स्टेटस:- भाग अंतिम
समुद्राच्या लाटांच्या आवाजाच्या सानिध्यात, वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळूक येऊन हलणारा आणि दिमाखदार सूर्यप्रकाश असलेल्या त्या जागेवर एक रेशमी शामियाना बांधला होता.
गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या या शामियानाच्या बरोबर मध्यभागी होमकुंड होते आणि त्या होमकुंडामध्ये अग्नीचे सौम्य अस्तित्व जाणवत होतं.
अग्नी त्या तिथल्या लोकांवर प्रसन्न होता कारण त्या अग्नीचा धूर कुठेही पसरला नव्हता.
दोन गुरुजी दोन्ही बाजूला बसून त्या होमकुंडात तुपाची धार सोडत होते त्या अग्नीला अतिशय उत्तम प्रकारे मंत्रोच्चार च्या साहाय्याने अजून प्रसन्न करून घेत होते. काही देखणे विधी तिथे संपन्न होत होते आणि सौंदर्याचा देखणा जोडा असलेले शिवांगी आणि अर्णव शास्त्रोक्त पद्धतीने त्या विधींना पार पाडत होते.
त्यांच्या समोरच छान सोफ्याची अरेंजमेंट केली होती आणि त्याच्या बाजूला काही लोक हातामध्ये काही थाळी पदके घेऊन उभे होते.
तिथे सगळे मिळून 25 लोक सुद्धा नसावेत पण लांबून जरी कोणी पाहिले तर जाणवेल की इथे काहीतरी मोठी गोष्ट सुरू आहे.
महाबलीपुरामच्या सी शोर टेम्पल च्या बरोबर बाजूला भगवंताच्या साक्षीने आणि पंचमहाभूतांच्या तत्वाच्या सानिध्यात आज अर्णव आणि शिवांगी चा विवाह सोहळा संपन्न होत होता.
ठरल्याप्रमाणे साध्या तरीही उत्तम प्रकारे आणि कशाची कमतरता नसलेल्या या विवाहमध्ये खास सगळे जण मुंबई हुन इथे पोहचले होते.
आज या सगळ्या लोकांचे सिक्युरिटी गार्डसुद्धा महाबलीपुरामच्या पार्किंग पाशी होते, कारण या विवाहात मोजून आणि ठरवलेलीच माणसे होती.
सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होतीच पण विशेष म्हणजे अर्णव आणि शिवांगी यांच्या चेहऱ्यावरचे तेज काही आज लपत नव्हते.
सगळे विधी उत्तम झाल्यावर लग्न मुहूर्ताच्या वेळी सगळेजण उभे राहिले. असंख्य गुलाबाच्या फुलांनी तयार केलेला आणि त्यात सोबत असलेल्या छानशा सोनेरी कांकणांनी सिद्ध असलेला मोठा हार दोघांच्या हातात देण्यात आला.
मुहूर्ताच्या वेळेस जसे " तदैव लग्नम सृजनंत देव" हा श्लोक म्हणून "शुभमंगल सावधान" असे म्हणण्यात आले त्यानंतर सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्या नवीन जोडप्याचे स्वागत आणि अभिनंदन केले.
जसे शिवांगी ने अर्णव ला हार घालायचा प्रयत्न केला तसे अलगदपणे अर्णव ला त्याचा छोटा भाऊ अर्जित आणि त्याचा काका यांनी हसत मजेमध्ये उचलले.
ते पाहून शिवांगीच्या दादाने तिला अर्णवच्या उंची एवढे उचलले.
अर्णव ने सुद्धा हार घालताना अजिबात मान खाली केली नाही ते बघुन शिवांगी ने सुद्धा तसेच आणि तसेच ताठ मान ठेऊन हार घालून घेतला.
आणि त्या दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. सिंघनिया आणि बजाज फॅमिली आज खऱ्या अर्थाने एकत्र झाल्या होत्या.
