स्त्री.. प्रत्येकाची जबाबदारी (भाग दोन)

आयुष्यात नव्याने उभी राहिलेली स्त्री
"अमो.. ल अरे ती वांद्रे सरांची डोनेशन वाली फाईल कुठे आहे रे? नाही म्हणजे काल मी इथेच माझ्या डेस्क वर ठेवली होती. आता इथे दिसत नाहीये. मला चांगल आठवतंय मी इथेच ठेवली होती. तू पाहिलीस का कुठे?" जिज्ञासा अमोलला विचारत होती.

"नाही मॅम..म्हणजे मीच ती फाईल काल निघण्याआधी तुम्हाला दिली होती. आणि मी तर आत्ताच तुमच्या पाच मिनिटं आधीच आलोय ऑफिसमध्ये!" अमोल म्हणाला.

"अरेच्चा..मग गेली कुठे ती फाईल? भानामती झाली की काय? असो.. इथली फाईल आहे म्हणजे इथेच असेल.
बरं अमोल ऐक ना.. गेल्या महिन्यात अंध मुलांच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या काही शालेय वस्तू आपल्याला देण्यात आल्या होत्या. त्याची सगळी डिटेल्स मला मेल करशील आणि हो त्या कृपा महिला आश्रमातून महिलांच्या पगारातील छोटा हिस्सा त्यांनी आपल्या एन.जी.ओ ला खूप विश्वासाने दिला आहे. त्यातून त्यांनी लहान मुलांच्या अनाथ आश्रमाला उपयोगी वस्तू भेट म्हणून द्यायला सांगितल्या आहेत. त्यांचे एच.आर येतीलच पण ते वाटपाच्या दिवशी येतील. त्या पैशांमध्ये जे काही सामान येईल ते घेऊन त्याची डिटेल्स पण मला मेल कर." जिज्ञासा म्हणाली.

"ओके मॅम. मी लगेच कामाला लागतो आणि ती फाईल पण शोधून ठेवतो." शांतपणे उत्तर देऊन अमोल केबिन बाहेर निघून गेला आणि त्याच्या डेस्क जवळ जाऊन लॅपटॉप मध्ये डोकं खुपसून बसला.

ऑफिसची वेळ संपल्यावर सगळे आपापल्या घरी जायला निघाले जिज्ञासा बराच वेळ ऑफिसमध्ये इतर फाईल चेक करत थांबली होती. रात्री नऊच्या सुमारास ती ऑफिसमधून बाहेर पडली. गेट बाहेर खुर्चीत अमोल बसलेला तिला दिसला.

"अमोल..तू गेला नाहीस अजून? अरे वाजले बघ किती!"जिज्ञासा म्हणाली

"मी तुझी वाट बघत थांबलो. तू एकटीच घरी जाणार एवढ्या रात्री आणि मी पण तर तुझ्या इथूनच वीस मिनिटांवर पुढे राहतो. म्हणून म्हटलं एकत्रच जाऊया."अमोल म्हणाला.


"बरं..ठीके! मी कॅब बुक करते."जिज्ञासा म्हणाली.

"नको तू थांब, मी करतो."असं म्हणत त्याने लगेच कॅब बुक केली.


"अमोल..काही झालं आहे का? नाही म्हणजे आज तू गप्प गप्प दिसतोस म्हणून विचारलं? रोज सारखा खोडकर अमोल आज उगवलाच नाही."गमतीत तिने विचारलं

"हम्म.. खरंतर मला तुझ्याशी बोलायचं होतं. कॅब यायला उशीर आहे तोवर बस इथे."बाजूला असलेली चेअर पुढे सरकवत तो म्हणाला.

"हम्म..बोल!" खुर्चीवर बसत जिज्ञासा म्हणाली.


"जिज्ञासा..माझ्या बोलण्याने तू काय आणि कशी रिॲक्ट होशील मला माहित नाही पण..जिज्ञासा...आय लव यू.. माझं तुझ्यावर प्रेम आहे..लग्न करशील माझ्याशी? " तिच्या डोळ्यात डोळे घालून तो म्हणाला.


"अमोल..तू काय बोलतोयस तुला कळतय का?" डोळ्यातलं पाणी पुसत तिने विचारलं.

"हो, मला खूप चांगल कळतंय. मी खोडकर असलो तरी चांगल्या वाईटाची समज आहे मला. आधी वाटलं होतं तुझ्याप्रती मला आकर्षण आहे पण गेले काही दिवस खूप विचार करून मी या निर्णयाला पोचलो आहे की हे आकर्षण नाही.. प्रेम आहे."बोलतांना तिच्या नजरेला नजर भिडवत बोलणारा अमोल मनातून घाबरला होता.


"आपली कॅब आली."लाईटचा उजेड डोळ्यावर पडताच ती म्हणाली.

कॅबवाल्याने अमोल कडून डिटेल्स घेतली आणि मग अमोलने जिज्ञासासाठी कॅबचं दार उघडलं.

ती सुद्धा ओढणी सावरत आतल्या बाजूला सरकून बसली.

क्रमशः
©®श्रावणी लोखंडे..

🎭 Series Post

View all