Login

स्त्री जन्मा तुझी कहाणी..

स्त्री जन्मा ही तुझी कहाणी..

#स्त्री_जन्मा_तुझी_कहाणी..
#सुनो_द्रौपती_शस्त्र_उठाओ..

काल मणिपूरमध्ये घडलेली घटना ऐकली. जीवाचा थरकाप उडवणारी.. त्वेषाने पेटून उठावं अशी. किती विदारक चित्र.. माणुसकीला काळिमा! दोन महिलांना विवस्त्र करून रस्त्यावरून फिरवलं गेलं. अनेक पुरुषी हात त्यांच्या विवस्त्र देहावरून फिरत असतील. अनेक आर्त किंकाळ्या ऐकू आल्या असतील. अनेक पाशवी नजरा त्यांच्या देहावर रोखल्या असतील. देव जाणे! मन सुन्न झालं. अनेक बलात्काराच्या घटना डोळ्यासमोर फेर धरू लागल्या. अनेक पीडित मुलींचे आक्रोश, कर्कश किंचाळ्या.. अगदी कानठळ्या बसवणाऱ्या.. ऐकु येऊ लागल्या. मनात आग आणि डोळ्यात पाणी..

काय करणार आहोत आपण? काही नाही.. उघड्या डोळ्यांनी चॅनेल्स बदलून बदलुन बातम्या पाहत राहणार. अरेरे!! वाईट झालं अस म्हणत थोडे दिवस हळहळ व्यक्त करणार. फार फार तर मेणबत्या पेटवून निषेध व्यक्त करणार आणि नंतर त्या घटनेला विसरून अगदी सवयीचं होणार. पोटापाण्याच्या विवंचनेत आपापल्या मार्गाने जाणार. पुन्हा जैसे थे!

आजची स्त्री प्रगतशील. कोणत्याही क्षेत्रात अग्रेसर. चूल आणि मूल या संकल्पनेला सुरुंग लावून बाहेरच्या जगात अधिराज्य गाजवणारी. राष्ट्रपतीपद भूषवण्यापासून, मंगळावर पोहचलेली. क्रीडा, साहित्य, राजकारण, समाजकारण प्रत्येक क्षेत्रात अग्रगण्य असलेली. लोकल चालवण्यापासून विमान उड्डाण यशस्वी पार पाडणारी. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून यशस्वीपणे कार्यरत असणारी. होय आजचीच स्त्री.

मग ती इतकी का हतबल व्हावी? का तिच्या देहाची विटंबना? खरं तर ही विटंबना फार पुरातन काळा पासूनच. अगदी सत्ययुगापासूनच.. रामायण, महाभारतापासूनच स्त्री ही कायमच शोषित, पीडित. कधी स्वतःचं पावित्र्य सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा, आणि अग्निपरीक्षा देऊनही पतीने त्याग करावा? हीच शोकांतिका. भर सभेत वस्त्रहरण व्हावं आणि तिथे बसलेल्या लोकांनी उघड्या डोळ्यांनी फक्त पाहत राहावं. का? तेव्हापासून ते आजपर्यंत फक्त बघ्याची भूमिका अगदी चोखपणे पार पडणारा हा आपला समाज आजही अगदी तसाच. अगदी नपुंसक असल्यासारखा.

मागे नवरात्रीच्या वेळीस अशीच एक पोस्ट वाचली. दांडियाला जाणाऱ्या मुलींसाठी होती. "सूनो लडकियो अपनी मर्यादामे रहो तो दुनिया औकात मे रहेगी. मातारानी को खुश करने जाना है! शहरवालोंको नही।" आणि त्याच्या सोबत मुलींचे उघडया पाठीचे फोटो. काय म्हणावे याला? .कशाचं हे नागवेपण? म्हणजे मुलींच्या वेशभूषेवरून दुनियेची औकात ठरणार तर? आणि ती फक्त मनोरंजन करण्याचं साधन ठरणार तर? ती फक्त भोगवस्तू आहे का? जर वेशभूषेवरून तिचं चारित्र्य ठरत असेल तर काय म्हणावं? आणि अशा तोकड्या कपड्यांमुळे बलात्कार होत असेल आणि तर अहो, त्या तीन वर्षाच्या निष्पाप मुलीवर अत्याचार नसता झाला हो! अगदी अंगभर कपडे असतांना सुद्धा.. हो अगदी बरोबर ऐकलंत.. तोकडे कपडे घातले काय किंवा अंगभर बुरखा घातला काय पाहणाऱ्याच्या वासनाधीन नजरा त्याला हवं तेच पाहतात. खरं तर हे नागवेपण पुरुषांच्या विचारात आहे. स्त्रीला एक भोगवस्तू म्हणून पाहणाऱ्या पुरुषांच्या पाशवी नजरेत आहे.