म्हणल्याप्रमाणे अतिशय सात्विकता असलेले हे लग्न तेवढ्याच साध्या पद्धतीने पण संपूर्ण शास्त्रोक्त विधिवत पार पडले होते.
आज सगळ्याच्या चेहऱ्यावर विलसत असलेले समाधान आनंदाची एक वेगळीच जाणीव करून देत होते आणि या जाणिवेच्या पलीकडे होते एक आत्मिक सुख!
शिवांगी आणि अर्णव दोघेही इतक्या सुंदर पेहरावमध्ये होते की त्यांच्यावरून नजर हटत नव्हती.
सुंदर अश्या धोतर आणि सोनेरी काठाच्या उपरणे मध्ये असलेला अर्णव आणि पांढऱ्या शुभ्र रंगाची सोनेरी काठ असलेली साडी घालून शिवांगी दोघेही राजबिंडे दिसत होती.
लग्न जरी सध्या पद्धतीने असले तरी लग्न हे कुठल्या राजघरण्याच्या पेक्षा कमी नव्हते करण प्रत्येकाच्या चेहऱ्यावर असलेली खानदानी श्रीमंती ही कुठेच लपत नव्हती.
मुहूर्ताच्या लग्नानंतर जेव्हा गमती जमती झाल्या त्यावेळी सगळ्यांनी हसत सोहळा एन्जॉय केला. डोळ्यांचं पूर्ण फेडणारा सोहळा जरी सगळ्यांच्या मनात असला तरी तिथे आल्यावर महाबलीपुरामच्या पवित्र सानिध्या मध्ये सगळेचजण या आनंदात मनापासून शामिल झाले होते.
जेवणाची उत्तम सोय तिथेच जवळच केली गेली होती.
जेवणामध्ये कुठलाही शाही थाट नसताना तिथल्याच अन्नपदार्थ बनवणाऱ्या लोकांना सांगून स्पेशल भात, रस्सम, कैरीची चटणी, त्यासोबत बटाटा दही भाजी, पापड, लोणचे, ताक आणि मैसूर पाक असा साधा मेनू होता.
केळ्याच्या मोठ्या पानांवर हा मेनू वाढल्यावरअर्णव तिथल्या लोकांसारखा रस्सम आणि भात याचे गोळे करून खात होता. त्याला पाहून सगळे हसत पण होते आणि त्यांनी तसा खायचा प्रयत्न केला तर त्यांना जमत नव्हते.
अर्णव म्हणाला, "असे एक्सपर्ट होण्यासाठी चेन्नई ला यावे लागते"
यावर सगळे हसले.
विधी, जेवण आणि ईतर सगळं व्यवस्थित पार पडल्यावर अर्णव ने सगळ्यांना जमवले आणि सांगितले की,
"मला काही अनाऊन्ससमेंट करायची आहे"
सगळे त्याच्याकडे पाहत असताना तो म्हणाला,
"हा समुद्र, हा अग्नी, ही पृथ्वी, हे आकाश, हा देव आणि तुम्ही सगळे यांच्या आशीर्वादाने मी आणि शिवांगी आमच्या नव्या जीवनाची सुरुवात करत आहोत. तुम्ही आमची विनंती ऐकून आमचे लग्न साध्या पध्दतीने करून दिले त्याकरिता मनापासून धन्यवाद.
तुम्ही आम्हाला जे 100 कोटी दिले आहेत या पैस्यासाठी आम्ही काही ठरवले आहे."
अर्णव ने फोन करून त्याच्या सेक्रेटरी ला बोलावले, तो जसा आत आला तसे त्याच्या हातात एक मखमली पॅकेट आणि त्यावर एक सॅटिन रिबीन होती.
त्याने त्याच्या आणि शिवांगी च्या वडिलांना एकत्र बोलावले आणि त्यांच्या हातात ते पॅकेट दिले आणि सांगितले की तुम्ही ही रिबीन उघडा.
जशी ती रिबीन त्या दोघांनी उघडली तसे त्यातून गोल्डन आवरणात असलेली एक फाईल दिसली ज्यावर लिहिले होते, 'सिंघनिया बजाज फाउंडेशन'.
