Login

कथा - ऑनलाईन भाग 4

अनोखी प्रेमकथा...
कथामालिका भाग - 4
कथा - ऑनलाईन
लेखक - प्रा. प्रमोद जगताप

“हॅलो ! पराग उद्या निघातोयस ना इकडं यायला ?”
“हो येतोय लवकरच निघतो सकाळी.” परागने संध्याला उत्तर देत सांगितलं.
“अरे अनुराग पण कंपनीच्या कामानिमित्त बाहेर गेलेत चार दिवसासाठी ! नक्की ये रे वाट पाहतेय मी तुझी.”
अस बोलत फोन कट केला. चला आता उद्या लवकर निघायचय म्हणत परागने गाडीला किक मारली...
कानाशेजारी वाजणारा पाचचा आलार्म ऐकून पराग डोळे चोळत जागा झाला. अंगावरची वाकळ
पायानं झिडकारत पायत्याला लावली. पण अर्लाम वाजला म्हणून जागा झालेला पराग अजूनही पेंगतच होता. रात्री झोपायला झालेला उशीर त्याच्या बंद डोळ्यांत खोल रूजलेला असतानाही झोपेची झालर बाजूला सारून तो पुन्हा डोळे चोळत उठून बसला. साडेसातची मुंबई एक्सप्रेस पकडायची म्हणजे लवकर तर उठाव लागणारंच होतं अंधारात चाचपडत ब्रशवर कॉलगेट घेऊन पराग बाथरूममध्ये शिरला. गार पाण्याचे दोन तीन मग अंगावर घेतले तोपर्यंत तर बाहेर फोन वाजू लागला. घाई-गडबडीत आंघोळ उरकून टॉवेलवरच बाहेर येत परागने मोबाईल घेतला. संध्याचा आलेला कॉल पाहून हरवलेला पराग तिच्या विचारातच बॅग भरू लागला. दोन दिवस राहायच्या बेतानं तो सर्व सामान भरत होता. चार्जिंगला लावलेला मोबाईल घेत आईच्या उशाशी थांबून पराग आईला बोलत होता.
“मी दोन दिवसांत परत येईल, कामानिमित्त पुण्याला चाललोय; कुठे ? म्हणून मोडता काय घालू नकोस.”
रागानं कपाळाभर आट्या आलेल्या असूनही सकाळ सकाळ सुरूवात कशाला म्हणून आई गप्पच राहिली.
“तरी वाटलंच हुतं ! तुझी उरका-उरकी बघून, पर बघू पुन्हा घरला आल्याव जा आता गुमानं.”
हे आईच वाक्य कानावर पडताच परागने काढता पाय घेतला. सकाळची वेळ म्हणून वादळं थांबलयं असं म्हणत अंगण सोडलं. पाठीवरची बॅग सावरत स्टेशनच्या रस्त्याने चालत निघाला.पाठीमागून येणा-या रिक्षाला हात करून थांबवत होता, पण रिक्षा काही केल्या थांबतं नव्हत्या. अवघ्या दोन किलोमीटरचं अंतर पण घाई गडबडीत चालणं काय उरकत नव्हतं. पाऊले पुढे चालत होती पण रिक्षाची ओढीन मान मात्र सारखी मागे जात होती. आता स्टेशन हाकेच्या अंतरावरं आलं होतं. स्टेशनवरची अनाउसमेंट अगदी स्पष्ट ऐकू येत होती.
“कोल्हापूर से मुंबई सी.एस.टी.जानेवाली सह्याद्री एक्सप्रेस अपनी निर्धारित समय सात बजकर पैतीस मिनिट की गाडी बीस मिनिट देरी से चल रही है| यात्रीयोको होनेवाली असुविधा पर हमे खेद है।“
तसा परागने मोठा श्वास घेऊन आपला मोर्चा स्टेशनवर वळवला. तिकीट जनरलचच पण ऑनलाईन काढलं होतं. उग सकाळ सकाळी गडबड कशाला. घड्याळात पाहिलं तर सात वाजून वीस मिनिट झाली होती; म्हणजे गाडी यायला अजून अर्धा तास बाकी आहे. तेव्हा सारं कसं शिस्तीत झालं पाहिजे. असं म्हणतं फलाटवर येऊन थांबला. तेवढयात एक हलकाच स्पर्श झाला. ती तरूणी खूपच घाईत होती. तिने आपली बॅग ओढत काही अंतर मागे टाकले, पण परागची नजर तिच्या पावलांचा वेध घेत अजूनही पुढेच जात होती. अर्धा तास वेळ घालवायचा म्हणजे स्टेशनवर काही अवघड नसतय हे पक्के ठाऊक असलेला. पराग डोळ्याच्या कॅमेर-यात हरएक दृश्य टिपत होता. विविध रंगाची फुलं बागडताना तो मनमुराद पहात होता. तेवढयात पुन्हा एकदा घोषणा झाली.
“गाडी नंबर दो...चार...चार...झिरो...सात...सह्याद्री एक्सप्रेस फ्लॅटफार्म नंबर दो पर आ रही है|”
पुन्हा भानावर येत पराग आपला जनरल डब्याकडे जात होता. सकाळची ट्रेन होती तरीही दारातून कसाबसा आत घुसला. विक्रेत्याची गर्दी आणि गोंगाट आता जरा कमी झाला होता. पराग आपला दारातच उभा राहिलेला. गाडीन माहुली स्टेशन कधीच मागं टाकलं होतं. मुंबईच्या दिशेने आता गाडीनं चांगलाच वेग धरला होता. पुन्हा मान आत घेत गाडीत स्थिर होत परागने संपूर्ण डब्यात नजर फिरवली. जागा मिळेल तिथे बसून जाणारी जनता दिसत होती.
.
.
.
.
क्रमशः
भेटूयात पुढील भागात रविवारी
@प्र. प्रमोद जगताप फलटणकर
संवाद 8554857252


0

🎭 Series Post

View all