Login

जिंकलेल्या प्रेमाची गोष्ट..भाग -१

उपकाराच्या ओझ्यामुळे लग्नाच्या बेडीत अडकलेली रमा अखेर राघवच्या जिंकलेल्या प्रेमाची साक्षीदार कशी झाली जाणून घ्यायला उत्सुक असाल तर माझी कथा नक्की वाचा जिंकलेल्या प्रेमाची गोष्ट
भाग -१

"आई मला हे बाळ नकोय." रमा चिडून म्हणाली.

"काय ! अगं वेडी झालीस का रमा तू ? हे बोलणं शोभतं का तुला ? तुझ्या आणि राघवच्या प्रेमाचं प्रतीक आहे हे बाळ." आईचाही आवाज वाढला होता.


"कसलं प्रेम आणि कसलं काय ? आजवर कोणती तरी गोष्ट माझ्या मनाप्रमाणे झाली का  आपल्या घरात ? इव्हन माझं नाव सुद्धा रमा ठेवलं कारण त्याचं नाव राघव ठेवलं होतं म्हणून. त्याच्या मेलेल्या आईच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किती तो तुमचा अट्टाहास ? आणि इथे जिवंत असलेल्या माझ्या भावनांची कसलीच पर्वा नाही तुम्हाला."

"रमा अगं ,काय वाईट झाले तुझे रमा नाव ठेवले तर. असे कसे काहीही बोलतेस तू ? तुझ्या भावनांची आम्हाला पर्वा नाही असे पुन्हा पुन्हा बोलून ,आतापर्यंत तोच तो  विषय काढून स्वतःला आणि इतरांनाही त्रास देऊ नकोस. आजवर तुझे बिनबुडाचे आरोप ऐकून घेतले पण राघव सारखा इतका प्रेमळ नवरा भेटलेला असतानाही त्याची तुला जराही किंमत नाही याचे वाईट वाटतेय. आणि अगं ही गोष्ट जर बाबांना समजली तर काय होईल ?" आई

"लहान आहे का मी आई ? माझे निर्णय मी स्वतः घेऊ शकते ना ? माझा जन्म फक्त बाबांच्या हातातली आणि आता त्या राघवच्या हातातली कटपुतली बनून राहण्यासाठीच झाला आहे का ?" रमा.


"हेच ऐकण्यासाठी तू मला इथं बोलावलंस का ? तुला हेच बोलायचं असेल तर निघते मी." आई.


तितक्यात राघवने डोअर नॉक करत स्वतःच्याच खोलीत प्रवेश केला. त्याने रमाचे सर्व बोलणे ऐकले होते.

तो रमाला म्हणाला , "माझ्या मेलेल्या आईची इच्छा होती म्हणून मी तुझ्याशी लग्नगाठ बांधली असली तरी रमा लहानपणापासून माझे तुझ्यावर मनापासून प्रेम होते आणि त्याचमुळे मी तुझ्याशी लग्न केले पण सॉरी ! तुला मात्र सगळ्यांनी गृहीत धरले हे माझ्या उशीरा लक्षात आले. इतकच काय तुझ्या मनाविरुद्ध अनेक गोष्टी मी ही केल्या आहेत त्याची शिक्षा मला भोगायला हवी. पण माझे एक ऐकशील ? या सगळ्यात त्या निष्पाप बाळाचा काहीच दोष नाही तर तू त्याला नको ना शिक्षा देऊस. हवं तर तू हे मंगळसूत्र , ही जोडवी आणि ही टिकलीही नाही लावली तरी चालेल पण माझ्या बाळाला या जगात येऊ देत. राघवचा कंठ दाटून आला होता. मी तुला वचन देतो की , बाळ जन्माला आल्यानंतर काही तासातच मी तुला या बंधनातून कायमचा मुक्त करेल. विश्वास आहे ना तुझा माझ्यावर ?" राघव आतून पूर्णतः तुटला होता. मोठी हिंमत एकवटून तो हे सगळे बोलत होता.


रमाच्या आईचे डोळे विस्फारले होते. राघव हे काय बोलतोय म्हणून त्या राघवला काही बोलणार

तोच रमा म्हणाली , "आणि बाबांचं काय ?"


"त्यांनाही कसं समजवायचं ते मी पाहीन. गेल्या वर्षभरात तुझ्या विश्वासास पात्र होण्याइतकी तरी आपली मैत्री झाली याचा आनंद वाटला. बाकी आजपासून माझी बायको म्हणून तुझ्यावर कुठलीही जबाबदारी नसेल." असे म्हणून राघव तिथून निघून गेला.


राघव पाठोपाठ शालिनीताईही जड अंतःकरणाने तिथून निघून गेल्या.

रमा मात्र आता फक्त त्या नऊ महिन्यांचा कालावधी कधी संपणार आणि ती पूर्वीप्रमाणे स्वछंदी जीवन कशी जगणार या विचाराने अगदी आनंदी झाली.