अर्णव ने सांगितले "बाबा, कृपा करून या फाईल मध्ये काय आहे हे वाचून दाखवा."
तसे अर्णव च्या वडिलांनी ते पेपर्स वाचायला घेतले.
" आज सिंघनिया बजाज फाउंडेशन या नव्या संकल्पनेची स्थापना होत आहे ज्या मार्फत अनेक लोकोउलपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
या फौंडेशन तर्फे दर वर्षी 5000 लोकांचे सामुदायिक विवाह सोहळे संपन्न करण्यात येतील.
तसेच महाबलीपुराम जवळ एक वृद्धाश्रम बनवायचे ज्यात निराधार, गरजू लोकांना आजन्म मोफत सोयसुविधा असेल.
त्याच बरोबर अनाथ मुलांसाठी एक अनाथालय जे चेन्नई च्या आउटसकर्ट्स वर म्हणजेच ईस्ट कोस्ट रोड वर करण्याचा प्लॅन आहे.
त्याच बरोबरोबर मुंबई, बंगलोर, हैद्राबाद, त्रिवेंद्रम, अहमदाबाद इथे या फाउंडेशन एक युनिट काम करतील ज्या मार्फत दरवर्षी 10000 विद्यार्थ्यांना शिक्षण आणि 2000 विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिप देण्यात येतील.
दरवर्षी अनेक विविध कार्यक्रमामार्फत नवीन रोजगार स्थापन करण्यासाठी हे फौंडेशन काम करेल.
अपघातग्रस्ताना रक्कम दिली जाईल आणि गरिबांना नोकरीसाठी प्राधान्य दिले जाईल.
त्या प्रत्येक गरजू व्यक्ती ला मदत केली जाईल जो त्याच्या फॅमिलीचा कर्ता पुरुष असेल. सिंघानिया बजाज फौंडेशन हे त्यात असणारी सर्व रक्कम ही समाजासाठी खर्च करेल"
तो आलेख वाचताना अर्णव च्या वडिलांचे डोळे पाणावले आणि आवाज जड झाला.
शिवांगी च्या वडिलांनीसुद्धा अर्णव कडे अभिमानाने पाहून मान डोलावली.
संपूर्ण आलेख वाचून झाल्यावर सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिले आणि सगळेच निशब्द झाले होते.
आज स्वतःचा स्टेटस सोडून साध्या पद्धतीने लग्न करून अर्णव आणि शिवांगी ने जी मुहूर्तमेढ रोवली होती त्यावर बोलण्याकरिता कोणाकडे शब्दच नव्हते.
अर्णव च्या वडिलांनी जवळ येऊन त्याच्या पाठीवर हात ठेवून " जिंकलस! तू सर्व काही जिंकलस" इतकेच ते बोलू शकले इतका त्यांचा आवाज भरून आला होता.
आज अर्णवच्या या वागण्याने सगळ्यांचा 'स्टेटसचा' कोट पूर्णपणे हरला होता आणि त्याच्या ऐवजी माणुसकीचा सदरा आनंदाने जिंकत होता.
अर्णव आणि शिवांगी ने सगळ्यांचे आशीर्वाद घेतले.
तिथल्याच एका दगडाला हातात घेऊन अर्णव शिवांगीबरोबर समुद्रापाशी आला.
तो दगड हातात ठेऊन त्याने प्रार्थना केली आणि त्या दगडाला समुद्रात स्नान घालून तो दगड जवळ ठेवला. हा सिंघानिया बजाज फाउंडेशन चा दगड असणार होता जो महाबलीपुरम येथून रोवल्या जाणार होता.
त्या दोघांनी एकमेकांच्या हातात हात गुंफले आणि ते निघाले अश्या प्रवासाला जिथे स्टेटस पेक्षाही संपूर्णता, समाधान आणि आनंद हे कायमस्वरूपी नांदणार होते.
समाप्त!
©®अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा