जिंकलेल्या प्रेमाची गोष्ट.. भाग -२

रमा राघवच्या प्रेमाची गोष्ट..
भाग -२


"मला घरी बनवलेले काहीही खायची मुळीच इच्छा नाहीये. आता मला हॉटेलमध्ये डिनर करण्याची प्रचंड इच्छा झाली आहे. जी तू कधीच पूर्ण नाही करू शकणार." रमा तोऱ्यात म्हणाली.

"का नाही पूर्ण करू शकणार ? तू बघच आता." राघव म्हणाला.

"शक्यच नाही. तुला काय ठाऊक आहे माझी चॉईस ? हम्म गावठी लोक. आपल्या या गावाशिवाय आणि त्याच्या विकासाशिवाय आहे दुसरे काही ध्येय तुमचे ? आणि या तुमच्या आदर्श गावात आहे असे एखादे हॉटेल ? ज्यामध्ये हा सरपोदरांचा ,सॉरी सरपंचांचा लेक आपल्या बायकोला घेऊन जाईल." रमा तावातावाने बोलत होती.


" माझ्या गावाबद्दल तू काही बोलूच नकोस. इथल्या मातीशी नाळ जोडली आहे माझी. त्यामुळे माझा कितीही पाणउतारा केलास तरी मी सहन करेन पण गावाबद्दल नाही. तू पाच मिनिटांत तयार हो. इथे हॉटेल नसले म्हणून काय झाले ? तुझी इतकीच इच्छा असेल तर आपण शहरात जाऊया." राघव कितीही चिडला असला तरी तो रमाशी मात्र अगदी प्रेमाने बोलायचा.

रमा राघवच्या याच स्वभावाच्या नकळत प्रेमात पडली होती पण तिला हे मान्यच नव्हते.

अखेर राघव आणि रमा हॉटेलमध्ये पोहोचले. याआधी हॉटेलमध्ये गेल्यावर राघवला हॉटेल मॅनर्स कळतील का ? ही शंका घेणारी रमा आज मात्र निश्चित होती कारण त्या दिवशीचा तो प्रसंग तिच्या डोळ्यांसमोर अगदी ताजा होता. राघव आणि रमाची ती रात्र रमा अजूनही विसरली नव्हती. पेहेराव जरी ग्रामीण असला तरी त्यादिवशी राघवने दाखवलेले हॉटेल मॅनर्स आणि त्याचे फ्लुएंट इंग्लिश बोलणे रमावरच काय तिच्या मैत्रिणींवरही वेगळीच छाप पाडून गेले होते.


राघवने रमाच्या प्रत्येक फेवरेट डिश लक्षात ठेवून त्या ऑर्डर केल्या.

रमाला सॉफ्ट ड्रिंक्स खूप आवडतात हे माहीत असल्यामुळे राघव तिला म्हणाला , "रमा मला माफ कर. तुझी एक इच्छा मी पूर्ण नाही करू शकत. सध्या तरी तू सॉफ्ट ड्रिंक्स घेऊनच नये असं मला वाटतं. त्यामुळे फक्त नऊ महिने तू सॉफ्ट ड्रिंक्स टाळ. त्यानंतर तुला हवे ते तू खाऊ पिऊ शकशील .माझ्या बाळासाठी एवढं करशील ना ?" राघवने रमा समोर अक्षरशः हात जोडले.


रमा म्हणाली ,"अरे तू मला या अशा लग्नाच्या बेडीतून मुक्त करतोयस म्हटल्यावर सॉफ्ट ड्रिंक्सच काय ,तू म्हणशील ते सोडायला मी तयार आहे." रमा हसत हसत म्हणाली.

'इगो सोड रमा. तो सोडलास की तुला माझ्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी दिसतील आणि तू कायमची माझ्याजवळ राहशील पण तुला ते नकोच असेल तर मी तुला नाही फोर्स करणार.' हताश होऊन राघव मनात बोलत होता.

"अरे आता कसला विचार करतोयस ? मी म्हणाले ना नाही घेणार मी सॉफ्ट ड्रिंक्स म्हणून." रमा म्हणाली.


"नाही कसला नाही ." राघव पाणावलेले डोळे टिपत तिथून निघून गेला.


रमा विचारात पडली होती. ती विचार करू लागली.
'आजवर मी राघवला काहीच कसे विचारले नाही की तो इतके फ्लुएंट इंग्लिश कसे बोलू शकतो ? गावाकडे राहूनही तो सगळ्या गोष्टीत इतका परफेक्ट कसा काय आहे ? मेन म्हणजे त्यादिवशी त्याने मला आणि माझ्या मैत्रिणींना चांगलेच इम्प्रेस केले होते म्हणूनच कदाचित मी त्याच्या इतक्या जवळ गेली असेल. राघवला कुर्ता घालून केतकीच्या पार्टीमध्ये आलेले पाहिल्यावर सगळ्यांनी मला किती टोमणे मारले आणि मी ही किती चिडले होते. लगेच ग्लासामागून ग्लास ड्रिंक्स घेतली. स्वतःवरचा ताबा गमावल्यावर किती शांतपणे राघवने मला सावरले , ते ही न चिडता आणि तो माझ्या मैत्रिणींसमोर त्यादिवशी त्यांना समजेल अशा भाषेत जे फाड फाड इंग्रजी बोलला ना मला तर वाटले त्याचे शिक्षण फॉरेन कंट्री मध्ये झाले की काय ! खरंच राघव तू परफेक्ट आहेस पण माझ्यासाठी नाही हे ही तितकेच खरे.' आज पहिल्यांदा रमा कसल्या तरी विचारात पडली होती आणि गालातल्या गालात हसतही होती. राघव जवळ आलाय याचेही तिला भान नव्हते.

