा मार

एसटीतलं भांडण
भाग -३ अंतिम

तेवढ्यात...
बस थांबली. बसला जो जोरदार हिसका बसला होता तो गाडी पंचर झाल्यामुळेच बसला होता.पण...

कंडक्टर ड्रायव्हरचे आपापसात बोलणे झाले नंतर ड्रायव्हर काही अवजारे घेऊन खाली उतरला.
कंडक्टर गाडीतच होता.
त्या बाईने पाच मिनिट वाट पाहिली अन् पुन्हा आपला कल्ला हल्ला सुरू केला.

"काय हो कंडक्टर साहेब, आधीच ही जीवघेणी गर्मी त्यात ही खचाखच भरलेली बस श्वास घ्यायला जागा नाही .त्यात केव्हाची उभी आहे मी. बस का बरं थांबवून ठेवलीत? करा ना सुरू पटकन."

कंडक्टर आधी चिडलेला होता तो बसमधून उतरता उतरता म्हणाला,
"मला कशाला ज्ञान शिकवता तुम्हीच बघा ना सुरु करून. आम्हाला काय हौस आली मध्येच बस उभी करून ठेवण्याची."

थोडा वेळ वाट बघून शेवटी सगळे पॅसेंजर खाली उतरवले. दहा मिनिट, पंधरा मिनिट करता करता एक तास निघून गेला‌. पण बस दुरुस्त होण्याची चिन्हे काही दिसेनात .
शेवटी ड्रायव्हर कंडक्टर मिळून निर्णय घेतला हे पॅसेंजर्स दुसऱ्या गाडीत बसवून देण्याचा.

येणारी प्रत्येक गाडी भरूनच येत होती .शेवटी दोन दोन चार चार पॅसेंजर एक एका गाडीत कंडक्टर बसवून देत होता.

त्यात या बाईची टणटण सुरू," माझा पहिला नंबर लावा मी उभी राहून थकले माझे पाय दुखतायेत."

कंडक्टरलाही ते मोफत मनोरंजन कदाचित आवडलं असेल त्यानेही तिचा नंबर जवळजवळ शेवटीच लावला.

त्यात जवळपास एक तास निघून गेला होता.
आता हाश्य हुश्य करत ती बाई बस मध्ये चढली.

पुन्हा सीट काही मिळेना.
तिचा कलकलाट सुरू झाला.
दोघा तिघांना जागेसाठी म्हणून झाले त्यांच्याशी हुज्जत बाजी घालून झाली.

पण हा कंडक्टर काही ऐकणाऱ्यातला नव्हता.
त्याने तंबीच दिली,
"ही बस आधीच पूर्ण भरून आलेली आहे. त्या पंक्चर बस मधले प्रवासी ह्यात सामावून घ्यायचे म्हणून आम्ही तुम्हाला आत मध्ये घेतले. गुपचूप उभे रहा. प्रेमाने जागा मिळत असेल तर बसा .नाहीतर आताही तुम्हाला गाडीच्या खाली उतरवून देतो."

तिने जास्तच बोलायला सुरुवात करताच कंडक्टरने शेवटी तिला खाली उतरवले मागच्या गाडीत जागा आहे त्यात या म्हणत.
आता पंचर गाडीच्या कंडक्टरने डोक्यावरच हात मारला.

एक एक करत गाडी येत होती आणि जात होती बाईला काही जागा मिळाली नाही.
कंडक्टर थकला होता आता त्यांनी गाडीला हातच दाखवला नाही.

पुन्हा ती कमरेवर हात देवून सज्ज.
"तुमची कंप्लेंट नोंदवते .कसे प्रवाश्यांना त्रास देतात ते."

काय आश्चर्य तिने असे म्हटले आणि बस सुरू झाली.

कंडक्टर ड्रायव्हर त्या बाईला बसमध्ये बसवून घेऊन पुढच्या प्रवासाला निघाले.आता पुर्ण बसच तिच्यासाठी रिकामी होती.

समाप्त
©®शरयू महाजन
0

🎭 Series Post

View all