स्त्री..प्रत्येकाची जबाबदारी (भाग एक)

आयुष्यात नव्याने उभी राहिलेली ती स्त्री..
"आई.. ए आई.. अगं माझा डब्बा देतेस ना! मला उशीर होतोय ऑफिसला जायला."टेबलवर ठेवलेलं घड्याळ हातात घालत आणि भिंतीवरच्या घड्याळात वाजलेत किती बघत ती म्हणाली.

"हो...झाला डब्बा.." एका हाताने किचनचा पडदा बाजूला करत प्रमिला ताई लेकीचा डब्बा घेऊन आल्या.

"थँक्यू आई. लव्ह यू..उम्मा..चला बाबा जाते मी.

तिचं वाक्य मधेच तोडत प्रमिला ताई म्हणाल्या.

"अग्ग..कितीदा सांगितल तुला..नेहमी येते बोलावं." प्रमिलाताई म्हणाल्या.

"सॉरी आई सॉरी.. बरं येते मी आणि तुम्ही दोघेही औषधं वेळेवर घ्या ओके..आई तुझ्या बीपीच्या गोळ्या आज संध्याकाळी घेऊन येते गं. आता चला बाय बाय...निघते मी...सॉरी...येते मी." पायात चपला घालत भरभर जिने उतरत ती घाईघाईत निघून गेली.

"सांभाळून जा गं.." प्रमिला ताई पाठून आवाज देत हात हलवत म्हणाल्या.

घरासोबत आई बाबांची काळजी करणारी घराची एकुलती एक कमावती लेक घराचा आधार घरातला कर्ता पुरुष असणारी घरची लेक.. जिज्ञासा.
आर्मीमध्ये भरती होऊन सीमेवर लढायला जायचं. देशाचं रक्षण करायचं स्वप्न होतं तिचं. नावाप्रमाणे जिद्द होती तिच्यात. प्रत्येक कामात चोख. देशसेवेच वेड होतं तिला पण तिच्या हेल्थ इश्युमुळे ती सैन्यात भरती होऊ शकत नव्हती. आपली देशसेवेची इच्छा आपण सीमेवर न जाताही पूर्ण करू शकतो हे तिचं ठाम मत होतं.
बऱ्याच सोशल साईड वर ती ॲक्टिव होती. एका एन.जी.ओ. मध्ये एच.आर. या पदावर कार्यरत होती. एका अपघातात वडिलांनी दोन्ही पाय गमावेल त्यामुळे घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर होती. आई घरी शिवणकाम करायची आणि बाबा घरात बसून बसून प्रमिलाताईंना मदत म्हणून फॉल पिको आणि सोबत घरातली इतर छोटी मोठी कामं करत बसायचे. जसं की भाज्या निवडणे, कांदा चिरून देणे, पीठ मळणे..त्यातच त्यांचा वेळ निघून जायचा आणि नुसतं बसून खातोय ही भावना ही मनात यायची नाही.

सगळ छान आलबेल सुरू होतं. तिघेही खाऊन पिऊन सुखी.. समाधानी होते. जिज्ञासाच्या मेडिकल इश्यूमुळे तिने लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. तिचा हा निर्णय अर्थात आईबाबांना पटला नव्हता तरी लेकिवर कोणतीच जोर जबरदस्ती करायची नाही असं त्यांनी ठरवलं होतं.

एन.जी. ओ मध्ये एक नवीनच मुलगा रुजू झाला होता. नाव होतं अमोल...
हसरा.. खेळकर..खोडकर..मनमिळाऊ असा मुलगा होता तो. कामाच्या बाबतीत जिज्ञासा फार शिस्तप्रिय होती. दिलेल्या मुदतीत काम झालं नाही तर सगळेच तिची बोलणी खायला कान तिच्या समोर घेऊन हजर असायचे. बॉसगिरी फक्त ऑफिसमध्ये असायची. ते ही फक्त कामाच्या वेळेत. ऑफिसमधून बाहेर आल्यावर त्यांची जिज्ञासा मॅडम सगळ्यांसोबत फक्त जिज्ञासा बनून जायची. लेट नाईट आउटिंग पासून पब..पार्टी वैगरे सगळ पण वेळेचं आणि जबाबदारीचं भान ठेवून.

अमोल सगळ्यांसोबत छान जुळवून घेत होता. त्यातच त्याला जिज्ञासा आवडू लागली आहे असं सारखं वाटत होतं. त्याने तिच्यासमोर तसं कबूल केलेलं नसतं कारण तो ही याबाबतीत श्योर नव्हता. त्यात ती लग्न करणार नाहीये असा तिचा निर्णय त्याला त्याच्या इतर कलिग मित्रांकडून कळला होता.
क्रमशः..
©®श्रावणी लोखंडे..


🎭 Series Post

View all