स्त्री.. प्रत्येकाची जबाबदारी (भाग तीन अंतिम)

आयुष्यात नव्याने उभी राहिलेली स्त्री..
कॅब मध्ये बसल्यावर दोघेही एकमेकांशी बोलले नाही. जिज्ञासा तिचं घर आल तशी उतरली आणि पाठी न बघता सरळ निघून गेली. तिच्या डोळ्यातलं पाणी त्याने पाहिलं होतं. घरी जाऊन फ्रेश झाल्यावर तिने अमोलला मॅसेज केला.

"उद्या सकाळी ठीक साडे सातला एस.पी गार्डन मधे भेट."

"ओके..!" तिचा मॅसेज बघून अमोलने लगेच रिप्लाय दिला.


आईबाबा...मला तुमच्याशी बोलायचं आहे.

"बोल ना बाळा!" प्रमिलाताई म्हणाल्या.


"आमच्या ऑफिसमध्ये एक नवीन मुलगा रुजू झाला होता असं म्हणाले होते मी..म्हणजे त्याला जॉइन होऊन तसे सहा सात महिने झालेत आज त्याने मला प्रपोज केलंय!" बाबांकडे बघत ती म्हणाली.


"तू काय उत्तर दिलंस बाळा?" बाबांनी विचारलं


"उद्या भेटायला बोलावलं आहे त्याला."जिज्ञासा म्हणाली.

"तुझा जो काही निर्णय असेल तो नेहमी सारखा आम्हाला मान्य असेल. हे बघ बाळा...आमच्यासाठी तू तुझा विचार करणं सोडू नको. आम्हाला माहीत आहे तुझ्या लग्न न करण्याच्या निर्णयाच कारण पण तरी सुद्धा तू एकदा विचार करावा असं आम्हाला दोघांनाही वाटते. तुझा संसार फुलताना बघण्याची तर आमची सुद्धा इच्छा आहे " डोळ्यांच्या कडा पुसत बाबा म्हणाले.

"मी उद्या बोलेन त्याच्याशी..मग बघू. चला..झोपते आता आणि तुम्ही पण झोपा." जिज्ञासा म्हणाली.

सकाळी ठरल्या ठिकाणी दोघे भेटले. सकाळ असल्याने गार्डनमध्ये जास्त कोणी नव्हत. एका झाडाखाली असलेल्या बाकड्यावर दोघेही बसले.


"माझ्यावरच प्रेम का करावं वाटलं तुला?" जिज्ञासाने विचारलं.


"वाटलं म्हणून प्रेम करता येतं का?" अमोल म्हणाला

"तसं नाही पण मीच का? ऑफिसमध्ये माझ्या आयुष्याबद्दल सगळ्यांना माहीत आहे तू सुद्धा अनभिज्ञ नसशील." जिज्ञासा म्हणाली.


"हो,म्हणजे मला सगळी कल्पना आहे. पण तुझ्या सोबत जे झालं ते इतर कोणासोबत ही होऊ शकतं."त्याने उत्तर दिलं.


"पण त्यामुळे माझं पावित्र्य भ्रष्ट झालं त्याच काय? काय चूक होती माझी. दोन वर्ष लागली मला त्यातून बाहेर पडायला. ते दरिंदे आता गजाआड असले तरी माझ्यासोबत झालेला अतीप्रसंग जीवघेणा होता तो कसा विसरू मी. आजही वाटते संपवावं स्वतःला. किळस वाटते स्वतःच्या शरीराची. कितीतरी वेळा झोपेत जाग येते आणि काळवेळ न बघता अंगावर थंड पाणी घेऊन नखांनी ओरबाडते मी स्वतःला. तितकं कमी वाटलं त्यांना म्हणून एसिड फेकून माझा चेहरा पण खराब केला त्यांनी. लहानपणापासून आर्मी मध्ये भरती व्हायचं स्वप्न होतं माझं ते तर पूर्ण झालंच नाही. लग्न करून आईबाबांनी मला सुखी बघावं हे ही मी करू शकत नाही कारण ज्यावेळी माझ्यावर अतिप्रसंग ओढावला आणि त्यांनी मला मारहाण केली. पोटात लाथा बुक्क्यांनी मारलं...त्या सगळ्यात माझ्या गर्भपिशवीला इजा झाली आणि ती काढावी लागली. अमोल...तू एका अश्या मुलीवर प्रेम करतोयस जी तुझ्यासोबत चार लोकांत उठून दिसणार नाही कारण तिला रूप नाही. एका अश्या मुलीसोबत तुला आयुष्य जगायचं आहे जी तुला बाप होण्याचं सौभाग्य कधीच देऊ शकत नाही. खरं सांगायचं तर आजवर माझ्या या चेहऱ्यामुळे कोणत्याच मुलाने प्रेम केलं नाही. तरी सुद्धा आईबाबांच्या आग्रहाखातर मी गेल्या काही महिन्यात पाच ते सहा स्थळं पाहिली. प्रत्येकाला कामात असलेली माझी पोस्ट आणि पैसा दिसला रे.. " डोळ्यातलं पाणी पुसत ती म्हणाली.


