Login

जिंकलेल्या प्रेमाची गोष्ट ..भाग -३ (अंतिम भाग)

रमा राघवच्या जिंकलेल्या प्रेमाची गोष्ट
भाग -३


दिवसा मागून दिवस जात होते .राघव स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त रमाची आणि त्यांच्या बाळाची काळजी घेत होता. रमाला नववा महिना सुरू होता. दोन दिवसानंतर रमाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम अगदी थाटात होणार होता. रमाचे बाबा तर खूप खुश होते. जरी रमाचे तिच्या मनाविरुद्ध  लग्न केले असले तरी माझी लेक आता मातृत्वाची जबाबदारी पेलायला तयार झालीय म्हणजे नक्कीच राघवने तिचे मन जिंकले असेल हा विचार करून ते रमाच्या आईला म्हणाले , "आज जानकी ताईंनी जे वचन मागितले होते त्या वचनाची पूर्तता झाली. रमा आणि राघवचा सुखाचा संसार हेच तर हवे होते जानकी ताईंना. खरंच रमा राघवची अर्धांगिनी झाली तेव्हाच त्यांच्या ऋणातून मुक्त झाल्यासारखे वाटत होते पण आता तर ती त्यांच्या घराण्याला वारस देणार आहे याहून दुसरे सुख दुसरे असूच शकत नाही." रमाचे बाबा.


राघव आणि रमा एकमेकांपासून थोड्या दिवसांत वेगळे होणार आहेत हे फक्त रमाच्या आईला ठाऊक होते रमाच्या बाबांच्या बोलण्याला त्यांनी काहीच प्रोत्साहन दिले नाही.

"हम्म."म्हणून डोळ्यातील अश्रू टिपत त्या बाहेर निघून गेल्या.


'आता हिला काय झालं निघून जायला ?' हा विचार मनात करत रमाचे बाबा त्यांच्या पाठोपाठ येणार तोपर्यंत त्यांना महत्त्वाचा कॉल आला आणि ते बाहेर निघून गेले.


इकडे रमाच्या घरी ही कार्यक्रमाची लगबग सुरू होती. राघव मात्र उदास होता. कारण आता थोड्याच दिवसांत रमा त्याच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार होती. राघवचे मन आता रमा हळूहळू ओळखू लागली होती. राघवकडे पाहत असतानाच अचानक तिचा पायऱ्यांवरून पाय घसरला. रमाची ती अवस्था पाहिल्यावर राघव पुरता घाबरला. त्याने तिला उचलले आणि लगेच हॉस्पिटल गाठले.

"रमा तुला काही होणार नाही. तू घाबरू नकोस. मी आहे तुझ्यासोबत. देवा माझ्या रमाला काहीच होऊ देऊ नकोस." राघव देवाकडे विनवणी करत होता.


हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर रमाची अवस्था पाहून डॉक्टरांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. डॉक्टरांनी तिला ओटीमध्ये नेले. रमावर उपचार सुरू झाले. रमाचे आई-बाबाही हॉस्पिटलमध्ये पोहोचले. रमाच्या आई-बाबांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.


तितक्यात डॉक्टर बाहेर येऊन राघवला म्हणाले , "मिस्टर राघव आम्ही बाळ किंवा आई या दोघांपैकी एकाचाच जीव वाचवू शकतो. आता तुम्ही सांगा."


राघवच्या डोळ्यांतून अश्रू ओघळू लागले. तो डॉक्टरांना हात जोडून गयावया करू लागला.
"प्लीज डॉक्टर असं नका ना बोलू. मी माझ्या बाळाशिवाय आणि रमाशिवाय नाही जगू शकणार."

"डॉक्टर हे काय बोलताय तुम्ही ? तुम्हाला हवी ती मदत आम्ही करू पण प्लीज माझ्या रमाला काही होऊ देऊ नका." रमाच्या बाबांना गहिवरून आले होते.

आईचा कंठ दाटून आला होता.

राघवने आजवर रमासाठी किती केले होते पण रमाने त्याला कधी समजूनच घेतले नाही हे आईला ठाऊक होते. तरीही आज त्याने आपल्या मुलीलाच वाचवावे ही रमाच्या आईची मनापासूनची इच्छा असली तरी राघवला हे कोणत्या तोंडांने सांगवे हेच त्यांना कळत नव्हते.

"मिस्टर राघव वेळ फार कमी आहे. तुम्ही पटकन उत्तर द्या." डॉक्टर.

राघव म्हणाला ,"डॉक्टर तुम्ही रमाला वाचवा."