राघव म्हणाला ,"रमा प्रेमात पडल्यावर माणसाची ही अशी अवस्था होते. प्रेमात पडलीस की काय कोणाच्या ? आता तू मला बिनधास्तपणे तुझ्या मनातल्या गोष्टी बोलू शकतेस हो ना ? बोल कोणाचा विचार करतेस?" राघव चुटकी वाजवत रमाला विचाराच्या तंद्रीतून बाहेर काढत म्हणाला.


"तुझाच."रमाच्या या वाक्याने राघवच्या डोळ्यांत वेगळीच चमक दिसली.


"माझा विचार करतेस ?" राघव आश्चर्याने म्हणाला.

रमा पुढे चटकन म्हणाली , "तुझा म्हणजे , आजवर मी तुला तुझ्या पास्टविषयी कधी विचारलंच नाही हा विचार करत होते. प्रेम वगैरे म्हणशील तर माझ्याच्याने ते शक्यच नाही. मला कोणाच्याही बंधनात अडकायचे नाहीये. स्वच्छंद जगायचेय एकटीने."रमा म्हणाली.


"हम्म. म्हणूनच तर तुझी ही इच्छा मी पूर्ण करतोय." राघव.


"त्यासाठी तुला बिगवाला थँक्स ! पण आता मला खरं खरं सांग. तू त्या दिवशी एवढा फ्लुएंट  इंग्लिश कसा काय बोललास ?" रमा.


"जाऊ दे रमा , आता आपण वेगळे होणार आहोत तर माझा भूतकाळ जाणून घेऊन काही फायदा आहे का ?" राघव.


"अरे आपण वेगळे होणार म्हणजे फक्त नवरा बायको नसू पण चांगले मित्र आयुष्यभर राहणार आहोत. तुझ्यासारखा चांगला मित्र मला गमवायचा नाहीये. सांग ना गावी असून तुला  एवढे कसे माहिती ?" रमा आज मनमोकळेपणाने राघवशी बोलत होती.


"म्हणजे तुला असे म्हणायचे आहे की ,गावच्या लोकांना टेबल मॅनर्स माहीत नसतात." राघव.


"राघव अरे वाद नको ना घालू. पुन्हा गावच्या लोकांविषयी माझ्या तोंडून काही गेले तर आपला वाद होणार आणि मला आता वाद नकोय." रमा .


"तुला माहितीय रमा. माझे बाबा आमदार म्हणून सहज निवडून आले असते पण आजवर त्यांनी सरपंच म्हणूनच गावाची सेवा का केली कारण त्यांना गावाविषयी , गावातल्या लोकांविषयी प्रचंड आत्मियता आहे. आजवर कित्येक गरीब कुटुंबातील मुलांना त्यांनी आर्थिक मदत देऊन मोठमोठ्या पदांवर अधिकारी बनताना पाहिलेय. कित्येकांना आमदार ,खासदार होणेही बाबांच्या मदतीमुळे शक्य झाले आहे. त्यातलेच तुझे बाबा एक.
(रमाच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. आमदाराची लेक म्हणून रमा एवढ्या ऐटीत घरात वावरत होती. तिचे गडगंज श्रीमंत बाबा राघवच्या बाबांच्या मदतीवर मोठे झाले आहेत हा तिच्यासाठी खूप मोठा धक्का होता.)
अग अशी काय पाहतेस. आजवर मी तुला कधीच बोललो नाही पण हे खरंय आणि हे सत्य तुला तुझ्या बाबांनीही कधी सांगितले नसेल कारण त्यांच्याकडून माझ्या बाबांनी वचनच घेतले होते केलेले उपकार सांगून जर तुझी मुलगी लग्नाला तयार होत असेल तर मला तशी सून नकोय. इतकेच काय तू शहरात कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकणार आणि मग माझा मुलगा अडाणी असेल तर तू त्याला कशी पसंत करणार ? म्हणून माझ्या बाबांनी गावच्या शाळेतच कॉन्व्हेंट स्कूलसारख्या शिक्षणाची सोय केली ." राघव.


आता मात्र रमाला राघवबद्दल थोडीशी सहानुभूती वाटली आपण राघवशी किती चुकीचे वागलो याची जाणीवही तिला झाली. पण तिच्या थोरामोठ्यांच्या मैत्रिणी तिला काही तिचा युगो बाजूला ठेवूच देत नव्हत्या. त्यातल्याच एका मैत्रिणीचा तिला फोन आला आणि ती म्हणाली ,
"रम तुला माहितीये आम्ही आता मस्त लॉंग ड्राईव्हला निघालोय." मैत्रिणीचे हे वाक्य ऐकल्यावर रमाला पुन्हा आपण लग्नाच्या बेडीत का अडकलोय ? असे वाटून ती लगेच राघवला म्हणाली, "निघूया का आपण?"


दरवेळी रमाला येणारा फोन आणि तिचा बदलणारा मूड हे आता राघवच्या परिचयाचे झाले होते.


मानेनेच होकार देत राघव आपल्या स्टाईल मध्ये उभा राहत गाडीकडे वळला. रमाही त्याच्या पाठोपाठ गाडीत जाऊन बसली.


रमा राघवच्या प्रेमाची गोष्ट अपूर्णच राहणार का ?

पाहूया पुढील भागात क्रमशः

©®सौ.प्राजक्ता पाटील

🎭 Series Post

View all