"मला एक सांग माझं हे रूप असचं राहणार आहे का? अगं कधी ना कधी हे रूप सुद्धा नष्ट होणार आहे कारण रंग रूप देह हे नश्वर असतं. तुझ्या भूतकाळात तुझ्या सोबत जे झालं ते आपण पुसू शकत नाही पण त्यातून बाहेर निघण्यासाठी प्रयत्न तर करू शकतो ना? राहिला प्रश्न मी बाप नाही होऊ शकत तर आपण एखादं बाळ दत्तक घेऊ. त्या बाळाला आईबाबा भेटतील आणि आपल्याला बाळ. हे बघ..मला माहित आहे या गोष्टी माझ्या घरी समजावणं खूप जास्त कठीण आहे पण अशक्य तर नाही ना? तु यासगळ्याचा विचार करत तुझं पुढचं आयुष्य का वाया घालवतेस?"अमोल म्हणाला.


"तुझ्या सगळ्या गोष्टी मला मान्य आहेत अमोल..पण तुझ प्रेम मला मान्य नाही. दोन वर्षांत पहिल्यांदा आईबाबा सोडून दुसरं कोणीतरी माझ्यावर प्रेम केलंय आणि मी त्या व्यक्तीला आयुष्यभरासाठी दुःख नाही देऊ शकणार. आज तुला इथे भेटायला बोलावलं कारण तुझ्या प्रश्नाचं उत्तर मला सगळ्या गोष्टी क्लिअर करून द्यायचं होतं. अमोल..मला तुझं प्रेम मुळीच मान्य नाही. तू छान..सुंदर.. तुझ्या योग्य मुलगी बघून लग्न कर आणि तुझा संसार सुखाने फुलू फळु दे..इतकीच माझी इच्छा आहे..प्लीज अमोल.."ती तिथून उठून निघत होती की त्याने तिचा हात धरला.

काही गोष्टी आपल्या हातात असतात तेंव्हाच सावरायचं असतं
नंतर झालेला आयुष्याचा पसारा आवरताना तारांबळ उडते.
अमोल..यातून बाहेर पड. तुझीच काय..मी आणखी कोणाचीही होऊ शकत नाही..किंवा मलाच व्हायचं नाही आणखी कोणाचं. तू माझा खूप चांगला मित्र आहेस. आपण मित्र बनुनच राहुयात. त्याला कुठल्याही नात्याच लेबल नको देऊयात.

एवढं बोलून जिज्ञासा तिथून निघून सरळ घरी आली.

"आईबाबा..मी अमोलला नाही म्हणाले. त्याच माझ्यावर खूप प्रेम आहे पण बाबा..मला त्याच आयुष्य खराब करायचं नाही ओ.." असं म्हणून तिने बाबांच्या कुशीत शिरून हंबरडा फोडला.

(आजही कितीतरी अतिप्रसंग ओढावलेल्या मुली त्यांचं आयुष्य जगण्यासाठी घाबरतात. सगळ्या इच्छा आकांक्षाना तिलांजली देतात. काही जगतात तर काही जणी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळतात. सगळ्यांच्या घरी आई, बहिणी,मामी,काकी आहे..प्रत्येक मुलाने जर स्त्री कडे आदराने पाहिले तर असे प्रसंग कोणत्याच मुलीवर.. बाईवर ओढवणार नाहीत. अठ्ठ्यात्तरावा स्वातंत्र्यदिन असला तरी स्त्री अजूनही स्वतंत्र नाहीये.. आणि स्वतंत्र असलेली स्त्री सुरक्षित नाहीये. कित्येक मुली त्यांच्यावर होणाऱ्या अतीप्रसंगामुळे एकतर स्वतःचा जीव गमावतात किंवा आपला आत्मविश्वास गमावतात आणि ज्या मुली यातून सावरून नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न करतात त्या पुढचं आयुष्य जगायला घाबरतात..गरज आहे ती सगळ्यांनी आपापली जबाबदारी स्विकरण्याची. बाहेर असलेली स्त्री अथवा मुलगी कोणाची तरी आई किंवा बहिण आहे हे समजून वागण्याची.)
समाप्त...
©®श्रावणी लोखंडे..


🎭 Series Post

View all