रमाच्या आई-बाबांनी राघव समोर हात जोडले. आईला राघवच्या मनाचा मोठेपणा पाहिल्यावर पुन्हा खजिल झाल्यासारखे वाटले.


डॉक्टर ऑपरेशन थेटरमध्ये निघून गेले. तब्बल दोन तासानंतर डॉक्टर बाहेर आले ते ही छोट्याशा बाळाला हातात घेऊनच.

"काँग्रॅच्युलेशन ! तुम्ही बाबा झालात. गोड परी जन्माला आलीय." बाळाला राघवच्या हातात देत डॉक्टर म्हणाले.

राघवची नजर रमाला शोधत होती.

"डॉक्टर रमा कुठेय ? ती कशीय?" राघव चटकन बोलून गेला. पाठोपाठ स्ट्रेचरवरून रमालाही  रूममध्ये शिफ्ट करण्यासाठी आणले जात होते हे पाहिल्यावर राघवला डॉक्टर म्हणाले , "ही बघा आली तुमची रमा. बाळ आणि बाळंतीण दोघेही अगदी ठीक आहेत."


राघवच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळत होते. रमाच्या आई-बाबांच्या आनंदालाही पारावर उरला नाही. ते दोघे रमाच्या स्ट्रेचरपर्यंत धावत गेले.  आई बाबांनी रमाच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला.

पेढे , गिफ्ट ,कितीतरी मौल्यवान गोष्टी रमाच्या आणि राघवच्या बाबांनी हॉस्पिटलमध्ये सर्वांना दिल्या.

इतके सगळे असले तरी राघव आणि रमाच्या आई मात्र आनंदी दिसत नव्हत्या. आता डिस्चार्ज द्यायची वेळ जवळ आली होती. रमाची डिलिव्हरी झाल्यापासून राघव रमाजवळ जास्त थांबतही नव्हता.

रमा आईला म्हणाली , "आई मला राघवशी बोलायचय."

रमाला नेमके काय बोलायचे असेल ? हे आईला ठाऊक होते.


आई म्हणाली , "रमा तुला हवा तो निर्णय घे पण सारासार विचार करून घे. आज तुला नवा जन्म मिळालाय तो राघवमुळेच. जेंव्हा डॉक्टरांनी विचारले बाळ आणि आई यांच्यापैकी कोणाला तरी एकाला वाचवावे लागेल तेंव्हा राघवने तुला वाचवायला सांगितले. तुला तर माहितीये तो त्याच्या बाळावरती जन्माला येण्याआधी पासून किती प्रेम करत होता ते. तू आमच्या घरी जन्म घेतलास ही देखील राघवच्या आईचीच पुण्याई आहे. त्या माऊलीने आम्हाला मूल व्हावे म्हणून सव्वा महिन्याचा कडक उपवास केला होता आणि आज राघवने त्याच्या सुखाचा त्याग केला." रमाच्या आई आवंढा गिळून म्हणाल्या.


रमाच्या डोळ्यासमोरून तिच्या आणि राघवच्या आयुष्यातील छोटे मोठे क्षण झरझर सरकले. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. रमाच्या आईने राघवला आत पाठवले होते.

रमा रडतेय हे पाहिल्यावर राघव तिचा हात हातात घेऊन म्हणाला , "रमा तुला काही त्रास होतोय का ? मी डॉक्टरांना बोलवू का ?"

रमाने त्याचा हात घट्ट पकडला आणि ती म्हणाली ,"  राघव मला माफ कर रे. मी खूप चुकलेय. तू किती मोठ्या मनाचा आहेस. तू खूप चांगला आहेस."

"रमा याला प्रेम म्हणतात अगं. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच मी माझ्या निर्णयावर अजूनही ठाम आहे. आजच बाबांशी बोलून मी तुला या लग्नाच्या बंधनातून मुक्त करेल." राघव.

"नाही राघव मला तुला आणि माझ्या बाळाला सोडून कुठेच नाही जायचंय. नकोय मला ते स्वातंत्र्य. मला फक्त तू हवा आहेस. तुझं निस्वार्थ प्रेम हवं आहे. मला माफ करशील ना ?" रमा राघवच्या हातांवरती गाल टेकवून म्हणाली.


डोळ्यातील आनंदाश्रू पुसत , होकारार्थी मान हालवत राघवने रमाच्या डोक्यावरून हात फिरवला. तिला आपल्या छातीशी घट्ट पकडले. खऱ्या अर्थाने आजपासून त्यांच्या जिंकलेल्या प्रेमाच्या गोष्टीची नवी सुरुवात झाली होती.