***************


राघव रमाच्या खोलीतून थेट आईच्या खोलीत तिच्या फोटोजवळ गेला. त्याने इतका वेळ दाबून ठेवलेला हुंदका बाहेर आला. आज तो अगदी मनसोक्त रडत होता. नेहमीप्रमाणे त्याच्या पाठोपाठ येणारे बाबाही घरी नसल्याने आज त्याला अडवणारं , त्याच्या अश्रूंवर फुंकर घालणारं  कोणीच नव्हतं. आज आईच्या खोलीत त्याच्या   आईशी तो मनमोकळ्या गप्पा मारणार होता. तिला त्याच्या फसलेल्या प्रेमाची गोष्ट सांगणार होता.


"आई मी हरलो गं आज. माझं प्रेम हरलं. तुला खरं सांगू आई , तुझ्या सगळ्या इच्छा मी आजवर पूर्ण केल्या पण रमाचा आणि माझा सुखाचा संसार असावा ही तुझी इच्छा मला नाही पूर्ण करता आली.तिला हे सगळं नकोय. तिला वेगळं व्हायचंय आई वेगळं. ऐन तारूण्यात माझ्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरवल्यावर किती पोरका झालो होतो मी. पण माझं बाळ , माझं बाळ तर बालपणीच त्याच्या आईच्या मायेला पोरकं होणार आहे. कसं सारवेन मी हे सगळं ?" आज राघव मनातलं सगळं बोलत होता त्याच्या हृदयात साठवलेल्या आजवरच्या भावना तो मोकळेपणाने आईजवळ मांडत होता. तो अगदी सायंकाळपर्यंत आईच्या खोलीत बसून राहिला.


रात्री बाबा घरी आले. शीलाकाकूंनी सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला होता. राघवची आई गेल्यापासून घरातली सगळी जबाबदारी शीला काकू सांभाळत होत्या. घरातल्या एक सदस्यच बनल्या होत्या त्या. गेली तीस वर्ष घरात राहिल्यामुळे घरातल्या सगळ्यांचे चेहरे त्यांना वाचता येत होते. आज राघव आणि रमा दोघांचा मूड खराब आहे हे ही त्यांच्या लक्षात आले होते. पण त्या काहीही बोलल्या नाहीत. त्यांनी जेवणासाठी सगळ्यांना आवाज दिला. सगळेजण टेबलवर येऊन बसले.

आज शीला काकूंनी सगळा स्वयंपाक रमा आणि राघव यांच्याच आवडीचा बनवला होता. पण रमा मात्र जेवणाच्या ताटावर बसली आणि वासाने तिला उचमळायला लागले तशी ती धावतच बेसिनकडे गेली.


राघवच्याही घशाखाली घास उतरत नव्हता. त्याच्या जीवाची होणारी घालमेल त्याच्या बाबांच्या लक्षात आली.

बाबा म्हणाले , "शीला अहो काय झालेय रमाला ? तिची तब्येत ठीक नाहीये का ? काय रे राघव ? मी चार दिवस घराबाहेर गेलो नाही की लगेच आजारी पडली माझी सून." 

शीला हसून म्हणाली ,"साहेब आता हे असेच होणार. घरात पाळणा हलणार आहे."

"काय!" आनंदाने उभे राहात राघवचे बाबा म्हणाले.

"हो बाबा ,आजच टेस्ट केलीय. पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत." पण हे सांगताना राघवचा चेहरा म्हणावा तितका आनंदी दिसत नव्हता ही गोष्ट बाबांच्या लक्षात नाही आली पण शिलाकाकूंना जाणवली.

"अरे व्वा! मी आजोबा होणार आहे तर. आजपासून रमाला जे खावेसे वाटेल तोच मेनू सगळ्यांसाठी बनवा. राघव तू जाऊन रमाला काय खावेसे वाटते ते विचार आणि चक्कर वगैरे येत असेल तर तिला थोडा आराम करू दे." राघवचे बाबा म्हणाले.


राघव होकारार्थी मान हालवत काळजीने रमाच्या पाठोपाठ गेला. त्याने तिला आधार देण्यासाठी आपला हात दिला पण रमाने त्याच्याकडे पाहिलेही नाही. ती बेडरूम मध्ये जाऊन एसी ऑन करून रिलॅक्स चेअरवर बसली.


राघव रमाच्या पाठोपाठ आत आला आणि तिला म्हणाला , "रमा तुला काय खावेसे वाटते ते तू मला सांग. मी बनवेन तुझ्यासाठी , आपली नजर फिरवून राघव सावरासावर करत म्हणाला ,म्हणजे माझ्या बाळासाठी मला हे करावेच लागेल."


रमाला कळतील का राघवच्या भावना ?

पाहूया पुढील भागात क्रमशः

©®सौ. प्राजक्ता रामराजे पाटील

🎭 Series Post

View all