जेव्हा पुरुषाला जगात कुठे पुरुषार्थ दाखवण्यासाठी जागा उरत नाही तेंव्हा अशा रीतीचे कृत्य करून आपला पुरुषार्थ सिद्ध केला जात असावा. पण यात त्या स्त्रीचा काय दोष? तिने फक्त या मानसिक विकृतीला बळी जायचं? हेच दुर्दैव आजच्या शापित स्त्रीचं की दोष तिच्या स्त्री असण्याचा? न उमगणार कोडं..

'बलात्कार' या नुसत्या शब्दांनी अंगाचा थरकाप व्हावा. नुसत्या विचारांनी मन सुन्न व्हावं. मग त्या पीडित स्त्रीने कसा सहन करावा तिच्यावर होणारा अत्याचार? कधी शारीरिक तर कधी मानसिकही.. इथेच हे पर्व थांबत नाही दुर्दैवाने त्या नतंरही तिच्यावर वारंवार बलात्कार होत राहतो. पुन्हा पुन्हा.. कधी लोकांच्या बीभत्स नजरेतून तर कधी कोर्टात चालू असलेल्या उलट तपासणीत. प्रत्येक वेळीस शोषित तर फक्त एक स्त्रीच.

तस पाहिलं तर हा बलात्कार नेहमीच होत राहतो. कधी दरवाज्याआड समाजमान्य विवाह संबंधात तर कधी बाहेर चारचौघात. आणि तेंव्हाही दोषही फक्त स्त्रीलाच दिला जातो. का? मग तिच्या वेशभूषेला तर कधी संध्याकाळी सातच्या घरात नसण्याला कारणीभूत ठरवलं जातं. तर कधी तिच्या रात्री अपरात्री मुलांसोबत बाहेर असण्याला जबाबदार ठरवलं जातं.

अरे कोणत्या जगात वावरतोय आपण? कसला हा समाज? भावनाशून्य असलेला. जंगली श्वापदे सारी.. परमेश्वराने बुध्दी देऊनही जनावरंच राहिलेली. स्वतःला माणूस म्हणवून घेणारी. स्त्री पुरुष समानतेच्या गप्पा सांगणारे अशा वेळीस कुठे जातात? उंच तुझा झोका गं असं म्हणत तिच्या कर्तुत्वांचे पोवाडे गाणारा ‘सो कॉल्ड’ समाज अशावेळीस जातो कुठे? माणुस म्हणवून घ्यायची लाज कशी वाटत नाही?

मनात येतं, अशा नराधमांना तसच जाळून मारायला हवं. शिवाजी महाराजांनी जसा असा अत्याचार करणाऱ्याला चौरंग केला होता; अगदी तशीच शिक्षा व्हायला हवी. कधी कधी वाटतं साऊदी अरेबिया सारखी हुकूमशाही राजवट असावी. तिथे अशा गुन्हेगारानां इतकी कठोर सजा होते की परत कोणी तसा गुन्हा करण्याची हिंमत करत नाही. असं ऐकिवात आहे. तशीच शिक्षा करण्यात यावी म्हणजे तसे गुन्हेगार घडणार नाहीत; पण हे कधी होईल? होईल की नाही माहीत नाही.

खरं तर हे चित्र बदलण्यासाठी आपल्यालाच पाऊल उचलण्याची गरज आहे. कायदे अजून कडक करायला हवेत. कायदेभंगाची शिक्षा त्याहूनही कडक असायला हवी. आपल्याच घरापासून सुरुवात करायची म्हणत असाल तर आपल्या मुलांवर चांगल्या संस्कारांची गरज आहे. मुलगा मुलगी एक समान ही भावना रुजवायला हवी. चांगलं वाईट याची समज देण्याची गरज आहे. मुलींकडे फक्त भोग वस्तू म्हणून न पाहता सन्मानाने पाहायला शिकवण्याची गरज आहे. मानसिक विकृती पासून दूर ठेवण्याची गरज आहे. ‘तू मुलगा आहेस म्हणून काहिही करू शकतो’ या भ्रमातून बाहेर काढण्याची गरज आहे; पण तोपर्यंत काय? फक्त सोसणं, सहन करणं.. उघड्या डोळ्यांनी पाहत राहायच. आसवं गाळत म्हणत राहायचं हे स्त्री! आजही तू बंदिनीच आणि स्त्री जन्मा हीच तुझी कहाणी.

नाही.. आता द्रौपदीने जागं व्हायला हवं. आता तिचे बंधुराज भगवंत श्रीकृष्णदेव तिला वाचवायला येणार नाही. तिलाच शस्त्र उचलायला हवं. तिची लढाई तिलाच लढली पाहिजे. आता फक्त अश्रू ढाळून चालणार नाही. आपल्याला उठावं लागेल. संघटित व्हावं लागेल आणि अशा नपुसंक समाजाविरुद्ध आवाज उठवावा लागेल. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला सन्मानाने वागवायला हवं. एकमेकांच्या हक्कासाठी लढायला हवं. अशा श्वापदांची वेळीच नांगी ठेचायला हवी तरच अशा नराधमांना अद्दल घडेल.
समाप्त..
©अनुप्रिया..
२१.०७.२०२३


0